‘माहितीतील आठवणी’ या सदरात, आजच्या दुसऱ्या भागात वाचू या.. निवृत्त माहिती उपसंचालक तथा वर्धा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी श्री सुधाकर धारव यांच्या, विनोबाजींच्या प्रायोपवेशनाच्या आठवणी…
आचार्य विनोबा भावे यांनी प्रायोपवेशन करून १५ नोव्हेंबर १९८२ रोजी पहाटे देहत्याग केला. त्यांचे स्वीय सहायक बाळ विजय यांनी बाहेर व्हरांड्यात येऊन ही माहिती दिली.
बाबांचे शव पांढऱ्या शुभ्र खादीच्या वस्त्रात ठेवले होते. शासकिय इतमामाने म्हणजे तिरंगी झेंड्याने ते झाकतात त्याप्रमाणे पोलीस अधिकारी अनॉमी राय यांनी पूर्ण तयारी केली होती.
आश्रमवासीयांना नाराज करू नका असे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. इंदिराजी त्याच दिवशी दुपारी मॉस्कोहुन आल्या कारण त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते.
त्या दिवशी नरकचतुर्दशी व अमावस्या (लक्ष्मीपूजन) असल्यामुळे बहुतेक अधिकारी सकाळी अंघोळीला घरी गेले होते. तिथे सहा दिवस वाट पहाणारे पत्रकारही नव्हते. प्रा. डॉ. किरण ठाकूर यांनी सर्वप्रथम हे वृत्त यू एन.आय. या वृत्तसंस्थेला पाठवले. तसेच मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी श्री.ग. सहस्त्रभोजने यांना तात्काळ टेलिफोनवर (हॉट लाईनने) कळविले. अधिकृतपणे सिव्हील सर्जनने सुमारे नऊ वाजता खास बुलेटीन काढून जाहीर केले.
बाबांच्या अंत्य संस्कारानंतर प्रधानमंत्री इंदिराजी धाम नदीच्या काठावर असलेल्या पिंपळाच्या पारावर एकट्या शांतपणे बसून राहिल्या. त्यांच्या पासून थोडे दूर म्हणजे गांधी छत्री जवळ सर्व अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. धाम नदीच्या दोन्ही तिरावर स्त्री पुरुषांची प्रचंड गर्दी होती.
नदी – पात्रात चबुतऱ्यावर दहन करण्यात आले.
बाबांच्या स्वभावानुसार ते फारच कमी बोलत. किंवा…..मौन व्रताला रहात असत. तरीपण काही हितसंबंधीयांनी हवे ते शब्द घालून आपली प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न केला. जसे ‘प्रायोपेषण पर्व‘ किंवा ‘अनुशासन पर्व‘ बाबांनी स्वतः उच्चारले नाही. त्यामुळे बरेचदा वृत्तपत्र क्षेत्रात गोंधळ होत असे. किंवा लोकांनाही आश्चर्य वाटत असे. विशेषतः त्यावेळचे केंद्रीय नभोवाणी मंत्री वसंतराव साठे नेहमी आश्रमात येत असत. त्यांनीच एकदा बाबांना ‘भारत रत्न’ देण्याची माहिती आश्रमात दिली. तेव्हा विनोबांनी स्पष्ट शब्दात ‘मला भारत रत्न नको’ असे सांगितले होते. त्यामुळे शासनाने मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्कार जाहीर केला.
विनोबा नंतर त्यांचे बंधू शिवबा यांनी सुद्धा देहत्याग केला. विनोबा, शिवबा व बाळकोबा तिनही बंधू अविवाहीत होते. ते एक वस्त्र परिधान करणारे
‘तपस्वी’ वृत्तीने जगले.
स्थितप्रज्ञ विनोबांना विनम्र अभिवादन.

– लेखन : सुधाकर धारव.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
सुधाकर धारव यांनी विनोबांच्या देहत्यागाचे वर्णन मन हेलावून टाकते
🌹🌹अप्रतिम 🌹🌹