संस्कार संपत्ती
“मुले म्हणजे देवा घरची फुले !” देवाला फुल प्रिय असते ! फुलांशिवाय देवाची पूजा अपूर्ण असते. देवाची व वातावरणाची प्रसन्नता नेहमीच विविध फुलांनी बहरते.
आमच्या आयुष्यातही प्रसन्नता लाभली, ती या फुलांच्या रूपाने. मुलांनी भरलेला आमचा सोनाली क्लास ! आठवणींना मनाच्या कप्प्यात कोरून, आमच्या जीवन प्रवासाचा अविस्मरणीय टर्निंग पॉइंट ठरला, तो हाच ! “मुलांनी बहरलेली सोनाली क्लास बाग !”
दरसाल आमच्या क्लास मध्ये येणारी, लहान- लहान गोजिरवाणी निष्पाप मनाची मुले, म्हणजे आमच्यासाठी, हसरी खेळकर मुलांची बाग होती. कोणतीही डीएड पदवी न घेता, फक्त आम्ही मिळवलेल्या शिक्षणाच्या बळावर, आमचा क्लास चालू केला होता. आमच्या बालपणापासून आम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला होता, तीच पद्धत आम्ही या मुलांसाठी वापरण्यास सुरुवात केली होती.
प्रत्येक मुलात असलेली शिकण्याची उत्सुकता, किंवा त्याची बुद्धीमत्ता व अभ्यास करण्यासाठी लागणारी विद्यार्थ्याची मेहनत, ह्या तीन गोष्टी पारखून, प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष देत, हया मुलांना घडविण्याचा आमचा प्रयत्न असे.
सात आठ वर्षांपर्यंत, मुलांना आपण जसे वळण देतो व त्यांच्या मनावर अभ्यासाचे जसे महत्त्व कोरत ठेवतो, तशी ती मुले, आपसूक वळत जातात. हे आमच्या लक्षात आले होते.
काही मुलं मस्तीखोर होती. काही शांत होती. काही उत्सुक होती, तर काही कमालीची हुशार होती. प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्यांना हाताळण्यासाठी आम्हाला वेगवेगळे प्रयोग करावे लागत असत.
जसजशी मुले मोठ्या वर्गात जातात, तसतसे त्यांना शिक्षणाचे महत्त्व स्वतःहून कळू लागते. हा अनुभव आम्हाला दरवर्षी मिळत असे.
आमची शिकवण्याची पद्धत फारच सोपी होती. एखादा विषय गोष्टीरुपात साकारून, मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी, आमची नेहमीच धडपड असे. कधी गमतीदार विनोद करत व वर्गाला हसत-खेळत शिकवणे, माझ्या पतींना अलबत जमत असे. पाठांतराच्या वेगवेगळ्या युक्त्या सांगून, मुलांकडून चांगले पाठांतर करून घेण्यात, सरांचा हातखंडा होता. गणित विषयात, गणिते सोडविण्याच्या सोप्या पायऱ्या दाखवून, गणित विषय प्रत्येक मुलाचा आवडीचा विषय झाला होता.
इंग्रजी विषयात तर मुले, लवकर तयार झाली होती. कारण इंग्रजी व्याकरणावर अधिक भर देऊन, मुलांना वाक्य रचनेच्या अनेक सोप्या युक्त्या, सर दाखवून देत असत. आज ही मुले भेटली की म्हणतात !
“सर, तुमच्या शिकवणीच्या सोप्या पद्धतीमुळे, आम्ही आज चांगले इंग्रजी बोलू शकतो !”
जेव्हा आमचे वर्ग पाचवी ते दहावीपर्यंत सुरू झाले, तेव्हा आम्ही क्लासच्या सहली काढणे बंद केले . कारण पेपरात येणाऱ्या बातम्या, उगाचच मनाला चटका लावून जात असत.
त्यामुळे मुलांचा, वर्षभरातील एखादा विरंगुळा म्हणून, ३१ डिसेंबर किंवा १ जानेवारी, असा दिवस साधून, “गेट-टुगेदर” म्हणून, हा दिवस आम्ही साजरा करत असू. सोहळ्याची आखणी अभ्यासासोबत, महिनाभर चालू असे. खाणे-पिणे, नाचणे, काही कला सादरीकरण करणे, असे छोटे- छोटे कार्यक्रम आखले जात असत. सर्व मुलांना त्या दिवसाची फार उत्सुकता लागून राहत असे.
