त्र्यंबकेश्वरहुन आमच्या गाड्यांचा ताफा निघाला. सायंकाळी सुर्य पिवळे तांबूस ऊन पसरवीत होता. नागमोडी वळणे, चढ उताराचा रस्ता आयुष्याच्या 35 वर्षांच्या आठवणी जाग्या करून देत होता.
आम्ही सगळे गाडीच्या ताफ्यातील विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर गावच्या
माध्यमिक शाळेचे 1985 सालचे विद्यार्थी होतो. मोक्षगंगा नदीच्या तिरावरील 63 खेड्यांची ती मध्यवर्ती बाजारपेठ होती, तशी ती परिसरातील एकमेव शाळा होती.
परिसरातील सगळी पोरे सायकल, पायी, आणि मिळेल त्या वाहनाने शाळा गाठत. बारदानाच्या पिशवीत दप्तर असत. युनिफॉर्म खाकी चड्डी, आणि पांढरा शर्ट. तोच वर्षभर वापरायचा. आणि कितीही जागी फाटला तरी तोच शिवायचा. हाच दंडक मुलींनाही लागू होता.
शाळा दोन शिफ्टमध्ये असायची. पाचवी ते सातवी सकाळी. आणि आठवी ते दहावी दुपारी.
दहावीची आम्ही मुलं जरा टगेच होतो. हाफ पॅन्ट घालायला संकोच वाटायचा. म्हणून आम्ही सर्व उंचीने मोठ्या असलेल्या दहा बारा मुलांनी लांब पॅन्ट साठी आंदोलन केले. त्याला आंदोलन म्हणतात हे आता कळतं.
त्याचा परिणाम असा झाला की लांब पॅन्ट तर झाली नाहीच पण शाळेत बसण्यासाठी बंदी झाली. पालकांना आणल्याशिवाय वर्गात यायचं नाही. असा हुकूम निघाला. शेवाटी आपले आपले मोठे भाऊ पालक म्हणून आणले आणि एकदाचे वर्गात बसलो.
दहावीच्या परीक्षेचे महत्व होते. पण त्यानुसार तयारीसाठी आजच्या सारखे शाळाबाह्य क्लास किंवा मार्गदर्शन नव्हते. सगळी भिस्त शाळेच्या शिक्षकांवर. तरीही सगळे दहावी सुटलो.
दहावी नंतर जो तो वेगळ्या वेगळ्या शिक्षणाच्या वाटा शोधत निघाला. येथून निरनिराळ्या दिशेने झालेल्या वाटा आज 35 वर्षानंतर एका दिशेने निघाल्या होत्या. पिवळे सुर्य मावळतीला झुकला होता.
रम्य संध्याकाळ मनाला मोहक करत होती. गार वारा अंगाला स्पर्श करून जात होता. रस्त्यावर परतीची गायी गुरे आठवणीचा हिंदोळा देत होती. लहानपणीची कविता आठवली,
“पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर”
अशी ती कविता आठवली आणि संधी प्रकाशात गाड्या “शिरपा माळ” येथे येऊन थांबल्या.
शिवाजी महाराज सुरतेस गेले तेव्हा या वाटेने गेले. या वाटेत त्यांनी या जागेवर मुक्काम केला होता. त्यांच्या पदस्पर्शने ही जागा पवन झाली, म्हणून हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. शासनाने हा परिसर देखणा केला आहे.
या जागेवरून परिसर खुप छान दिसत होता. संधी प्रकाशात पौर्णिमेच्या चंद्राचे ते गोमटे रूप, छायाचित्र काढण्याचा मोह करून गेले. सगळ्यांनी एकत्रित, काहींनी जोडीने, सेल्फी काढल्या.
आता ओढ होती रिसॉर्ट वर जाण्याची. त्याप्रमाणे रिसॉर्टला पोहचलो तेव्हा साडेसात वाजले होते. प्रत्येकाची रूम स्वतंत्र होती. नियोजनाप्रमाणे रूम वाटप झाले. आठ वाजता फ्रेश होऊन मोकळ्या जागेत जमायचे आहे असे सांगण्यात आले.
ह्या सर्वांना एकत्रित आणण्याचे काम आमचे मित्र भिला बच्छाव, आशालता भांबरे, अनिल मोरे, रत्नाकर पगार संदीप पाटील यांनी केले. आणि त्यांनीच सर्व नियोजन केले. फ्रेश होऊन खाली रिसॉर्ट च्या मोकळ्या जागेत आलो तर छान शेकोटी पेटवली होती. त्या सभोवती गोल खुर्च्या मांडल्या होत्या. माईकची व्यवस्था होती. सगळे येऊन बसले.
आयोजकांपैकी अशोक भदाणे यांनी सूत्रसंचालन हाती घेतले. त्याने प्रयोजन सांगून सर्वांनी आपला परिचय द्यावा असे सुचवले. त्यापैकी जास्त शिक्षक, शिक्षिका असल्याचे कळले. हसत खेळत, थोडे विनोद करीत, हा परिचय संपला. जेवण झाली. परत सगळे त्याच जागी जमले. महिलांनी गाणी म्हटली. भेंडया वगैरे झाले. मग गाण्यावर जोडी जोडीने ठेके धरले. हे सगळे संपलं तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता.
इतक्या वर्षांनी एकत्र आम्ही आलो पण सहज एकरूप झालो. वर्गात मुलींचा गट निम्या जागेत, तर मुले निम्या जागेत बसायची. पण त्या काळी मुलं मुली कधी बोलत नसू. काहीही कारणाने कोणी कुणाशी बोलत नसत. मुलं मुलांच्या ताफयात आणि मुलींचा वेगळा ताफा. मुली खेळायला वेगळ्या जागेवर. मुलांच्या खेळाच्या जागाही वेगळ्या.
त्यावेळी एन. आर. सावंत मुख्याध्यापक होते. अतिशय कडक शिस्तीचे, सर्वत्र शांतता असे. तासिका संपल्यावर आवाज येई तो फक्त घंट्याचा. एकाद दुसऱ्या वर्गातुन हास्य कल्लोळ ऐकू आला की शिपाई येऊन शिक्षकांना सूचना करीत.
अश्या काळात मुलीशी बोलणे दुरापास्तच. तरीही एकदा असे घडले, एक मुलगी नवीन आली होती. जरा धीट होती. धीटाईने बोलायची. तिचे कोणाशी तरी काहीतरी भांडण झाले. तिने थेट मुख्याध्यापकांना
सांगितलं आणि तिने चार पाच मुलांची नावं दिली सांगून. दुसऱ्या दिवशी जो मार मुलांना बसला, की परत आयुष्यात कोणीही, कोणत्याही कारणाने, कोणत्याही नजरेने मुलीकडे पाहिलं नाही.
अश्या वातावरणातील आज आम्ही सगळे एकत्र आलेलो. कोणी आजोबा तर कोणी आजी झालेलो. पण या पहिल्याच इतक्या वर्षांच्या भेटीने भारवून गेलो हे मात्र खरे.
सकाळी नास्ता केला. एकत्रित फोटो काढले आणि दाभोसा धबधबा पाहण्यासाठी निघालो. आता पर्यंत आम्ही रुळून गेलो होतो. हा धबधबा येथून 12 किमी वर होता. घनदाट जंगलाकडे निर्मनुष्य रस्त्यावर जाताना, निसर्गाची किमया बघताना मन प्रसन्न करून गेले. पण त्या काळात कोणतीही साधने नसताना शिवाजी महाराज इतक्या जंगलात कसे वावरले ? हा प्रश्न सहज डोकावत होता. अगदी झाडातून डोकवाणाऱ्या किरणासारखा.
धबधबा खोल होता. काहीजण खाली गेले. काही वरच थांबले. खाली गेलेले दीड तासांनी परतले. येथून राजवाडा बघितला. फोटो काढले. गप्पा गोष्टी विनोद करत तेथून परतलो. दुपारी दोनला जेवणे झाली.
आयोजकांनी शेवटी समारोप केला. सर्वांना वारली पेंटींग भेट दिल्या. एक सुंदर प्रवास झाला. नियोजन आखीव रेखीव होते. अंधाराचे आत त्रंबकेश्वरपर्यंत पोहचयाचे होते. परतीचा प्रवास सुरु झाला.देवबाध चा गणपती बघितला. इतक्या जंगलात आर. एस एस चा सेवाप्रकल्प चालू असल्याचे बघून आश्चर्य वाटले. त्र्यंबकेश्वर आले तेव्हा थोडे हायसे वाटले. नाशिक जवळ आले तेव्हा सर्वांनी चहा घेतला. पुन्हा भेटण्याचे ठरवून आम्ही आमच्या वाटेने निघालो पक्षी घरट्याकडे परतावे तसें. खुप काही आठवून आणि साठवून !
– लेखन : विलास कट्यारे. संपादक, सा.सहस्त्रार्जुन.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
Very nice