लक्ष्मीनगर शाळेतील शालेय कार्यक्रमानंतर कोपरगाव तालुक्यातील शाळांमधून निमंत्रणे येवू लागली. शिवाय या कार्यक्रमानंतर “लक्ष्मीनगर शुगर मिलच्या” रसिकांसाठी माझा कुटुंब… चा एक बहारदार कार्यक्रम सादर झाला.
त्या कार्यक्रमला नामदेव देसाई नावाचे एक रसिक योगायोगाने उपस्थित होते. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव शुगर फॅक्टरीत कार्यरत असलेल्या देसाई सरांची व माझी चांगली गट्टी जमली. त्यांच्या
निमंत्रणानुसार मी त्यांच्या कडे हरेगावला एक कार्यक्रम…कुटुंब…. चा करायचा आणि त्या परिसरातील कार्यक्रम करण्यासाठी नगर ऐवजी श्रीरामपूरला मुक्काम करायचा असे ठरले, आणि मी श्रीरामपूर स्टेशन समोरच्या एका लॉजवर मुक्काम हलवला.!
त्यावेळी श्रीरामपूरच्या आजूबाजूला सात शुगर फॅक्टरी होत्या. तेथील कांही रसिकांना देसाई सरांनी हरेगावच्या माझ्या कार्यक्रमाला निमंत्रित केलेले होते. सर्व दर्दी रसिकांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली आणि मित्र नामदेव देसाई यांची…
“नवा नवा झाला मंत्री,
आणि म्हणाला ड्रायव्हरला,
मी चालवतो गाडी आज,
तू बैस बाजूला, मग..
ड्रायव्हर म्हणे मंत्र्याला…. साहेब,
ही कार आहे, सरकार नाही…
कार चालवायला….
अकलेची गरज आहे.”
ही वात्रटिका मी कार्यक्रमात सादर केली तेव्हा रसिकांनी कार्यक्रम हॉल अक्षरशः डोक्यावर घेतला. सातही शुगर फॅक्टरी वरचे कार्यक्रम निश्चित झाले.
त्या दरम्यानच नामदेव रावांनी श्रीरामपूर तालुक्यातील कांही कवींना निमंत्रित करून एक कवी गोष्टींचा कार्यक्रम घेतला. अनेक कवींशी मैत्री झाली व त्यांच्या कविताही संकलित झाल्या. त्यावेळी बजरंग अग्रवाल आणि चंद्रनिवास दायमा या महाविद्यालयीन तरुणांशी माझा चांगला परिचय झाला. आमचे सूर जुळले भेटीगाठी वाढत गेल्या…. आणि परिचयाचे रूपांतर ‘घट्ट मैत्रीत’ झाले.
दायमा कुटुंबाशी तर माझे कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. चंद्रनिवासचे माझ्यावर व माझे त्याच्यावर विशेष प्रेम होते आणि आजही आहे. श्रीरामपूर व आसपास असलेल्या सर्व शाळांमध्ये मी माझे शालेय कार्यक्रम सादर करायचे, त्यासाठी दायमाच्या मदतीने प्रत्येक शाळेत भेटून शालेय कार्यक्रमाचे दिवस निश्चित करायचे, असे मी व चंद्रनिवासने ठरवले. त्यासाठी आम्ही दहा पैसे तास, दराने दोन सायकली भाड्याने घ्यायचो व शाळा-शाळां मध्ये जावून तिथल्या मुख्याध्यापकांना भेटायचो. ….. माझ्या शालेय कार्यक्रमाची माहिती द्यायचो…. चंद्रनिवासच्या ओळखीने कार्यक्रम ठरवायचा.. अगदी देतील त्या मानधनात ! एका दिवसात तीन कार्यक्रम सहज करायचो.!
ज्यादिवशी कार्यक्रम असायचे त्या दिवशी चंद्रनिवास एकच सायकल भाड्याने घ्यायचा. माझ्यासाठी पण एक सायकल घेऊ या नां, माझ्या या बोलण्यावर चंदू मला हसत हसत म्हणायचा, “अरे विश्वनाथ, तुला शाळेत जाऊन कार्यक्रम करायचेत… त्यासाठी तुला दमून चालणार नाही. भरपूर एनर्जी टिकली पाहिजे.” असं म्हणून तो मला डबलसीट घ्यायचा….. आम्ही शाळेत जाऊन कार्यक्रम करायचो. कधी एखाद्या दिवशी कार्यक्रम नसला किंवा पैसे नसतील तेंव्हा माझं जेवण दायमांच्या घरीच व्हायचं. ती माऊली मला म्हणायची, “माझी मुलं आहेत, तसाच तूही ! घरदार, नोकरी सोडून झपाटल्या सारखं मराठी कवितेसाठी काम करतोयस… तेच खूप चांगले व वैशिष्ट्यपूर्ण आहे. केंव्हाही हक्कानं जेवायला येत जा ! ”
असे मित्र, अशी निर्भेळ प्रेम करणारी माणसं मला त्या सुरुवातीच्या पडत्या काळात भेटली, त्यांचं अमूल्य सहकार्य मला लाभलं, म्हणूनच मी नोकरीचा विचारही न-करता, अनेकांचा विरोध पत्करून, घेतलेला वसा ठामपणे जपत जपत, गेली ४० वर्षं मराठी काव्य-शारदेची व मराठी रंगभूमीची सेवा नेटानं व आनंदानं करतो आहे…. पुढेही शेवटपर्यंत करत राहणार आहे.
क्रमशः….

– लेखन : प्रा विसुभाऊ बापट
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800