अतिशय कष्टात बालपण गेलेल्या, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या, यशस्वी संसार व व्यवसाय केलेल्या श्री
जगन्नाथ गोविंदराव जवकर या आपल्या थोर वडिलांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे चिरंजीव दीपक जवकर यांनी जागविलेल्या प्रेरणादायी आठवणी…
मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर गाव तसे ऐतिहासिक, निजाम राजवटीत अनन्य साधारण महत्व असलेले गाव. या किल्ले धारूर गावात भुईकोट किल्ला असून येथे अनेक राजे, महाराजे होऊन गेले.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी याच किल्ले धारूर गावात ब्रिटिश राजवटी विरोधात गावातील अनेक लोकांनी लढे उभारून मोठा संघर्ष केला. अशा या किल्ले धारूर पुण्यनगरीत साधारणतः 1915 ते 16 या दरम्यान श्री. जगन्नाथ गोविंदराव जवकर यांचा कासार घराण्यात जन्म झाला. त्यांची जन्मतारीख नीटपणे उपलब्ध होत नाही.
बालपणीच त्यांच्या आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचे संगोपन शेजार्यांकडे झाले. त्यांचे बालपण अतिशय खडतर व कष्टाचे गेले. ज्यांच्याकडे ते काम करत ते दिवसभर राबवून घेत तरीही त्यांनी कामाचा कधीही कंटाळा केला नाही.
धोतर आणि कमिस (शर्ट) हा त्यावेळचा त्यांचा पोशाख असे. एकदा दसरा दिवाळी जवळ आली असताना ज्यांच्याकडे ते काम करीत होते त्यांच्याकडे जमा पैशातून मलमलचे धोतर घेण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यावेळी मलमल धोतराची किंमत साधारणतः एक रुपया किंवा दोन रुपये असेल परंतु मालकांनी धोतर घेतले नाही. त्यामुळे ते खूप नाराज झाले.
आपण एवढे काम करतो तरीही सणासुदीला कपडे घेतले नाहीत म्हणून त्यांनी मनाचा निर्धार करून तिथून बाहेर पडून स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.
परंतु व्यवसायासाठी भांडवल कोण देणार ? असा प्रश्न निर्माण झाला. मग ते धारूरचे तत्कालीन मोठे जमीनदार, सावकार रामप्रसाद शुक्ल यांच्या कडे गेले व त्यांना आपली सर्व हकिकत सांगून बांगडी व्यवसाय सुरू करण्याचा आपला निर्धार सांगितला व बांगडी व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा रुपये कर्जाऊ घेतले. तो काळ स्वस्ताईचा होता.
मग त्यांनी दहा रुपयाचा बांगडीचा माल (दोन माळा) आणला व दसऱ्याच्या मुहूर्तावर बांगडीचा व्यवसाय सुरू केला.श्री कालिकामातेचा आशीर्वाद व देवाच्या कृपेने व्यवसायास उत्तम प्रतिसाद मिळाला. व्यवसाय वाढू लागला. त्यामुळे त्यांनी अल्पावधीतच घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.
बांगडीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी स्त्रियांना बांगडी भरण्यास जावे लागत असे, कारण त्याकाळी स्त्रिया फारसे घराबाहेर पडत नसत. नागपंचमी असो, दसरा-दिवाळी असो किंवा संक्रात असो गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन स्त्रियांना, मुलींना ते बांगड्या भरत असत.
कोणाकडे मुंज असो, लग्न असो ,बांगडी भरण्याकरता जगन्नाथराव कासार यांनाच बोलवीत असत व तेही ही आनंदाने सर्वांकडे जात. त्यांचा एक शिरस्ता होता, तो म्हणजे ते केव्हा ही लगेच पैसे मागत नसत. दिले तर ठीक नाही तर जेव्हा देतील तेव्हा ते घेत. पण लोकही प्रामाणिकपणे पैसे आणून देत.
