“आम्ही यवतमाळकर” म्हणून यापूर्वी वर्षा फाटक यांनी लिहिलेले आहेच. तरीही आज पुन्हा “आम्ही यवतमाळकर” विषयी यवतमाळ निवासी निवृत्त माहिती उपसंचालक श्री सुधाकर धारव यांचे लेखन प्रसिद्ध करण्याचे कारण म्हणजे एकच गाव, त्या गावातील व्यक्तींना कसे वेगळे वाटू शकते, त्याचे हे उदाहरण होय. त्यात पुन्हा पहिल्या लेखिका आहेत तर दुसरे लेखक आहेत, त्यामुळे आठवणी, दृष्टीकोण यातही फरक आढळून येईल…….
‘इतिहास संशोधक अँड.य.खु.देशपांडे, राष्ट्रीय पुढारी बापूजी आणि लोकमतचे सर्वेसर्वा जवाहरलाल दर्डा यांचे जे गाव तेच माझे गाव, यवतमाळ !
या गावाला पेन्शनरचे गाव म्हणतात. कारण या गावात भरभराट होण्यासाठी आवश्यक असणारी साधने नाहीत. मुख्य म्हणजे नदी नाही, रेल्वे मार्ग नाही, राष्ट्रीय राजमार्ग नाही, त्यामुळे मोठी बाजारपेठ नाही. तरी मला यवतमाळ आवडते कारण माझा जन्म येथे झाला. शिक्षण येथे झाले आणि नोकरी येथेच लागली !
माझे वडील, आजोबा, पणजोबा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी होते. आमचं घरदार, शेजारी पाजारी आणि मनमिळावू लोक हीच आमची संपत्ती.
मारे सत्तर -पंचाहत्तर वर्षांपूर्वी हे गाव म्हणजे एक आटपाट नगर. तीन सिनेमागृह होती. राजकमल, सरोज आणि श्याम. मी पाहिलेला पहिला सिनेमा संत तुकाराम, आजी बरोबर. बेल, फुल, अक्षदा घेऊन गेलो होतो. राजकमल टॉकीज व्ही.शांतराम यांचं होतं. जयश्री आणि व्ही शांताराम या गावात येऊन गेले. त्यांचे नातेवाईक काळे साहेब व वनकुद्रे येथेच राहत होते.
सरोज टॉकीज मध्ये नाटकं येत असत. पृथ्वीराज कपूर, त्यांची नाटक मंडळी घेऊन येथे आले होते. दिवार, गद्दार ही त्यांची नाटकं. तेव्हा साउंड सिस्टिम नव्हती. बहुतेक कलाकार, दामुअण्णा माळवणकर, शांता आपटे, धुमाळ, श्रीराम लागू पासून अमिताभ बच्चन पर्यंत सर्वांची पायधूळ यवतमाळला लागुन गेली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे नेहमी येत असत. ते त्यांच्या भजनी मंडळासह पारवेकरांच्या बंगल्यावर उतरत असत. त्यांच्या भजनाला खूप गर्दी होत असे. आसपासच्या खेडयातील लोक बैलगाडीने येथे येत असत. तसेच गाडगे बाबांचं कीर्तन चौतीस कलमात म्हणजे आजाद मैदानावर होत असे. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळाच्या गजरानं आसमंत दुमदुमून जात असे. आबाल वृद्ध किर्तन संपेपर्यंत उठत नसत.
आम्ही नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकलो. सर्व शिक्षक वडिलांच्या बरोबरीचे, ओळखीचे पण धाक खूप मोठा असे. खरं जीवन येथेच घडलं. पहिल्या वर्गात सं. घोटे दुसरीत गंजीवाले, तिसरीत गोंधळेकर नी चौथीत पां.भो.दाभेरे सर होते. नगर परिषदेच्या ए. व्ही. स्कुलमध्ये आठवीपर्यंत शिकलो. तेथे अरुण हळवे, शरद आकोलकर, डॉ.सुरेश देशपांडे, डॉ अशोक साठे, दत्ता सास्तीकर इत्यादी विद्यार्थ्यां सोबत होतो.
सरकारी हायस्कुल मध्ये श्लोकायुक्त गुलाबराव पाटील, उद्योगपती अमोल मुनोत, मेजर करंदीकर, मुख्य अभियंता तांबे, मुख्य पोष्टमास्तर जनरल, दिक भालचंद, डॉ श्रीखंडे, इत्यादी विद्यार्थी होते.हेडमास्तर के.बी.गोडबोले, व्ही.एल.देशपांडे, गणोरकर, गोखले यांनी आम्हाला घडवलं. शाळेत एन.सी.सी. ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम नियमित होत. जीवन घडविण्यास ह्या लहान लहान गोष्टी कारणीभूत झाल्यात हे विसरून चालणार नाही.
त्यानंतर गावात अमोलकचंद महाविद्यालय, दाते कॉलेज, महिला महाविद्यालय, महिला मंडळ इत्यादी शैक्षणिक संस्था निघाल्या आणि सुशिक्षितांची संख्या वाढत गेली.
यवतमाळचे गुलाबराव कदम आणि सिद्धार्थ विनायक काणे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झालेत ही अभिमानाची गोष्ट आहे.
आझाद मैदानातील महादेवाचे हेमाडपंथी मंदिर येथील सर्वात जुने मंदिर. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. तसेच तळ्यांचा गणपती, राममंदिर, विठ्ठल मंदिर, दत्तमंदिर येथील आध्यात्मिक केंद्र भाविकांची आकर्षणाची केंद्र आहेत.
१९०२ साली यवतमाळ जिल्हा झाला. हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे इंग्रजांनी हेच जिल्ह्याचे ठिकाण केले. त्यानंतर तेथे टाऊन हॉल नावाची मोठी इमारत झाली. नगर परिषद आली, जिल्हाधिकारी कार्यालये, दगडी इमारती बांधल्या गेल्या.
येथे सर्वात जास्त लोक, शेतकरी आणि शेतमजूर होते. कापूस आणि ज्वारी येथील प्रमुख पिके. जमीन काळी कसदार. लोक मेहनती, काबाड कष्ट करून पोट भरणारे.वरण भाकर, मिरचीचा ठेसा हे त्यांचे मुख्य अन्न. देवावर विश्वास ठेवणारे, उपासतापास श्रद्धापूर्वक करणारे होते.
आता श्याम मानव, अंधश्रद्धा निर्मूलन वाले जवळच असलेल्या कळंबचे. या गावात मारुतीची मंदिरे चारही दिशांना आहेत. मशिदी पण सुशोभित केलेल्या आहेत. तर चर्च आणि गुरुद्वारा पहाण्यालायक आहेत. सन १९५८ – ५९ साली डॉ. राजेंद्र प्रसाद, प्रथम राष्ट्रपती, पंडित जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे, इंदिरा गांधी वगैरे मोठे मोठे लोक या गावाला भेट देऊन गेले.
गाव लहान असल्यामुळे लक्षात रहाण्यासारखी काही लोक आहेत जे गरीब असले तरी मायाळू होते.
बनी भाजीवली, तिच्याजवळूनच सर्वांनी भाजी घेतली पाहिजे. किती वाजले ते सांगणारा वामनराव कतरणी, कलाकारांमध्ये चिंधे, पेंटर, बनकर बंधू, मुर्तीकार, पेंटर वामनराव शिरभाते, नाटककार बाळ वगारे, पांडमाजी पुंडकर, (स्त्री भूमिका करणारे) दादा राऊत इत्यादी व्यक्ती आणि वल्ली पण होऊन गेल्यात. हीच माणस यवतमाळचं वैभव होत. या सर्वांना भय्याजी दर्डा संध्याकाळी गांधी चौकात भेटत असत.
लंडनच्या आजी बनारसे यवतमाळला रहात होत्या. त्यांची मुलगी इथेच आहे. त्याही आता आजीबाई झाल्यात.
नवीन यवतमाळात निळोण्याचा पाणी पुरवठा, सराफ बाजार, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मोठमोठी कार्यालये, पक्ष कार्यालये, इत्यादी निघाली. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे उद्योगधंदे पुढे आले. रेमंडचा कारखाना, चौकातील दिव्याचा, सिमेंटचा इत्यादी लहान मोठे उद्योग औद्योगिक विकास क्षेत्रात सुरू झाले. त्यामुळे स्वयंचलित वाहनांची संख्याही वाढली. रस्ते मोठे झाले.दळणवळण वाढले. पण माणसं विखुरली.
वृत्तपत्र क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. पहिले वृत्तपत्र हरिहर गिरी यांनी काढले. आता येथे दैनिक, साप्ताहिक, मासिक यांची यात्राच लागली आहे. तरीपण शरद अकोलकरांचे दैनिक लोकदूत, मतदार,
नमो महाराष्ट्र, महासागर, सिंहझेप इत्यादी वृत्तपत्रे नियमित निघतात.
वर्षातून दोन वेळा भावे मंगल कार्यालयात पुस्तकांचे प्रदर्शन भरते. लोकांचे राहणीमान सुधारले. वीज, रस्ते, पाणी यांची समृद्धी लाभली पण पूर्वीचा माणूस काळाच्या पडद्याआड हरवला.
तुकडोजी महाराज म्हणतात माणूस द्या, मज माणूस द्या ! मला हवा माणूस भला.
माझं घर
आयुष्याच्या संध्याकाळी येथे आहे. माणसाला अजून काय हवं असतं ? समाधान ! फक्त अन्नपूर्णेसारखी पत्नी, मित्रासारखा मुलगा, मैत्रिणी सारखी सुन, सावली सारखा नातू नी फुलपाखरासारखी नात सोबत असल्यावर, मरणा न भीत मी तुजला ! म्हणून माझं कुटुंब, दोस्तमित्र ओळखीचा परिसर, माझा आवडता गाव – मातृभूमी- यवतमाळ…..
चार भिंती म्हणजे घर नव्हे.
विश्वास हेच घर.
क्षण एक पुरे प्रेमाचा !
वर्षाव पडो मग मरणाचा !

– लेखन : सुधाकर धारव
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
मित्रांनो,
आजच्या न्युज स्टोरी टुडे ब्लॉगच्या सुरूवातीलाच ” आम्ही यवतमाळकर ” च्या पुनरावृत्ती बद्दल संपादकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही लेखिका – लेखकांचे आपल्या गावाबद्दल अर्थात यवतमाळ खुद्द बद्दल खूप छान विचारांची मांडणी केली आहे. मात्र शहरी भागातील विविध सांस्कृतिक व कमी जास्त औद्योगिक विकास कसा झाला याची सुंदर माहिती दिलेली आहे.
मी सुद्धा ” ग्रामीण भागातील यवतमाळकर ” असल्यामुळे तिसरे लेख लिहावे काय ? असे विचार नव्हे मोह मनात निर्माण होत आहे. परंतु काही असो ” आम्ही यवतमाळकर ” च्या दोन्ही “यवतमाळकर लेखिका – लेखकांचे मनापासून अभिनंदन !!
राजाराम जाधव,
सहसचिव सेवानिवृत्त
महाराष्ट्र शासन
छान अप्रतिम लेख