शालेय कार्यक्रम आणि कुटुंब…. हे दोन्ही कार्यक्रम चांगले चालले होते. नगर जिल्ह्यातील रसिकांचा मोठाच प्रतिसाद मिळत होता. पण दोन्ही नोकरीत जास्त रजा मिळत नसल्याने मला पुनःपुन्हा कोल्हापूरला जावून यावे लागत होते.
कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमात सतत व्यत्यय येत होता. शिवाय अर्थशास्त्र शिकवत असतांना माझ्या रजेच्या काळात बुडालेला पोर्शन भरून काढण्यासाठी मी ‘एक्स्ट्रा तास’ घेऊन मुलांना शिकवत होतो. त्यामुळे होणारे मुलांचे नुकसान मनाला मुळीच पटणारे नव्हते. म्हणूनच १९८१-८२ चे शैक्षणिक वर्ष संपताना दोन्ही नोकरींना रामराम ठोकून (राजिनामा देवून) मी ‘कविता रंगवायचा वसा’ घेऊन महाराष्ट्रात भ्रमंती करायचं ठरवलं…. कारण नोकरीच्या बंधनात राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कवी संकलित करणे शक्य होणार नव्हते. शिवाय वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार निर्माण करणाऱ्या कवींना भेटून त्यांच्या काव्यप्रकाराचे व्याकरण समजावून घेणे कार्यक्रमासाठी आवश्यकही होते.
या माझ्या नोकरी सोडण्याच्या निर्णयामुळे सर्व नातलग व संबंधित स्नेही मंडळी माझ्यावर नाखूष झाली, कांही तर आजही नाखूष आहेत. असो.
तर रसिकहो, राहता शहरात झालेल्या त्या शालेय कार्यक्रमामुळे एक वेगळी पण चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अगदी कोपरगाव पर्यंतच्या शाळाशाळां मधून मला शालेय कार्यक्रमासाठी बोलावणी येवू लागली. असाच एक कार्यक्रम लक्ष्मीनगर शुगर मिलच्या शाळेत ठरला. व्यवस्थित मानधनही मिळणार होते. त्या कार्यक्रमला जाताना वाटेत शिर्डीला थांबलो व श्रीसाईबाबांचे दर्शन घेतले.
साईबाबांच्या दरबारात कलावंत आपली सेवा सादर करू शकतात, हे मला माहीत असल्याने तेथील कार्यालयात जाऊन मी तशी विनंती केली. लक्ष्मीनगरचा कार्यक्रम करून मी परत शिर्डीला पोहोचलो. कांही ट्रस्टींची भेट झाली आणि ते मला साईदरबारात घेऊन गेले. साईबाबांच्या सेवेत एक महिला कलावंत “अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम” हे सादर करीत होत्या. मी त्यांच्या बाजूला जावून बसलो.
तबला-पेटीच्या साथीने गीत सादर करण्यात त्या तल्लीन झाल्या होत्या. त्यांच्या गाण्या नंतर मला सेवा द्यायची होती. दोन तीन फोटोग्राफर फोटो काढत होते. त्यांचे गाणे संपले, त्या थोड्या बाजूला सरकल्या. मी त्यांच्या जागेवर पेटी घेऊन बसलो आणि “ओंकार प्रधान रूप गणेशाचे” या भक्तिगीताने सेवा सुरू केली. माझे गीत संपताच बाईंनी माझा निरोप घेतला.
त्यांच्या पाठोपाठ फोटो ग्राफर बरोबर सगळी गर्दीही निघून गेली. आता ट्रस्टी, कांही रसिक आणि साक्षात साईबाबांच्या सेवेत मी अर्धा तास कांही भक्तिगीते सादर केली. सेवा संपली, मी साईबाबांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि आम्ही पुन्हा कार्यालयात गेलो. ट्रस्टींनी मला साईबाबांचा फोटो, त्यांच्या अंगावर पांघरलेली शाल, श्रीफळ व प्रसाद दिला.
त्यांचा निरोप घेऊन निघतांना ट्रस्टी मला म्हणाले, “बापट सर, तुमच्या आधी साईबाबांची सेवा करणार्या सुप्रसिद्ध सीनेतारका सुलक्षणा पंडित होत्या.” साईदरबारात अचानकपणे हा विलक्षण योग आला होता.
श्रीसाईबाबांच्या सेवेत अर्धा तास कार्यक्रम सादर करून साईबाबांचा प्रसाद आणि भरभरून आशिर्वाद मला व माझ्या कार्यक्रमाला लाभले, हे माझे भाग्य.! याच दरम्यान अशीच आणखी एक सेवा करायची अमूल्य संधी मला मिळाली. शिर्डी जवळच साकूरी नावाचं गाव आहे. तिथे असलेला उपासनी महाराजांचा मठ गोदावरी माताजी (साईबाबांच्या शिष्या) चालवत होत्या. तिथे एकमुखी दत्तात्रेय मंदिर आहे. त्या मठात साक्षात गोदावरी माताजींच्या समोर मी माझा कुटुंब…… चा संपूर्ण कार्यक्रम सादर करून मला गोदावरी माताजींचे आशिर्वादही लाभले आहेत. असे आशिर्वाद लाभल्यामुळेच मी गेली ४० वर्षें केवळ कविता सादर करून रसिकांची व मराठी रंगभूमीची सेवा करतो आहे.

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800