देश विदेशात 🇦🇹🇦🇴 गेली ४० वर्षें “कुटुंब रंगलंय काव्यात” या एकपात्री प्रयोगाद्वार सर्व वयोगटातील रसिकांचं अभिरुची संपन्न मनोरंजन, प्रबोधन
करणारे प्रा विसुभाऊ बापट दर मंगळवारी आपल्या भेटीला येत आहेत.☺️
अल्प परिचय
प्रा. विसुभाऊ बापट, अर्थशास्त्र विषयात एम्.ए., कोल्हापूरच्या सत्यवादी दैनिकात आठ वर्षे सहसंपादक आणि प्रगती कॉलेजमध्ये दोन वर्षे प्राध्यापक होते. १९८२ साली हे सर्व सोडून त्यांनी मराठी कविता रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘वसा’ घेतला .
१९७६ पासून आजपर्यंत १४ हजार शाळांमध्ये रोज ३/४ प्रमाणे ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम सादर केला. पैकी १२०० वर आदिवासी आश्रम शाळा, अंध शाळा, रिमांड होम साठी विनामूल्य कार्यक्रम सादर केले.
२६ जानेवारी १९८१ पासून ते ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा एकपात्री काव्य – नाट्यानुभव कार्यक्रम सादर करीत असून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात व परदेशात राहणाऱ्या मराठी रसिकांना त्यांनी कवितेत रंगविले आहे.
३१ मे २००३ रोजी दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे सलग ११ तास आणि २७ सप्टेंबर २००९ रोजी रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सलग १५ तास त्यांनी मराठी कविता सादर केल्या. विशेष म्हणजे यात एकाही कवितेची पुनरुक्ती नव्हती व सर्व कविता मुखोद्गत होत्या. म्हणूनच ‘लिम्का बुक’, ‘वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडिया’ व ‘वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस् ऑफ इंडिया’ मध्ये “कुटुंब रंगलंय काव्यात” ची नोंद झाली आहे.
विसुभाऊंच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे १०,००० कविता, १००० वर कवी, ७० हून अधिक काव्य प्रकार, दहा वर मराठी बोली, ४५ तासांचे पाठांतर, ३००० वर प्रयोगांचे सादरीकरण हे आहे. सुप्रसिद्ध कवी शंकर वैद्य सरांनी त्यांना ‘काव्यदूत’ पदवी देऊन गौरविले आहे.
तर अशा या थोर कुटुंब रंगलंय काव्याच्या पहिल्या भागात आज आपण रंगू या !
भाग १
लेख क्र. १.
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांच्या अनुषंगाने कविता म्हणजे काय ? हे समजावून सांगणाऱ्या”ओंकार काव्य दर्शन” या शालेय कार्यक्रमाचा शुभारंभ मी कोल्हापूरच्या मेन राजाराम हायस्कूल मध्ये १९७६ साली केला. त्यानंतर दै. सत्यवादीची नोकरी सांभाळून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर येथील शाळांमध्ये मी हे शालेय कार्यक्रम सादर केले.
प्रामुख्याने पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील कार्यक्रमानंतर मला काही पालकांनी भेटून सांगितले, “बापट सर, आम्हालाही कविता ऐकायला आवडतात. आमच्या साठी एखादा कार्यक्रम तयार करा नां.! ”
असं सांगणारे बरेच पालक भेटले. पण….”पहिला कार्यक्रम करण्याची जबाबदारी आमची… तुम्ही कार्यक्रम तयार करा.! ” असं सांगून जबाबदारी घेणारा पहिला रसिक अहमदनगर मध्ये भेटला….अरविंद कुलकर्णी.!
माझ्या अहमदनगरच्या मुक्कामात हे अरविंद कुलकर्णी एका संध्याकाळी आपल्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. “बापट सर, हा माझा मुलगा केतन.! नवव्या इयत्तेत शिकतोय. तुमचे बरेच शालेय कार्यक्रम त्याने पाहिले आहेत. आता तो कविता लिहू लागला आहे. आपल्या कडून कविता ऐकायला आम्हालाही आवडतील. तेंव्हा आमच्यासाठी असा एक कार्यक्रम तयार करा ना.! शुभारंभाचा प्रयोग आमच्या ‘नगर क्लब’ मध्ये आयोजित करण्याची जबाबदारी माझी.! ” अशी जबाबदारी त्यांनी घेतली म्हणूनच मी असा कवितांचा कार्यक्रम तयार करायचे ठरवले, आणि तसा एकपात्री कार्यक्रम तयारही केला.
दै. सत्यवादीत काम करीत असल्याने प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या अनेक कवींच्या कविता माझ्या संकलनात होत्या. कवितांचा विशेष अभ्यास करून मी त्या कवितांवर संपादकीय संस्कारही केले होते. कांही प्रसिद्ध कवींच्या मार्गदर्शनाने कांही संस्कारित कविता मी पाठही केल्या होत्या. शिवाय ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, सूर्यकांत खांडेकर, श्रीकांत नरुले या सुप्रसिद्ध कवींच्या सहवासातून कवितेचे व्याकरण आणि त्यांच्या कविता मी संकलित केल्या होत्या. या कवींच्या कांही कविता, व गीतरामायणातील कांही कविता मला मुखोद्गत होत्या. त्या सर्व कवितांचा उपयोग या माझ्या नवीन एकपात्री कार्यक्रमासाठी करायचे मी ठरवले.
कोल्हापूर मधील कांही लोकनाट्यातून, कलापथकातून गण सादर करण्यासाठी मी जात असे, शिवाय त्यातील बतावणीची तयारी करूनही घेत असे. त्याचाही उपयोग या एकपात्री कार्यक्रमासाठी करायचा. शिवाय “मी अत्रे बोलतोय” हा एकपात्री कार्यक्रम सादर करणारे प्रा.सदानंद जोशी आणि “वर्हाड निघालंय लंडनला” हा एकपात्री प्रयोग सादर करणारे प्रा. लक्ष्मणराव देशपांडे या दोघांना गुरुस्थानी मानून मी माझ्या एकपात्री कार्यक्रमाची बांधणी केली.
भावना, उत्कटता व सौंदर्य या तीन गुणांतून “उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार” ही मराठीतील कवितेची व्याख्या रसिकांना समजावून सांगायची. यातील प्रत्येक गुण सांगिताना कविता सादर करायच्या. कोल्हापुरातील देवल क्लब मध्ये शिकलेल्या कलांचा उपयोग या एकपात्री साठी करायचा. म्हणजेच नीळकंठ बुवा चिखलीकर यांनी शिकवलेल्या संगिताचा उपयोग करून कांही कविता तबला-पेटीच्या साथीने (मी स्वतः पेटी वाजवतोच) गावून सादर करायच्या, माझ्या अभिनय गुरुंनी (द.स. तथा तात्या अंबपकर, वाय.जी. भोसले) दिलेल्या धड्यांचा उपयोग करून कांही कविता साभिनय सादर करायच्या, सादरीकरण करण्यासाठी आबालवृद्ध रंगतील…. त्यांना आवडतील अशाच कविता सादर करायच्या असे मी मनाशी ठरविले. आणि “वर्हाड निघालंय लंडनला” तसं “कुटुंब बसलंय काव्याला” या नावाने माझा एकपात्री तयार झाला.
२६ जानेवारी १९८१ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग श्री. अरविंद कुलकर्णी यांच्या मुळे अहमदनगरच्या “नगर क्लब” मध्ये आयोजित करण्यात आला. नगर क्लबचे सर्व सभासद म्हणजेच अहमदनगरचे सर्व “क्लास वन ” ऑफिसर्सही कार्यक्रमासाठी सहकुटुंब एकत्र आले. अरविंद कुलकर्णींनी माझा परिचय करून दिला.
कवींच्या कवितांतील शब्दाची ताकद मला माहीत होती…. गुरुंच्या कृपेने मला माझ्या सादरीकरणावर विश्वास होता. त्यामुळे गणेश वंदना, सरस्वती प्रार्थना, गुरू वंदना सादरीकरणा पासून सुरू झालेला माझा एकपात्री कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. बलसागर भारत होवो या साने गुरुजींच्या कवितेने “कुटुंब बसलंय काव्याला” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची मी सांगता केली, त्यावेळी टाळ्यांच्या कडकडाटाने नगर क्लब दुमदुमला होता.
नगरच्या रसिकांना माझा प्रयोग आवडला होता. म्हणूनच २७ तारखेला नगरच्या सर्व वृत्तपत्रांनी माझ्या एकपात्री कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी दिली होती.
इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या केतन अरविंद कुलकर्णी याच्या ज्या कवितेमुळे माझा नवीन एकपात्री कार्यक्रम सुरू केला ती कविता अशी….
आव्हान
ईश्वरा, कबूल आहे…
तू आज पर्यंत कित्येक पराक्रम केलेस,
रावणाला मारलंस , हिरण्यकश्यपूचा वध केलास,
कंसाचा कर्दनकाळ ठरलास…!
तरीसुद्धा माझं तुला आव्हान आहे.. ..
अरे, हिम्मत असेल तर मैदानात ये.
एकाच जाग्यावर बसून
राज्य करण्याचे तुझे दिवस संपलेत.
कां? घाबरलास ??
मला माहिती होतं.. तू घाबरणार.!
कारण, आज हजारो कंस जागे झालेत.
लाखो दुर्योधनांनी हातात गदा घेतली आहे.
म्हणूनच घाबरलास.!
अरे, फेकून दे तो मुकुट,
आणि आमच्या झोपडपट्टीत रहायला ये.
घाबरू नकोस….
तुझ्यापेक्षा सुंदर बासरी वाजविणाऱे गारुडी
सध्या गल्ली-बोळातून फिरतायत…!
आपल्याला हा उपक्रम कसा वाटतोय ते कृपया अवश्य कळवा म्हणजे अधिक हुरूप येईल .!

– लेखन : प्रा विसूभाऊ बापट
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
उपक्रम खुप छान आहे. श्री. बापटांचे अनुभव एैकायला, नव्हे, वाचायला नक्कीच आवडेल. बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांचा कार्यक्रम प्रत्यक्ष एैकला होता. व सर्वांना त्यांनी काव्यांत रंगवले होते ती आठवण आहे.
९ वी मधे शिकणाऱ्या केतनची कविता पण आवडली. आत्तापर्यंत तो एक उत्तम कवी झाला असेल.
उपक्रम एकदम छान.
लहानपणापासून कवितेबद्दल आवड निर्माण झाली, त्याला अनेक कारणं होती. त्यातलंच एक म्हणजे विसुभाऊंचं “कुटुंब रंगलंय काव्यात” आज या कार्यक्रमाचा इतिहास प्रत्यक्ष विसुभाऊंच्या लेखणीतून उतरलेला वाचायला मिळाला. छान वाटलं.
उपक्रम आवडला…. प्रा. विसूभाऊ बापट यांनी एक काळ गाजवला त्यामुळे सरांचे अनुभव ऐकायला मजा येईल. फक्त “कुटुंब बसलंय काव्याला” कि कुटुंब रंगलंय काव्यात” याचा खुलासा करावा प्लिज.