ज्या व्यक्तींनी पारंपरिक व्यवसायच न करता कालानुरूप शिक्षण घेतले, नवे काही करण्याचे धाडस केले त्या व्यक्ती निश्चितच यशस्वी होऊ शकतात हे समाजभूषण पुस्तकाने दाखवून दिले आहे, असे विचार
मुंबईच्या महापौर सौ किशोरीताई पेडणेकर यांनी व्यक्त केले. त्या समाजभूषण पुस्तकाच्या मुंबई विभागीय प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, या पुस्तकातील व्यक्तीपैकी कुणी उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक, अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, झाल्या आहेत. तर काही राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. श्री प्रशांत टाकसाळे यांनी तर परदेशात आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे.
विशेष म्हणजे यशस्वी व्यक्तींमध्ये महिला देखील आहेत, ही अत्यन्त समाधानाची बाब आहे. या पुस्तकाचा खूप प्रसार झाला पाहिजे, ते सर्व
शाळा, कॉलेज मध्ये आणि घराघरात पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी पुस्तकाचे लेखक, संपादक देवेंद्र भुजबळ यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली.
या ऑनलाइन कार्यक्रमात अखिल भारतीय कासार मध्यवर्ती मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष श्री अशोक जवकर, सौर ऊर्जा उद्योजक श्री सुनील टोंगे, सामाजिक कार्यकर्ते सौ आशा व अशोक कुंदप, लेखिका रश्मी हेडे, सामाजिक कार्यकर्ते श्री सुधाकर नर, न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलच्या सह संपादक अलका भुजबळ, जेष्ठ पत्रकार शेषराव वानखेडे आदी उपस्थित होते.
महापौर किशोरीताई पेडणेकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री श्रीमती वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी समजताच त्यांनी श्रीमती वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले, त्यामुळे त्यांना नाशिक येथे जावे लागल्याने त्या या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाल्या.
– टीम एन एस टी 9869484800