Friday, November 22, 2024
HomeUncategorizedWorld Heart Day: जागतिक हृदय दिन आणि आपण !

World Heart Day: जागतिक हृदय दिन आणि आपण !

जागतिक आरोग्य संघटनेने हृदयविकारासंबंधी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा “जागतिक हृदय दिन” म्हणून घोषित केला आहे, त्यानिमित्ताने हा संवाद !

जागतिक महामारी करोनाने सध्या संपूर्ण जगाला विळखा घातला असून त्यातून अजून किती मृत्यू होतील आणि किती वाचतील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. आरोग्य समस्येसोबतच आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांना मानसिक तणाव वाढून ह्रदयविकाराच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे . त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुटुंबियांची काळजी घेणं आवश्यक आहे.करोना साथीनंतर किंवा आताही हृदयविकार पिडीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच राहील असे वाटते !

Click here to readकोरोना जाणा:कोरोना टाळा

हृदयविकार म्हटलं की अनेकांना घाम फुटतो ! मुळात हृदयविकार होण्याची आपण वाट का पहातो ते खरोखरच समजत नाही !

आपला आहार समतोल ठेवला, व्यसनं ( दारू, तंबाखू , गुटखा, विडी, सिगारेट ) दूर ठेवली, अतीव चिंता न केली,वयाला साजेसे व्यायाम केले , भरपूर पाणी पिले, खारट-गोड-तेलकट-तूपकट योग्य प्रमाणात खाल्ले,मासांहार योग्य प्रमाणात ठेवला, पालेभाज्या व फळभाज्या यांचा आहारात समावेश केला तर बऱ्याच प्रमाणात हृदयविकाराला आपण दूर ठेऊ शकतो !

हृदयविकार व उपचार

छातीत धडधड वाढणे, छातीत दुखायला लागणे, चालतांना धाप लागणे, छातीतून वेदना खांदा-मान-पाठ याकडे पसरणे , अचानकपणे अंग गार पडणे, अचानक चक्कर येणे, गुदमरून जाणे, अतिशय थकवा जाणवणे अशी लक्षणे जाणवत असतील तर हृदयविकार असण्याची दाट शक्यता असते हे नेहमी लक्षात ठेवावे !

ज्यांना मधुमेह, रक्तदाब, अनुवंशिक हृदयविकार व मुत्रपिंड आजार आहेत त्यांनी विशेष सावध रहावे.अचानक जर तिव्र स्वरुपात वरील लक्षणे दिसून आली तर त्वरीत उपचार सुरू केले पाहिजेत अन्यथा जिवावर बेतू शकते.अश्या वेळी जवळ कोणी उपस्थित असेल तर रुग्णालयात नेऊन उपचार सुरू केले पाहिजेत.एकटेच असाल तर तुम्ही कमीतकमी हालचाल केली पाहिजे, शक्यतो खाली बसावे.लांब श्र्वास घेऊन जोरात ४-५ वेळा खोकला काढावा.उपलब्धअसेल तर ऍस्प्रीन ची गोळी घ्यावी.

Click here to readMental health : जपू या, मनाचं आरोग्य

हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी अॅस्प्रीन व साॅर्बिट्रेट ची गोळी नेहमी सोबत बाळगावी.चालू असणारी औषधे आपणहून बंद करु नयेत.अती श्रम टाळावेत.भांडणे करु नयेत म्हणजे टेंशन वाढणार नाही.पथ्य करावेत.ईसीजी,इको,स्ट्रेस टेस्ट,ॲन्जिओग्राफी,ॲन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी करावी लागेल की नाही हे तज्ञ डॉक्टर ठरवतील त्याप्रमाणे करणे आवश्यक असते.चालढकल अंगाशी येऊ शकते.

रक्तदाब कमी किंवा जास्त नसणारांना देखील हृदयविकार झटका येऊ शकतो.मधुमेह,काॅलेस्ट्राॅल, धुम्रपान,अती मद्यपान, अनुवंशिकता,वाढीव वजन,वाढते वय ,जंक फूड सेवन,अती चिंता अशा अनेक कारणांमुळे सुध्दा हृदयविकार झटका येऊ शकतो.कोणत्याही वयात आणि सडपातळ बांधा असणाऱ्यांना सुध्दा हृदयविकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीस वर्षाच्या मुलाला सुध्दा हृदयविकाराचा झटका आल्याचेही उदाहरण आहे, त्यामुळे कमी वयात देखील हृदयविकार होऊ शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. निरोगी भासणाऱ्या वयाची चाळिशी ओलांडलेल्या व्यक्तींनी समग्र रक्त तपासणी, इको,स्ट्रेस टेस्ट करून घेणं आवश्यक आहे कारण लवकर निदान झाल्यास उपचार सोपे पडतात.

Click here to readलोक काय म्हणतील?

ज्या गोष्टी आपण टाळू शकतो ते केलेच पाहिजे.व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.नियमीत व्यायाम आणि समतोल आहार घ्यावा.मानसिक चिंता कमी करण्यासाठी प्रयत्न करा. हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करा.जरी हृदयविकार झाला तरी घाबरून न जाता योग्य उपचार सुरू ठेवले तर तुम्ही चांगले आयुष्य जगू शकता व उर्वरित आयुष्य आनंदाने घालवू शकता.चांगले आरोग्य हीच खरी आपली संपत्ती होय!
“जागतिक हृदय दिनाच्या” आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपले हृदय निरोगी राहण्यासाठी काळजी घेण्याची नम्र विनंती !

– अविनाश अशोक गुठे
DM.Cardiology,MD.(Medicine),
( हृदयविकार तज्ञ, असिस्टंट प्रोफेसर, लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज व महापालिका हाॅस्पीटल,सायन, मुंबई )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments