पिकनिक गीतं
चित्रपट हिंदी असो मराठी सहल/पिकनिक विषयावर हमखास एखादे गाणं असतं. अशाच काही गाजलेली गाणी, काही विस्मृतीत गेलेली आजच्या सदरातून आपल्या भेटीला …
सहल/पिकनिक आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय.श्रम परिहार, विरुंगळा आणि ताजेतवाने होण्यासाठी वेळ मिळाला की कोठेतरी बाहेर मोकळ्या हवेत फिरून यायचे.मग कधी जमेल तसे सागर किनारा, नदी, तलाव, जंगल, किल्ले किंवा प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायची. सोबत मित्रमंडळी अथवा कुटुंब. मग धमाल मस्ती, गाणी, नाच, जेवण आदी जमेल तशी मजा करायची. कधी पायी, सायकल, बस, रेल्वे आणि मिळेल त्या वाहनांची मदत घेत पिकनिक करायची. शाळा, कॉलेज ते नोकरीच्या ठिकाणी मित्रांसोबत एन्जॉय केलेल्या अनेक सहलीच्या आठवणी मग मनात गुंजत असतात.
सिनेमा बघताना अनेकदा त्या चित्रगीतात आपण जणू त्या पिकनिक ग्रूपमध्ये स्वतःला पाहत असतो. असंच एक लोकप्रिय गीत आहे नर्गिस दत्त आणि प्रदीप कुमार यांच्यावर अभिनित अदालत (1958) या सिनेमातील. ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातील हा सिनेमा.
सायकलचा जमाना. साहजिकच या जोडीचा मित्रपरिवार सायकलवर पिकनिक धमाल करतो. त्यांच्यावर चित्रीत गाणं आहे, ‘जब दिन हसीन, दिल है जवान, क्यों ना मनाये पिकनिक/सीने में आग, ओठो पे राग, मिलजुल के गाए पिकनिक’. असंच एक ओल्ड अँड गोल्ड गाणं. पण विस्मृतीत गेलेलं.
चित्रपट आग्रा रोड(1957). कलाकार विजय आनंद आणि शकीला. नाही आठवत चेहरे. असू द्या. गाणं ऐकू या. ‘उनसे रिपी टीपी हो गई, क्या बात पक्की हो गई/’हिरो सायकलवर मोटारगाडी चालविणाऱ्या हिरोनला चेस करीत गाणं गातोय.
शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्यावर चित्रीत एक धमाल पिकनिक गीत आहे, दिल देके देखो (1959) या चित्रपटातील.’यार चुल बुला है, हसीन दिलरुबा है/झूठ बोलता है, मगर जरा ..बोलो जी दिवाना क्या करे/’.. आवाज मो.रफी आणि आशा भोसले. गीत मजरुह आणि संगीत उषा खन्ना.
तर देवानंद आणि नूतन यांनी अभिनय केलेले ‘दिल का भवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे’ हे गीत दिल्लीतील कुतूबमिनारची सफर घडवून आणते. तेरे घर के सामने (1963)चित्रपटाचे हे गीत आजही लोकप्रिय आहे.
तराने पुराने किंवा भुले बिसरे गीत ऐकताना कानात गुंजत राहते. मो.रफी यांच्या आवाजातील या गीताला संगीत दिले होते एसडी बर्मन यांनी तर गीत लिहिले आहे हसरत जयपुरी यांनी. सर्वानाच आवडणारे गीत.
वक्त (1965) नावाचा सिनेमा आठवतोय ? “चिनोय सेठ, जिनके घर शिशे के होते है वह दुसरे के घर पर पत्थर नही मारते’ या राजकुमार यांच्या डायलॉग साठी प्रसिद्ध पावलेला. या सिनेमातील ‘दिन है बहार के, तेरे मेरे इकरार के, दिल के सहारे आजा प्यार करे’ हे गीत एक सुंदर पिकनिक गीत आहे. एका नौकेत मित्रपरिवार साजरे करीत आहे. शर्मिला टागोर आणि शशिकपूर यावर चित्रीत हे गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायले आहे.
आशा भोसले मो रफी आणि कोरस आवाजातील ‘लहरो मे झुल के हे गीत डॉ गुंडे चित्रपटातील पिकनिक गीत आहे. परीक्षा संपताच काही विद्यार्थी सायकलवर बाहेर पडत धमाल करतात असे हे चित्रण आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर चित्रीत आहे. ‘कितनी जवान है जिंदगी ….विश्वजित, जॉनी वॉकर आणि राजश्री या कलाकारांनी धमाल अभिनय केलेला हा चित्रपट आहे ‘शहनाई'(1964). आवाज मो. रफी.
खरंतर अशी अनेक धमाल पिकनिक गीत आहेत. काही नवी काही जुनी.
आज काही अत्यंत गाजलेल्या कृष्ण धवल चित्रपटातील ही गाणी पुन्हा आठवली. तुम्ही काही पिकनिक आठवा आणि त्याचा आस्वाद घ्या. सध्या दसऱ्याच्या आणि दिवाळी निमित्ताने सलग सुट्टीत अनेक जण पिकनिक आनंद घेत आहेत. पाऊस माघारी परतला आहे. कोरोनाचे वातावरण निवळत आहे. पण तरीही सावधानता व नियम पाळून आपण हा आनंद घेऊ या.

– लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
पिकनिक मानसिक आरोग्य संपन्न असावे यासाठी मनमोकळेपणाने सफर .
धन्यवाद साहेब.