महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिकारी निर्णयानुसार रितसर भरती प्रक्रिया राबवून महिलांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात भरती होण्याची संधी उपलब्ध झाली.
या निर्णयानुसार पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या, पहिल्याच तुकडीतील, ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या सुनीता कुलकर्णी नाशिककर या गौरवशाली सेवा बजावून नुकत्याच पोलीस उपअधीक्षक म्हणून सन्मानाने निवृत्त झाल्या.
दर गुरुवारी, आपण वाचू या… त्यांचे वेधक, प्रेरक आत्मकथन “आणि ,मी पोलीस अधिकारी झाले !”
नमस्कार, मंडळी. पोलीस खात्यातील माझा प्रवेश आज मी आपल्याबरोबर शेअर करीत आहे. मी मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी गांवची. आपल्याला कल्पना असेलच हुपरी गाव चांदी नगरी म्हणून प्रसिध्द आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत हुपरीचा चांदी व्यवसायाचा पाया घातला गेला. ९०% लोकांचा चांदीचा व्यवसाय. त्याचप्रमाणे सोबत शेती देखील. त्यामुळे गाव तसं खातंपितं होतं.
माझ्या वडीलांचा सुध्दा चांदीचे दागिने बनविण्याचा आणि शेती असा दुहेरी व्यवसाय होता. घरी एक भाऊ, ८ बहिणी, आजी (मुलगा नसल्याने आईची आई) ती आमच्याकडेच रहायची. विधवा आत्या देखील आमच्याकडेच राहायची. गुरे ढोरे असं अगदी पारंपारिक वातावरण घरी होतं.
हुपरी हे खेडे असल्याने त्याकाळी, म्हणजेच ३३ वर्षापूर्वी मुली हे “परक्याचे धन” अशी समजूत होती. थोडी फार शाळा शिकवून हात पिवळे करून (लग्न) मुलींना सासरी पाठविली की, आपण जबाबदारीतून मुक्त ! असा विचार प्रवाह अगदी आमचे घरी सुध्दा होता. माझ्या मोठ्या ५ बहिणींचे सुध्दा विवाह झालेले होते.
माझ्यासाठी सुध्दा स्थळे पहाणे चालूच होते. मला लहानपणापासून वाचण्याची अत्यंत आवड होती. जे पुस्तक हातात येईल ते वाचून संपेपर्यंत मी खाली ठेवायचे नाही. आपल्याला अतिशयोक्ती वाटेल पण घरातील लाईट बंद केला की देव्हाऱ्यातील डीम लाईट मध्ये सुध्दा मी वाचन करायचे. इतकी वाचनाची आवड होती.
त्यामुळे मी वडिलांकडे हट्ट केला व काॅलेजला ऍडमिशन घेतली. आमच्या गावात फक्त ज्युनियर काॅलेज होतं. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जावे लागे. पहाटे पाच वाजता उठावं लागे. ६ व ६.१५ अश्या दोन एस.टी.बस होत्या. त्या पैकी मिळेल ती गाडी पकडून कोल्हापूर गाठावं लागे. पण पदवीधर होण्याची जबर महत्वाकांक्षा होती. हुपरी ते कोल्हापूर अशी ३ वर्ष जाऊन येऊन १९८६ साली मी बी.काॅम. झाली.
त्यानंतर वडिलांना सांगितलं, मी नोकरी करणार ! त्याच दरम्यान पोलीस अधीक्षक आदरणीय मीरा बोरवणकर मॅडम यांचं कोल्हापूरातील धडाकेबाज काम मी वृतपत्रातून वाचतच होते. त्यामुळे आतून कुठे तरी पोलीस खात्याबद्दलचे आकर्षण वाढत गेलं. त्यातच ज्युनियर काॅलेजमधील “द पॅट्रीयट” ह्या कवितेमुळे “देशासाठीचं मरण हेच खरं मरण” असं वाटु लागलं. बोरवणकर मॅडममुळे पोलीस खात्याबद्दल थ्रिल वाटत होतं.
त्याच दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पेपरमध्ये जाहिरात आली. महिला पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची ही पहिल्यांदाच थेट भरती होणार होती. मी स्वत: ऍथलिट व कबड्डी खेळाडू असल्याने मला ही सुवर्ण संधी वाटली.
मी अर्ज भरला. त्या काळी महिला साधारणपणे शिक्षिका, नर्स, कारकून आदि क्षेत्रामध्येच असत. त्यामुळे ही पठडी बाहेरची नोकरी कशी असेल ? कारण आजपर्यंत घरातील कोणीही नोकरी साठी बाहेर पडले नव्हते. त्यामुळे पोलिसच काय पण कुठल्याही नोकरी बाबत काहीही पार्श्वभूमी नव्हती. पण नोकरी करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती.
मला शारिरीक चाचणीत २०० गुणांपैकी १८५ गुण मिळाले. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावणे आलं. मुलाखतीत मला विचारलं कि, आयपीएस महिला अधिकारी सांगा ? मी लगेच त्यांना आदरणीय मीरा बोरवणकर मॅडम यांचं नाव सांगितलं. पुढचा प्रश्न विचारला की, आपण पोलीस खात्यात का येवू ईच्छिता ? यावर मी हा जॉब थ्रिलींग असल्याचं सांगताच पॅनेल पैकी एका आदरणीय सदस्यांनी पोलीस खात्यात थ्रिलींग वगैरे काही नसते, असे सांगितले. नंतर इतर प्रश्नोत्तरे झाली. त्यांनी मला नोबेल पारितोषिक विजेत्या महिलेचे नाव सांगा ? म्हणताच मी मदर तेरेसा ह्या असून त्यांचं सेवाव्रती काम माझा आदर्श असल्याचे सांगितले.
अशाप्रकारे मुलाखत होवुन ६ जून १९८७ ला नाशिक पोलिस प्रशिक्षण केंद्रात (सध्याचे नाव महाराष्ट्र पोलीस अकॅडमी) येथे मी ६ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी रूजू झाले.
पुरूष प्रधान व संवेदनशील पोलीस खात्यात काम करतानाचे प्रत्यक्ष अनुभव पुढच्या भेटीत ! धन्यवाद.
– लेखन : सुनिता कुलकर्णी नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800