पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माजी सभापती कै जयंतराव टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा निरोप समारंभ पत्रकार भवनातं काल आयोजित केला होता. दैनिक केसरी चे विश्वस्त संपादक डॉ दीपक टिळक आणि माजी संपादक अरविंद व्यं गोखले यांनी जयंतराव टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांनी स्वागत केले आणि कार्यवाह गजेंद्र बडे यांनी आभार मानले.
या निमित्ताने कै जयंतराव टिळक यांचे पत्रकार संघ आणि प्रतिष्टान यांच्या वर असलेल्या ऋणा बाबत प्रतिष्ठानचा संस्थापक विश्वस्त कार्यवाह म्हणून माझे (प्रा डॉ किरण ठाकूर) संस्मरण येथे देण्याचा मोह आवरत नाही. ते येथे देत आहे.
जयंतराव टिळक आम्हाला पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून लाभले हे आमचे भाग्य. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेत प्रतिष्ठान ची स्थापना करण्याचा निर्णय झाला आणि या विश्वस्थ
संस्थेचे नेतृत्व दादांनी करावे हे देखील इतके स्वाभाविक होते की कुठलीही, काहीही चर्चा न करता त्यांच्या अनुपस्थितीत निर्णय झाला. मुख्यतः रामभाऊ जोशी आणि गोपाळराव पटवर्धन आणि आनंद आगाशे यांच्यासमवेत इतर विश्वस्तां ची निवड झाली आणि मी विश्वस्त कार्यवाह म्हणून काम सुरू केले.
वास्तविक श्रमिक पत्रकार संघ म्हणजे कामगार संघटना आणि जयंतराव दादा हे मालक पत्रकार. इतर क्षेत्रांमध्ये मालक आणि श्रमिक यांच्या संबंधात असतात तसे ताणतणाव आमच्या या क्षेत्रातही असायला हवे होते. परंतु मी १९७४ पासून आतापर्यंत अनुभव घेतला आहे. या दोनही संस्थामध्ये एकही ताण-तणावांचा प्रसंग आल्याचं मला आठवत नाही. दादा आणि केसरी- मराठा संस्था यांच्यामध्ये खूप जिव्हाळ्याचे नाते नेहमीच राहिले.
मला एक वेगळाच प्रसंग आठवतो. तो १९६९-७० मध्ये पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात विद्यार्थी म्हणून मी प्रवेश घेतला तेव्हाचा. त्या वर्षी विभागाची प्रथमच ट्रिप दिल्लीला जाणार होती.. तिथे पोहोचल्यानंतर कळले कि संपूर्ण व्यवस्था दादांनी आपल्या स्वतःच्या निवासस्थानी केली होती. राज्यसभेचे सदस्य या नात्याने त्यांना मिळालेल्या निवासस्थानात त्यांनी ही व्यवस्था करून दिली होती. आम्ही तीस विद्यार्थी होतो. परंतु आमचा त्रास होतो किंवा अडचण होते असे त्यांनी जाणवू दिले नाही.
नंतर हळूहळू समजत गेले की पत्रकारिता विभाग सुरू करण्या साठी आणि नंतर सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केवढा हातभार लावला होता. विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीत स्वतः इंदुताई टिळक तर होत्याच पण केसरीच्या संपादन विभागातील श्रीमती मृणालिनी ढवळे यांना देखील त्यांनी पाठविले होते. त्यानंतर काही वर्षांनी डॉ दीपक टिळक यांनी विभागाच्या अभ्यासक्रमाला प्रतिष्ठा दिली. विभाग प्रमुख म्हणून केसरी च्या संपादक विभागातील श्री ल ना गोखले यांनी जबाबदारी स्वीकारण्यासाठी दादांनी प्रोत्साहन दिले.
पुणे पत्रकार संघ १९४० मध्ये स्थापन झाला. तेव्हापासून संघाचे काम केसरी च्या कार्यालयात चालायचे. इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट (आय एफ डब्ल्यू जे चे) अध्यक्ष केसरीचे माधवराव साने झाले, तेव्हा आणि नंतर १९७४ मध्ये या आमच्या फेडरेशनचे सतरावे वार्षिक अधिवेशन पुण्यात झाले. तेव्हा सर्व कामासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून जयंतराव यांनी सरकार दरबारी मदत केली आणि आणि एकूणच भरघोस पाठिंबा दिला. या कार्यक्रमात सुद्धा रामभाऊ जोशी, य वि नामजोशी, आणि संपादक अरविंद व्यं गोखले ही केसरीची जाणकार मंडळी आमच्या मदतीसाठी उभी होती.
या काळातच दादांचा माझ्याशी आणि इंडियन एक्सप्रेस चे त्यावेळचे बातमीदार प्रकाश करदळे यांच्याशी संबंध आला. पुणे श्रमिक पत्रकार संघ असे नामकरण झालेल्या या संघटनेचे शिस्तीत काम चालू राहिले. त्यानंतर त्यातून पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था उभी राहिली. या सगळ्या कामासाठी दादांचा पाठिंबा खूप मोलाचा ठरला.
प्रतिष्ठानचे काम १९९१ मध्ये सुरू झाले तेव्हा तर एवढा मोठा प्रकल्प उभा करण्यासाठी -मुख्यत: निधी उभा करण्यासाठी- आम्हाला दादांची खूप मदत झाली. त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांची आणि अन्य नेत्यांची आम्हाला जेथे-जेथे मदत लागली तेथे दादांच्या नुसत्या नावाचा सुद्धा उपयोग झाला. सार्वजनिक हितासाठी हा प्रकल्प उभारत आहोत हे आम्ही सांगत असू. त्याचा उपयोग झाला. मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासक या सर्वांवर दादांचा एक नैतिक धाक असायचा. त्याचा आम्हाला निश्चित फायदा झाला.
आमची पत्रकारांची संघटना असल्यामुळे सगळ्या गोष्टी सहज सोप्या असतील असे मानू नका हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वागण्याच्या पद्धतीमुळे आमच्यावर बिंबवले होते.
अनेक वेळा त्यांच्या बरोबर मी पुण्यातल्या उद्योगपती आणि अन्य धनिक यांना देणग्या साठी भेटायला गेलो आहे. त्या प्रत्येक वेळी ते गमतीने म्हणायचे ‘चला आपल्याला भीक घ्यायला जायचे आहे’ राजकीय आणि पत्रकारितेतील स्थानाचा गैरफायदा थोडादेखील न घेता आम्हाला मदत हवी आहे. सार्वजनिक कामासाठी याचकाची भूमिकाच आपण ठेवली पाहिजे हे त्यांनी आम्हाला चांगलेच बिंबवले होते.
या सगळ्याची आज आठवण होते आहे. त्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कार्यवाह आणि विश्वस्त यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद

– लेखन : प्रा. डॉ किरण ठाकूर
पुणे पत्रकार प्रतिष्ठान चे संस्थापक विश्वस्थ कार्यवाह
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
लेखनआवडले.
बरीच नवीन माहिती समजली .
Informative