टचकन् यावे डोळा पाणी
भेट होता वा आठवणींनी
व्यर्थ होई जीवन आपुले
प्रेम जिव्हाळा अन् आपुलकी वाचुनी
तेव्हाच येई अर्थ जगण्याला
असे कुणी जर अश्रू पुसण्याला
होऊन जाते जगणे सुंदर
जेव्हा कुणी लावतो लळा
आपपर भाव सोडून
लावू आपणही इतरांना लळा
मनुष्य जन्माचे सार्थक होई
फुलविता प्रेम दयेचा मळा
उगाच का जातो कोणी
दिंडीत नाचाया
ओवाळून टाकतो विठाईच्या चरणी
भक्त आपुले मन काया
एकच नाव येते मुखी
पांडुरंग पांडुरंग
कारण कवटाळितो प्रेमे
तो माय बाप पंढरीचा श्रीरंग
त्याचीच लेकरे आपण सारी
गळून पडते जात पात
सांगून गेले ज्ञानदेव
असे विश्वाचे कल्याण त्या मानव धर्मात🙏
– रचना : राजेंद्र वाणी