शेतकरी आणि सिनेमा
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सिनेमा माध्यमातून वेळोवेळी प्रभावीपणे आवाज उठविलेला दिसतो.
अशाच काही निवडक चित्रपटांचा हा मागोवा.
हॉलीवुड आणि जागतिक सिनेमा असो की भारतीय बॉलिवूड जगत, शेतकरी विषयावर अनेक सिनेमानी प्रकाश टाकला आहे. ग्रेप ऑफ व्रथ (1940), फील्ड ऑफ ड्रीम (1989), दि रिअल डरट ऑफ फार्मर्स आणि जपानी कृषी शास्त्रज्ञ मासानोबु फुकुओका याच्या ‘एका काडीची क्रांती’ वरील लघुपट, आदींनी या विषयाला अधोरेखित केले आहे.
भारतीय सिनेमात दो बिघा जमीन, मदर इंडिया, उपकार, लगान आदी सिनेमांनी या विषयाला ठळक केले आहे.
सुरवात करूया, ‘दो बिघा जमीन’ (1953)या सिनेमाने. त्यातील पुढील एका संवादाने.
“जमीन तो किसान की माँ होती है,
माँ को बेच दू ?”
“अरे तुझे उससे क्या मिलता है ?”
सिनेमातील नायक शेतकरी शंभू (बलराज सहानी) आणि जमीनदार (मुराद) यांच्यातील हा संवाद. जमिनदाराला आपल्या कारखान्यासाठी शेतकरी शंभूची जमीन हवी आहे. “तुझी जमीन दे नाही तर घेतलेले 253 रु. कर्ज परत कर.”
त्यावर, जिंदगी मे मैने 50 रु. नही देखे ,253 रु.कहा से लाऊगा ?”, हे हतबल शंभूचे उत्तर. शेवटी आपली जमीन परत मिळविण्यासाठी तो शहरात जाऊन रिक्षा चालवितो.
या सिनेमातील ‘हरीयाली सावन ढोल बजाता आया’ हे पावसाचे स्वागत करणारे लता, मन्नाडे यांच्या आवाजातील गीत असो की रोजगारासाठी शहराकडे निघालेल्या शंभूच्या तोंडी असलेले, भाई रे, गंगा जमना की गहरी है धार/आगे या पिछे सबको जाना है पार/धरती कहे पुकार के /बीज बिछाले प्यार के/मौसम बीता जाय/अपनी कहानी छोड जा/कुछ तो निशानी छोड जा/कौन कहे इस ओर / तू फिर आये या ना आये .. गीत शैलेंद्र. संगीत सलील चौधरी. प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांनी ‘बाइसिकल थिवज’ या इटालियन सिनेमातून प्रेरणा घेत हा सिनेमा बनविला होता.
बाइसिकल थिवज मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर बेकारीमुळे उध्वस्त कामगार जीवन दाखविले होते.
रॉय यांनी सावकार आणि शेतकरी यावर आधारित सिनेमा बनविला होता. बलराज सहानी, निरुपा राय, मीनाकुमारी या कलाकारांच्या अभिनय आणि गीत संगीताबरोबरच शेतकऱ्याच्या प्रश्नावर हा सिनेमा आजही माईल स्टोन मानला जातो.
मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ (1957) शेतकरी आणि सावकार या विषयावरील महत्वाचा चित्रपट.
नायिका राधा (नर्गिस दत्त), नायक बिरजू (सुनील दत्त) आणि रामू (राजेंद्र कुमार) या माय लेकरांचा गावचा सावकार सुखीलाल बरोबरचा संघर्ष या चित्रपटात चितारला आहे. आज देखील तोच संघर्ष विविध स्वरूपात कायम आहे. ‘दुनिया में हम आये है, तो जीना ही पडेगा/जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा/ गिर गिर के मुसीबत मे संभलते ही रहेंगे, जल जाये मगर आग पे चलते ही रहेंगे … (आवाज : लताजी, गीत- शकील बदायुनी, संगीत नौशाद)
मराठीत ‘अरे संसार संसार, सिनेमात शेतकरी आणि सावकार यांची ही गोष्ट रंजना आणि कुलदीप पवार या कलाकारांनी आपल्या अभिनयाने पडद्यावर साकारली होती. त्यातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेले, प्रा.विठ्ठल वाघ लिखीत,’ काळ्या मातीत मातीत/तिफण चालते, तिफन चालते/इज थयथय नाचते/ढग ढोल वाजवतो/ढोल वाजवतो, ढग ढोल वाजवतो..हे अनिल अरुण यांनी संगीत दिलेले गीत खूपच श्रवणीय आहे.
