Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यमनातील कविता

मनातील कविता

कवी माधव ज्युलियन
‘ गझल ‘ व ‘ रूबाई ‘ हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय डॉ. माधवराव पटवर्धन उर्फ
कवी माधव ज्युलियन यांना जाते.
‘ उमरखय्यामच्या रुबाया ‘ नावाचा मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद, ‘ द्राक्षकन्या ‘ रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर, ‘ मधुलहरी ‘ रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर, ‘ काव्यचिकित्सा ‘, ‘ काव्य विहार ‘ नावाचे लेखसंग्रह, ‘ गज्जलांजली ‘ नावाने स्फुट गझला,’ छंदोरचना ‘ हा संशोधनात्मक ग्रंथ,’ तुटलेले दिवे ‘ म्हणजेच सूनीतांजली  ‘सुनितांची माला’ नामक दीर्घकाव्य आणि काही स्फुट कविता, ‘नकुलालङ्कार’,  ‘ सुधारक ‘ नावाची दीर्घकाव्ये,  याशिवाय फारसी- मराठी शब्दकोष, भाषाशुद्धि-विवेक, ‘ विरहतरङ्ग ‘ नावाचे खंडकाव्य, ‘ स्वप्नरंजन ‘ हा काव्यसंग्रह अशी त्यांची साहित्य संपदा आहे.

आजकाल कथा, कविता किंवा अगदी पुस्तकेही श्राव्य माध्यमातून वाचताना…ऐकताना म्हणणे अधिक योग्य होईल, नवीन पिढी दिसते. पण जुन्याच गोष्टी पुन्हा नवीन रूपे घेऊन येतात हे अगदी खरं आहे. मी आणि माझ्यासारखे इतर अनेक जण ह्याच श्राव्य माध्यमाच्या अगदी पहिल्या पिढीचे म्हणता येईल अश्या रेडिओचे संस्कार घेऊन आलो आहोत. काही गीतांची, वक्त्यांची पहिली प्रथम ओळख झाली ती रेडिओच्याच द्वारे. ती गाणी आजही लख्ख आठवतात. केवळ गीतच नव्हे तर संपूर्ण क्षण पुन्हा जगला जातो.

मी आठवी किंवा नववीत असेन. दुपारी अकरा- सव्वा अकराची वेळ. दुपारी बाराची शाळा असल्याने तयार होऊन, गणवेश घालून जेवणाची तयारी करायची आणि त्यावेळी गाणं ऐकू यायचं…

‘ प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई
बोलावुं तुज आता मी कोणत्या उपायीं ?…’

त्यावेळी जे भावविभोर शब्द ऐकले ते कितपत कळले हे सांगणं तसं कठीण आहे परंतू काव्याचे, शब्दांचे आणि भावनांचे सोनेरी संस्कार करणाऱ्या ह्याच त्या रचना आणि हेच ते कवी.

२१ जानेवारी १८९४ रोजी मराठी सहित्यास काही अप्रतिम शेर बहाल करण्यासाठी ह्या पृथ्वीवर अवतरले कवी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन अर्थात कवी माधव ज्युलियन.
मातेच्या विरहाने व्याकूळ होऊन रचलेल्या वरील ओळी त्यांच्या.
‘ मातेच्या माघारीही जगरहाटी प्रमाणे आयुष्य चालूच राहिले परंतू चित्तातून मात्र आईची स्मृती हटत नाही ‘ असे हे वर्णन. मात्र कविवर्यांची मातेची स्मृती काही विलक्षण आहे. कारण रचनाकार म्हणताहेत की, ‘ मला तुझी रूपरेखा स्मरत नाही.’

‘ चित्तीं तुझी स्मरेना काहीच रूपरेखा
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका…’

मातेचा चेहराही स्मरू नये इतक्या बालवयात जर मातृत्वाची छाया हरवली असेल तर ही तळमळ जीव कासावीस करणारी असेल. चित्तातील ह्या व्यक्तिरेखेच्या रूपाचा अभाव आणि त्या अभावाच्या स्मृतीत गुंतलेला भाव !

‘ घे जन्म तूं फिरूनी, येईन मीहि पोटीं,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !’

कवीच्या ओळी, त्यातील वेदना जेंव्हा वाचकाच्या वेदनांशी जुळतात तिथे ती कविता खरी पोहोचते. वरील दोन ओळीत अडकलेले कवी मन मी आरपार समजू शकते कारण मी देखील ह्याच्याशी मिळती जुळती प्रार्थना, याचना अगणित वेळा केलेली आहे, करते आहे. एक अशीच आस माझ्याही हृदयात आहे.

माझ्या मनात अनेकदा विचार येतो की भाषा हे सर्जनशीलतेचे मोठे कारण आणि प्रोत्साहन आहे. मराठी भाषा, मराठी साहित्य इतके विशाल आणि सुंदर आहे की नकळत त्यातील रचनांचा मनावर प्रभाव पडत जातो, बीजे रुजतात आणि हिरवंगार काहीतरी उमलू लागतं. मराठी शब्दांची जादू काही अलौकिक आहे. आज, एका मराठी वाक्यात चार हिंदी किंवा चार इंग्रजी शब्द वापरणे किंवा ‘मी मराठी फारसे वाचत नाही’ असं सांगणे ह्यात प्रतिष्ठा, धन्यता मानणारी मराठी कुटुंबं पाहिली की हबकायला होतं. इंग्रजी, हिंदी, उर्दू वाचन अवश्य करावं परंतू मातृभाषा असतांना देखील मराठी न वाचण्यामागची विचारधारा अनाकलनीय आहे.

‘ मराठी असे आमुची मायबोली ‘ म्हणत कवी ज्युलियन याचे यथोचित वर्णन करतात…

‘ मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळी…’

मग यासाठी ‘साहित्यसेवा’ हे एकमेव व्रत असावे हे सांगतांना कवीवर्य म्हणतात…

‘ तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेंव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ‘

वर उल्लेख केल्याप्रमाणे मायबोली बद्दल निरातिशय अभिमान बाळगणाऱ्या कवी ज्युलियनांनी फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए.ची पदवी मिळवली आणि इंग्रजी साहित्य हा विषय निवडून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. फारसी भाषेतील    गझल ‘ आणि ‘ रुबाई ‘ ह्या रचना प्रकारांचा अभ्यास करून त्यांना मराठी भाषेत पेरण्याचे कार्य देखील त्यांनी केले. गझलेचे शेर स्वरूपात लिहिलेल्या त्यांच्या अनेक रचना आहेत.

‘ मिळेना अन्तरीं तूझ्या मला थोडाहि ओलावा
म्हणूनी तूज सोडावें,
न तू हा बोल बोलावा.

दिव्याची दाहक ज्योती पतङगा चाळवी भोती,
न त्याला स्वास्थ्य देवो ती, तरी तो गोड दुष्टावा…

रिघाया वाणवर्षावीं भितो जो पौरुषाभावी,
न त्याने मात्र या क्षेत्रीं चुकूनी पाय टाकावा.

जशी तू दाविशी भीती तशी ही वाढते प्रीती.
‘नको’ चा अर्थ ‘हो’ ऐसा मजेचा बायकी कावा !…’

‘ हट्टी प्रेमाचे ‘ वर्णन करताना उद्गरलेल्या ह्या ओळी. ह्यात स्त्री मनाची हळुवारता, सुकोमलता ह्याचा सुंदर विचार आहे आणि त्याचबरोबर माघार न घेणारे, चैतन्याने आणि आवेगाने उजळलेले एका प्रेमीचे मनही आहे.
‘ स्वप्नयोग’ नावाचे काव्य ही असेच… एका स्त्रीने पाहिलेले स्वप्न, वियोगात घडलेले स्वप्नयोग… एकाचवेळी तलम आणि बोचणारेही !

‘ झोपेंत कधी असतां मी
त्या शान्त तमोमय कालीं
प्रियदर्शन माझा येऊ,
ऊमटवी टवटवी गालीं
माझिया टिपें नेत्रींचीं
घे टिपुनि कृष्ण ओठांनी,
दे अरुण शान्ति ह्रदयाला
वचनामृत ओतुनि कानीं,…

का घ्येय दूर गेलेलें
परत ये गाढ झोपेंत ?
मग राहिन अपुली आता
मी झोप सदाची घेत !
पण झोपहि गाढ न येऊ
जरि मरतें कामाखालीं,
ये प्रभो, झाक हे डोळे,
गाडून टाक पाताळीं ! ‘

याशिवाय ‘ हाकाटी ‘, ‘ आगगाडी ‘, ‘ चिमुकली शांता ‘, ‘ रसिकास ‘  अश्या अनेक सुंदर सुंदर रचना आहेत. उत्कट भावनाप्रधानता, सौंदर्यपूर्णता आणि आशय सखोलता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
२९ नोव्हेंबर १९३९ रोजी कवी माधव ज्युलियन यांनी आपली गझल पूर्ण केली आणि ह्या ऐहिकाच्या मैफिलीचा निरोप घेतला.

कवीवर्य माधव ज्युलियन, आपण ‘ गझल ‘ ह्या काव्यप्रकारास मराठीत आणून माझ्यासारख्या अनेक गझल प्रेमींवर थोर उपकार केले आहेत. आपल्याला माझा प्रणाम 🙏🏻
‘ प्रेम माहात्म्य ‘ नावाच्या आपल्या गझलेत आपण म्हटले आहे…

‘ प्रेमावीण जीवाला कशाचा जीवनीं आधार ?
चारी मुक्ति देऊ हें, जिणें यावीण कारागार !…

देण्यावाचुनी येथे न ये व्यापार तेजीला,
हा तोटयात नित्याचा, पहा अव्याज हा व्यापार !…’

जीवनात प्रेमाचे अढळ स्थान आहे. प्रेम हा एक परीस स्पर्श आहे; अंतर्बाह्य उजळून टाकू शकणारा ! प्रेम देणारे नाते कोणतेही असो, त्याचे निर्व्याज असणे मनुष्यास उद्धरून टाकते. मात्र जगाचा व्यापार निराळा असतो. निस्वार्थ प्रेम ज्याला मिळाले तो भाग्यवंत. ज्याला नाही मिळाले त्याला जगणे म्हणजे एक  ‘ जन्मठेप ‘ वाटू लागते.

जन्मठेप

विषारी अहं व्याप्त फुत्कार होते
इथे लोक ओकीत अंगार होते

वृथा गायले मी उरीच्या स्वरांना
मला दाद हे तुच्छ हुंकार होते

नसे मान्यता बासरीच्या ध्वनीला
सदा चाप दोरी टणत्कार होते

अहोरात्र मोर्चा निघे राक्षसांचा
मनुष्यावरी ते बहिष्कार होते

जगी भाबड्या निष्कलंकी मनांना
असे जन्मठेेपी पुरस्कार होते

डॉ गौरी जोशी – कंसारा

– लेखन : डॉ. गौरी जोशी-कंसारा, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments