दंडाधिकारी म्हणून काम करताना कायम तटस्थ असायला हवे खरे तर. पण एक आईही होतेच कि मी ? एक हृदयस्पर्शी अनुभव सांगताहेत, गीतांजली गरड -मुळीक, नायब तहसीलदार, वाई
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट आली होती. रस्त्यात भरकटलेल्या अवस्थेतील जखमी कुत्र्याला मदत करून त्याला उपचार करून बरे केल्याबाबत.
जर प्राण्यांबाबत आपण इतके संवेदनशील असू तर भरकटलेल्या मनुष्याबद्दल तर नुसतेच संवेदनशील नव्हे तर जागरूकही असायला हवे.आणि विशेषतः जेव्हा आपण शासकीय सेवेत काम करत असतो, तेव्हा अशा गरजू लोकांना शोधण्याची गरज पडत नाही. ते आपणहून आपल्या समोर व्यथा सांगण्यासाठी येत असतात.
तसेच तुम्ही शासकीय सेवेत असा किंवा सामाजिक क्षेत्रात.. नियती किंवा जी काही तिसरी शक्ती असावी ती एकदा तरी अशी संधी किंवा असा प्रसंग समोर आणून ठेवते कीं तिथे तुम्हाला तुमच्या चाकोरीबद्ध दृष्टिकोनासोबतच वेगळे डोळे, वेगळी नजर आणि वेगळी बुद्धी वापरावी लागते, किंबहुना आपण ती वापरली पाहिजे किंवा वापरण्याची संधी सोडली नाही पाहिजे. असे वेगळेपण वापरल्यानंतर, जो काही त्या प्रसंगाचा परिपाक आपल्याला लाभतो त्याचे समाधान जगावेगळेच असते.
असाच एक अनुभव निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कामकाज करत असताना मला आला. घटनेतील व्यक्तींचे नावे, पत्ता न सांगता वर्णन करणे योग्य राहील. तर कार्यकारी दंडाधिकारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई च्या केसेस चालवल्या जातात.
तर अशाच एका प्रकरणात पोलिसांनी एक अशी चॅप्टर केस माझ्यासमोर आणली कि त्यामध्ये पत्नीने, पती आणि सासू यांनी बरेच दिवस मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला आहे म्हणून तक्रार होती वगैरे.. त्या अनुषंगाने पत्नी, पती आणि सासू असे तिघेही समोर उभे होते. पतीचे वय 32-33 असेल आणि पत्नीचे 26-27 च्या आसपास. दोघेही दिसायला बऱ्यापैकी गोरेगोमटे आणि चांगले राहणीमान असणारे वाटत होते.यात जाब देणारे होते पती आणि सासू. यांना विचारणा केली असता, त्यांनी किरकोळ भांडण झाले मॅडम, ती पण नोकरी करते पण घरी जास्त लक्ष देत नाही, मुलगा सहा वर्षाचा आहे त्याकडे लक्ष देत नाही त्यावरून थोडीफार भांडणे होतात असे पतीने खालच्या आवाजात सांगितले. तसेच सासूनेही सांगितले.
पतीने मग माझ्याकडूनही काही चुका झाल्या आहेत पण मी परत अश्या चुका करणार नाही, मी लिहुनही देतो असे तो बोलला. पण पत्नी आत्ता घराबाहेर पडली आहे तिने घरी यावे असे वाटते हे ही तो बोलला.
सासूनेही नातू आईची खूप आठवण काढतो असे सांगितले. पण पत्नीने घरी येणेस नकार दिला. हे पुन्हा मला त्रास देतील मारूनही टाकतील मी येणार नाही असे स्पष्ट सांगितले.
इथपर्यंत ठीक होते. मग सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया झाल्यावर खरे तर आपण फक्त ज्यांच्याविरोधात तक्रार असतें, त्यांना पुढील तारखेला सुनावणीला बोलावतो. पण माझ्या मनात वेगळाच विचार चमकला.सुनावणीला पत्नीलाही जाणीवपूर्वक बोलवायचे मी ठरवले आणि पुढच्या आठवड्यात याच दिवशी तिघांनाही सुनावणीला यायला सांगितले.
पुढील आठवड्यात तिघेही माझ्यासमोर उभे राहिले. पती आणि सासू घायकुतीला आले होते. पती म्हणाला, मॅडम कितीही मोठ्या स्टॅम्प पेपर वर लिहून घ्या पण मलाही पश्चाताप होतोय. मी जॉब लाही लागलोय. आता मी पूर्णपणे योग्य प्रकारे, भांडण न करता हिच्यासोबत राहीन. पण हिला आमच्या घरी यायला सांगा. माझा मुलगा सारखा रडतोय हिची आठवण काढून..
सासू म्हणाली, त्याला कालपासून ताप आलाय आणि रात्रभर मम्मी मम्मी म्हणतोय.. चररदिशी मनावर काट्याने ओरखडा उठून कळ येते तसें मला झाले. ही बाई गेले बरेच दिवसापासून आपल्या मुलापासून लांब राहतेय. तेही कोणत्यातरी दूरच्या नातेवाईकांकडे.. आणि हिला आपल्या मुलाची आठवण येत नसेल ? त्याला कुशीत घ्यावेसे वाटत नसेल ? इतकी भावनाशून्य कशी असेल ही ? असे अनेक विचार एका क्षणात तरळून गेले मनात. आणि ही बया स्तब्ध उभी.
मी तिला विचारले, बाई तुमचा मुलगा लहान आहे तो आजारी आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही का ? निदान त्याच्यासाठी तुम्ही जायला नको का ? शिवाय तुमचे पती आणि सासू लिहुनही द्यायला तयार आहेत.. मी एवढे बोलल्यानंतरही ही ढिम्म, चेहऱ्यावर कोणताही बदल नाही. मुलाचा विषय निघूनही तिला कोणताच फरक पडत नाही हे दिसत होते. म्हणाली काही नाही ताप त्याला. हे उगाचच सांगत आहेत.. वगैरे का कोणास ठाऊक मला अचानक त्या मुलाचा न पाहिलेला चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. आणि त्याची अवस्था मनात घर करू लागली.
आपण एक दंडाधिकारी म्हणून काम करताना कायम तटस्थ असायला हवे खरे तर. पण एक आईही होतेच कि मी ? माझ्या लेकाला किंवा लेकीला जरा कुठे शिंक आली तरी घरात असो वा ऑफिस मध्ये दहादा काय खाल्ले होतेस, कुठे गारठ्यात गेला होतास का, वाफ घे औषधं घे, झोपून राहा… काय नि काय.. धास्तावून जातो आपण आया आणि ही दगड झाली होती.
मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला कि अगं बाई एका ठराविक क्षणी आपल्या मुलालाही प्राधान्य द्यायला हवे. आपण त्याला जर जन्म दिलाय तर आपली काही जबाबदारी आहेच कि त्याच्यासाठी काहीही करून दाखवण्याची. शिवाय तो लहान बाळ आहे..आयुष्यात कायमच एवढे कठोर होऊन चालत नसतं. काहीवेळा नुसताच वैयक्तिक भावनाच झुलवत बसवायचे नसते. समावेशक निर्णय घ्यायला हवा तुला. निदान आपल्या पोटच्या मुलासाठी तरी विचार कर…तिचा राग आला. मग पुन्हा पुन्हा मी पुढच्या आठवड्यातील तारीख तिघांनाही दिली….
तिसऱ्या वेळेस मला हॉल मध्ये ते तिघेही प्रवेश करताना लांबून दिसले. पण मी चमकले.. कारण यावेळी पतीने सोबत आपल्या मुलाला आणले होते. लांबून तो छोटा मुलगा जवळ येऊ लागला. खूप गोड, गोरागोमटा, अतिशय निरागस आज्जीचे बोट धरून बावरल्यासारखा येत होता. तो जसा जसा माझ्या टेबल जवळ येऊ लागला तशी मी स्तब्ध होऊ लागले होते. कारण आधीच तो न पाहताही माझ्या मनात घर करून गेला होता. त्याची व्याकुळता मला गेले कित्येक दिवस सतावत असायची. आणि आज माझ्यासमोर त्याच व्याकुळतेने आला होता. अर्थात त्याला याची किती समज असणार म्हणा.. मी उसने कोरडे भाव आणून त्यांना पुन्हा त्यांचे म्हणणे विचारले.. पती म्हणाला मुलाशी फोनवर बोलते, येते म्हणून आणि मी विचारल्यावर नाही म्हणते. तिला नोकरी करायची असेल तर ती ही करु दे. मी सगळं स्वातंत्र्य देतो पण तिने घरी यावे एवढेच म्हणणे आहे. सासुही हेच बोलली… मी पत्नीकडे पाहिले..
ती म्हणाली मी कधीच येते बोलले नाही. आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी यांच्या घरी कधीच जाणार नाही. मुलाला वाटल्यास मी नंतर कधी तरी माझ्यासोबत नेईन. ती तिच्या पोटच्या मुलाकडे डोळे भरून पाहतही नव्हती.. आणि……. काहीतरी घडले. मला कधीही वाटले नाही ते घडले. या तिघांचे बोलणे सुरु असतानाच तो छोटा मुलगा बोलला.. मॅडम….मी आतून हलले इतक्या आर्त स्वरात त्याने मला हाक मारली…मला दोन मिनिट बोलायचंय असं तो म्हणाला… आणि माझ्या डोळ्यांनी माझी साथ सोडली… ते भरून आले. आणि मी माझे ओठ घट्ट मिटून घेतले. आणि मी जिकिरीचा प्रयत्न करून ताठ बसून होते.. कारण मला तिथे म्हणणे न्यायपूर्वक ऐकून घ्यायचे होते. मला भावुक होऊन चालणार नव्हतें . तो बोलू लागला..
मॅडम, मम्मी माझ्याशी फोनवर बोलते मी तुझ्याकडे येते म्हणून आणि मी प्रॉमिस मागितले तर देत नाही… फोन बंद करते.. तुम्ही तिला सांगा ना माझ्याकडे यायला… सांगा ना मॅडम.. असे म्हणून तो रडायला लागला… बरं.. या क्षणी परिस्थिती अशी होती कि पूर्ण हॉल मधील सर्व स्टाफ चे लक्ष या नाट्याकडे लागून राहिले. त्यातील काही जण आणि जणी देखील स्तब्धच उभे राहिले होते
आपल्या जागीच जेव्हा तो छोटा बोलू लागला… त्यातील एक ऑपरेटर मुलगी तर बाहेर पळत गेली आणि बाहेर जाऊन मोठ्याने रडू लागली होती. खूपच भावुक झाली होती.. लग्न झाले बरेच दिवस झाले पण कूस उजवली न्हवती तिची… आणि इथे आई पोटच्या रडणाऱ्या मुलाकडे इतके दिवस लांब राहूनही पाहायलाही तयार नव्हती.. तो मुलगा बोलता बोलता रडायला लागल्यावर माझ्या शरीराचाही तोल सुटतोय कि काय असे मला वाटू लागले. माझ्या डोळ्यातले पाणी वाढू लागले होते.. पण शरीर निश्चल ठेवावे लागत होते.. कोणीतरी दगडाचे शिल्प बनवावे आणि दगडाच्याच डोळ्यात चार पाच थेंब खरे पाणी भरावे.. अशी अवस्था माझी झाली होती.. ती स्त्री माझ्या भरल्या डोळ्याकडे बघत होती पण मुलाकडे बघायला तयार नव्हती.
मी त्याच भरल्या डोळ्यांची नजर तिच्याकडे वळवली आणि तिला विचारले, बोला तुमचे काय म्हणणे आहे ? यावर… तरीही ती निर्दयी असल्यासारखी म्हणाली, तरीही मी यांच्याकडे जाणार नाही… आता मात्र माझा तोल मी सावरणे अशक्य होते. आणि माझा आवाज वाढला.. मी तिच्यावर ओरडले आणि बोलले बाई तुम्हाला काही कळत का.. हे मुल एवढ्या कळकळीने तुम्हाला साद घालतय, तुम्हाला पाझर कसा फुटत नाही ? एवढे कसले मनाचे चोचले पुरवता ? तुमचे पती, सासू तुम्हाला नम्रपणे विनवणी करून तुम्हांला बोलवत आहेत आणि तुम्ही स्वतःचेच म्हणणे दामटत आहात. इतके कोडगे कसे कोण असू शकते ?
मी आज हे तुम्हाला मुद्दाम आवाज चढवून बोलत आहे यावरून या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घ्या जरा. या मुलाचा तरी विचार करा… तरीही बाई ढिम्म होती. मी पतीला, सासूला आणि त्या मुलाला जायला सांगितले… तो मुलगा रडतच आपल्या आज्जीचे बोट धरून आपल्या आईकडे वळून वळून बघत निघून जात होता. मी त्या बाईंना पुढच्या तारखेला बोलावलेच. ती भावनाशून्य अशी निघून गेली. मग स्टाफ मधील दोघी माझ्याजवळ आल्यावर मात्र माझ्या डोळ्यातील पाणी खाली उतरले..
पण मन विषण्ण झाले होते. मला उगाचच आशा वाटली होती कि कदाचित ती काही अटीवर का होईना मुलाकडे पाहून आज तरी पाघळेल आणि घरी जाईल. पण मलाच हरल्यासारखे वाटू लागले. अर्थात मी सावरले स्वतःला.. काही विचार केला आणि दुसऱ्या दिवशी एका मान्यवर प्रौढ विचारी व्यक्तीला फोन केला. त्यांना या गोष्टीची कल्पना दिली.. ते या दोघांनाही ओळखत असल्याचे बोलल्यावर जरा बरे वाटले.
त्यांना मी तिला समजावून सांगण्यास सांगितले. ते तिच्याशी बोललेही आणि त्या पतीशीही बोलले. त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता ..पण तिचा घरी येण्यास ठाम नकार होता.
पुढील आठवड्यात ते तिघे आले. पती आणि सासूने आधी कृतज्ञता व्यक्त केली कि तुम्ही वैयक्तिक मनापासून प्रयत्न करत आहात मॅडम. तुम्ही ज्यांना सांगितले त्या साहेबांनीही हिला मध्यस्ती करून समजावण्याचा प्रयत्न केला. पण जाऊदे आता.. माझं नशीब आणि माझा मुलगा.. असा हताश होऊन तो बोलला. आणि ते सही करून निघून गेले.
या दरम्यान अतिवृष्टी आणि दरडी कोसळल्याने थोडा गॅप पडला.. आणि हा विषय संपला तर नाही पण थोडा बाजूला पडला. आणि एक दिवस तो पती आला.. त्याच्या डोळ्यात एकप्रकारची चमक होती.. तो सही करून लगबगीने माझ्याकडे आला आणि म्हणाला.. मॅडम तुमच्या प्रयत्नांना यश आले. ती घरी येते असे म्हणाली आहे मला. चार दिवसांनी ती घरी येणार आहे. हे ऐकल्यावर मला आनंद तर झालाच पण सर्वात आधी त्या छोट्या मुलाची आठवण आली आणि त्याच्यासाठी खूप समाधान वाटले. पुढच्या तारखेला मुलासह सर्वांनी या असे मी त्याला सांगितले. तो आनंदाने हो म्हणाला आणि तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी ज्यांनी मध्यस्थी केली होती त्यांचा फोन आला.. नियतीचे धागे काही वेगळेच गुम्फलेले असतात हे अगदी अनुभवातून कळते हे मात्र खरं.. ते म्हणाले मॅडम त्याचा काल मोठा ऍक्सीडेन्ट झालाय… त्याला ऍडमिट केलंय.. त्याला महात्मा फुले आरोग्य योजनेचा दाखला द्याल का ?.. आता काय करणार..
म्हणजे काल तो माझ्या ऑफिस मधून आनंदाने जे बाहेर पडला होता त्या भरात त्याचा ऍक्सीडेन्ट झाला होता कि काय असा विचार मनात आला. वाटले कि याच्या नशिबात सुख लिहिलेय कि नाही ? नशीब एकदा हुलकावणी द्यायला लागले कि खेळ जास्तच रंगतो एखाद्याच्या बाबतीत. असं झालं या पतीच्या बाबतीत… आता अजून दोन महिने तरी हे एकत्र यायचे नाहीत आणि मुलाची आईची ताटातूट अजून लांबणार होती.
पण मग पुढच्या तारखेला पुन्हा आश्चर्य कारक असे घडले कि मी कामात व्यस्त असताना अचानक ती पत्नी आणि तिची सासू या दोघी एकत्र माझ्यासमोर आल्या. सासू म्हणाली मॅडम माझी सून घरी परतली बरं का. तीही म्हणाली, हो मॅडम, मी आता माझ्या घरी परत आलेय. तुम्ही वारंवार मला समजावत होतात.. ज्यांना मी थोडंफार मानायचे त्या काकांच्याही कानावर तुम्ही हे घालून मला समजावण्याचा प्रयत्न केला. खरंतर मी आधी यांच्या कटकटीना वैतागूनच बाहेर पडले होते पण ज्या दिवशी माझा मुलगा तुमच्यासमोर रडला त्यावेळचा तुमचा चेहरा नंतर कायम मला आठवत राहिला, तुम्ही त्यापूर्वी मला कधीच मोठ्याने बोलला न्हवतात पण माझ्या बाळाचे रडणे आणि बोलणे ऐकल्यावर तुम्ही मला ओरडलात.. पण समजावण्यासाठी.. मग मलाही विचार करायला भाग पडले.
माझे विचार मी बदलले आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला. मी तुमची खूप आभारी आहे. आत्ता माझे मिस्टर दवाखान्यात ऍडमिट आहेत. मी त्यांचीही काळजी घेतेय आणि माझा मुलगाही माझ्याजवळ आहे. तो खूप खुश आहे. असे ती बोलली. बस्स… हाच शेवट तर पाहिजे होता मला.. सर्वांनाच हवा असतो….
थोडक्यात काय तर काहीवेळा आपण काम करत असताना गोष्टींकडे ढिम्मपणे पाहतो. त्याचे चाकोरीबद्ध आणि कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून फाईल बंद करतो. पण काहीवेळा अश्या फाईल मधल्या लोकांना, त्यांच्या अडचणींना, त्यांच्या भावनाना वाचता यायला पाहिजे. वस्तुतः.. त्यावर काही उपाय करण्याचे प्रयत्न करता आले तर ते थोडा वेळ देवून करता केले पाहिजे. वस्तुतः…. नोकरी तर काय आपण करतोच..
दहा तास नि बारा तास काय… काम तर करतोच आपण आणि निवृत्त होईपर्यंत ते करणारच आहोत.. दोन चार अडचणीतल्या लोकांना त्यातून बाहेर काढण्याचे जे समाधान असतें ते आपल्याच आयुष्यातील असणाऱ्या पोकळीमधील खाचखळग्याना मलमपट्टी करून जात असतें. हे समाधान आपल्यालाच एक मानसिक बळ आणि शारीरिक उभारी देत असतें. आणि अजून अश्या प्रकारे काम करण्याची ऊर्जाही देत राहते…
शेवटी नेहमीचे वाक्य.. आयुष्यात नाही तरी हाय काय आणि नाय काय.. यायचे आणि जायचे आहेच.. कशात सुख समाधान मिळावायचे आहे हा आपलाच हक्क आणि अधिकार असतो. त्यावर कोणाचे बंधन नसते.. आपल्यासमोर कोण एखादी अडचण घेऊन आला तर नक्की वेळ काढून त्याला मदत करावी.. हे नक्की…. धन्यवाद 🙏🙏🙏

– लेखन : गीतांजली गरड -मुळीक,
नायब तहसीलदार, वाई
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
अनोखे मिलन खुपच छान लेख. धन्यवाद सर.