नमस्कार, मंडळी.
आपल्या “वाचक लिहितात” या सदरात आपण आठवडा भरात आलेल्या निवडक प्रतिक्रिया देत असतो. पण यावेळी तसे न करता, जेष्ठ पत्रकार प्रा डॉ किरण ठाकुर यांच्या “बातमीदारी करताना…” या सदरात त्यांनी ते वाराणसी येथे यु एन आय या वृत्त संस्थेचे वार्ताहर असतांना पवित्र गंगा नदीच्या भीषण प्रदूषणाच्या प्रभावी बातम्यांमुळे पुढे किती सकारात्मक परिणाम झाला, याचे प्रत्ययकारी अनुभव व्यक्त होत आहेत.
अशीच एक सविस्तर प्रतिक्रिया आज देत आहे. त्यामुळे अन्य प्रतिक्रियांना सुट्टी☺️
दिवाळीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा💐
आपली
– टीम एनएसटी
प्रा. डॉक्टर किरण ठाकूर यांनी १९८० साली वाराणसी येथे यू.एन.आय. चे वार्ताहर म्हणून काम करत असताना गंगा नदीच्या प्रदूषणाबाबत घेतलेले अनुभव आणि निव्वळ बातमीदारीच्या पलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून त्याचा ध्यास घेत त्याच्या शुद्धीकरणासाठी केलेले प्रयत्न हे निष्ठावान आणि अभ्यासू पत्रकारितेचे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
लेखाच्या शेवटी त्यांनी चाळीस वर्षांत अनेक नेत्यांच्या अनेक आश्वासनांनंतरही हा प्रश्न समूळ नष्ट झालेला नाही, ही व्यक्त केलेली खंत अतिशय योग्य आहे. माझे याबाबतचे गेल्या दोन वर्षांतील अनुभव या निमित्ताने सांगावेसे वाटतात.
मी एक लघुउद्योजक विद्युत अभियंता. व्हीए टेक वाबाग ही चेन्नईस्थित कंपनी मैला, नदी यांच्याशी निगडित जलशुद्धीकरणांचे मोठे प्रकल्प उभारते. या कंपनीने वाराणसी आणि काठमांडू येथे उभारलेल्या अनुक्रमे मैला आणि नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये माझ्या कंपनीत उत्पादन झालेली काही विद्युत यंत्रणा वापरली आहे. अर्थात त्यांच्या विशाल रामसेतूकार्यात माझा वाटा खारीचाच असला तरी हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित करत असताना त्या त्या प्रकल्पठिकाणी माझा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यानिमित्त झालेल्या दौऱ्यांत काम झाल्यावर अनुक्रमे गंगाकिनारी असलेले विविध घाट आणि बागमती किनारी असलेले पशुपतिनाथ मंदिर यांना आवर्जून भेटी दिल्या.
गंगाकिनारच्या डॉ. ठाकूर यांनी लिहिलेल्या परिस्थितीत ४० वर्षांत आता बराच सुधार झाला असला तरी तिथे अजून बरेच हवाप्रदूषण होत आहे आणि नदीचे पाणीही काही अंशी प्रदूषित होत आहे. पशुपतिनाथ मंदिराबाबतीत देखील हीच वस्तुस्थिती आहे.
वाराणसीच्या अनेक घाटांवर फिरणे हा मन समृद्ध करणारा अनुभव असला तरी आपण कोणत्याही गल्लीत असलो तरी दर २०-२५ मिनिटांनी ‘राम नाम सत्य है’ च्या घोषणांनी आणि घाटांकडे येणाऱ्या मर्तिकाच्या यात्रांनी मनात थोडी चलबिचल होते. पण याचीही थोड्या वेळात सवय होऊन जाते. अंतिम क्रियेसाठी नगरपालिकेतर्फे राजा हरिश्चंद्र आणि मनकर्णिका घाटांवर अधिकृत दाहिन्याही उभारल्या गेल्या आहेत. परंतु अधिकांश लोक उघड्या घाटांवर नदीच्या समीप अंत्यविधी करण्याला प्राधान्य देतात.
