बालदिन नुकताच होऊन गेला. आपण सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
To Every Kid in Us वगैरे वगैरे.
बालदिन आला की आपल्याला बरोबर मुलांची आठवण होते. एकाहून एक सुंदर मेसेजेस, कार्टून्स ची चित्र, वो बचपन के दिन, गुजरा हुआ जमाना .. सगळं सगळं.
पण खरंच आपण आपल्यातले हे बालपण जपतो का हो ? किंवा मुलांना तरी जपू देतो का ?
बघायला गेलं तर असा काय फरक आहे बालपण आणि आयुष्याच्या इतर अवस्थांमधे ?
बालपण म्हणजे मोकळेपणा, निरागसता, उद्याची फिकीर न करता आजचा दिवस मनसोक्त घालवायचा आणि मुख्य म्हणजे बालपण हे इतर अवस्थांच्या मानाने कमी वेळ असते हो. अगदी हातात धरलेल्या वाळू सारखं. ते कधी आपल्या हातातून निसटून जातं आपलं आपल्याला देखिल कळत नाही.
आजकाल मुलांना चहुबाजूनी जे एक्स्पोजर आहे ते पाहता हा अवधी अधिक झपाट्याने कमी होतोय.
सर्वांगीण विकासाच्या नावाखाली ती दबली गेली आहेत आणि त्यांना श्वासही घ्यायला फुरसत नाही अशी परीस्थिती.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपण मग आपल्या वेळचं मोकळं ढाकळं बालपण आठवतं, तेव्हा कसं बरं होतं नाही म्हणत आजचा दिवसही वायाच घालवतो.
बालपणाचं एक वैशिष्ठ्य म्हणजे छक्के पंजे नव्हते हो. जगाचा बरा वाईट अनुभव घेऊन आपण इतके संशयी झालोय की जरा कोणी चांगलं वागलं की आपल्या मनात लगेच पाल चुकचुकते, अरे याला आपल्याकडून काय हव असेल ? बालपणातली निरागसता सगळी संपूनच गेली की काय ? तेव्हा कसं कोणी चॅाकलेट दिलं की आपण लगेच काहीही ऐकायचो.
मला पूर्ण कल्पना आहे की मोठ्या वयात तसं वागता येणार नाही पण शंका कुशंका, डावपेच, छक्के पंजे यांनी आपणच आपलं जीवन अतिशय हीन पातळीवर आणतो. कोणतीही गोष्ट जशी आहे तशी स्विकारण्याची आपली तयारीच नाही जणू.
यातच एकमेकांवर कुरघोडी करत राहणे, विनाकारण
खुसपट काढत राहणे, आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करत वादविवाद करत राहणे हे सर्व असतंच. लहान मुले पण त्यांना एखादी गोष्ट इतरांपेक्षा जास्त समजत असेल, येत असेल तर जरा बढाई मारतात पण त्याला आढ्यतेचं स्वरुप नसतं हो. ते सारं खेळीमेळीमध्ये चालू असतं.
मला सांगा आपण लहान पणात कट्टी घ्यायचो .. किती वेळ ? फार फार तर एक दिवस. पण नंतर मग बट्टी करुन आपसातली समस्या विसरून एक व्हायचोच ना ? मग हाच समंजस पणा खरं तर जो बालपणात होता, सोडून द्यायची वृत्ती होती, तयारी होती ती कुठे गेली ?
बालपणात आपण विचार करत होतो का हो, मिरच्याचे १ इंच तुकडे करायचे, बारीक करायचे का आणखी काही. म्हणजेच अती चिकित्सा कोणत्या गोष्टीची करत नव्हतो. जरुर तिथे शहानिशा करावी, चिकित्सा ही करावी पण ती जर पदोपदी येत असेल तर बालपणातला तो निखळ गोडवा कसा हो मिळणार ?
तेव्हा कधी उद्या वर्गात काय होणार ? काय वाढून ठेवलय याची कधी चिंता केल्याचं आठवतय का ? की त्यामुळे रात्री झोपच आली नाही असं कधी झालय ?
उलट दुनियेत काहीही होवो आपण मात्र ७ / ७:३० ला गा गा.
ती गोष्ट नाही का एक माणूस कामावरुन येऊन घरात प्रवेश करताना त्याच्या सगळ्या चिंता एका गाठोड्यात बांधतो, ते बाहेरच झाडाला लटकवतो आणि मगच आत प्रवेश करतो.
आताही हाच प्रयोग आपण करु शकतो. बालपणातली छान झोप आताही तुम्ही परत मिळवू शकता जर ठरवलं तर !
तेव्हा विशेष काही गोष्टी आपल्याजवळ नसायच्या.
पण जे काही आहे त्यात समाधान होत. कधी कधी बालस्वरुप आपल्या कडे जे नाही त्याबद्दल हट्ट होता पण तो फारकाळ टिकत नसे. (आजकालच्या आक्रस्तळ्या मुलांना हे लागू होत नाही) खावं प्यावं मजा करावी, आनंदात जगावं, आला दिवस छान घालवावा ..
आपल्याही आधीच्या पिढीचं बालपण आठवलं तर त्यात त्यांना फारच कमतरता झेलाव्या लागल्या पण तरीही आजही कोणा आजींशी बोललात तर त्या तेच म्हणतील, ते दिवस छान होते म्हणून.
लहानपणी आठवतंय, साबणाचे फुगे करण्याचा छंद असायचा. केवळ गंमत. तसच आताही साऱ्या चिंता त्या साबणामधे कालवा आणि फुगे करून सोडून द्या, पहा हलकं वाटेल.
लहानपणात एक गोष्ट होती, जबाबदारी नव्हती, मग हे सर्व असं करणं शक्य होत पण वयपरत्वे जबाबदारी आलीच तरी ती हाताळण्याची बुद्धीही लहानपणापेक्षा विकसित झालीच आहे की ! आपण नेमकं याचा विचार न करता केवळ त्या जबाबदारी बरोबर येणारा ताणच बघत असतो.
थोडक्यात काय आपल्यात दडलेलं मुल आपण कायम नाकारत असतो. त्याने कधी डोकावण्याचा प्रयत्न जरी केला तरी लगेच त्याला ए! हे काय लहान मुलासारखं ?
असं म्हणून गप्प करून टाकतो. आपणच आपल्याला प्रौढ करत असतो. विनाकारण शिष्टाचाराची जोखडं स्वत:वर लादत असतो. म्हणजे कसंही वागून चालेल असा गैरसमज कृपया नको !
बालपण म्हणजे एक निखळ, नैसर्गिक उर्जेचा झरा आहे जो प्रत्येकाने आपल्या अंतरंगात जपला पाहीजे. वयानुरुप बंधने आली तरीही ! मधुन मधून या निरागस गोंडस मुलाकडे पहावं ! हरवलेल खूप काही सापडेल बघा.
चला पुन्हा लहान होऊ या !

– लेखन : शिल्पा कुलकर्णी, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
अगदी योग्य शब्दात लिहीले आहे. नविन पिढीचे बालपण, निरागसता फार लवकर, लहान वयांत संपते असे जाणवते. 👌👌
खूप छान ! एकदम समर्पक लेख !
Masta
खूपच छान, चित्र पण सुंदर आणि चपखल!!