माहेरवाशीण माहेरी धारूरला आली की जगन्नाथ मामाच्या दुकानी येऊन बांगड्या भरूनच जाणार हे देखील ठरलेलेच असायचे .
पुढे त्यांनी बांगडी बरोबर भांडी व्यवसाय ही सुरू केला. संसार उपयोगी भांडी, लग्नाची भांडी, बस्ता व आहेर वस्तू घेण्यासाठी एकमेव दुकान म्हणजे जगन्नाथ मामाचे हे ठरलेले.
व्यवसायामध्ये त्यांची सचोटी, प्रामाणिकपणा, सातत्य तर होतेच त्याचबरोबर त्यांचे गावामध्ये सर्वांबरोबर अतिशय प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यांची विश्वासार्हता व लोकप्रियता मोठी होती. तसेच त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदराची भावना निर्माण झाली होती त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव व सचोटीने वागणे. त्यामुळे त्यांना कोणी तात्या तर कोणी जगन्नाथ मामा तर कोणी जगन्नाथ काका असे प्रेमाने म्हणत.
व्यवसायाची उत्तम धुरा सांभाळत असताना त्यांचा विवाह परळी वैजनाथ येथील प्रसिद्ध व्यापारी श्री. गणपतराव दहातोंडे कासार यांची मुलगी यमुनाबाई यांच्याशी साधारणतः 1939 ते 40 दरम्यान झाला. त्यांना सहा मुले व तीन कन्या झाल्या. मुले आईला जिजी म्हणत. तसे त्या दोघांना ही गावातील सर्वजण प्रेमाने व आदराने तात्या, जिजीच म्हणत. जिजीचा स्वभाव खूप प्रेमळ होता. तात्यांच्या पाठी मागे ती भक्कमपणे उभी होती. त्यांना तिची खुप मोठी साथ होती.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देताना तात्यांना अनेक वेळा कठोर संघर्ष करावा लागला. काही वेळेस भूमिगत राहून लढा द्यावा लागत असे. अशा वेळेस ती न घाबरता खंबीरपणे संसाराची जबाबदारी पार पाडत असे. मुलांच्या प्रगतीत तिचा मोलाचा वाटा होता. संसाराचा गाडा हाकताना तिचीही खूप दमछाक होत असे तरी ती न डगमगता सर्व कामे व्यवस्थित पार पाडीत असे .
पुढे जिजीही तात्यांना बांगडी व्यवसायात मदत करू लागल्या. अर्थातच बांगडी व्यवसायाचा व्याप वाढू लागला. खरचं म्हणतात ना, बांगडी हे स्त्रियांचे सौंदर्य वाढवणारं लेणे आहे ! बांगडी एक अलंकार आहे !
हिरवा चुडा हे सौभाग्याचं लेणं !
त्यामुळेच तात्या आणि जिजीला गावात आदराचे स्थान प्राप्त झाले. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे दोघेही सेवाभावी वृत्तीने इतरांना मदत करीत. अजून एक विशेष तात्या लहान असो मोठे असो ते सर्वांना अहो जाहोने बोलत. सर्वांशी प्रेमाने राहत. लोकांनी ही त्यांना भरभरून प्रेम दिले.
तात्यांचे शिक्षण कमी होते. परंतु त्यांनी पुढे आपल्या मुलांना उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळेल याची चांगलीच दखल घेतली आणि त्यांना उच्चशिक्षित बनविले.
त्यामुळेच तात्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री.नारायणराव धारूर गावात चांगले शिक्षण घेऊन पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी आंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाला. बी.कॉम. फायनल परीक्षेत मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये डोमिनियन फर्स्ट येऊन गोल्ड मेडलिस्ट ठरले. त्यावेळेस मराठवाड्यातील अग्रगण्य वृत्तपत्रात योगेश्वरी महाविद्यालयाचा विद्यार्थी नारायण जगन्नाथ जवकर यांचे नाव झळकले, त्यावेळी धारूरला आनंदाचे वातावरण पसरले होते. आंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वर्गाने धारूरला घरी येऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी धारूरचे नामवंत डॉ. बा. म .पटवर्धन व धारुर वासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते ही गोष्ट धारूर वासिया करता फार मोठी अभिमानाची होती, ते वर्ष होते १९६६ चे.