यांसाठी लागणारा मोठा लाकूडसाठा या घाटांकडे येणाऱ्या गल्ल्यांमध्ये उघड्यावर साठवून ठेवलेला असतो. मर्तिकक्रिया करणारे ठेकेदार लाकूडपुरवठा करून जवळजवळ चिता रचतात आणि मर्तिकाबरोबर आलेले नातलग दहनक्रिया पूर्ण होईपर्यंत काही तास तिथे बसून राहतात. देहाची अथवा चितेच्या लाकडांची रक्षा नदीत टाकण्यास बंदी असली तरी वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर काही रक्षा नदीच्या पात्रात जाऊन पडते. त्याव्यतिरिक्त या दोन घाटांच्या परिसरात धुराचे लोट उठतात आणि करपट वास भरून राहतो.
दररोज सूर्यास्ताच्या वेळेस मधोमध असणाऱ्या दशाश्वमेध घाटावर अत्यंत लोकप्रिय असणारी ‘ओम जय गंगे माता, श्री जय गंगे माता, जो नर तुमको ध्याता, मनवांछित फल पाता.’ ही श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेली मंगल आरती गंगापूजनाबरोबर सादर होते आणि हजारो लोक तल्लीन होऊन तिचा अनुभव घेतात. परंतु त्याच वेळी या घाटापासून अवघ्या ५००-६०० मीटर अंतरावर उत्तरेला असलेल्या मनकर्णिका आणि दक्षिणेला असलेल्या राजा हरिश्चंद्र घाटांवर उघड्यावर अनेक चिता एकाच वेळी जळत असतात. पार्थिव देहावरील अंत्यसंस्कार अतिशय आवश्यक गोष्ट आहे हे सर्वमान्य असले तरी तो आजूबाजूच्या समाजाचा, पर्यावरणाचा विचार करून केल्यास अधिक परिपूर्ण होईल असा विचार यावेळी मनात येतो.
काठमांडूचे पशुपतिनाथ मंदिर जगातील एक नावाजलेले मंदिर आहे. अत्यंत सुंदर दगडी, धातू आणि काष्ठ कोरीव कामाने अंतर्बाह्य नटलेले आहे. या देवस्थानाअंतर्गत लहानमोठी मिळून एकंदरीत ५१८ देवळे आहेत. परंतु याच्या मागेच बागमती नदीच्या काठावर अंत्यविधींसाठी लांबचलांब ओवऱ्या आहेत. एका वेळी तिथे ८-१० चिता तरी धडधडत असतात. तिथे मात्र प्रदूषणविरोधी नियमांचे पालन आपल्यापेक्षा कमी प्रमाणात होते. तसेच तिथे दहनक्रियांचे दगडी चौथरे थेट नदीलाच भिडले असल्यामुळे रक्षा नदीत पडण्याची शक्यता कितीतरी अधिक असते आणि ते प्रत्यक्षात दिसतेही.
हे जलप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठीच बागमती नदीच्या काठी पशुपतिनाथ मंदिराजवळच व्हीए टेक वाबाग या कंपनीने गुहेश्वरी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. मानवी देहांवर अंत्यसंस्कार होत असतानाच बागमती नदीच्या दुसऱ्या तीरावर अनेक धार्मिक कार्येही चाललेली असतात. एका तीरावर जीवन समृद्ध करण्यासाठी केलेली परमेश्वराची प्रार्थना तर दुसऱ्या तीरावर परलोकगमनासाठी केलेले संस्कार आणि या दोहोंच्या मधून वाहणारी प्रदूषित बागमती नदी एका दृष्टीक्षेपात आपल्याला मानवी जीवनाचा प्रवास दाखवते !
वाराणसी आणि जास्त करून काठमांडू येथील नदीकाठच्या उघड्यावरील अंत्यसंस्कारांमुळे मन विषण्ण झाले असले तरी या दोन्ही शहरांमधील जलप्रदूषणनियंत्रणात माझ्या उद्योगाचा लहानसा वाटा आहे ही त्यातल्यात्यात माझ्यासाठी समाधानाची गोष्ट !

– लेखन : भूषण तळवलकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800