– आम्ही मैत्रिणींनी देखील शाळेत अशी वात्रट खुर्ची पहिली होती. नाटकाच्या प्रॅक्टिसच्या वेळी नाटकात भाग घेतलेल्या सगळ्या मुली त्यावेळी आदर्शगृहात जमत असू.
नाटकात राजा, राणी आणि प्रधान अशी पात्रे होती. दरबार भरलेला आहे अशा सीनसाठी खुर्च्या मांडलेल्या असायच्या. यातली एक खुर्ची फार चिमटे काढायची. नाटकातला तथाकथीत राजा ती खुर्ची हळूच राणीसाठी मांडायचा, राणी प्रधानासाठी ती खुर्ची राखून ठेवायची तर दरबारातला हुशार बिरबल ती प्रधानाकडून आपल्याकडे येण्याआधीच तिची रवानगी आम्हाला दिग्दर्शन करणाऱ्या बाईंसाठी बिनधास्त ठेवून द्यायचा. आम्हा मुलांना शब्दफेक नीट जमली नाही किंवा नाटकातले संवाद आठवले नाहीत की मग बाई त्यांना बसणाऱ्या चिमट्यांची परतफेड पुरेपूर करायच्या हे वेगळे सांगायला नकोच !
चिमटे बसले तर बसू देत पण आम्ही बिनधास्त चुका करायचो शाळेत असताना. फक्त शाळेतच नव्हे तर आत्ताही करतो त्याच निरागस वृत्तीने.
चुकांचा विषय निघाला तसा खुर्च्यांच्या पाठोपाठ विंदांचाच ‘न चुकणारी माणसे’ हा लघुनिबंध आठवला. त्यात ते लिहितात, “काही माणसे ‘मी चुकत नाही’ हे बिरुद मिरवीतच जगात प्रवेश करतात. ते जेव्हा बाजारात जातात तेव्हा बिनचूकपणे योग्य दुकानातच खरेदी करतात. ते खरेदी करतात तो माल नेहमीच दर्जेदार असतो. त्यांचा न्हावी सुद्धा सगळ्यांहून जास्त कसबी असतो आणि तो हुडकून काढण्यासाठी त्यांनी पद्धतशीर संशोधन केलेलं असते. त्यांचा शिंपी सगळ्यांहून कापड कमी घेतो आणि अधिक वक्तशीर असतो. त्यांचा गवळी म्हणे दुधात पाणीच घालीत नाही आणि “घातलेच तर ते गाळून घालतो”. हे शब्द आठवत असताना माझ्या मनात हास्याचे कढ असे काही दाटून येऊ लागले की पुढे त्यातूनच शिंप्याची एक गमतीदार गोष्ट आठवली !
आमच्याकडे एक भारी शिंपी होता ‘डिसेंट’ असे त्याच्या दुकानाचे नाव. त्याचे म्हणे वैशिष्ट्यच होते की केवढेही कमी कापड असले तरी तो न कुरकुरता कपडे शिवायचा. ग्राहकांशी त्याचे वागणे अगदी दुकानाच्या नावाप्रमाणेच ‘डिसेंट’ होते. त्याची ख्याती ऐकून आमच्या शेजारचे तात्या नुकत्याच जन्मलेल्या आपल्या नातवाकरता कुंची शिवावी म्हणून त्याच्याकडे गेले.
आपल्याकडे असलेले जरीचे कापड दाखवीत तात्यांनी शिंप्याला विचारले की, “यात किती कुंच्या शिवून मिळतील ?” तर शिंपी म्हणाला, “दोन”. मग तात्यांना वाटले की हा कमी कापड वापरुन शिवणारा आहे आणि ते ही न कुरकुरुता; तर विचारायला काय हरकत आहे ? “चार होतील का ?”, तात्यांनी विचारले. डिसेंटवाला शिंपी खाली मुंडी घालून कटींग करता करता मानेनेच त्यांना “हो” म्हणाला. तात्या मनातून खुश झाले. वचने किम् दरिद्रता या विचाराने थोडं कचरतच तात्या पुन्हा म्हणाले, “दहा होतील का हो ?” तर हा शिंपी त्यांच्याकडे एक विक्षिप्त कटाक्ष टाकून “हो” म्हणाला. तात्या भलतेच खुश कारण जिथे ‘दोन’ कुंच्या व्हायच्या तिथे आता ‘दहा’ शिवून मिळणार होत्या, त्याने नातवाची चांगलीच सोय होणार होती. शिवाय सासू-सुना दोघीही खुश होणार ते वेगळेच.
एका आठवड्यानंतर तात्या कुंच्या झाल्यात का ते विचारायला गेले तर शिंपी म्हणाला, “पुढल्या आठवड्यात या. काम किचकट आहे.” तात्यांनाही पटले की आता इतक्या कमी कापडात दहा शिवून घ्यायच्या म्हणजे .. एका आठवड्याने ते पुन्हा गेले तेव्हा शिंप्याने शिवलेल्या दहा कुंच्या काढत तात्यांना हात पुढे करा असे सांगितले आणि त्यांच्या दहा बोटात त्या दहा कुंच्या अडकविल्या. तात्यांचा चेहरा आता पडला होता. कोणत्या मापाच्या कुंच्या, ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवून म्हणेल तेवढ्या कुंच्या शिवणारा शिंपी आणि अधाशीपणे अधिक होतील तर होऊ देत म्हणणारे तात्या दोघांचेही गणित इथे चुकले, हे बाकी खरेच. ☺️
माझे काका नेहमी म्हणायचे तुमचे लॉजिक पक्के असेल तर तुमचे गणित चुकणार नाही. आधी लॉजिक नीट समजून घ्या. लॉजिकचा संदर्भ डोक्यात आला नि एकदम ट्यूब पेटली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ‘ना. सी. फडके’ लॉजिक हा विषय उत्तम शिकवायचे. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात कोणत्याही विषयापेक्षा लॉजिकची लेक्चर्सं फार गाजत ती अर्थातच प्रा. ‘ना. सी. फडके’ यांच्या शिकविण्याच्या हातोटीमुळे. प्रा. फडक्यांची भाषा मधुर, रसाळ, बोलणं आणि स्पष्टीकरण आखीव-रेखीव. उदाहरणं अनेकदा वर्गातील मुलींवर आधारलेली. विद्यार्थ्यांना गुदगुल्या कशा कराव्यात हे फडक्यांना चांगलं ठाऊक होतं.
एकदा वर्गात त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, “व्हॉट इज द मॅटर ?” … मग उत्तर देताना म्हणाले, “डोन्ट माइंड”. पुन्हा विचारलं, “व्हॉट इज माइंड ?” आणि स्वतःच उत्तर देत म्हणाले, “इट इज नॉट मॅटर”. या त्यांच्या शब्दकोटीवर मुले जाम खूश होत असत. अजून एक असाच किस्सा. एका विद्यार्थिनीला पेपरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले म्हणून नाराज होऊन तिने उत्तरपत्रिकेचा चोळामोळा केला आणि जवळच्या खिडकीतून बाहेर फेकून दिला. हा सारा प्रकार पाहून वर्गाला उद्देशून प्रा. फडके एवढेच म्हणाले, “फिगर इज नॉट सो बॅड”. चाणाक्ष विद्यार्थ्यांना अर्थातच गर्भितार्थ कळला आणि वर्गात हशा पिकला.
हे प्राध्यापक कुणीकडे आणि आमचे शामळू, मिळमिळीत प्राध्यापक कुणीकडे असे मला अनेकदा वाटते. पण आमच्या वर्गातली मुलं मात्र भारी होती. – क्रमशः…

– लेखन : दीपाली दातार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800