Thursday, July 3, 2025
Homeलेखआठवणीतील दिवाळी.

आठवणीतील दिवाळी.

आज वयाच्या पन्नाशी नंतरचा काळ सुरू झाला. या ठिकाणी उभे राहून मागे वळून पहायचा प्रयत्न केला. जरा शांत, निवांत क्षण मिळाले आणि आमचा बालपणीचा काळ सुखाचा सहज आठवत गेला. आठवणींच्या लाटांवर लाटा मनात उसळत राहिल्या. नेहमीप्रमाणे मी स्वतःला सोडून दिलं. आठवणीं बरोबर वाहत गेले. थांबवूनही जेव्हा मन ऐकत नाही, तेव्हा मी ही अडेलपणा करत नाही. आजही तेच केलं.

गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा हे आमचं विश्व होतं. आमची दिवाळी आतासारखी नसायची. खूप समृद्ध, माणसांनी, नातलगांनी, फराळानी भरलेली असायची. दिवाळी म्हणजे फटाके, फराळ, रांगोळ्या आणि नवीन कपडे हे समीकरण होतं.

त्याकाळात आमच्या आया घरीच असायच्या. नोकरी करणारी आई एखाद्याच घरात असायची. म्हणून फराळ हा बाहेरून यायचा नाही. मानाने घरात बनवला जायचा. माझी आईही तिच्या नेहमीच्या मैत्रिणींसोबत फराळ बनवताना दिसायची.

बापरे… तेव्हा शाळेला सुट्टी लागलेली असायची. पण दिवाळीचा भलामोठा अभ्यास दिलेला असायचा. दर वर्षी दिवाळीच्या सुट्टी बाबत मी अनेक स्वप्न पहायची. पण स्वप्नाप्रमाणे कधीही, काहीही घडायचं नाही. आमची स्वप्न सुद्धा किती मजेशीर असायची ! आज हसायला येतं… पण तेव्हा ती सगळी स्वप्न हे आमचं जीवन होतं. अजून टीव्हीचा जमाना आलेला नव्हता. त्यामुळे संपूर्ण दिवस मोकळा असायचा.

शाळेतील स्वप्नाळू, अलका अग्निहोत्री

प्रत्येक दिवाळीत मी पहिलं स्वप्न पाहायची, ते मोठं मजेशीर असायचं. दिवाळीचा अभ्यास दिवाळी सुरू होण्यापूर्वीच मी पूर्ण करून दिवाळी मस्त मजेत घालवली आहे.. पण इतकी व्यवधानं असायची की नेमका अभ्यासाला वेळच मिळायचा नाही. आईला फराळात, घर आवरण्यात मदत करणे ही सर्वात महत्त्वाची कारणं असायची.

आईने केलेल्या फराळाचं तेव्हा काही वाटायचं नाही. पण आज मात्र नवल वाटतं. मोतीचूर बुंदीचे लाडू आई स्वतः घरी बुंदी पाडून करायची. रवा-बेसनाचे लाडू ही तिची मास्टरी होती. दरवर्षी फराळाची सुरुवात रवा-बेसनाच्या लाडवाने व्हायची. दुपारच्या मधल्या वेळात खारे आणि गोड शंकरपाळे आपला नंबर लावून जायचे. दुसऱ्या दिवशी चकली आणि शेव ठरलेली. पोहे गच्चीत वाळत घालायचं आणि आठवणीने परत आणायचं काम माझं आणि माझ्या मोठ्या भावाचा होतं. दुपारच्या वेळी सगळं वर ठीक आहे ना हे पाहून यायला मात्र भाऊच जायचा.

तिसऱ्या दिवशी बुंदी पाडली जायची आणि दिवसभर हे लाडू पुरायचे. काही वेळा आईने घरी मैसुरपाक सुद्धा केलेला होता. एकदा तिच्या सगळ्या मैत्रिणींनी एकत्रच बुंदीचे लाडू करायचं ठरवलं. सगळं सामान आणून झालं. सामान आमच्याकडे होतं. दुपारी चार मैत्रिणी जमणार म्हणून सगळी तयारी झाली. अडीच किलो बुंदी वाट पाहून आईने पाडायला घेतली. तरीही कोणीच आल्या नाहीत. मी उगीच जमेल तशी मदत करत होते. जवळजवळ सगळी बुंदी मी पाडली होती. बुंदी पाकात पडली. आता लाडू वळायला आले तरी कोणी आल्या नाहीत. शेवटी वडील ऑफिसातून आले तर घरी ही तयारी. बाबा घरी आले की लगेच त्यांना जेवण लागायचं. तिने ते जेवणही तयार करून ठेवलं होतं. बाबांच जेवण झाल्यावर त्यांनीही छान पैकी लाडू वळायला घेतले. मी आणि भाऊ सुद्धा उत्साहाने जमेल तसे लाडू वळून आईला देत होतो आणि ती त्यांना नीट आकार देत होती. सगळे लाडू व्हायला बराच वेळ लागला. दुसऱ्या दिवशी बाबा ऑफिसला गेल्यावर आपला वाटा घ्यायला मात्र सगळ्या आल्या होत्या. प्रत्येकीला वाटले की बाकीच्या आहेत, होतील लाडू.. आई अक्षरशा रडली होती त्या दिवशी.. तरीही तीने त्यांचा वाटा त्यांना देऊन टाकला. परंतु यापुढे एकत्र फराळ करायचा नाही याचा कानाला खडा लावला.

चिवडा शेवटी व्हायचा. खारे शंकरपाळे तिचे स्वतःचे आवडते होते. करंजी करताना मात्र तिची खूप तारांबळ व्हायची. शेवटचा पदार्थ अनारसे असायचा.

त्याकाळी शेजारी- पाजारी, मित्रांकडे ताटं द्यायची पद्धत नव्हती. फराळाला बोलावलं जायचं. मग छान गप्पा रंगायच्या. अचानक कोणी आलं तरी छान फराळ पुढे केला जायचा. आम्ही कोणत्या काकूंकडे काय चांगलं असतं ते आपापसात बोलत असायचो.. बाबांचं भजनी मंडळ होतं. शनिवारी रात्री भजन ठरलेलं असायचं. भजन झाल्यानंतर फराळाचा कार्यक्रम व्हायचा..

माझं दुसरं स्वप्न असायचं तेही असंच. दर दिवाळीत मला नवीन कपडे मिळतील असं वाटायचं. पण त्या काळात असं कधीच व्हायचं नाही. आई जुनेच फ्रॉक आठवडाभर गादी खाली ठेवून द्यायची. तिच त्यांची इस्त्री. मग दिवाळीच्या पहिल्या दिवशी असे गादी खाली ठेवून नवीन झालेले कपडे घालून आम्ही आपली दिवाळी साजरी करायचो. उत्साह इतका असायचा की नवा फ्रॉक मिळाला नाही याचं फारसं काही वाटायचंही नाही.

आमच्या चौकासमोर आराम हॉटेल होतं. ते हॉटेल वाले रात्री एक, दिड वाजता हॉटेल धुवायचे व नंतर झोपायचे. पण बरोबर सकाळी साडेचार वाजता डांबरी फटाक्यांची माळ लावायचे. त्यांनी सुरुवात केली की त्या आवाजाने आम्ही सगळे जागे व्हायचो. मग आई तेल लावून सर्वांना अंघोळ घालायची. आंघोळीला खास दिवाळीचा म्हणून मोती आणि मैसूर सॅंडल सोप बाबांनी आणलेला असायचा. त्या साबणाची अंघोळ मला खूप आवडायची. मग आमच्या अंगाला उटणं लावून आई बाहेर जायची… आणि पुढची अंघोळ आम्ही पूर्ण करायचो. हे उटणं आणि फटाके बाबा सहकार बाजार मधून आणायचे.

याच दिवसात नवं कालनिर्णय कॅलेंडर यायचं. त्याच्या जोडीला ऑफिसमधून आणलेले दिवाळी अंक असायचे. हे सगळं असल्याशिवाय, मुळात दिवाळीला सुरुवातच व्हायची नाही.

माझं तिसरं स्वप्न असायचं ते म्हणजे भरपूर फटाके मिळण्याचं. आमच्याकडे एक हिंदालियमची शाळेची पेटी होती. बाहेरून त्याला कडी होती. त्या पेटीत मावणारे किंबहुना पेटीत भरपूर जागा शिल्लक राहील इतकेच फटाके बाबा आणायचे. सहकार बाजार मध्ये फटाके आणायला बाबा आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचे. पण घ्यायचे काय आणि किती हे मात्र तेच ठरवायचे. घरी आणलेले फटाके आम्ही पुढचे चार-पाच दिवस गॅलरीत ती पेटी उघडी ठेवून उन्हात वाळवायचा. जितके फटाके ऊन खातील तितके छान वाजायचे . त्याकाळी फुलबाज्या, टिकल्या, नागगोळी, भुईचक्र हेच जास्त असायचे. थोडी लवंगी फटाके आणि एखाद बंडल डांबरी फटाके मिळायचे. मग ऐन दिवाळीत आम्ही लवंगी आणि डांबरी फटाके सुटे करायचो आणि खूप फटाके मिळाले असं वाटून खुश असायचो. त्या पेटीचा खरा ताबा भावाकडे असायचा. तो लवंगी , डांबरी मस्त उडवायचा. मला मात्र त्या आवाजाच्या फटाक्यांची भीती वाटायची. डांबरी फटाक्यांची पाचशे, हजार, दीड हजाराची लड आणि सुतळी बॉम्ब समोरच्या आराम हॉटेल वाले यांनीच पहिल्यांदा वाजवायला सुरुवात केली. त्या काळात कितीतरी दिवस हे फटाके फक्त हॉटेलवाले वाजवतात असा माझा समज झाला होता. पुढे काही वर्षांनी जेव्हा बाबांनी आम्हाला डांबरीची लड पूर्ण वाजवायची परवानगी दिली, आणि सुतळी बॉम्ब आणून दिला तेव्हा उगाच मला हॉटेलवाल्यांइतके आपण मोठे आणि श्रीमंत झालो आहोत असं वाटत होतं.

माझं चौथा स्वप्न होतं की मला एकटीला माझ्या मैत्रीणींसह सकाळी फिरायला जाता येईल. पण तसं कधी घडलंच नाही. आम्ही सगळी चौकातली मुलं साधारण एकाच वयाची आणि समान भावंड असणारी होतो. त्यामुळे मुली वेगळ्या अशा कुठे जायच्या नाहीत. दिवाळीत पहिल्याच दिवशी सगळं आवरून पाच वाजता आम्ही बाल मंडळी खाली जमायला लागायचो. आईने थोडा थोडा फराळ बांधून दिलेला असायचा.

तो घेऊन आणि आईने दिलेला “नवा” फ्रॉक घालून आम्ही चौकात जमायचो. कोण आधी आलं, कोणाला उशीर झाला, यावर मग चिडवाचिडवी व्हायची. सगळे जमे पर्यंत सहा वाजायचे, तेव्हा छान फटफटलेलं असायचं. मग सगळे जण पायीपायी गृहनिर्माण भवन, कलानगर करत नंदादीप गार्डनमध्ये जायचो. तिथे माळ्याने झाडांना पाणी देणं, झाडं कापणं असं काम सुरू केलेलं असायचं. त्याला सांगून आम्ही आमचा फराळ एका ठिकाणी जमा करायचो आणि मग भरपूर खेळायचो. मुलं त्यांचा खेळ खेळायची आणि आम्ही मुली पकडा-पकडी, लपाछपी सारखे खेळ खेळायचो. खेळून दमछाक झाली की मस्त सगळे एकत्र जमून फराळ करायचो. कोणीही कोणताही फराळ खायचा. खूप मस्त वाटायचं.

कोणी खेळताना पडलं, लागलं तर मोठी भावंडे आणि सगळे छान सांभाळून घ्यायचे. खेळून झाल्यावर माळी दादा कडे जाऊन त्याच्या त्या मोठ्या नळीतील पाण्याने हात धुताना आम्ही मुद्दाम ओल्या व्हायचो आणि हसायचो. थकलो भागलो की सगळे एकत्र घरी यायचो. येता – जाताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरावरून पुढे जाताना बाहेर काढलेले वाघाचं चित्र पाहून उगीचच भीती वाटायची. पुढे बरेच वर्षांनी कॉलनीत गेलो तर सुरुवातीलाच कलानगरचा तो काढलेला वाघ बघून हसू येत होतं.

बाजूला असलेलं नंदादिप गार्डन आजही आहे हे बघून बरं वाटलं. पण आता ते अगदी छोटं, केविलवाणं दिसत होतं. गार्डन लहान झालं आहे किंवा आम्ही खूप मोठे झालो आहोत. तरी ते गार्डन आहे याचं खूप बरं वाटत होतं.