अवर्षण आणि नापिकी, कर्जापायी होणाऱ्या आत्महत्या यावर प्रकाश झोत टाकणारा गाभ्ररीचा पाऊस (2009) चांगलाच गाजला होता. गिरीश
कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, अमन अत्तर यांनी अभिनय केलेला हा सिनेमा शाहीर ‘विठ्ठल उमप’ यांच्या आवाजातून डोळ्यात पाणी आणतो. ‘आभाय कुठं गेलं, डोय काचाचं पक्षी झालं/आता पाऊस येऊ दे ग माय, हे माझं, माता माय….डोळ्यात पाणी आणते.
‘पिपली लाईव्ह (2010) या सिनेमाने देखील प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले होते. एका शेतकऱ्याची आत्महत्या आणि त्याला मीडियाने दिलेले प्रोपोगंडा कव्हरेज यावर सत्य पण विनोदी पद्धतीने केलेलं भाष्य, यामुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. ओमकार दास माणिकपुरी, रघुबीर यादव आणि नवाझुदिन सिद्धीकी यांनी अभिनित या सिनेमात रंग भरले होते. ‘सखी सैया ताहे खूब कमाल है, महंगाई डायन खात है’ हे गीत वाढत्या महागाई बाबत विचार करायला लावते. या गीतात सोयाबीन आणि मका पिकाला शेतकऱ्याला काय भाव मिळतो असा प्रश्न उपस्थित केला आहे.
‘कडवी हवा’ (2017) हा असाच एक शेतकरी आत्महत्या आणि कर्जवसुली या विषयाबरोबरच हवामान बदलाचे परिणाम यावर भाष्य करणारा चित्रपट. राजस्थान आणि ओरिसा समुद्र किनारपट्टी समीप गावांच्या उजाडीकरणाची पार्श्वभूमी असलेला सत्य घटनेवरील हा चित्रपट. संजय मिश्रा यांनी केलेली अंध शेतकऱ्याची भूमिका भाव खाऊन जाते.
तर रणवीर शौरी आणि तिलोत्तामा शोम यांनी रंग भरलेला, त्यातील एका गीतामुळे चांगलाच लक्षात राहतो. गुलजार यांनी हे गीत लिहिले आहे. ‘मै बंजर मै बंजर /मौसम बेघर होने लगा है/जंगल पेड पहाड संमदर/इंसा सब कुछ काट रहा है/छील छील के खाल जमीं की /तुकडा तुकडा बांट रहा है/आसमान से उतरे मौसम /सारे बंजर होने लगे है/….
मराठीत ‘झिंक चीक झिंग’ 2010 या भरत जाधव अभिनित आणि नितीन चंदन दिग्दर्शित सिनेमाने शेतकरी कर्जाची समस्या हाताळली होती. तर ‘गोष्ट डोंगराएवढी’ या मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे अभिनित सिनेमाने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या लोडशेडिंग समस्येवर प्रकाश टाकला होता.
ग्रामीण भागातून शहराकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या उत्तराखंडातील एका वृद्ध शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित मोतीबाग ही फिल्म देखील अतिशय महत्वाची आहे. 2019 ला ऑस्करसाठी पाठविली होती. तर ‘निरोज घोस्ट’ (2009) ही डॉक्यूमेंट्री फिल्म नामवंत पत्रकार पी साईनाथ यांनी सरकारी धोरणे शेतकऱ्यांना कशी संपवित आहेत यावर प्रकाश टाकते.
या चित्रपटाच्या यादीत ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती ‘हे गीत असलेल्या उपकार सिनेमाला (1967) विसरून कसे चालेल ?मनोजकुमार अभिनित आणि दिग्दर्शित उपकार सिनेमा ‘जय जवान जय किसान’ या घोषवाक्यावर आधारित होता. भारताचे तेव्हाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सुचविल्यानुसार मनोजकुमार यांनी 1965 च्या भारत – पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर तो तयार केला होता.
चित्रपट सदरातून शेतकरी विषयावर घेतलेला हा थोडक्यात आढावा. मनोरंजन नव्हे तर प्रबोधन करणारा !

– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800