आजच्या तरुण पिढीला संविधानाची सखोल ओळख करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने मुंबईतील प्रख्यात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात काल संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री सावंत बोलत होते.
यावेळी बोलताना श्री सुधीर सावंत यांनी संविधानातील विविध तरतुदींचा आढावा घेऊन त्यांचे आजच्या परिस्थितीत असलेले महत्त्व विशद केले.
दुसरे प्रमुख पाहुणे, निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी यावेळी बोलताना, संविधान दिवसाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्यानंतर लक्षणीय प्रगती झाली असली तरी अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे, असे सांगितले.
केंद्राचे सरचिटणीस आयु.चंद्रकांत बच्छाव यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष आयु.नितीन सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर संविधानातील प्रास्ताविकेची सामूहिक शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिन
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर नेमण्यात आलेल्या घटना समितीचा अहवाल भारत सरकारने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारून त्यानुसार देशाचे प्रत्यक्ष कामकाज २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाले. त्यामुळे आपण दरवर्षी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर २०१५ सालापासून आपण २६ नोव्हेंबर हा “संविधान दिन” म्हणून साजरा करीत असतो.
– लेखन : विलास जाधव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800