Friday, November 22, 2024
Homeबातम्याकल्याणच्या नागरिकांचा सवाल : घरातील कचरा टाकायचा कुठे ?

कल्याणच्या नागरिकांचा सवाल : घरातील कचरा टाकायचा कुठे ?

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना महामारीच्या साथीला नियंत्रणात आणण्याचे निरनिराळे प्रयोग करूनही अद्यापही अपेक्षित यश येत नाहीय. यामुळे आता महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवशी यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.

या महापालिका क्षेत्रात कोरोना नियंत्रणात येत नाही, त्याचा दोष हा केवळ महापालिकेलाच देता येणार नाही तर महापालिकेपेक्षाही सामान्य नागरिक आणि आरोग्य प्रशासनाला –घनकचरा विभागाला जबाबदार धरायला हवे असे सध्याची कल्याण डोंबिवलीची स्थिती पहाता म्हणता येईल.

कल्याण शहरात महापालिकेने कचरा कुंड्या काढून टाकल्या. त्यामागे कचऱ्याच्या वर्गीकरणाची मुळ कल्पना होती. कल्याण पश्चिमेच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर रोज ४०० टन कचरा जमा होतो. कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प सुरु झाला आहे. त्यामुळेच कचरा वर्गीकरणाला प्रारंभ केल्यावर आधारवाडी कचरा डेपोवरील कचऱ्याच्या प्रमाणात चांगलीच घट झाली आहे. शहरात कोरोनाने शिरकाव करताच लॉकडाऊन जाहीर केले. आणि पुन्हा डेपोवरील कचरा वाढीला लागला. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

शिवसेनेचे स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र देवळेकर हे महापौर असताना त्यांनी कचरा वर्गीकरणाची कल्पना चांगली उचलून धरली होती. ओला कचरा ,सुका कचरा अशा प्रकारच्या दोन बॉक्स ( पेट्या ) शहरात दिसू लागल्या होत्या. शाळा, महाविद्यालये, निवासी संकुले , सामाजिक संस्था यातून त्यांनी जनजागृती कार्यक्रमही केले. पण त्यांच्या कामाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ते महापौर पदावरून बाजूला होताच अनेक भागातल्या त्या पेट्याही नाहीशा झाल्या.

Rajendra Devlekar

पूर्वी प्रभागातील रस्त्यांवर कचरा कुंड्या होत्या. त्यात नागरिक कचरा टाकत. ट्रक मधून तो कचरा रोज गोळा करून डम्पिंग ग्राउंडवर नेला जात असे. कचरा वर्गीकरणाची योजना राबवण्याचा निर्णय होताच रस्त्यातील कचरा कुंड्या महापालिकेने काढून टाकल्या . प्रभागात नेमून दिलेल्या दिवशी आठवड्यातून दोन वेळा घंटागाडी येऊन कचरा गोळा करे. ओला कचरा व सुका कचरा नागरिकांनी स्वतंत्रपणे जमा करावा असे जाहीर केले. याच आशयाची दोन तीन वेळा पत्रके काढली, रिक्षेवर लाऊडस्पीकर लाऊन जाहीर केले. पण त्याचा विशेष परिणाम कोठेच जाणवला नाही. कारण घंटागाडी ठरलेल्या दिवशी कधीच येत नाही. या परिस्थितीत आजही काही बदल झालेला नाही. आठ आठ दिवस घंटा गाडी आली नाही तर नागरिकांनी कचरा कोठे टाकायचा ? विशेषत: ओला कचरा म्हणजे उरलेले अन्न ,खरकटे हे साठवून ठेवणे शक्य नाही. त्यांच्या दुर्गंधीमुळे उलट वाढत्या कोरोनाला पुष्टी देण्यासारखेच आहे.

आज महाराष्ट्राच्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आले नाहीत. त्यात कल्याण आघाडीवर आहे. रोज नवीन नवीन रुग्णाची भर पडत आहे. काही भागात रस्ते सफाईवर महापालिका लक्ष देत असली तरी कल्याण डोंबिवलीत अनेक भागात आजही घाणीचे साम्राज्य दिसते. नागरिकांना कचरा टाकायला अन्य पर्याय नसल्याने ते पूर्वी जेथे कचरा कुंड्या होत्या तेथेच आजही (रस्त्यात) कचरा टाकत आहेत. हा कचरा जनावरे, कुत्री, घुशी, कचरा गोळा करणारे लोक यांच्यामुळे इतरत्र पसरतो. आज महापालिकेतर्फे कचऱ्याचे वर्गीकरण त्यापासून गॅस किवा खतासारखे प्रकल्प बनवण्याच्या योजना आहेत. तरी त्याला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

सध्या शहरातून कोरोना रुग्णात वाढ होत आहे. कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढवण्यात आली तरी काही केंद्रातील सुविधांबद्दल नागरिकात नाराजी आहे. खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना प्रवेश देण्याची महापालिकेने व्यवस्था केली असली तरी त्यांचा उपचाराचा खर्च सर्व सामान्यांना परवडणारा नाही. शिवाय कोरोना रुग्णांना प्रवेश दिला तर संसर्गाच्या भीतीने इतर रुग्णावर उपचार करण्यास किवा त्यांना प्रवेश देण्यात टाळाटाळ केली जाते . अशाच एका प्रकरणात खडकपाडा भागात एका खाजगी रुग्णालयावर रुग्णाच्या संतप्त नातलगांनी रविवारी मोडतोड केली. त्यांच्या या तोडफोडीचे कुणीही समर्थन करणार नाही. पण कोरोना उपचाराचे सर्व नियम, शासनाने ठरवून दिलेले दर रुग्णालयाने दर्शनी भागातच लिहिलेले असतानाही हा हल्ला झाला ही गंभीर बाब आहे.

आज शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतात याचे प्रमुख कारण सामान्य नागरिकांना आता कोरोनाची भीती राहिलेली नाही. नागरिकांकडून शासनाच्या नियमांचे पालन होत नाही .जवळ जवळ पाच महिन्याच्या लॉकडाऊनला सारेच कंटाळले आहेत. घरात तरी कितीदिवस रहाणार ? असे अनेक प्रश्न आज कोरोनामुळे निर्माण झाले तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्नही आरोग्याच्या दृष्टीने तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा टाकण्याची सहज सोयीची उपलब्धता ही अत्यंत गरजेची आहे. नुसते निर्बंध लादून किवा कारवाईचा धाक दाखवून कचऱ्याचा प्रश्न आणि त्याबरोबरच कोरोना रुग्णाच्या वाढीचा प्रश्न सुटणार नाही.

 

Written by विनायक बेटावडकर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments