राजकवी भा. रा. तांबे
राजकवी भा. रा. तांबे यांचा २७ ऑक्टोबर १८७३ हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांना ही आदरांजली.
कवीवर्य भा. रा. तांबे यांनी सुमारे २२५ हून अधिक कविता लेखन केले. काही हिंदी कविताही त्यांनी लिहिल्या. याशिवाय इंग्रजी, उर्दू भाषांतील साहित्याचा त्यांचा अभ्यास होता.
लहान वयात हरवलेले पितृछत्र, बिकट आर्थिक परिस्थिती, खुंटलेले शिक्षण अशी अवस्था असतांनाही केवळ तीव्र ओढ आणि सश्रद्ध वृत्ती यामुळे कवीवर्य तांब्यांनी एकनाथ, मोरोपंत, ज्ञानेश्वर, तुकाराम अश्या संतांचे साहित्य, गीता, उपनिषदे, सांख्यदर्शन यासारखे तत्वज्ञान निरूपण ग्रंथ, जैन, बौद्ध धर्माचा अभ्यास, शाकुंतल, वेणीसंहार, उत्तर रामचरित, मालतीमाधव, मृच्छकटिक यासारखी नाटके, बायरन, शेले, किट्स, वर्डस्वर्थ, कोलरिज ह्या इंग्रजी कवींचा अभ्यास, शेक्सपियर चे सॉनेट्स, ब्राडले, ड्रायडन यांची समिक्षणे, कांट, स्पेंसर यांचे तत्वज्ञान आणि याशिवाय कितीतरी अधिक साहित्याचा अभ्यास केला होता.
परिस्थिती आणि अडचणींची सबब सांगत आपण आयुष्यात कितीवेळा माघार घेतो. मात्र राजकवी भा. रा. तांबे यांचा व्यासंग थक्क करणारा आहे.
‘सौंदर्य‘ ह्या शब्दात विलक्षण ताकद आहे. सौंदर्याची ओढ, त्याचे आकर्षण सर्वांनाच वाटते परंतु सर्वसामान्यतः ‘सौंदर्य‘ म्हटलं की आपला विचार स्त्री रूपावर अडकून पडतो. कवितेच्या बाबतीत मात्र ‘सौंदर्य’ हा शब्द निरनिराळे अर्थ प्रतीत करतो. सौंदर्य म्हणजे, जे सुंदरातून उत्पन्न झाले आहे ते आणि हे ‘ सुंदर ‘ म्हणजे ‘ सत्यम् शिवम् सुंदरम् ‘ चे सुंदर आहे; जे सुश्री आहे, तेजस्वी आहे, चारू आहे ! कधी हे रूपास उद्देशून असते, कधी शब्दास तर कधी अर्थास. यातला प्रत्येक गुण लेवून आलेल्या सौंदर्याची मनोहर धारा म्हणजे कवीवर्य भा. रा. तांबे यांची कविता !
आयुष्यासवे जन्माला आलेली आणि आयुष्यासमवेतच वाट चालणारी कविता !
भावाशयसंपन्न, सौंदर्यवान आणि व्यक्तिगत जाणीवांचे रंग ल्यायलेली !
सुंदर शब्द, सुंदर कल्पना आणि सुंदर भाव हा ह्या कवितेचा प्राण आहे, मग ती निसर्ग कविता असो, प्रेम कविता असो अथवा मृत्यू सारखे एक मोठे प्रश्नचिन्ह घेवून आलेली कविता असो.
‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी…’
सूर्यास्त समयीच्या संध्येचे केलेले हे वर्णन. यात ‘हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती’ म्हणत फुलपाखराच्या सुंदर रंगांना आणि संध्यासमयी आकाशात पसरलेल्या रंगांना हिरे, माणके आणि पाचू फुटून विखुरलेल्या रंगांची दिलेली उपमा विलक्षण सुंदर. यात शेवटच्या दोन ओळी इथे केवळ नमूद करते त्याचा संदर्भ मात्र जरा पुढे जाऊन देते.
‘पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा’
याशिवाय अतिशय प्रसिद्ध, सर्वश्रुत आणि जगाच्या न्यायावर भाष्य करणारी रचना…
‘मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनी दोन्हीं करां !’
अर्घ्य समय असतो पहाटेचा. उगवत्या सूर्यास अर्घ्य देण्याची प्रथा आहे. मात्र कवीवर्य म्हणताहेत ‘ मावळत्या दिनकरा…’
‘जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवी मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायण परा’
ह्यात ‘उगवत्या’ आणि ‘मावळत्या’ ह्या दोन चपखल शब्दांनी कवीवर्य तांब्यांनी वयाची, यशाची, प्रसिद्धीची आणि पर्यायाने आयुष्याची दर्शवलेली अवस्था हळूवारपणे एक गंभीर सत्य सांगणारी आहे.
प्रेमाची अभिव्यक्ती करणाऱ्या त्यांच्या रचनाही अप्रतिम आहेत. उरातल्या तीव्र प्रितीची शाब्दिक मांडणी द्रव्य- गुण सिद्धांताप्रमाणे भासावी अशी त्यांनी एका कवितेत दर्शवलेली आहे.
‘तिनी सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला
आजपासुनी जिवें अधिक तूं माझ्या हृदयाला…
नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत
पाणी जसें मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत,
हृदयी मी साठवी तुज तसा जीवित जो मजला…’
याशिवाय ‘कुणि कोडे माझे उकलिल का ? ही रचना देखील प्रेमात दोन जीवांना जी एकरूपता येते त्याचे यथार्थ वर्णन करणारी आहे.
कुणि कोडे माझे उकलिल का ?
हृदयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे;
नव रत्ने तू तुज भूषविले,
मन्मम खुलले आतिल का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?
कुणी कोडे माझे उक्लील का ?
प्रेम जागृत होण्यासाठी, प्रेमाची प्राप्ती होण्यासाठी आणि केवळ प्राप्ती नव्हे तर त्यातली चिरंतर ओढ टिकून रहाण्यासाठी काही फार वेगळं करावं लागतं असं मला वाटत नाही. केवळ एक शुद्धतेचा दीप आत उजळत असला, त्याला प्रतारणेची, कपटीपणाची, स्वार्थीपणाची काजळी जमणार नाही याची काळजी घेतली म्हणजे आपोआपच त्याचा उजाळा जोडीदाराच्या मुखावर आणि हृदयात दिसू लागतो. हे असे एकरूप होणे खरे आहे. हेच खरे प्रेम आहे.
साधे सोपे शब्द परंतू थेट हृदयाला स्पर्श करणारे भाव. ‘नववधू प्रिया मी बावरते’, ‘घट तिचा रिकामा झऱ्यावरी,’ ‘डोळे हे जुलमी गडे ‘, याही अश्याच अनुपम सौंदर्याची अभिव्यक्ती करणाऱ्या. ‘ तुझ्या गळा, माझ्या गळा ‘, ‘ या बालांनो या रे या ‘ सारख्या मधुर रचना निष्पाप मनाची ओळखही करून देतात.
याशिवाय त्यांच्या परमेश्र्वर भक्तीचे, अध्यात्मिक वृत्तीचे रूप दाखवणाऱ्या ‘ चरणीं तुझिया मज देई वास हरी ‘, ‘ भाग्य उजळले तुझे चरण पाहिलें ‘,’ अनंता, तुझें गोल, तारे तुझें ‘ अश्या अनेक रचना आहेत. ‘ सत्यम् शिवम् सुंदरम् ‘ यामधील शिवम् चे ध्यान करणाऱ्या आणि त्याचे भजनी रममाण होणाऱ्या ह्या रचना आहेत.
आता अखेरीस वर्णन करते आहे ते परमोच्च सत्य…आयुष्याचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू! कवीवर्य तांब्यांना मृत्यू बद्दल एक विलक्षण कुतूहल होते. त्यातल्या गुढतेने त्यांना जणू झपाटले होते.
मी यापूर्वी वर्णन केलेल्या रचनेत शेवटी दोन ओळी लिहिल्या त्याचा आता संदर्भ देते…
‘ पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा ‘
ह्यात, ‘कुठे बुडाला पलीकडील ती सोन्याचा गोळा ‘ ह्या ओळीतही तेच गूढ त्यांना खुणावते आहे असा भास होतो. सूर्यास्त सर्वांनी पाहिलेला, त्याचे काव्यात्मक वर्णन अनेक रचनांत आहे. मात्र राजकवींना त्यावेळच्या रूप, रंगापेक्षा अधिक औत्सुक्य वाटते आहे ते त्याच्या ‘ कुठे ‘ बुडण्यावर !
‘ जन पळभर म्हणतिल, ‘हाय हाय !’
मी जातां राहिल कार्य काय ?…
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचें काय जाय ?…’
मृत्यू बद्दल याहून अधिक सत्य आणि याहून अधिक उचित वर्णन आणखी कसे करता येईल? समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे’ म्हणून जे अंतिम सत्य सांगितले त्याचेच पुन्हा रसाळ भाषेत स्मरण करून देणारे हे काव्य. आपल्या माघारी सृष्टीचक्र नेमेक्रमे सुरू राहील, सगे सोयरे देखील क्षणाचा शोक करून आपापल्या मार्गी लागतील मग अश्या जगाच्या पाशात अडकून पडण्यापेक्षा शांती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे असा संदेश देणारी ही रचना.
सरते शेवटी कवीवर्यांची अजरामर रचना…
‘मरणात खरोखर जग जगतें;
अधि मरण, अमरपण ये मग तें…
सर्वस्वाचे दान अधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरि
रे! स्वयें सैल बंधन पडतें
स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काहीं मिळतें ?…’
७ डिसेंबर १९४१ हाच तो दिवस ज्या दिवशी राजकवी तांब्यांचे कुतूहल कदाचित संपले असावे आणि ज्या गुढाचे त्यांना कोडे होते ते सुटले असावे.
कवीवर्य तांबे, आपल्या कवितेने आम्हाला
‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ यातील प्रत्येकाचे दर्शन घडवले. आपण अटळ सत्य म्हणजे मृत्यू, याबद्दलचे कुतूहल, जिज्ञासा किंवा कदाचित भीती देखील अशी रमणीय शब्दांत व्यक्त केलीत. केवळ इतकेच नव्हें तर अश्या जगण्यात फार गुंतून पडण्यापेक्षा एक यज्ञ आरंभावा असा उपदेश केलात.
आपल्याला माझा प्रणाम🙏🏻
असाच एक ‘यज्ञ‘ इथे प्रज्वलित करते आहे. तो उरी सतत धगधगता रहावा हीच आपल्या चरणी प्रार्थना!
यज्ञ
निखाऱ्यांना कुठले ठावूक
कुणा कधी जाळलेले,
ते षडयंत्र अचूक
लोटणाऱ्याने पाळलेले.
आहुती चा अर्थच इथला
पुरता बदलून गेला,
हा त्याला अन् तो ह्याला
ज्वाले अर्पित गेला.
स्वार्थाचा कुयज्ञ मांडला;
कुठला देव प्रकटणार ?
राक्षस एक यज्ञी;
एक मनी प्रकटणार !
परमार्थी योजिल्या यज्ञा;
असुर विनाशित होते,
या देवांनो ध्वंस कराया;
हवना असुर बैसले होते.
विखार ठिणग्या लोळ होती;
प्रत्येकाला गिळतील,
चीतेवरचे चटके निश्चित
मृत्यूपूर्वीच मिळतील.
अग्नि वहावा स्वार्थाला
त्याग करावा पाशाचा,
यज्ञी त्या प्रतिबिंब पहा मग;
अवतार तू जगदीशाचा !

– लेखन : डॉ. गौरी जोशी- कंसारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800