लक्ष्मीपूजनाला आमच्याकडे एक प्लास्टिकची लक्ष्मी होती, वीतभर उंचीची.. आई तिला कपाटातून काढून तिची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी परत डब्यात ठेवून कपाटात ठराविक जागी तो डबा ठेवायची. लक्ष्मीपूजनाला लाह्या, धणे बत्तासे यांचा नैवेद्य असायचा. बाबा झेंडूची भरपूर फुलं, पाच प्रकारची मोठी फळं आणायचे. मग दुसऱ्या दिवशी आई त्याचं फ्रुट सॅलड बनवायची. सफरचंद बारीक चिरले की फ्रुट सॅलेड वाढतं म्हणून बारीक चिरायची सवय तिथूनच लागली. अनेक वर्ष आमचं लक्ष्मीपूजन असंच व्हायचं. पुढे पुढे लक्ष्मी काढणं आणि जागेवर ठेवण्याचं काम माझ्याकडे आलं.

आम्ही दिवाळीचं आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचे तोरण घरी करायचो. तसंच चौकामध्ये लागणारा मोठा आकाश कंदील आम्ही सगळे मुलं मिळून करायचो. तो चिटकवण्यासाठी लागणारा डिंक आमच्याकडे नव्हता. त्या काळी आम्ही भाताची पेज किंवा शिजलेला भात चुरून त्याच्याने कंदील पूर्ण करायचो. खूप मजा यायची.

पाडव्याला सकाळी सकाळी आम्ही बाबांना तेल लावत असू आणि त्यांना ओवाळत असू. भाऊबीजेला भावाला ओवाळत असू. बाबांची बहीण जवळ नसल्याने आम्ही त्यांना ओवाळत असू. धनत्रयोदशीपासून आपापल्या दारात काढायच्या रांगोळ्या भाऊबीजेचे पर्यंत चालायच्या. रांगोळी आई काढून द्यायची. रंग त्या मानाने मला पटकन भरता यायला लागले. आपली रांगोळी काढून झाली की शेजार्यांना मदत करायची. तेही अशीच मदत करत राहायचे. भाऊबीजेला आईचे भाऊ यायचे. तेव्हा तर भरपूर मजा असायची.

पाडव्याची पुरणपोळी ठरलेली असायची. बाबांना तव्यावरची पोळी वाढली तरी ते गारच वाढली असं हसत हसत म्हणायचे. तुपासाठी त्या काळात आमच्याकडे वेगळ्या वाट्या होत्या. भाऊ मामा आमच्या जवळच राहायचे. मग भाऊ मामा, राजू दादा मिलिंद दादा आणि अपर्णा सगळे आमच्याकडे यायचे. पाडव्याला आणि भाऊबीजेला आमचा मोठा बेत असायचा.

आई पंचामृत, पुरणपोळी, कटाची आमटी, आणि मसाले भात करायची. बाकी भाज्या चटण्या कोशिबिरी तेव्हा जरा मागे पडायच्या. पण ताट अगदी गच्च भरलेले असायचे. याची तयारी म्हणजे भाज्या कापून देणं हे मी आणि मामेबहीण अपर्णा नेहमी करायचो. आईच्या देखरेखीखाली आम्ही दोघी सगळ्यांना वाढायचो.

यानंतर दिवाळी तर संपायची. पण तुळशीच्या लग्नासाठी थोडे फटाके जपून ठेवलेले असायचे. तोपर्यंत आकाश कंदीलही लागलेला असायचा. तुळशीच्या लग्नाच्या दिवशी मात्र सगळे फटाके संपून जायचे.

या दिवसात अजून एक वेगळा वेडा छंद होता. दिवाळीत बहुदा पहाटे आणि रात्री फटाके फोडले जायचे. मग दिवसभर आम्ही सगळे चौकात हिंडायचो आणि अर्धवट फुटलेले लवंगा, डांबरी फटाके गोळा करायचो. अशा फटाक्यातील दारू एका कागदावर जमा करायचो आणि तो कागद नंतर पेटवून द्यायचो. हा आगळा वेगळा फटाका आम्हा सर्वांचा आवडता फटाका होता.

