क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या क्रांतिकारी जीवनाचा हा वेध….
ज्याच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणि त्यांनी इंग्रजांना गुडघे टेकायला भाग पाडले, इंग्रजांवर वार केले असा मोहक आणि बंडखोर आदिवासी नेता म्हणजेच “क्रांतिसूर्य बिरसा सुगना मुंडा” होय
ब्रिटिशांविरूद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात बिरसा मुंडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा जननायक मुंडा जातीचा होता. आदिवासींवर होत असलेल्या इंग्रजांच्या दडपणाविरूद्ध बिरसा मुंडा यांनी जो लढा दिला त्यामुळे भारतात रांची आणि सिंहभूमीचे आदिवासी बिरसा मुंडाला ‘बिरसा भगवान’ म्हणून ओळखतात.
बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलिहातू गावात १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. मुंडा प्रथेनुसार त्याचे नाव बिरसा ठेवले गेले. बिरसाच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हतू. बिरसा मुंडाच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब रोजगाराच्या शोधात उलिहातू येथून कुरुंबड्यात स्थायिक झाले. तिथे ते शेतात काम करून आपला चरितार्थ चालवित. नंतर त्याचे कुटुंब पुन्हा कामाच्या शोधात बम्बाला गेले.
बिरसा मुंडा यांच्या कुटुंबाची अशी भटकंतीच असायची. त्यांना राहण्याचे निश्चित स्थान नव्हते, त्यामुळे त्यांचे बालपण येथून तेथून प्रवासातच गेले. बिरसा मुंडा यांचे बहुतांश बालपण चल्कड़मध्ये गेले.
बांबूच्या झोपडीत वाढलेला बिरसा लहानपणापासूनच आपल्या मित्रांसह वाळूच्या ढिगात खेळायचा. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात तसेच ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे. थोडे मोठे झाल्यावर त्याला जंगलात मेंढरं चरण्यासाठी जावे लागे.
बिरसाचा बालपणीच नेम फार चांगला होता. ते वडिलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करायचे.
बिरसा मुंडा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे त्यांना त्याच्या मामाच्या अयुभातु या गावी पाठविण्यात आले. तिथे ते दोन वर्षे राहिले. सुरुवातीचे शिक्षण सकळा येथे घेतले.
लहानपणापासूनच बिरसा अभ्यासामध्ये खूप हुशार. त्यांनी शाळा चालवणारे गुरु जयपाल नाग यांच्याकडून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. पण.. त्यावेळी ख्रिश्चन शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारणे आवश्यक होते. बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती समाजाविषयी खूप आकस होता. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला.
सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.
तथापि, काही वर्षांनंतर बिरसाने ख्रिश्चन शाळा सोडली, कारण त्या शाळेत आदिवासी संस्कृतीची खिल्ली उडवली जायची. जे बिरसा मुंडा यांना अजिबात आवडत नसे.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी भारताच्या दोन तृतीयांश भागावर कब्जा केला होता आणि ही मालिका अजूनही सुरूच होती. १९ व्या शतकानंतर त्यांनी रियासी भारतातील काही भाग ताब्यात घेतला. छोटा नागपुर, बिरसा मुंडाचा परिसर आणि आदिवासीं त्यांचे हक्क हिसकावून घेण्यासाठी वनीकरण कायद्यासह इतरही अनेक कायदे लागू केले गेले. पाहता पाहता आदिवासींचे सर्व हक्क काढून घेण्यात आले.
आदिवासी लोकांना जंगलात मेंढरे चरण्यासाठी नेता येत नव्हती, जंगलातून लाकडे गोळा करता येत नव्हते. त्यामुळे या लोकांना आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता.
त्याच वेळी इंग्रजांनी जंगलांच्या बाह्य सीमांवर वस्ती करण्यास सुरवात केली. मुंडा लोग ती जमीन आपली सामान्य मालमत्ता मानत असत. बाह्य वस्तीतील लोकांना ब्रिटीशांनी त्या जागेची मालकी दिली. त्यामुळे आदिवासींमध्ये असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचं चळवळीमध्ये रूपांतर झालं. याचं नेतृत्व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी केलं. या चळवळीलाच “उलगुलान” या नावाने संबोधण्यात आले.
ऐन तारुण्याच्या काळात बिरसा मुंडा ब्रिटिश मिशनरी विरूद्धच्या चळवळीचा एक भाग बनले. बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे लोकनेते म्हणून उदयास आले.