पुढे ते सीए या उच्च शिक्षणासाठी पुणे येथे गेले. तेथेही त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत खूप मेहनत घेऊन अभ्यास केला व सी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले झाले व चार्टर्ड अकाउंटंट ही सनद मिळवली. तो काळ म्हणजे 1970 चा होय. त्याच साली मुंबईला शासकीय कंपनीत उच्च पदावर नोकरीस रुजू झाले व क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत झाले. सेवाकाळात त्यांचा कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांचा कामा निम्मित जवळचा संबंध यायचा. त्यांनी अनेक लोकांना उत्तम मार्गदर्शन करून आणि बऱ्याच लोकांना नोकरीस लावले. ते 2005 साली शासकीय कंपनीतून निवृत्त झाले व लगेच त्यांनी सी.ए.फर्म डोंबिवली येथे सुरू केली.
त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ऑडिट तीन वर्ष होते त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी, पंचायत समिती तहसील, ग्रामपंचायत यांचेशी संपर्क यायचा याच धरतीवर पुढे त्यांना बीड जिल्ह्याचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे ऑडिट मिळाले तेथेही ही असाच जिल्हाधिकारी ते ग्रामपंचायत पर्यंत त्यांचा संपर्क येत असे त्यांच्या उत्तम कामगिरीत पत्नी सौ. कै लतिका यांचा मोलाचा वाटा होता त्यांचा मुलगा चि. निलेश हे देखील सी.एस. C. S. company secretary, LLB आहेत ते एका नामांकित कंपनीत नोकरीस आहेत त्याच बरोबर सर्वभावंडाना योग्य मार्गदर्शन करून कर्तृत्ववान बनविले. धारूर गावा बद्दल व समाजाबद्दल त्यांना खुप प्रेम आपुलकी आहे .आजही त्यांची धारूर गावाशी तीच नाळ जोडलेली आहे. तसेच आजही धारूर वासियांना त्यांच्या बद्दल खूप मोठे कौतुक आहे ही आम्हा जवकर कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
तात्यांची दुसरे चिरंजीव सुभाष हे केंद्र शासनाच्या कंपनीत अधिकारी होते. त्यांच्या सौ. मीना या पत्नी त्या देखील सामाजिक कार्यात योगदान देत आहेत व शैलेश दिपाली, संदेश गायत्री मुले व सूना आहेत तेही मुंबई येथे नोकरीस आहेत.
तात्यांचे दीपक हे चिरंजीव राज्य शासनाच्या कंपनीत मुंबई येथे वित्त व कर विभागात अधिकारी होते. त्यांनीही कंपनीत आपला चांगला ठसा उमटविला, त्यांनी ही सर्वांशी सलोख्याचे व प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले निवृत्तीनंतर आजही त्यांना कंपनीत पूर्वी सारखाच मान आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. 🎂त्यांची पत्नी सौ.ज्योती यांनी देखील गरीब विद्यार्थ्यांची मोफत शिकवणी घेतली व विद्यादानाचे उत्तम कार्य केले त्या विज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत त्यांचा मुलगा चि.जयंत एका नामांकित कंपनीत नोकरीस आहे व सून सौ.युगंधरा या उच्च शिक्षित आहेत.
तात्यांचे चिरंजीव अशोक हे मुंबईतील प्रख्यात शासकीय बेस्ट कंपनी मध्ये डेप्युटी चीफ मॅनेजर या पदावरन निवृत्त झाले. त्यांनाही बेस्टमध्ये सर्वजण चांगले अधिकारी म्हणून आदर करतात. ते अखिल भारतीय सो.क्ष. कासार समाजाचे मुंबई विभागाचे विभागीय अध्यक्ष आहेत तसेच सामाजिक कार्यात ही चांगलें योगदान देत आहेत. त्यांच्या पत्नी सौ.कल्पना या चेंबूर येथील सांस्कृतिक मंडळाच्या सदस्या आहेत. मुलगी सायली बी ई इंजिनिअर (computer) आहे.
तात्यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत व राजकुमार हे दोघे धारूर येथील भांड्याचा व बांगडीचा व्यवसाय संभाळत आहेत. ते देखील तात्यांच्या वळणावरच चालत आहेत. गावामध्ये सर्वांशी त्यांचे अतिशय चांगले व प्रेमाचे संबंध आहेत.
लक्ष्मीकांत यांच्या पत्नी सौ. जोस्ना या महिला मंडळात सक्रिय आहेत. मुलगा प्रवीण हा देखील व्यवसायात मदत करीत आहे. सून सौ. सोनाली या देखील सांस्कृतिक मंडळात सक्रिय आहेत.
राजकुमार यांच्या पत्नी सौ मनीषा उत्तम गृहिणि आहेत मुलगी कु. ऋतुजा पदवीधर असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहेत .
तात्यांना तीन मुली आहेत प्रकाशवती, सौ.सत्यवती, सौ.मंगल या होत. सर्व जणी आपल्या दिल्या घरी सुखी आहेत. त्यांची एक पुतणी सौ शांता कुहिरे ही माजलगाव येथे आहे. प्रपंचाचा गाडा हाकताना त्यांची ही चांगलीच कसरत होत असे.
निजाम राजवटीत त्यांनी काही शौर्याच्या कामगिरी केल्या आहेत. तसे निजाम राजवटीत धारूर गावात मुसलमान व राजपूत लोकांचे प्रमाण जास्त होते. निजाम राजवटीत हिंदू लोकांना फारसे स्वातंत्र्य नव्हते. मुसलमानांकडून हिंदूंचा जाच होत असे. परंतु राजपूत लोकांच्या दबावामुळे मुसलमान लोकांचे फारसे चालत नसे. कसबा पेठेत देखील मराठा समाज मोठ्या प्रमाणावर होता. तसेच कसबा पेठेत देशपांडे कुटुंबे होते ते श्रीमंत होतेच परंतु मोठे शेतकरी होते .त्यामुळे धारूर गावात हिंदूंची ताकत फार मोठी होती. जबरदस्त एकी होती. निजाम राजवटीतून मुक्तता मिळविण्यासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी धारूर गावात लोकांचा सतत लढा चालूच होता. या लढ्यामध्ये तात्यांचा म्हणजेच जगन्नाथ रावांचा सहभाग नेहमीच राहिला. त्यांना अनेक वेळा भूमिगत व्हावे लागे. स्वातंत्र्य लढ्यात जी अनेक आंदोलने झाले त्यामध्ये त्यांचा सक्रिय व हिरारीने भाग होता. त्यांच्या कामगिरी मागे त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांचीही मोलाची साथ होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच निजाम राजवटीतील त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून घोषित करून स्वातंत्र्य सैनिकाचा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
स्वातंत्र्यापूर्व काळात त्यांनी बजावलेल्या काही महत्वपूर्ण कामगिरी व काही आठवणीचा उल्लेख करावा वाटतो.
निजाम राजवटीत डॉ. बा. म. पटवर्धन व श्री बाबूराव शेटे यांच्या जीविताला मुसलमानांकडून (रजाकारी) धोका निर्माण झाला होता व ते मुसलमानांच्या तावडीत सापडले होते, त्यावेळी जगन्नाथराव यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना मुसलमानाच्या तावडीतून सोडवून आणले व त्यांचे प्राण वाचवले. काठी चालवणे, तलवार चालविणे, रायफल चालविणे यामध्ये तात्या तरबेज होते .
निजाम राजवटीत एकदा होळीच्या वेळी मुसलमानांचा मुलगा, काशिनाथ चौकात होळी मध्ये पडून मृत्यूमुखी पडला त्यावेळेस राजपूत लोकांनी मुलास होळीत ढकलले असा आरोप मुसलमान लोकांनी केला व राजपूत लोकांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सदर तक्रार ही कटघरातील दहा-बारा प्रतिष्ठित राजपूत लोकांविरोधात होती. त्यावेळेस केज हे प्रमुख पोलीस ठाणे असल्यामुळे तेथील आमीन साहेब (फौजदार) या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी धारूर मुक्कामी आले आणि त्यांनी दहा-बारा प्रतिष्ठित राजपूत लोकांवर दोषारोप ठेवून त्यांना अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे घबराट पसरली. परंतू कट घरातील अत्यंत हुशार एक तज्ञ वकिली करणारे वजनदार व्यक्ती
म्हणून श्री बन्सीधर तिवारी यांचे नाव मशहूर होते ते स्वतः चौकशीसाठी आमीन साहेबा समोर हजर झाले व उलट अपील केले की त्या मुलास कोणीही होळीत ढकलले नाही तो मुलगाच पळत आला व होळीमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
यावर आमीन साहेबांनी त्यांना याला पुरावा काय असे विचारले व म्हणाले सदर घटना प्रत्यक्षपणे कोणी पाहिली असल्यास त्यास समक्ष हजर करावे. त्यावेळेस सदर घटनेची साक्ष देण्याची जवाबदारी जगन्नाथराव जवकर यांच्यावर सोपवली व त्यांना साक्ष देण्यासाठी अमीन साहेबा समोर हजर केले. त्याकाळात रजाकारी मुसलमाना विरोधात साक्ष देणे म्हणजे जीवाला धोका निर्माण करणे असे होते. परंतु जगन्नाथराव यांनी जीवाची पर्वा न करता साक्ष दिली. ती पुढील प्रमाणे:-
अमीन साहेब : आपका नाम
जगन्नाथ : जगन्नाथ गोविंदराव जवकर
अमीन : आप क्या काम करते है
जगन्नाथ. : चुडिका बेपार
अमीन. : आपने क्या देखा
जगन्नाथ. ,: साब एक लडका भागते भागते आया और होली मे गिर गया उसे कीसीने ही हात लगाया नही
अमीन : इस्का क्या सबुत है
जगन्नाथ.: साब जब की मैने खुद मेरी आँखो से देखा हैं उसे, सबूत की क्या जरूरत है ?
या त्यांच्या बयानवर आमीन साहेबांची खात्री झाली की त्या मुलाचा मृत्यू होळीमध्ये पळत जाऊन पडला असताना झाला. त्यात आरोप करण्यात आलेल्या लोकांचा काहीही दोष नाही असे सांगून अमीन साहेबांनी दहा-बारा राजपूत लोकांना दोषमुक्त केले. त्यांना अटक न करता त्यांची सुटका केली. असे अनेक घटनेचे ते साक्षीदार आहेत.
असे बरेच किस्से आहेत. एकदा अशीच एक घटना घडली. धारूर गावासाठी बार्शी ही प्रमुख बाजारपेठ होती व निजाम राजवटीत येरमाळा येथे चुंगी नाका होता. त्यावेळेस तेथे मराठवाड्याची बॉर्डर होती. निजाम राजवटी विरोधात मोठा उठाव झाला असताना याच चुंगी नाक्यावर स्वातंत्र्य चळवळीतील सैनिक मल्लिकार्जुन आप्पा कोष्टी यांना लपवून बॉम्ब गोळे आणताना पकडले होते, तेव्हा तात्यांना म्हणजेच जगन्नाथ रावांना बातमी कळताच ते येरमाळा येथे चुंगी नाक्यावर हजर झाले व फौजदार साहेबा बरोबर बहस करून मोठ्या शिताफीने देशप्रेमी सैनिक श्री. मल्लिकार्जुन आप्पा यांना सोडवून आणले व त्यांनाही अटक होण्यापासून वाचविले. अशा त्यांच्या अनेक शौर्याच्या घटना आहेत.
