नगर येथील महाजन गल्ली काॅर्नरवरील मे. आर. बी. कुलकर्णी या संगीत वाद्य दालनाचे संचालक श्री. सुहास कुलकर्णी यांची कन्या व श्री.महेश कुलकर्णी यांची पुतणी कु. गौरी कुलकर्णी ही स्टार प्रवाहवर मंगळवार दि.२३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या “अबोली” या मालिकेत अबोलीचीच प्रमुख भूमिका साकारणार आहे. नगर शहरातील युवतीस स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणार असलेल्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने नगरकरांची मान उंचावली आहे.
कु. गौरी कुलकर्णी हिने रांजण या मराठी चित्रपटात मधूची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर अलमोस्ट सुफळ संपूर्ण या झी युवा चॅनल वाहिनीवरून प्रसारित झालेल्या मालिकेत सईची भूमिका केली होती. तिने साकारलेल्या या दोन्हीही भूमिका लक्षवेधी ठरल्याने स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू होत असलेल्या अबोली या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी तिची निवड झाली. ही भूमिका तिच्यासाठी मोठे आव्हानच ठरणार आहे.
गौरीला मनसोक्त गप्पा करणे खूप आवडते. कुलकर्णी कुटूंब मोठे असल्याने तिचे बालपण मोठ्या गोतावळ्यात गेले. गौरीला नातेवाईकांचा गोतावळा, आपलेपणा लाभला. त्यातून तिचा स्वभाव बोलका झाला. स्टार प्रवाहवर सुरू होत असलेल्या अबोली या नवीन मालिकेतील प्रमुख भूमिका अबोली नावाच्या मुलीची. हीच भूमिका गौरीकडे आली. कमी बोलणारी, मितभाषी ती अबोली. बडबडणारे मुलीस न बोलण्याची भूमिका म्हणजे मोठे आव्हानच.
नेमके हेच आव्हान स्विकारत गौरीने अबोलीची भूमिका साकारण्याकरिता परिश्रम घेणे सुरू केले आहे. मालिकेची स्क्रीप्ट वाचून ऑडिशन दिल्यानंतर सेटवरील सर्वांनी तिला आत्मविश्वास दिला. घरातील थोरांचे आशीर्वाद घेऊन गौरी अबोलीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली.
सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, अपर्णा अपराजित, दिप्ती लेले, संदेश जाधव, अंगद म्हसकर हे कलाकार अबोली मालिकेत आहेत.
अबोलीने कमी शब्दात व्यक्त होणं, घरातील प्रत्येक व्यक्तीने अबोलीस गप्प बसण्यास सांगणं, अबोलीला तिचं म्हणणं मांडण्याची इच्छा असूनही घरात तिला म्हणणं मांडू न देणं त्यातून तिची होणारी घुसमट हे सर्व अगदी समर्थपणे गौरीने अबोलीच्या भूमिकेमधून साकारले आहे. ही भूमिका साकारताना तिने घेतलेले कष्ट नजरेत भरतात.
नगर शहरातील उमलती कलाकार कु. गौरी कुलकर्णी हिच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याकरिता स्टार प्रवाह वाहिनीवर मंगळवार दि.२३ नोव्हेंबर २०२१ पासून रात्री १०.३० वाजता प्रसारित होणारी अबोली ही मालिका आवर्जुन पहावी.

– लेखन : मिलिंद चवंडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800