आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम सातपुड्यातील बालाघाट या डोंगरदऱ्यात वसलेल्या गावाचे रहिवासी असुन ते पहिले आदिवासी गिर्यारोहक आहेत.
अनिल वसावे यांनी यावर्षी दोन गिर्यारोहण मोहिमात भाग घेतला. पहिली मोहीम प्रजासत्ताक दिनानिमित्त 360 एक्सप्लोर गृप द्वारे आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच शिखर किलीमांजारो (उंची 19,341 फुट) याची यशस्वी चढाई सकाळी 11.15 वाजेला पुर्ण केली. यावेळी अनिल वसावे यांनी किलीमांजारो शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून व भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला व भारत देशाचे नाव उज्ज्वल केले.
दुसरी मोहिमेत जुलै महिन्यात त्यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रुस शिखर सर केले. त्या बद्दल इंटरनॅशनल माऊंटनेर व विश्व विक्रमवीर म्हणून नाशिक येथे त्यांना गौरवण्यात आले.
नुकताच अनिल वसावे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम नंदूरबार जिल्ह्यातील भांगरापाणी येथील आदिवासी आश्रमशाळेत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव सांगताना त्यांनी सांगितले की, टांझानिया देशातील किलीमांजारो शिखर सर करत असतांना वातावरण अतिशय खराब होते. त्यातही शुन्याच्या खाली तापमान, घोंगाणारे वारे, पडणारा बर्फ, उभी चढण या सर्वांमधून अतिशय काळजीपुर्वक मोहीम पुर्ण केली.
ते पुढे म्हणाले की, गिर्यारोहण हा साहसी खेळ प्रकार असून आर्थिक दृष्ट्या न परवडणारा आहे. मला दोन्ही मोहिमा अंतर्गत आई, मित्र परिवार, मार्गदर्शक आनंद बनसोडे, आदिवासी संघटना व आदिवासी विकास विभागाने तीन लाख रुपये अशी आर्थिक मदत केली. परंतू ही मदत कमी असल्यामुळे अक्षरशः मोलगी बाजारात फिरून दुकानदार व नागरीकांकडून एक- एक रुपया गोळा करून मोहिमेसाठी पैसे उभारले.
आगामी मोहीम
अनिल वसावे यांचे आता दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंचीचे ॲकोनकागुवा हे 6980 मीटर उंचीचे शिखर सर करण्याचे ध्येय आहे. येत्या 20 डिसेंबर पासून ते या मोहीमेस सुरुवात करणार असून या मोहिमेसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
या मोहिमेसाठी अनिल यांना प्रशिक्षक, येण्याजाण्याचा खर्च, स्पर्धा प्रशिक्षण यासाठी जवळपास 19 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. मात्र अतिशय गरीब कुटुंबातील त्यांना हा खर्च झेपणारा नाही. म्हणून त्यांनी आदिवासी विकास विभागाकडे न्युक्लीअर बजेट अंतर्गत निधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्ताव दिला आहे. तसेच आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, आदिवासी आयुक्त यांनादेखील निवेदन दिले आहे. अनिलचा निधीसाठी पाठपुरावा सुरु असुन त्याला विभागाकडुन निधीची प्रतिक्षा आहे. डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत अनिल चढाईस सुरुवात करणार आहेत.
भविष्यात आदिवासी मुलांसाठी अकॅडमी उभारण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच आता सुद्धा ते गरिब आदिवासी मुलांना गिर्यारोहणाचे धडे देत आहे. परिस्थिती काहीही असली तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्या ध्येयासाठी झटत राहा. प्रयत्न करत रहा. यश निश्चित मिळतेच. फक्त आपण प्रामाणिकपणे मेहनत व काम करत राहिले पाहिजे असा मोलाचा संदेश ते विद्यार्थ्यांना देतात.

– लेखन : संजय अहिरे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
अभिनंदन अनिल सर
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
अनिल वसावे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन,
आपला गाव, तालुका, जिल्हा, राज्य ,देश यासाठी
अभिमानास्पद कामगिरी.
धन्यवाद मित्रा.