दिवाळी संपता संपता लक्षात यायचं की अजून अभ्यास झालेलाच नाही. मग उद्या शाळा सुरू होणार तर आदल्या दिवशी नुसती धांदल उडायची. अभ्यास जेमतेम पूर्ण व्हायचा. वही सजवायची राहून जायची. मग भाऊ मदत करायचा आणि कसा तरी दिवाळीचा अभ्यास पूर्ण व्हायचा. बाबा रागवायचे आणि पुढच्या वर्षी सुरुवातीला अभ्यास करायला सांगायचे. पण कितीही ठरवलं तरी शेवटच्या दिवशी होणाऱ्या अभ्यासाची मजाही काही औरच असायची.

दिवाळी भर बाबांनी आणलेल्या दिवाळी अंकांनी बहार यायची. प्रत्येक कथा आम्ही त्या काळात वाचून काढायचो. हंस, वसंत ही माझी आवडती मासिकं होती. आवाज अंक आला की हसायला यायचे पण चित्र भडक असायची. त्यातूनच त्या काळात सुरेश भटांच्या तरुण आहे रात्र अजूनी, मालवून टाक दीप.. अशा कविता छापून यायच्या.. बाजूला सुंदर साजेसे चित्र असायचे. त्या छापून आलेल्या कविता आजही हृदयात कोरलेल्या आहेत. त्या पाच-सहा कडवी असलेल्या कवितांचं मोठं नवल वाटत राहायचं..

पुढे अजून काही गोष्टी ॲड झाल्या. सकाळी बासरी, सनईचे सूर येऊ लागले.. पहाटेच घरी कॅसेट लावलेली असायची. पुढे टीव्ही आला. त्यात खास दिवाळीचं आकर्षण गजरा कार्यक्रम असायचा. एखादा चित्रपट असायचा. भाऊबीज, पाडवा, दिवाळी यांचे चित्रण असलेले चित्रपट आवर्जून दाखवले जायचे.

नंतर ग्रीटिंग कार्ड चा जमाना आला. तोवर माझे लग्न झाले होते. माझ्या नणंदेचे मिस्टर…. सुधाकरराव आवर्जून साऱ्यांना ग्रिटींग कार्ड पाठवायचे . त्यांचं कार्ड आल्याशिवाय दिवाळी आली आहे हे पटायचं नाही. दूरदर्शनवरची क्लासिकल गाण्यांची मेहफिल साऱ्यांच्या आवडीची होती. घरचे सगळे एकत्र बसून ती गाणी ऐकायचो. हे सगळं….. म्हणजे आमची दिवाळी असायची .

शेवटी शेवटी फराळ थोडासाच राहिला की बाबा भाऊ मामांना बोलवायचे.. पुन्हा सगळे आम्ही एकत्र येऊन थोडासा फराळ आणि भरपूर कांदा भजीवर ताव मारायचो. भाऊ मामा येताना त्यांना मिळालेल्या ड्रायफ्रूटचे मोठे मोठे खोके घेऊन यायचे. त्या खोक्यातला सर्व मेवा आम्ही हौसेनं खायचोच. पण त्याला आवरण म्हणून आलेला कागद आणि तो कप्प्यांचा खोका पुढे बरेच दिवस सांभाळून ठेवायचो.
कोणतीही स्वप्न पूर्ण न होता जुन्याच कपड्यातली, भरपूर फराळाची रेलचेल असलेली ती दिवाळी आजही मनापासून आठवते आणि आवडते.

आता मात्र मी दिवाळी अंक वाचत नाही. खरंतर विकत घेऊन वाचण्याची ऐपत आहे तरीही वाचत नाही. कथांचा तो दर्जा नसल्याने मन खट्टू व्हायला लागलं आणि मी अंक घेणं, वाचणं बंद केलं. आजही कुणी चुकूनही लवंगी, डांबरी फटाके फोडायला लागले की मी माझ्या बालपणातील दिवाळीत मनसोक्त फेरफटका मारून येते… मग आई चंद्राला आधी आणि भावाला नंतर ओवाळतांना दिसू लागते.

मधल्या काळात काळाने बरीच माणसं नेली.. आता दिवाळीत ग्रीटिंग कार्ड येत नाहीत.. माणसंही येत नाहीत.. मन मात्र बालपणीच्या त्या सुखद दिवाळीच्या रम्य आठवणीत रमून जातं…

अलका अग्निहोत्री

– लेखन : अलका अग्निहोत्री
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. ‘आठवणीतील दिवाळी’ बालपणीच्या या रम्य आठवणीत मन मस्तच रमले, कारण आम्ही भावंडं देखील ते दिवस अनुभवले आहेत. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments