हवियेत गोकुळे…..
राजच्या आईला आज शाळेत बघितलं. शिक्षिकेला भेटायला आली होती ती. मला बघून ती माझ्याकडे आली. तिच्या हातातला हिरवा चुडा खण खण करत होता.
राजची आई नेहेमी सौभाग्यवतीचा साज करून असायची. मुरळी, देवदासी या स्वतः ला अखंड सौभाग्यवती समजतात. सौभाग्य शब्दाची परिभाषा इथे फक्त हिरव्या चुड्या सोबत खण खण करणाऱ्या मुक वेदना…इतकीच असू शकते !
हाताला दार लावून तिच्या चुड्यातील एक बांगडी टिचकली आणि हाताला रक्त लागलं. मी तिला कापूस दिला आणि म्हणाले, “जास्त तर नाही लागलं न ?” ती म्हणाली, “नाही जी ताई. नाही काही लागलं”. मी राज चा विषय काढला. “नेहरू मस्त झाला होता त्या दिवशी. राज छान बोलला. तुम्ही का आल्या नाही बघायला ?” ती खुश होऊन म्हणाली, “हो पता चला. ताप होता ताई त्या दिवशी. राज गेला होता टेलर दादा कडे. शाळेला त्याच्या संगे आला होता.”
इथे जास्त हिंदी भाषेत बोलत असत सगळ्या महिला. हिंदी मध्ये आपली मातृभाषा मिसळून बोलणं ही इथली पद्धत होती.
राजची आई पण तिची मराठी हिंदी मध्ये मिसळून बोलत असे. मुलं तर सगळे हिंदी भाषाच बोलत असे.
मी तिला विचारलं, “त्यांच्या कडे रहायला जातो का राज ?”, ती लगेच म्हणाली, “नाही जी. पहली बार गेला होता. खुश झाला बहुत. ताई आमचं कोण असतं हो ? मानला त्याला दादा. कधी कधी पैसे लागते त्याला. मग देते मी. पोरांना भी देते त्याच्या. लेकराले खेळू देते आपल्या लेकरा संगे, तेच बहुत झालं ताई. रात्र झाली होती त्या दिवशी म्हणून तो थांबला तिकडे.”
माझ्या डोक्यात एक वेगळा विचार सुरू होता…. श्रीकृष्णास जन्म देणारी आई देवकी होती आणि त्याचा काही काळ सांभाळ करणारी आई यशोदा होती. हीच संकल्पना म्हणजेच आजची शासनाची दत्तक संगोपन योजना (foster care) आहे.
शून्य ते अठरा वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेल्या बालकांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे यादृष्टीने बाल संगोपन योजना राबविण्यात येते.
या उपक्रमातर्गत ज्या मुलांचे पालक अनेक कारणांमुळे, जसे की विकार (दिर्घकालीन आजार), मृत्यू, विभक्त होणे, किंवा एका पालकाने सोडून जाणे किंवा अन्य काही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेण्यास असमर्थ असतात त्यांना तात्पुरते दुसरे कुटुंब उपलब्ध करून दिले जाते.
कुटुंबाकडून काळजी घेतली जाणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार असतो म्हणून जोपासना (फ़ॉस्टर) कार्यक्रमांतर्गत मुलाला थोड्या कालावधीसाठी किंवा दिर्घ कालावधीसाठी कुटुंब उपलब्ध करून दिले जाते. अशी शासनाची योजना आहे.
ही योजना या वस्तीतील मुलांसाठी खूप गरजेची होती आणि आहे. पण या मुलांना त्यांचं शिक्षण होईपर्यंत किंवा काही काळ आपल्या कुटुंबात ठेऊ शकतील असे पालक मिळणं फार अवघड होतं. जवळ जवळ अशक्य होतं.
तरी त्या रेड झोन च्या आसपास राहणारे काही गरजू, गरीब कुटुंबे होती. ज्यांना आर्थिक मदतीची गरज होती.
अशी काही छोटी कुटुंबं आपल्या उपजिविकेसाठी या मातांवर अवलंबून होती. जसे हे टेलर मामा राजच्या आईला आपली बहीण मानत आणि राज ची आई त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करत असे. ते पैसे ती परत मागत नसे.
अश्याच प्रकारची गरजू कुटुंबं जर इथल्या मुलांना जोडली गेली तर यांना देखील अश्या प्रकारे काही काळासाठी उसणं कुटुंब मिळू शकेल. असा एक विचार मनात घोळू लागला. जरी या कुटुंबांनी मुलांना कायम आपल्या घरी ठेवलं नाही तरी, त्यांच्या अभ्यासासाठी काही वेळ त्यांना आपल्या घरी येण्याची परवानगी ते देऊ शकतील का ?
त्या एवजी या मुलांची आई त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत करू शकते आणि त्या महिला तसं करतच होत्या. मग हे अगदी काही मुलासाठी तरी शक्य होत गेलं आणि मुलांसमोरचं शिक्षण घेण्याचं आव्हान थोडं सुसह्य होऊ लागलं.

– लेखन : डॉ.राणी दुष्यंत खेडीकर.
बाल मानस तज्ञ, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800