तात्यांनी एकादे काम हाती घेतले की त्यातील त्यांची जिद्द व तडप वाखण्याजोगी असे.म्हणतात ना “मूर्ती लहान व कीर्ती महान” ते त्यांना तंतोतंत लागू पडत असे.
तात्या तसे जिद्दी होते. एकदा त्यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली की मला इंदिरा गांधी यांची भेट घ्यावयाची आहे. त्यावेळेस इंदिरा गांधी या आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांची भेट म्हणजे अशक्य. परुंतू ते स्वप्न देखील त्यांनी पूर्ण करून दाखवले. ते व त्यांच्या पत्नी यमुनाबाई हे चारधाम तीर्थयात्रेला गेले होते त्यावेळेस तीर्थयात्रे हून परतताना राजधानी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी, पंतप्रधान भेटीसाठी चारधाम यात्रेकरुंना घेऊन जात असे तेथे हिरवळीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्या सर्वांना पंतप्रधान इंदिरा गांधींनी भेट दिली व आस्थेने विचारपूस केली.
तो संवाद पुढील प्रमाणे :-
इंदिरा गांधी : आप सब कैसे हो ?
तात्या : हम सब आपके आशिर्वादसे ठीक है.
असा संवाद तात्यांनी साधला ! आपली इच्छा पूर्ण झाल्याने ते खूप आनंदी झाले. अश्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी आहेत
तात्यांचे मेहुणे कै. पुरुषोत्तमराव शिवाजीराव, तानाजीराव तर व्याही कै रत्नाकर वराडे, कै. शंकरराव रासने, श्री वसंतराव सातपुते, जेऊर (बाईजा बाई) श्री. दत्तात्रय कोळपकर, संगमनेर, श्री बापूसाहेब अंदुरे पाटील खरवंडी जि.अहमदनगर,
नातेवाईक मध्ये आवर्जून उल्लेख करावा वाटतो ते श्री.कै श्रीपाल ईटकर परभणी,
जगन्नाथरावांचे धारूर मध्ये अनेक विश्वासू मित्र ही होते जो देश को ब्रिटिश राजवट से आझादी के जंग मे लढ रहे थे ! त्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो हुतात्मा काशिनाथ चींचाळकर, नरहरी, महत्मा खिंडरे, अंबादास राव देशपांडे ई.
सनदशीर व कायदेशीर लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले श्री वसंतराव गावरस्कर होत. त्यांच्याकडे जगन्नाथराव नेहमी सल्ला मसलती साठी जात. वसंतराव त्यांना कपुरचंद फोजमल या नावाने हाक मारत असे (कपूरचंद फोजमल एक प्रसिद्ध व्यापारी नाव) कपूरचंद फोजमल हे बार्शी येथे बांगडीचे होलसेल व्यापारी होते. तात्यांना त्यांचे मोठे सहकार्य होते. तसेच त्यांचे गावातील काही प्रतिष्ठित मोठ्या व्यक्तींचा संबंध जवळचा होता. मा.नगराध्यक्ष नरेंद्रप्रसाद शुक्ल, व कॅ.राजपालसिंह हजारी ई… काही होत.
अजून एक सांगायचे झाले म्हणजे तात्या धारूरचे प्रसिद्ध सोन्या, चांदीचे व्यापारी बाप्पा म्हणजेच पुरुषोत्तमराव चिद्रवार यांच्याकडे दिवसभराचे कामकाज आटोपल्यानंतर जात. तेथे विविध विषयावर चर्चा होत असे. तेथे योग्य असे मार्गदर्शन, व्यापारविषयक माहिती मिळत असे.
असे अलौकिक व्यक्तिमत्व प्राप्त झालेले श्री. जगन्नाथराव गोविंदराव जवकर 15 नोव्हेंबर, 2000 साली अनंतात विलीन झाले.
आज ही धारूर व परिसरातील लोक त्यांची मनापासून आठवण काढतात हीच त्यांची खरी कमाई.
तात्यांना मानाचा सलाम.

– लेखन : दीपक जवकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800