अंधारल्या क्षणांचे अस्तित्त्व फार नाही
रक्तात निर्मिले मी जाज्वल्य सूर्य काही
हा नाद शंखभेरी संग्राम जीवनाशी
होईन चक्रवर्ती ठावे दिशांस दाही
कोंडून धूप ठेवे दैवी सुगंध त्याचा
जो आज पेटल्याने व्यापून व्योम राही
सांगेन मी दिव्यांना माझी मला जळू दे
हे कर्ज रोज त्यांचे ना पेलवे जराही
ओहोळ अंतरीचा अदृश्य पावलेला
पर्जन्य मीच झाले सृष्टीस देत ग्वाही
ओसाड तीच काया उद्यान होत आहे
आत्म्यात पेरलेले चैतन्य बीज पाही
आलोक पर्व माझे हे आत्म प्रेरणेचे
दैदीप्यमान आभा लाभो अशी तुलाही

– रचना : डॉ. गौरी जोशी-कंसारा, अमेरिका
अप्रतिम कविता. ओसाड तीच काया उद्यान होत आहे, किती सुंदर कल्पना. कितीही वाचली तरी पुन्हा वाचाविशी वाटावी अशी…
आपले खूप खूप आभार 🙏🏻
मनापासून आभार 🙏🏻
गर्भित अर्थाने जीवनास नवीन विचार, नवीन प्रेरणा, नवीन उर्जा देणारी आशादायी आणि प्रेरणादायी कविता… आत्मसन्मान, स्वावलंबन आणि जीवनाचे सोने करण्याची हिम्मत देणारी कविता…
डॉ गौरी जोशी मॅडम खूप छान रचना
हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅडम