Sunday, July 13, 2025
Homeकलाचित्रगीत

चित्रगीत

भारतीय चित्रपट हिंदी असो की प्रादेशिक, नृत्य, गीत, संगीत त्याचे प्रमुख आकर्षण आहे. लग्न सभारंभ असो की वाढदिवस व पार्टी, उत्सव असो की सांस्कृतिक कार्यक्रम अनेक मधुर गीतांच्या चालीवर चित्रीत नृत्यानी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजच्या सदरात त्याचा मनोरंजक आढावा.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात डोकावले असता अनेक नृत्य गीतांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मधुबाला, वैजयंतीमाला, संध्या, वहिदा रहेमान, हेमामालिनी, श्रीदेवी, माधुरी दिक्षित, जयाप्रदा, रेखा, हेलन, बिंदू या अभिनेत्रींबरोबरच भगवान दादा, शम्मी कपूर ते जितेंद्र, धर्मेंद्र, अभिताभ बच्चन, मेहमूद, मिथुन चक्रवर्ती, कमल हसन, चिरंजीवी, प्रभुदेवा, गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान अशा अनेक कलाकारांनी आपल्या बहारदार नृत्याने मन जिंकली आहेत.

भरत नाट्यम, कथ्थक, ओडिसी आदी शास्त्रीय, उपशास्त्रीय,लावणी, भांगडा, घुमर अशी प्रादेशिक लोकनृत्य त्यात आहेत. त्याच बरोबर पाश्चिमात्य ढंगाच्या पॉप, जाझ, ऑपेरा आणि फ्युजन आदी नृत्य प्रकारांनी सिनेमाचा पडदा कायम रंगीत केला आहे.

नृत्य गीत म्हटले की कृष्ण धवल जमान्यातील ‘अलबेला’ चित्रपटातील गीत आठवते. भगवान दादा आणि गीताबली यांनी केलेला, ’भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे’ या गीतावरील समूह नाच आजही लोकप्रिय आहे. लता मंगेशकर आणि चितळकर यांच्या आवाजातील या गीताला संगीत दिले होते सी. रामचंद्र यांनी आणि गीत लिहिले होते राजेंद्र कृष्ण.

‘श्री 420’ सिनेमातील ‘रमया वतावया रमया वतावया, मैने दिल तूझ को दिया’ या गीताने देखील अनेक पिढ्यातील तरुणाईला थिरकायला लावले. राजकपूर, नर्गिस, ललिता पवार आदी कलाकारांवर चित्रीत हे गाणं शैलेंद्र यांनी लिहिले. संगीत शंकर जयकिशन तर आवाज लता, मुकेश आणि मोहमद रफी.

‘अपलम चपलम, चप लायी रे दुनिया को छोड/’तेरी गली आयी रे, आयी रे, आयी रे’..काही आठवतं का. आजाद (1955) या दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील नृत्य गीताने एकेकाळी सर्वाना मोहित केले होते. ‘सई आणि सुब्बालक्ष्मी’ यांनी केलेले बहारदार नृत्य, आवाज लता उषा मंगेशकर.

असंच एक सदाबहार गीत आणि नृत्य ‘पारसमणी’ सिनेमात पहावयास मिळते. लता आणि कमल बारोट याच्या आवाजातील, ‘हसता हुआ नुरानी चेहरा, काली जुल्फे रंग सूनहरा/तेरी जवानी तोबा तोबा रे, दिलरुबा दिलरुबा’..असर भोपाली लिखित या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी साज दिला होता. कलाकार होते गीतांजली, महिपाल, हेलन.

शम्मी कपूर यांची एक खास नृत्य शैली होती. ’गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रीज बाला..’
या गीताने नेहमीच धमाल केली. गोकुळ अष्टमीला कित्येक दशके हे गाणं वाजतय.

शम्मी कपूर आणि मोहन चोटी या कलाकारांनी धमाल केलेल्या या गीताला आवाज आहे मो.रफी यांचा आणि कल्याणजी आनंदजी याचे संगीत. चित्रपट आहे ब्लफ मास्टर (1963)आजही गाणं कानावर पडलं की पाय थिरकतात.

शम्मी कपूर यांचा तुफान चित्रपट ‘ब्रम्हचारी’. त्यात शम्मी सोबत मुमताज, प्राण, राजश्री यावर चित्रीत नृत्य गीत आहे,  ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर/सबको मालूम है, सबको खबर हो गई’. रॉक अँड रोल पद्धतीचा हा नाच सर्वाना मोहवून गेला. रफी यांच्या आवाजाने काय बहार आणलेली. आजही पुन्हा पुन्हा पाहावे आणि ऐकावे असे नृत्य गीत.

मग येतो पडद्यावर धुमाकूळ घालणारा मेहमूद. ‘आ ओ ट्वीस्ट करे गा उठा मौसम, या मन्नाडे यांच्या आवाजावर धमाल नृत्य गीत करीत त्याने कमाल धमाल करीत सर्वाना रिझविले आहे. याच मेहमूदने मुमताज बरोबर ‘प्यार किये जा’(1966) सिनेमात रॉक अँड रोल चा तुफान आविष्कार दाखविला होता. मन्नाडे आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातील, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सजविले आणि राजेंद्र कृष्ण लिखित हे गाणं आजही लोकप्रिय आहे. ‘ओ मेरी मैना, तू मान मेरा कहना, अरे मुस्किल हो गया रहना तेरे बिना/आया आया यो’.. या चित्रपटात किशोर कुमार, शशिकपूर आणि ओमप्रकाश यांनी प्रेक्षकांना पोटभरून हसविले व नाचवले देखील होते.

मेहमूद यांनी ‘गुमनाम’ (1965) या भयपटात ‘हम काले है तो क्या हुआ हम दिलवाले है/हम तेरे तेरे चाहनेवाले है ’गीतावर हेलन सोबत नृत्य करीत बहार उडवून दिली होती. तर ‘साधू और सैतान’ सिनेमात ‘मेहबूबा मेहबूबा बना लो मुझे दुल्हा, जला दो मेरा चुल्हा’ म्हणत हेलन बरोबर जे लटके झटके प्रेक्षकांना दिले ते आजही अनेकांना स्मरणात आहेत.

जितेंद्रचा जमाना आला आणि या जम्पिंग जॅक स्टारने मग अनेक नृत्य अविष्कार दाखवीत मनोरंजन केले. मुमताज, बबिता, श्रीदेवी, जयाप्रदा आदी कलाकारांसोबत आपल्या नृत्य शैलीत इतिहास घडविला. ‘फर्ज’ (1967) सिनेमातील बबिता बरोबर ‘मस्त बहारों का मै हूं आशिक मै जो चाहे प्यार करो’ असो की लीला चंदावरकर समवेत ‘हमजोली’ सिनेमात ‘ढल गया दिन हो गयी श्याम, जाने दो, जाना है/अभी अभी आयी है, अभी अभी जाना है’, या गीत नृत्यानी भरपूर मनोरंजन केले आहे. श्रीदेवी बरोबर त्यांचा ‘हिम्मतवाला’ आठवा. लताजी आणि किशोरकुमार यांच्या आवाजातील ‘नैनो मे सपना, सपनो मे सजना/ सजना पे दिल आ गया, ओ सजना पे दिल आ गया/ नुसती धमाल.

‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांनी एक काळ गाजविला. आय एम ए डिस्को डान्सर म्हणत तरुणाईला वेड लावले. तर ऋषि कपूरने ‘सरगम’ मध्ये जयाप्रदासोबत ‘डफलीवाला डफली बजा, मेरे घुंगरू बुलाते है, मै नाचू तू न जा’… गात आणि नाचत कित्येक वर्षे प्रेक्षकांना नाचविले. त्याचे मग चांद मेरा दिल, चांदणी हो तुम (कर्ज)असो की जुही चावला सोबत तू तू तुतु तारा बस गया दिल बेचारा असो, कमाल केली आहे. त्यांचा बॉबी तर अप्रतिमच. त्यातील झूठ बोले कौवा काटे असो की ‘ना मांगो सोना चांदी, ना मांगो बंगला गाडी, ए मेरे किस काम के/ देता है दिल दे, बदले मे दिल के … या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते.

अभिताभ बच्चन तर बेमिसाल. डॉन चित्रपटातील ‘खाय के पान बनारस वाला’, सिलसिला फिल्ममधील होळी नृत्य, अमर अकबर अँथोनीतील ‘माय नेम इज अंथोनी गोंसालवीस’ असो की ‘नमक हलाल’ चे ‘पद घुंगरू मीरा नाचे और मै नाचू बिन घुंगरू ..’ सारखी किती तरी गीत नृत्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

रेखा, परवीन बाबी, झीनत अमान, स्मिता पाटील या कलाकारांसोबत त्यांनी विविध शैलीत बहारदार नृत्य सादर केली आहेत.

या नृत्य सफरीत गेल्या दोन दशकात ‘सपनोमे मिलती है, कुडी सपनो मे मिलती है’ (सत्या), ’तू चीज बडी है मस्त मस्त’(मोहरा), ’चोली के पिझे क्या है’ (खलनायक), ’एक दोन तीन चार पाच छह..’ किंवा ‘दीदी तेरा देवर दिवाना हाय राम कुडीओं को डाले दाना’ (हम आपके है कौन) सारखे अनेक नृत्यगीतांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यात शाहरुख खानचा ‘चल छईया छईया’ असो की ‘चायना गेट’ मधील उर्मिला मातोंडकर यांचे ‘ओ छम्मा छम्मा बाजे मेरी पायलिया’ मनोरंजनाचा मसाला ठासून भरलेला पहावयास मिळतो.

भारतीय नृत्य संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची विविधता. अगदी अलीकडे गाजलेल्या चित्रपटात ती दिसून येते. ‘लावणी’ हा महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य प्रकार. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या बहुचर्चित चित्रपटात ‘दीपिका पदुकोण’ आणि ‘प्रियांका चोप्रा’ यांनी ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गीतावर अप्रतिम लावणी सादर केली. तर रौफी हा काश्मीरी नृत्य प्रकार ‘मिशन काश्मीर’ चित्रपटात पहावयास मिळतो.

लोकप्रिय ओडिसी नृत्य प्रकार ‘भुलभुलैया’ या प्रियदर्शन दिग्दर्शित सिनेमात विद्या बालन यांनी ‘मेरा डोलना’ हे नृत्यात सादर केलाय. तर राजस्थानी ‘घुमर नृत्य’ पद्मावती चित्रपटात दीपिका पादुकोणने सादर केले आहे. याबरोबरच ‘भांगडा’ (पंजाबी) नृत्य ‘जब वी मेट’ सिनेमात करीना कपूर आणि शाहिद कपूर तर चेन्नई एक्सप्रेस मध्ये केरळ राज्यातील कथ्थकली नृत्याचे दर्शन’ तू काश्मीर मै कन्याकुमारी चित्रपटात कलाकार शाहरुख खान दीपिका पदुकोण यांनी अभिनित केले आहे.

भारतीय चित्रपट विशेष करून हिंदी चित्रपट नृत्य गीत संगीताचा आढावा घेताना अशी शेकडो लोकप्रिय नृत्य गीते आहेत. या गीतांनी आपला एक काळ गाजविला आहे. गीत नृत्याचा प्रवास सुरुवातीला भरत नाट्यम, कथ्थक सारख्या शास्त्रीय आणि विविध प्रादेशिक लोककला प्रकारापासून सुरू झाला. त्यात मग पाश्चिमात्य आणि अन्य नृत्य प्रकाराचे मिश्रण होत गेले.सोलो, पॉप, जाझ, ऑपेरा, हिप हॉप, अरेबिक आणि लॅटिन फॉर्म पर्यंत त्यात सामील झाले. आहे. पण त्याच बरोबर भारतीय नृत्याचीआपली स्वतंत्र शैली देखील दिसून येते.

आता मात्र हिंदी चित्रपटात मोठ्या प्रमाणावर फूजन झाले आहे. पन्नास साठच्या दशकात समूह नृत्य तर सत्तरच्या दशकात कॅब्रे आणि नंतर डिस्कोने त्याची जागा घेतलेली दिसून येते. पुढील काळात फ्री स्टाईल डान्स ने आपली छाप सोडली. गोविंदा सारख्या कलाकारांनी आपली स्वतंत्र शैली निर्माण केली.

आता तर जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान, यामुळे हिंदी सिनेमा जगभर पोहचला आहे. प्रचंड आर्थिक गुंतवणूक, भव्यदिव्य आणि महागडे सेट्स, नृत्याच्या पार्श्वभूमीवर विविध चित्रीकरण स्थळे आणि बदलता कपडेपट यांनी प्रेक्षकांची अभिरुचीच बदलून टाकली आहे. जगभरातील वाद्यसंगीत आणि नृत्यप्रकारातील मिश्रण, फूजन आता नवलायची गोष्ट राहिली नाही. थोडक्यात नृत्य गीत संगीताचा हा मनोरंजनाचा प्रवास अनेक जुने नवीन ज्ञात अज्ञात कलाकार, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर यांच्या श्रमातून साकार झाला आहे. या सर्वांना मानाचा मुजरा.

डॉ. त्रंबक दूनबळे

– लेखन : डॉ.त्र्यंबक दुनबळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments