‘नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा‘ ही कविता मी मराठी माध्यमाच्या शाळेत असताना शिकले. तेव्हा पावसाचेही माध्यम मराठी असावे. तो कौतुक करण्याइतका नियमाने येत-जात असे. पावसाच्या पुढच्या पिढीने मराठी माध्यम नाकारले असावे. कारण हल्ली तो केव्हाही येतो नि केव्हाही दडी मारण्याची मनमानी करतो !
पावसाळा नेमाने येत नसला तरी दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल (निक्काल?) आषाढी-कार्तिकीसारखे नेमाने येतात नि दोन विषयांवर चर्चा हमखास रंगतात. नापास होणाऱ्यांच्या आत्महत्या नि मेडीकल इंजिनिअरींगच्या क्षेत्रातील फी वाढ ! पर्यायाने मध्यमवर्गाच्या आर्थिक अडचणीची रडगाणी ! काही काळ वृत्तपत्रे रकाने भरण्याची सोय म्हणून हे विषय चघळतात. दूरदर्शनवर चर्चांचा कंठशोष होतो. मग पुन्हा रिझल्ट लागेतो अळीमिळी गुपचिळी ! हे योग्य आहे ?
मध्यमवर्गाच्या समस्या खोट्या नसूनही प्रश्न पडतात की रडगाण्यांसाठी तावातावाने चर्चा होतात नि समस्या सोडवण्यासाठी होत का नाहीत ? वर्षानुवर्षे हेच दळण दळण्याचा लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या नि ऐकणाऱ्यांना कंटाळा येत नाही ? वितंडवादाची निष्क्रिय खुमखुमी जिरवण्यासाठी चर्चा होतात का ? ‘टिळक श्रेष्ठ की आगरकर,’ हा विख्यात प्रश्नच कपडे बदलून निष्क्रियांच्या तोंडपाटिलकीसाठी प्रगटतो ?
शिक्षणाचा विचार केवळ नोकरीसाठी करणेही केविलवाणे वाटते. पोट महत्वाचेच ! समाधानाचा मार्ग पोटातून जातो, हे खरे ! तरी मार्ग पोटातून पुढे का सरकत नाही ? नोकरी या विषयाशी तो संपणे योग्य नाही.
ज्ञान आणि माहिती यांच्या अर्थातही हल्ली गल्लत होते. पूर्वी ज्ञान, समज, कौशल्य नि उपयुक्तता हे चार सोपान चढून लोक पंडिताची कक्षा गाठत. ‘सोप्या’ भाषेत सांगायचे तर नॉलेज, अंडरस्टँडिंग, अॅप्लिकेशन, यूज ! ज्ञान वापरण्यास महत्व असे. म्हणून पढतमूर्ख हा शब्द निर्माण झाला, याची जाणीव हरवते आहे. शिक्षणाचे ध्येय केवळ धनवृद्धी का बनते? मनीषाही उत्तम नोकरदार बनण्याची ! पगारदार मराठी माणूस श्रीमंत वाटला तरी धनवंतात त्याचा समावेश होतो का ? याचे उत्तर सुखद नसल्याने नेमेची येतो….. या उक्तीगत नियमाने होणाऱ्या वायफळ निष्क्रिय चर्चांच्या संदर्भात काही उदाहरणे नमूद करावीशी वाटली. म्हणून….
मराठी समजाने नोकरीचा मोह टाळून स्वतंत्र धंदा करावा हा विचार नवा नाही. आता मराठी तरुण स्वतंत्र धंदा करताना दिसतातही. तरी मला हे स्त्री मुक्ती आंदोलनागत वाटते. ही चळवळ भरात असताना, स्वतःस शहाणे समजणाऱ्या नि उथळ विनोद करण्यात माहिर असलेल्या डुढ्ढाचार्यांनी एक बोचरा विनोद खूपदा ऐकवला होता. स्त्री मुक्त व्हायला हवी, या नियमास अपवाद असावा माझी आई नि पत्नीचा ! त्याच तालावर मराठी माणसाने नोकरीचा मोह सोडून स्वतंत्र धंदा करावा, यास अपवाद असावा, माझ्या मुलाचा नि नवऱ्याचा! पाट्या टाकण्याचा पगार मिळवून मराठी माणूस स्वतंत्र व्यवसायात मागे का ? या विषयावर कंठशोष करायला स्वतः मोकळे असावे नि आपल्या लेकाने सुरक्षित जीवन जगावे, ही लालसा! व्यवसायात यश प्राप्त करण्याचे प्रशिक्षण देणारे महाग अभ्यासक्रम आता खूप आहेत. पण बिझनेस टायकून्सपाशी त्या पदव्या क्वचित असतात.
शिक्षण वाईट नसते, पण केवळ उत्तम नोकरी मिळवण्यास शिकणे केविलवाणे आहे. म्हणून शिक्षण दुर्लभ ठरलेल्या यशस्वी लोकांची उदाहरणे नमूद करत आहे……
माझा जन्म, शिक्षण नि अर्ध्याहून अधिक जीवन गुजरातेत ! इतर प्रदेशात नि परदेशातही खूप वास्तव्य झाले. त्यामुळे विचारसरणी मराठी न उरता भारतीय नि पुढे वैश्विक बनली. ग्लोबल व्हिलेजची (जग नावाचे खेडे) संकल्पना रुजल्यापासून बरेच लोक वैश्विक बनले. माझा महाराष्ट्राबाहेर वावर अधिक असल्याने आपल्या नि इतरांच्या खुबी नि खोडी जाणवल्या. जीवनाची सुरुवात गुजरातेत झाली नि मराठी समाजाच्या गुणांची कदर करणारा गुणग्राही गुजराती समाज आधी दिसला. गुणग्राही मराठी माणसे भेटली नाहीत असे नव्हे. पण अधिकतर गृहितके नि पूर्वग्रहांची शिकार असलेले लोक दिसले.
‘गुजरात्यांकडे भांडवल असते हो,’ असा गळा काढत त्यांचे यश फालतू ठरवणारे खूप बघितले. पूर्वी मराठी समाजात दारिद्र्य होते. पण दोघे अर्थार्जन करू लागले नि मराठी माणसाची स्थिती हलाखीची उरली नाही. पूर्वीच्या तुलनेत बँकेचे कर्ज घेणे सोपे झाले आहे. तरी मराठी माणूस नोकरीचा आग्रह धरतो. भांडवल नाही म्हणून की जोखीम पत्करण्याचे भय वाटते ? तेच महागाचे शिक्षण न घेण्याच्या समर्थनांचे !
मेडिकल नि इंजिनिअरींगचे शिक्षण इतर शाखांहून कोणत्याही काळात महाग होते. डोळ्यावरील ढापणे दूर केली तर गुजराती श्रीमंत नसतात, हे जाणवते. मराठी समाज फारसा गुणग्राहक नाही, हेही ! इतरांच्या गुणांचे कौतुक नि अनुसरण करून वेगळी वाट चोखाळणे ग्लोबल व्हिलेजमध्ये तरी घडायला हवे. म्हणून श्रीमंत नसून यशस्वी महानुभावांच्या यशाचे गमक नमूद करावेसे वाटते.
ज्ञात पासून अज्ञाताकडे जाणे सोपे ! पूर्वी गुरुकुल व जीवनाच्या शाळेत ज्ञानार्जन घडे. शाळा महाशाळा खूप नंतर निर्माण झाल्या. अभिनयाचे अभ्यासक्रमही ! तरी पूर्वी अभिजात अभिनय होताच. पृथ्वीराज कपूर, राजकपूर, देवानंद, मधुबाला, मीनाकुमारी…. प्रशिक्षित नव्हते. तरी त्यांनी अभिनयक्षेत्र गाजवले. तेच संगीतक्षेत्रात अढळ स्थानी असलेल्या मंगेशकर भावंडांचे ! त्यांची आधीची नि आताची आर्थिक स्थिती सारे जाणतात. पण संगीतक्षेत्रात असूनही या भावंडांनी आर्थिक अडचणीमुळे शिकता आले नाही, हे रडगाणे कधी आळवले नाही.
सुपरिचित सुशीलकुमार शिंदे यांचे कर्तृत्व तळागाळातून फुलले, हे ही सारे जाणतात. रामायण, महाभारत, वेद… लिहिणारे युनिव्हर्सिटीचे पदवीधर नव्हते. कालीदास, मीराबाई, ज्ञानेश्वरादी भावंडे, नामदेव, रामदास, तुकाराम, बहिणाबाई… कुणापाशी डॉक्टरेट नव्हती. आरोग्यमंत्री शत्रुघ्न सिन्हा एकदा विनोदाच्या अंगाने म्हणाले होते, “शिक्षक मला तिरस्काराने म्हणत – डॉक्टर दूर तू कंपाऊंडरही होणार नाहीस. त्यांचे म्हणणे खरे ठरले. मी झालो आरोग्यमंत्री ! म्हणजे डॉक्टर वा कंपाऊंडर नाहीच की !”
एकोणीसावे शतक संपत असताना आजची शिक्षणप्रणाली सुरू झाली. तेव्हाही ही प्रणाली नाकारून व्यक्तिगत कौशल्यावर विश्वास ठेवणारे होतेच. मुंबईच्या मूळजी जेठा मार्केटचे निर्माते, तेजपालशेठसारखे अनेक ! तो जुना काळ, असे म्हणण्यातही हंशील नाही. हे वर्तमानातील संदर्भही देता येतातच की…
मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रिटवर नवभारत प्रकाशन मंदिर हे गुजराती सूचक मंदिरच आहे. त्याचे संस्थापक मालक धनजीभाई शाह, मूळ अहमदाबादचे ! तिथेही १९९० पासून सी.जी. रोडवर त्यांची पुस्तकांची वातानुकुलित शोरुम आहे. १९५० साली ते अहमदाबादच्या विख्यात शाळेतून सत्तर टक्के गुण मिळवून मॅट्रिक झाले. तेव्हा पहिल्या प्रयत्नात क्वचित कुणी मॅट्रिक पास होई ! प्रश्नपत्रिकात बहुविकल्प देणारे प्रश्न नसत. त्यामुळे मार्कांचा ढीग रचला जात नसे. पहिला वर्ग मिळवणारे थोडे नि सत्तर टक्के गुण मिळवणारे क्वचित दिसत. ते मेडिकलला सहज जाऊ शकत.
बौद्धिकदृष्ट्या धनजीभाई डॉक्टर होण्यास समर्थ होते. ते शिक्षण महाग ! डॉक्टर होण्याची क्षमता असून डॉक्टर न झालेले तेव्हाही खूप असत. पण नैराश्यास वश होऊन त्रागा करत तणतणण्याची वा आत्महत्या करण्याची पळपुटी वृत्ती गुजरातेत नव्हती. धनजीभाईंच्या काकांचे गुर्जर ग्रंथ संग्रहालय होते. तिथे ते नोकरी करू लागले. चुलत भावांबरोबर ते काम करत. त्यांना वाचनाचा छंद ! गुजराती लोक वाचत नाहीत, हा स्वतःही फारसे वाचत नसलेल्या मराठी समाजाचा पूर्वग्रह ! या नोकरीत धनजीभाईंना व्यावसायिक शिक्षणासोबत छंद जोपासण्याची संधी मिळाली. पुढे त्यांना अधिक काही करावेसे वाटले. ते अहमदाबादचा निरोप घेऊन ओरिसास गेले. तिथे जम बसला नाही. म्हणून ना त्यांनी आत्महत्येचा विचार केला की नैराश्याची चैन ! ते मुंबईस गेले. तिथे व्यवसायात जम बसलेला एक मित्र होता. धनजीभाईंनी त्याच्याकडे नोकरी मागितली. नोकरी देणे टाळण्यासाठी नव्हे तर मित्राच्या क्षमतेची जाणीव असल्याने त्याने स्वतंत्र काम करणे सुचवले.
धनजीभाईंपाशी फक्त काकांच्या दुकानात पुस्तकविक्रीचा थोडा अनुभव! म्हणून मोठ्या थैल्यात पुस्तके घेऊन ते घरोघरी विकू लागले. सल्लागार मित्राचा संपर्क होताच. तो फक्त तोंडपाटिलकी करणारा उपदेशक नव्हता. त्याने धनजीभाईंना पाच हजाराची हुंडी मिळवून दिली. म्हणून त्यांनी प्रिन्सेस स्ट्रिटवर पुस्तकांचे दुकान थाटले. दुकानाचा जम बसताच समाधान न पावता ते प्रकाशन क्षेत्रात प्रवेशले.
गुजराती प्रकाशकात नवभारत प्रकाशन मंदिर या संस्थेचा आदराने उल्लेख होतो. अहमदाबादच्या टोलेजंग देखण्या शो रुमला तीन मजले आहेत. आता पुत्र अशोकची त्यांना मदत असते. आपला समाज भारताबाहेर असल्याची नोंद घेऊन अशोकभाईंना पुस्तके निर्यात करण्याची इच्छा झाली. लगेच विचार अंमलात आणण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात होते ! अशोकभाई केवळ एस.एस.सी. पास आहेत. तरी एम.बी.ए. पदवीधारकाहून अधिक सहजतेने ते धंदा ‘मॅनेज’ करतात.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पाच नवलाच्या बाबींचा समावेश आहे. त्यात मुंबईच्या सूरज वॉटर पार्क अग्रभागी! गोरेगावात साईबाबा नगराची रचना करणारे अरुणभाई मुछाळा या पार्कचे निर्माते ! कुणी शिक्षण विचारले तर नववी नापास सांगण्यास त्यांना संकोच वाटत नाहीत. तरी त्यांच्या मनात शिक्षणाविषयी आकस मात्र नाही. म्हणून त्यांनी पॉलिटेकनिक कॉलेजच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश असलेल्या सूरज वॉटर पार्कचा धबधबा, विविध प्रकारच्या कुलुपांचा नि स्लाईड्सचा संग्रह, फायबर गुंफा या सर्व संकल्पनांचे उद्गाते अरुणभाई! सर्वांनी निर्मल आनंद घ्यावा, असे त्यांना वाटते. म्हणून अरुणभाई निर्मित एकाही परीसरात धूम्रपान, सुरापान नि मांसाहारास परवानगी नाही.
नववीत नापास झालेला मुलगा बापाकडून भांडवल घेऊऩ मुंबईस गेला. रक्तात धंद्याची वारसागत क्षमता असल्याने उत्तम धंदा करून श्रीमंत झाला, अशी ही कहाणी नाही. ते जन्मले शेतकऱ्याच्या घरात! नववीत नापास झाल्याचे कळताच घरी जाणे टाळून नेसत्या वस्त्रानिशी त्यांनी अहमदाबाद गाठले. कारण नव्हती त्यांना शेतीची आवड की घरात खायला काळ नि भुईला भार होण्याची हौस ! म्हणून त्यांनी अहमदाबादला रिक्षा चालवली, ते प्लंबिंगचे कामही शिकले.
मग ते मध्यप्रदेशात गेले. तिथे विडीच्या कारखान्यात काम केले पण ते त्यांना आवडले नाही. स्वतःस काय आवडेल याचा शोध आणि बोध घेत ते मुंबईस पोहोचले. तिथे त्यांनी प्लंबिंगचे काम सुरू केले. मुंबईत त्यांची धीम्या गतीने पण निश्चित मार्गावर वाटचाल सुरू झाली. प्लंबिंगच्या कामात जम बसताच त्यांनी बिल्डिंगचे सामान आणि रेती पुरवण्याच्या कामाची भर घातली. पुढे इमारती बांधण्यास प्रारंभ केला. मग वॉटरपार्कची निर्मिती केली.
जोगसंजोग (योगायोग) नावाचे मासिक सुरू केले. मनात मातृभूमीचे ऋण फेडण्याची तीव्र आस ! म्हणून राजकोटला त्यांनी अॅम्युझमेंट पार्क तयार करवला…. आणि कितीतरी ! आता त्यांच्या हाताखाली बाराशेहून अधिक लोक काम करतात. त्यात नजरेत भरतो त्यांचा तरुण मुलगा! बाराव्या वर्षापासून तो पित्याचे काम बघत शिकलेला ! ते म्हणतात, “शिक्षित मंडळी योजना आखण्यात वेळ घालवतात. आम्ही प्रोजेक्ट नजरेने जोखतो नि डोक्याचा कौल घेऊन वेगाने निर्णय घेण्याचे धाडस करतो. डिग्ऱ्यांपेक्षा आम्हाला कौशल्य, नीती आणि साहस या त्रिसूत्री योजनेचे अधिक आकर्षण ! व्यवसायात आम्ही अनीती घुसू देत नाही !“
अमरेली जिल्ह्यातील खजडीया नावाच्या छोट्या गावी जन्मलेले चतुरभाई कानजीभाई बाबरीया हे मुंबईतील हिरे व्यवसायातील लखलखीत नाव ! खेड्यातील सामान्य शाळेत चौथीपर्यंत शिक्षण! कुटुंबात माणसे वाढली नि जमिनीच्या तुकड्यावर निभेना. म्हणून पाचवीत जाण्याऐवजी ते सुरतेस गेले. सुरत हिरे व्यवसायाची काशी ! हिरे कारखान्यात नोकरी करत ते हिऱ्यास पैलू पाडण्यात पारंगत झाले. थोडी गंगाजळी जमताच त्यांना धंदा खुणावू लागला. पण कामाचा जम बसला नाही. बचत संपली तरी नामोहरम न होता ते नेटाने कामास लागले. घरच्यांची मदत दूर, गावी पैसे पाठवावे लागत. तरी ते अपयशाने ना ते खचले की कुणाची मदत नाही… म्हणत गळा काढला.
नोकरीत पुन्हा थोडी पुंजी साठली नि त्यांना नोकरी नकोशी वाटली. पण सुरतेस स्वतंत्र काम करणेही नको वाटले. मुंबईस जाऊन त्यांनी दहिसरला छोट्या पायावर काम सुरू केले. आता व्यवसायात दिग्गज ठरणारे चतुरभाई म्हणतात, “तरुण वयात कामाचा जम बसला तेव्हा यशासाठी शिक्षणाची गरज नाही, असं वाटलंही. पण प्रौढ वयात शिक्षणाचं महत्व पटलं. काळाशी ताल जुळवून नवे तंत्रज्ञान आत्मसात अवश्य केले. पण उत्तम आकलनशक्ती आणि तीव्र इच्छेमुळे ते जमले. शिक्षण नसल्याने कष्टाने यश साध्य करावे लागले. शिक्षण असते तर अधिक सहज नि वेगाने यश प्राप्त झाले असते, हे निर्विवाद !“ शिक्षणाचे महत्व कबूल करण्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसतो.
गुजराती साहित्यिक राजेंद्र शुक्ल यांनी आपल्या तीन मुलांना कधी शाळेत पाठवलेच नाही. घरी शिकवून त्यांनी मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांचा पिढीजात धंदा होता. त्यामुळे पदव्यांविना घरच्या धंद्यात काम करणे मुले जमवू शकली, हे खरे ! रिलायन्सचे धीरुभाई अंबाणी, दि.मो. ट्रस्टचे मफतकाका महेता, हरकिसन महेता हॉस्पिटलचे बालभाई, एस. कुमारचे शंभुकुमार कासलीवाल, कच्छहून आलेले झेब्रा ब्रांड छत्रीवाले भुराभाई पटेल… कुणी नव्हते खूप शिकलेले की तोंडी चांदीचा चमचा घेऊन जन्मले. उलट जन्मावेळी बहुतेकांचे आर्थिक स्तर निम्न मध्यमवर्गाहून खालच्या पातळीचे होते. पण ना कुणी आर्थिक परिस्थितीची रडगाणी गायली की शिकता आले नाही याचा महाग शिक्षणपद्धतीवर राग धरला.
गुजराती माणूस म्हणजे पैसा नि मराठी माणूस म्हणजे ज्ञान, हे गृहितक विश्वसत्य मानणाऱ्यांसमक्ष भारताच्या वर्तमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उत्तम उदाहरण ठेवलेच आहे. अत्यंत निम्न आर्थिक स्तरात जन्मून परिस्थितीशी अथक झुंज देत ते इथवर पोहोचले. शिक्षण प्राप्त करण्यासाठी त्यांनी टोकाची धडपड केली. सोयी सवलतींचा अभाव असताना आपले ध्येय साध्य केले, हे सारे जाणतात.
स्वामी आनंद यांनी अशा कर्तृत्वान महानुभावांच्या जीवनालेखाची गाथा गुजराथी भाषेत प्रकाशित केली आहे. ज्ञानी वीरचंद धरमसी यांची कहाणी अगदी आगळी ! सत्तरी ओलांडलेले वीरचंदभाई रोज सकाळी अकरा वाजता एशियाटिक लायब्ररीत जात. अनेक विषयात कुतूहल असलेल्या वीरचंदभाईंनी अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. वीस वर्षे संशोधन करून The first Indian Archaeologist (भगवानलाल इंद्रजी – पुरातत्वविद्येचे भारतीय आदिपुरुष) हा ग्रंथ लिहिला.
संशोधक कुणास म्हणावे, ज्ञान किती सखोल असू शकते, हे जाणायचे असेल त्याने वीरचंदभाईंचे हे पुस्तक वाचावे. भगवानलाल एशियाटिक लायब्ररीच्या मुंबई शाखेचे ते पहिले फेलो ! १८७७ साली त्यांची या पदावर नेमणूक झाली. जबरदस्त ज्ञानपिपासा असेलेले खेडवळ भगवानलाल चालत तर कधी बैलगाडीने अशी मजल दरमजल करत मुंबईस पोहोचले होते. त्यांना १८८४ साली नेदरलँडच्या विश्वविद्यालयाने पुरातत्व संशोधनासाठी डॉक्टरेट प्रदान केली. नेदरलँडने त्यांच्यापासूनच भारतीयांना अशी मानद् पदवी प्रदान करण्याची प्रथा सुरू केली.
औपचारिक शिक्षण विचारात घेत नव्हते भगवानलाल पदवीधर की वीरचंदभाई ! तीव्र ज्ञानपिपासा आणि अथक श्रम करण्याची तयारी या जोरावरच त्यांनी अनुपम यश प्राप्त केले. त्यांच्या ज्ञानाचा गुजरात वा भारतातच नव्हे तर विदेशातही आदर होई. संशोधक लोक वीरचंदजींना ‘लाख दुखोकी एक दवा’ वा चालताबोलता एनसायक्लोपिडिया समजत. मूक चित्रपटांच्या संदर्भात वा कोणत्याही शंकांचे निरसन वीरचंदभाईंकडे मिळेल, अशी साऱ्यांना खात्री वाटे. पेन्सिल्व्हानिया युनिव्हर्सिटीचे आर्कियॉलॉजीचे अभ्यासक त्यांचा सल्ला घेत.
कुणी दुबळ्या आर्थिकस्थितीमुळे तर कुणी विपरीत शिक्षणप्रणालीमुळे शालेय जीवनात वा कॉलेजात चमक सिद्ध करू शकत नाहीत. वीरचंदभाईंच्या संदर्भात तसा प्रश्न नव्हता. परिस्थिती सोयीची असूनही त्यांनी नववीनंतर शिक्षण सोडले. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना वाचनाचा छंद जडला. दहा वर्षांचे होईतो त्यांनी गुजरातीत छापून आलेले सारे अभिजात साहित्य वाचले. पण घोकंपट्टीस महत्व देणारी शिक्षणप्रणाली त्यांना रुचली नाही. मनात अनेक विषयात कुतूहल !
कच्छ परिसरात तयार होणाऱ्या विशिष्ठ ठिकऱ्या आणि पन्हळींचे त्यांना आकर्षण ! वाचनालयात बसून ते या संदर्भात प्रसिद्ध झालेले आर्कियॉलॉजिकल अहवाल तासंतास वाचत बसत. पुढे हे कुतूहल इतके वाढले की वयाच्या बाराव्या वर्षी ते दक्षिणेतील गुंफा आणि पडीक किल्ले यांच्या अभ्यासासाठी घराबाहेर पडले.
पुस्तके, प्रवास आणि प्रत्यक्षानुभावाने त्यांच्या ज्ञानात अफाट भर घातली. सारे मजेत चालू असताना अचानक डोक्यावर घराची जबाबदारी कोसळली. ज्ञानयात्रेस खीळ बसली. ज्ञान अफाट असले तरी हातात पदवीचा कागद नव्हता. म्हणून जबाबदारी पेलण्यात ज्ञानाची मदत झाली नाही. पण अचानक जबाबदारी कोसळली तसा अचानक आगळ्या संधीचा दरवाजा उघडला. पेनसिल्व्हानिया युनिव्हर्सिटीतील डॉक्टर ग्रोगरी यांच्या नेतृत्वाखाली आर्कियॉलॉजीकल सर्वेक्षणासाठी एक टीम भारतात आली. त्यात त्यांना टीममध्ये इंटरप्रिटरचे काम करण्याची संधी मिळाली.
वीरचंदभाईंनी या संधीचे सोने केले. त्यांच्या सहकाराने जर्मन भाषेत पुस्तके प्रकाशित झाली. मूकपटांच्या संदर्भात ज्ञानकोष (एनसायक्लोपिडिया) तयार झाला त्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. लेखकांची नावे प्रकाशात असणे नवलप्रद नाही. सुजाण वाचक म्हणून वीरचंदभाईंना मिळालेल्या प्रसिद्धीवलयास आगळे महत्व आहे. प्रसंगी कोणत्याही विषयात समजुतीचा गोंधळ उडाला तर वीरचंदभाईंपाशी त्याचे समाधान असेल, अशी जाणकारांना खात्री वाटते.
पदव्यांची चळत बाळगणाऱ्या ज्ञानी पंडितांच्या मांदीयाळीत नववीपर्यंत शिकलेल्या ज्ञानी वीरचंदभाईंना मानाचे स्थान असे. सारे त्यांना जिवंत एनसायक्लोपिडिया वा चालताबोलता ज्ञानकोश म्हणत ! तरी त्यांच्या विनम्रतेची गाठ सैलावली नाही. ते म्हणत, ”औपचारिक शिक्षण न घेतलेला मी एकमेव नाही. आंतरराष्ट्रिय ख्याती प्राप्त केलेले अरुण कोल्हटकर विशेष शिकले नव्हते. तरी त्यांच्या इंग्रजी कवितांचा बहुमान झाला. फारसे न शिकलेल्याने मातृभाषेत कविता करणे नवलाचे नाही. पण अरुणजींनी परक्या भाषेत कवित्व सिद्ध करण्याचा पराक्रम केला. विधायक वा रचनात्मक कामास औपचारिक पदव्यांचे सोयर-सुतक नसते, हे त्यांच्यासारखे अनेक महानुभाव सिद्ध करतात !”
जगात हाती पदवीची चळत नसलेल्या यशस्वी लोकात सचिन तेंडुलकरचा उल्लेख अटळ ! पाकिस्तानात भारत-पाक श्रणीत खेळायचे असल्याने बारावीची परीक्षा हुकलेल्या इरफान पठाण आणि पार्थिव पटेल यांच्याही कर्तृत्वाची नोंद अटळ !
हे गुजरात-महाराष्ट्रापुरते सीमित नाही. सॅकेरीन निर्मितीचा पहिला मान पटकावणाऱ्या अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीचे मालक जॉन. एफ. क्वीनी याचे शिक्षण सहा यत्ता ! रोलेक्स घड्याळांच्या कंपनीचे मालक हान्स विल्स डॉर्फी फार शिकले नाहीत. ध्यास, लगन व प्रामाणिक कष्टाची कास धरून लोक खूप महत्कार्य करतात.
लियो टॉलस्टॉय विश्वविद्यालयातील अभ्यासास वेळेचा अपव्यय म्हणत. ते पाच वर्षाचे असताना त्यांचे वडील निवर्तले. पुढे चार वर्षांनी आई ! तरी (की म्हणून?) त्यांनी महान तत्वने7त्ते म्हणून कीर्ती मिळवली. सामान्य शेतकऱ्याचा कष्टाळू मुलगा वाचन, कष्ट आणि वक्तृत्वशैलीच्या बळावर अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, हे अब्राहम लिंकनने सिद्ध केले. तत्वचिंतक सॉक्रेटिसचे वडील पाथरवट ! चौदा वर्षाच्या वयास शाळा सोडून त्यांना दगड फोडण्याचे काम करावे लागले. तरी अॅथेन्सच्या प्रजेस सॉक्रेटिसच्या विचारांनी वेड लावले. स्वविचारास ठामपणे चिकटून राहण्यासाठी देहत्याग स्वीकारणारे सॉक्रेटिस एकमेव असावेत.
ही यादी न संपणारी! सर्व महानुभावांची कार्यक्षेत्रे, कर्मभूमी, वय आणि सामाजिक परिस्थितीत साम्य नाही. तरी काही बाबातीत साम्य नजरेत भरते ! सर्वांची नम्रता अनोखी! अहंमन्य वृत्तीचा अभाव ! जे नाही त्याबद्दल तक्रार न करण्याची वृत्ती ! आहे त्याचा उत्तम उपयोग करून घेणे आणि नाही त्याचा खेद करत गळा न काढणे ! परवडत नव्हते त्याबद्दल कुणी ना हळहळ व्यक्त केली की नैराश्याच्या गर्तेत दडी मारली. वादात शक्ती खर्च न करता सर्व शक्तीनिशी परिस्थितीशी चार हात करून त्यांनी क्षमता सिद्ध केली.
या यशस्वी लोकांच्या मते, अमुक पदवी, तमुक शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळणे वगैरे बाबींचा कारकीर्द सुरू करताना थोडा फरक पडतो, पण पुढे आत्मसूच, प्रामाणिक महेनत आणि कौशल्य या तिवईवरच यश ताठ उभे राहते. म्हणून सुवर्णपदक विजेत्या डॉक्टरवर माशा मारण्याची वेळ आलेली दिसते नि गुणवत्तायादीत चमकलेल्या इंजिनियरपेक्षा जुजबी तंत्रज्ञान शिकलेला टेक्निशियन अधिक कौशल्या सिद्ध करताना दिसतो.
शिक्षण अर्थहीन नसते, पण ज्ञान उपयोगात आणण्याच्या कौशल्यास अधिक महत्व आहे. पोपटपंची आणि आत्मसात केलेले ज्ञान यात फरक आहे. म्हणून मुलांचे संगोपन करताना त्यांच्या मनात योग्य विचारांची पेरणी करण्याची गरज असते. लहानसहान बाबींनी सैरभैर होऊन नैराश्याची शिकार बनणे टाळण्याचा तो उत्तम मार्ग आहे. मुलांची क्षमता आणि आवडनिवड विचारात न घेता त्यांना डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यातच पराक्रम आहे, हा बुर्झवा विचार घुसवण्याची चूक वडीलमंडळींनी केली नाही तर बऱ्याच आत्महत्या टळतील. पुढच्या पिढीस श्रमाचे महत्व
समजावणे हे जन्मदात्यांचे आणि काही अंशी समाजाचेही कर्तव्य आहे.
यशस्वी लोक स्वतःस ज्ञानी म्हणवत फुशारत नाहीत. त्यांना बढाया मारायला वेळ नसतो. बढाया मारत छाती काढणारे सहसा ज्ञानी नसतात. म्हणून म्हणतात – स्वतःस पंडित समजणारा अज्ञानी असतो आणि स्वतःस अज्ञानी समजणाऱ्यास खऱ्या अर्थाने ज्ञानाची भूक असू शकते. कारण संचितात ज्ञानाची भर पडू लागली की खूप काही आपल्याला ठाऊक नसल्याची जाणीव होते. मी ज्ञानी, हे गृहितक प्रगतीचा शत्रू ठरते. रींगणाबाहेर नजर टाकण्याजोगे खुले मन ठेवणाऱ्यांच्या भविष्याची इमारत देखणे रूप धारण करते.
तुम्हाला नाही वाटत – या बाबतीत विचारात बदल करण्याची गरज आहे ?

– लेखन : स्मिता भागवत, कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
फार सुंदर, सविस्तर, वास्तवादी लेख. सर्वांनी याचा विचार करायलाच हवा. मनापासून ज्या विषयांची आवड असेल त्यांत खुप परीश्रम करून यश मिळवतां येते. त्यात दैवाचाहि भाग आहे हे मान्य केले तरी निराश न होता कार्यरत असावे. व येणाऱ्या संधींचा फायदा घ्यावा. स्मिता भागवतांचे विचार मनापासून पटले व आवडले. धन्यवाद
Wonderful. What a inspiring
Story and thought provoking. Very useful in shaping our future and thought process. Great.