१८९५ मध्ये बिरसा मुंडा यांनी “आम्ही ब्रिटिश शासन प्रणालीविरूद्ध बंडखोरी जाहीर करतो आणि ब्रिटिश नियम कधीच पाळणार नाही. आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीच ब्रिटिशांच्या कायदयांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. हे गोरे लोक, तुम्ही आमच्या देशात काय करता ? छोटा नागपूर हे शतकानुशतके आमचे आहे आणि आपण ते आमच्यापासून दूर करु शकत नाही. म्हणून आपण आपल्या देशात परत जाणे चांगले. जो इंग्रज आमच्या विरूध्द उभा राहील त्यास आम्ही यमसदनी पाठवू.” असे घोषित केले. पाहता पाहता त्या डोंगरावर हजारो लोक जमा झाले. यामुळे संतप्त ब्रिटीश सरकारने बिरसा मुंडास पकडून देणा-यास ५०० रूपये बक्षिस जाहीर केले.
या चळवळीलाला जबाबदार म्हणून इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना अटक केली. त्यांना हजारीबाग मध्यवर्ती कारागृहात दोन वर्षांची शिक्षा झाली. या शिक्षेमुळे बिरसा मुंडांची कीर्ती आणखी वाढली.
१८९८ मध्ये त्याची सुटका झाली. सुटकेनंतर बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश राणीचा पुतळा जाळण्याचा आदेश दिला. लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे १८९९ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या प्रियजनांनी याची पूर्तता केली. त्यामुळे ब्रिटीश त्रस्त झाले.
आदिवासींना लाभलेला भूमी युद्धाचा वारसा प्राचीन आहे. बिरसाने इंग्रजांविरूद्ध बंड पुकारले. बिरसा मुंडा यांनी विविध जमातीच्या गटांना एकत्र आणले त्यांना इंग्रजांविरूध्द लढण्यास प्रेरित केले. बाण, कुऱ्हाड आणि गुल्लेर घेऊन मुंड्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. त्यांची मालमत्ता जाळली. बरेच इंग्रज पोलिस ठार केले. या युद्धात ब्रिटीश सैन्य हरले, परंतु नंतर त्या भागातील अनेक आदिवासी नेत्यांना ब्रिटीशांनी अटक केली. त्यामुळे “उलगुलन” म्हणून ओळखले जाणारे हे बंड फार काळ टिकू शकले नाही. ही चळवळ ब्रिटीशांनी चिरडली.
३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथून अटक करण्यात आली. तुरुंगात शिक्षा भोगत असतांना ९ जून १९०० रोजी तुरुंगातच त्यांचा रहस्यमयरित्या मृत्यु झाला. प्लेगच्या आजाराने मरण पावल्याचे म्हटले जाते तर काहींच्या मते इंग्रजांनी त्यांना फासावर चढवले.
बिरसा मुंडा यांची जयंती विशेषतः कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यात साजरी केली जाते. झारखंडची राजधानी असलेल्या कोकर रांची येथे त्यांच्या समाधीस्थळावर बरेच कार्यक्रम साजरे केले जातात.
त्यांच्या निधनानंतर सरकारने तुरुंगाला आणि रांची विमानतळाला बिरसा मुंडा यांचे नाव दिले. त्याचे एक चित्र भारतीय संसदेतही बसविण्यात आले आहे. त्यांच्या नावावर बऱ्याच संस्था, अनेक विद्यापीठे स्थापन केल्या आहेत.
बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र च्या आदिवासी भागात बिरसा मुंडाची देवाप्रमाणे पूजा केली जाते आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.
२००४ मध्ये “उलुगुलन एक क्रांती” हा हिंदी चित्रपट बनला ज्यामध्ये ५०० बिरसा अनुयायांचा समावेश होता. २००८ मध्ये इक्बाल दुरान यांच्या दिग्दर्शनाखाली बिरसा च्या जीवनावर आधारित “गांधी से पेहले गांधी” हा हिंदी चित्रपट बनला होता, ज्याला कादंबरी पुरस्कारही मिळाला होता.
भगवान बिरसा मुंडांची ख्याती भारतभर असली तरी तळागाळातील आदिवासी पर्यंत ही महती फार क्वचितच पोहोचल्याचे दिसते. तरीही… आजचा आदिवासी सुशिक्षित होत आहे. सामाजिक, राजकीय परिस्थितीशी तो मिळवून घेताना दिसतोय. सामाजिक बांधिलकेची जाणीव त्याला होवू लागली आहे. या प्रवाहात तो येऊ पाहतोय. तसा त्याचा आता सहभाग होतानाही दिसत आहे.

– संकलन : विकास पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800