आज भेटले ते. एक काळ लोटून गेला होता. मागच्या सगळ्या खुणा पुसट झालेल्या. परतीच्या प्रवासाच्या सगळ्या वाटा अंधारल्या होत्या. तिच्या ओटीत पडलेलं सुख दुःख त्याने बघितलं नाही. त्याच्या वाट्याला आलेल्या गोड कडू घासाचा हिशोब तिने केला नाही. आधी भेटायचे ते ज्या प्राजक्ताखाली तो आता वाकला होता.
प्राजक्ताचा केशरी देठ पांढऱ्या पाकळ्यात मिसळत होता. संध्याकाळ चा मावळता सूर्य आपले निरोपाचे रंग उधळत होता. सावळा होत चाललेला आसमंत हळूहळू चांदण्याची दुलई पांघरात होता. कुटूंब, मुलं, नाती सगळा पसारा निष्फळ ठरला होता कदाचित वृद्धधाश्रमाचि पायरी पण आता चढवेना. दोघांनी एकमेकांचे थरर्थणारे हात हाती घेतले आणि हाताची गुंफण घट्ट केली. चंदेरी प्राजक्त असा उमलला होता कोमेजण्या आधी….
काल वृद्धाश्रमातील एक काकांचा फोन आला. माझ्या काविताचं भरभरून कौतुक करत होते. स्वतच्या पण काही कविता त्यांनी म्हणून दाखवल्या. मी सहज विचारलं कुठं राहता तुम्ही ? तर पलीकडचा आवाज जरा जड झाला, आणि उत्तर आलं, वृध्दाश्रमात. मग मी ही एक क्षणभर शांत झाले.
नंतर मात्र काका हसून म्हणाले, “आम्ही इथे मजेत असतो सगळे. तसा काही त्रास नाही. पण आयुष्यभर घर आणि कुटुंब यांच्यासाठी राब राब रबलो. सहचारिणी निघून गेली आणि एकटा पडलो. पाखरं सगळी उडून गेली जिकडे तिकडे. घर खायला उठलं. मग इथे आलो. नात्यांची ओळख होता होता ती कधी नाहीशी झाली तेच कळलं नाही. पण आता ठिक आहे. दिवस इतका भरगच्च गेला पण संध्याकाळ अशी एकटी होईल असं वाटलं नव्हतं.” जणू त्यांच्या जड आवाजातून एक संपूर्ण आयुष्याचा हिशोब वजा, बाकीचं अचूक गणित मांडल्या जात होतं.
हातचे किती तरी धरले होते पण सगळे वजा झाले हाती काहीच उरलं नाही. नात्यांचं आणि एकटेपणाचं तसं फारसं जमत नसावं.नात्यांचा गुंता कधी कधी एकटेपणा देऊन जातो आणि कधी कधी ऋणानुबंध जुळलेली मूठभर माणसं या एकटेपणात रंग भरून जातात. वृद्धाश्रमात हल्ली छान मित्र मैत्रिणी भेटत आहेत आणि आयुष्याच्या संध्याकाळी आलेल्या एकाकीपणाला एकमेकांना साथ देऊन उत्तर शोधत आहेत. “कोण काय म्हणेल” आयुष्यभर वागवलेलं या गोष्टीचं मानसिक ओझं बाजूला ठेऊन ते निर्णय घेत आहेत.
याबाबत निरनिराळ्या प्रतिक्रिया येतात. त्या दोघांची मुलं आणि कुटुंब यांची पण बऱ्यापैकी सकारात्मक साथ मिळू लागली आहे. आज नीलकंठ आजोबांनी आजीला गजरा आणला. लपून कसाबसा आजीला दिला. आजीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर गुलाबी हास्य उमटलं. सूना, मुलं, नातवंडं अश्या कुटुंबात दोघे एकटे पडले होते. दोन मुलांच्या दोन घरांच्या मधल्या भींतीने नीलकंठ आजोबा आणि आजीला वेगळं केलं होतं. दोन मुलांच्या संसारात ती दोघे एकाकी झाली होती. मुलांनी त्यांच्या आपसातील भांडणात आई वडिलांना पण वाटून घेतलं होतं. या वयात भरल्या घरात दोघे एकटे होते.
वृद्धावस्थेत एकटेपणातून बरेचसे मानसिक आजार बळावतात. तसंच दुर्लक्ष, अनादर, हालअपेष्टा, ताणतणाव हे घटक ज्येष्ठांमधील मानसिक आजाराला कारणीभूत ठरतात. वाढत्या वयानुसार होणारे मानसिक आघात यामुळे मानसिक आरोग्य ढळू शकते. ज्येष्ठांचे आपलं मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहार, योगा, ध्यान, चालण्यासारखे हलकेफुलके व्यायाम आवश्यक असतात.
ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक संस्थांशी जोडून असणं. आपल्या आवडीचे मनाला भावेल ते जरूर करावं. मनावर कोणतेही, कोणाचेही दडपण न ठेवता अगदी मनसोक्त जगावं. या गोष्टी ज्येष्ठांचा एकटेपणा दूर करू शकतात. याशिवाय वाचन, छंद, अधूनमधून सिनेमा, पिकनिक या गोष्टीही ज्येष्ठांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याला पोषक ठरू शकतात.
वृद्धावस्था हा जीर्ण काळ नसून, आयुष्याला परत एकदा मिळालेली नूतन पर्वणीच आहे. आयुष्भर अनेक प्रकारचे कष्ट, बंधन, दडपण घेऊन अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करून परत एक सुरेख निवांत झालर म्हणजे वृद्धावस्था आहे असं म्हणता येईल. स्वतःसाठी किती करायचं राहून जातं. जबाबदाऱ्या सांभाळून जगणं मागे सुटून जातं. या सगळ्या सुटलेल्या गोष्टी नव्याने हाती घ्याव्या. अडखळलेल्या गोष्टींना परत एक सुरेल ताल द्यावा.
विद्या चा कथ्थक क्लास सुरू असताना एक महिला आत आली आणि नृत्य करणाऱ्या मुलींकडे कौतुकाने बघू लागली. विधाने तिच्या जवळ जाऊन तिला विचारलं, “आजी, क्लास ची माहिती हवी होती का ?” तिने होकारार्थी मान हलवली. विद्या ने सगळी माहिती दिली आणि म्हणाली, “किती मोठी आहे तुमची नात. तिला कोणती वेळ चालेल ते सांगा”. तेंव्हा आजीने आपलं पाठीतून जरा वाकलेलं शरीर ताठ केलं आणि म्हणाल्या, “नात नाहीय मला. मीच शिकणार आहे कथ्थक”. ते ऐकून विद्या आपल्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपवू शकली नाही. पण तिने आनंद व्यक्त करून आजीना उद्या पासून क्लास ला येण्यास सांगितलं.
आजीच्या गालावरची खळी तेराव्या वर्षी मनात दाबलेली कथ्थक शिकण्याची इच्छा खुलवून हसली आणि आजीची वयानुसार दमलेली पावले एक नवा रिदम घेऊन निघाली होती. असाच चंदेरी प्राजक्त प्रत्येक दमलेल्या, एकाकी मनात फुलावा.

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
बाल मानस तज्ञा, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
खूप छान कथा!
संसाराची जबाबदारी पेलता पेलता मनातल्या कितीतरी ईच्छा आंकांक्षांना मुरड घालावी लागते.
सर्व जबाबदार्यांतून निवृत् झाल्यावर स्वतःचा आनंद शोधणे योग्यच आहे. डाॅ.राणी दिक्षितांनी त्यांच्या या कथेतून चांगला संदेश जेष्ठांना दिला आहे.
खूप सुंदर