खर्चाच्या अनुषंगाने ताळमेळ साधत, मी स्वतः घरीच पावभाजी तयार करत असे. तर कधी वडापाव, ढोकळा, समोसा, स्वीट असे पदार्थ मागवले जात असत. त्यासोबत मस्त आईस्क्रीमचा आस्वादही मिळत असे. हया दिवशी मुले खूपच छान नटून-थटून येत असत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी उत्साह ओसंडून वाहणारा नजारा, पहावयास मिळत असे. त्यांचे ते, हसरे-लाजरे, बुजरे चेहरे, आजही नजरेसमोर उभे राहतात.
कुतुहलाची बाब म्हणजे, सरांचा जन्मदिवस ! ही मुले कधीच विसरली नाहीत. न चुकता, हया दिवशी, स्व:खर्चाने केक, फुलांचा गुच्छ व छानसे पेन, गिफ्ट आणत असत. क्लास संपला की, सरांचा वाढदिवस, ही मुले साजरा करत असत. सर, सर्वांना स्वतः केक भरवत असत, नि मुले सरांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेत असत. तेव्हा त्यांच्यातील संस्कार, असा असे की, ज्याच्या चरणी हातांचा स्पर्श होतो, त्यातून त्या व्यक्तीची ऊर्जा आपल्या शरीरात सामावते. ही गोष्ट हया मुलांनी, आजही जतन करून ठेवली आहे.
कार्यक्रमानंतर मात्र अभ्यासाला जोमाने सुरुवात होत असे. दहावीचे ज्यादा तास सुरू होत असत. रोज सकाळी पहाटे पाच वाजता, दहावीची मुले अभ्यासाला क्लास मधे येत असत. सात वाजता घरी जाऊन, पुन्हा शाळा सुटल्या नंतर क्लास मधे येत असत. मग मात्र घरी जाण्यास वेळ ठरलेली नसे. प्रत्येक वर्गाच्या प्रश्न पत्रिका तयार करून, त्याच्या झेरॉक्स कॉपिज काढून, तेवढ्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात असत. उत्तरपत्रिका तपासून, त्यातील अवघड बाबींना सोपे करून दाखवणे, ही आमची उजळणी असे. साध्या पद्धतीचा अवलंब करून, मुलांना यश मिळवून देण्याच्या प्रयत्नात, आमची त्या काळात धडपड असे.
काळानुरूप अभ्यासात बदल होत होते. मराठी माध्यमाला सेमी इंग्रजी लागू झाले होते. मुलांची शिकताना फरफट जाणवत असे. पण कलेकलेने त्यांची आवड निर्माण करून देण्यात, आम्ही यशस्वी ठरलो होतो. संगणकावर प्रात्यक्षिक प्रयोग दाखविणे, काळाची गरज झाली होती. तीही आम्ही यशस्वीपणे पार केली होती.
मुले कधीतरी सांगून जात की, सरांच्या तासाला मजा येते ! पण मॅडमच्या तासाला भीती वाटते ! का कोणास ठाऊक माझा चेहरा गंभीर असल्याकारणाने किंवा मी फार तिखट बोलत असल्याने कदाचित मुलांनी, माझी अशी प्रतिमा तयार केली असावी ! पण सरांनी दिलेला “तो” प्रसाद व भिंतीला पाठ टेकवून खुर्चीच्या स्थितीत बसण्याची ती दिलेली शिक्षा, आणि मग थरथरणारे पाय ! बापरे ! अजूनही मुले आठवणीने सांगतात.
कधीकधी शिकवून झाल्यानंतर किंवा एखाद्या विषयाला अनुसरून सर, मुलांना स्वतःच्या बालपणात घेऊन जात असत. त्या गोष्टी ऐकताना मुले रमून जात असत. चांगल्या गोष्टींतून पुढची पिढी, अनुकरणाने तयार होत असते. त्यामागील सरांचा हा हेतू असे.
कधी आम्हाला ऑफिसमधून येण्यास उशीर होत असे तेव्हा, मुले स्वतः दरवाजा उघडून क्लासमध्ये व घरात बसून अभ्यास करत असत.पण कधीही कुठलीच वस्तू इकडची तिकडे होत नसे. त्यांच्यातील प्रामाणिकतेचा हा विश्वास फार मोठा होता.
विविध गुणांची अवखळ मुले, हेच आमच्या पंचवीस वर्षाचे विश्व होते. बरीच मुले, आमच्या खेळकर व शिस्तबद्ध अध्ययनातून पुढे निघून गेली आहेत. अशाच काही पाखरांचा उल्लेख, मला येथे करावासा वाटतो.
जयेंद्र सारंग खूप मेहनती, प्रामाणिक व समंजस ! आज तो नेव्ही मध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे. वैशाली सावंत खूप बोलकी, उत्साही आणि तेवढीच मेहनती ! आज ती वकील आहे. तिने स्वतःचे कार्यालय, उलवे येथे उभे केले आहे. संतोष म्हात्रे, खूपच क्रियाशील, धडपड्या, अखंड बोलका (क्लास मधे अबोल होता.) नेहमी हसतमुख, मेहनती आणि तेवढाच गंभीर ! थोडक्यात, क्लासच्या गेट टुगेदरचा व्यवस्थापक ! अक्षय पोस्टुरे, तसा आळशी होता. पण चिकाटी होता. व्यवहारी गुणाने, त्याने दातांचे टेक्निकल क्लीनिक उभे केले आहे.
विशाल मोरे, नागेश कस्पले, हे दोघे बिल्डरच्या कार्यालयात एजंटचं काम करत आहेत. लता गवळी, आज चिपळूणमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहे. महेश ओणकर, दिगंबर करंजे, धनंजय कासले, स्वतःच्या गाड्या घेवून, टुरिस्टचा व्यवसाय करत आहेत. देवेंद्र करंजे, राकेश, गजानन, गणपत, विकी शिंदे, मुकेश, प्रकाश, प्रताप, विशाल, नितीन, कृष्णा, संदीप, शिल्पा, भावना, सविता, सुषमा, स्वाती, तन्मय, तेजस, सुजय, सूयश, संगीत पाटील, राकेश, स्नेहा, विपुल, अरविंद (आज हा आपल्यात नाही. पण त्याच्या आठवणी सदा आपल्या सोबत आहेत.) जितेंद्र, क्रिकेट वेडा ! सुरक्षा, ही तर लग्नानंतर रत्नागिरी येथे राहते. पण गेट टुगेदरला दरवर्षी न चुकता, सर्वांमध्ये सामील होते.
हया सगळ्यांशी मिळून मिसळून राहणाऱ्या माझ्या मुली, सोनाली व स्वप्नाली ! सर्व मुले अतिशय गुणवान होती व आहेत. सर्व मुलांनी आम्हा उभयतांस खूप आदर व प्रेम दिले आहे.
हया सर्व मुलांमध्ये असणारा आमच्या विषयीचा आदर, आजही त्यांच्या मनी तेवढाच जाणवतो. गुरु पौर्णिमेला तर, हया मुलांनी, आमच्या घरी येऊन, हात घड्याळ भेट दिली होती. नकार दिला असता, मुले म्हणाली, “आज आम्ही तुमच्या आशीर्वादाने, चांगला यशस्वी माणूस घडू शकलो, हे आमचे प्रेम समजून, तुम्ही ठेवा.” असे हे आगळे वेगळे प्रेम आम्हास, मुलांकडून मिळाले.
गेट-टुगेदरच्या निमित्ताने, सोनाली क्लासचे सारे माजी विद्यार्थी पिकनिक काढून एकत्र भेटतात, तेव्हा भूतकाळातील त्या दिवसांना उजाळा मिळतो.
क्लास मधील एकमेकांविषयीचे व आमचेही गमतीदार किस्से, मुले आजही सांगतात. ज्या गोष्टी त्यावेळी सांगू शकत नव्हते, अश्या आठवणी सांगून खूप हसवतात. आज ही सर्व मुले, खूप मोठी झाली आहेत.
मुलांनो, लहानपणी तुमच्या निखळ हास्याने क्लास भरून जात असे, तसेच आजही तुम्ही खळखळून हसता. कधी फोनवर भेटता किंवा कधी प्रत्यक्ष भेट होते तेव्हा मला म्हणता, “मॅडम, मी तुमचा जीवनप्रवास वाचतो. असंच भरपूर लिहित राहा. आम्हाला वाचायला खूप आवडतं. “तेव्हा तुमच्या आठवणी आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.
सन १९८९ पासून मुलांचे व आमचे नाते जुळले होते. गुरु आणि शिष्य, हया नात्या पलीकडील, आपले हे अखंडीत आगळे- वेगळे नाते गुंफले आहे.
तुम्ही सर्वांनी, एका प्रेमळ नात्याच्या चौकटीत आम्हा उभयतांस कोरले आहे. हेच आमच्या “जीवन प्रवासाला” मिळालेले सन्माननीय प्रशस्तीपत्र आहे.
मुलांनो, तुमच्यातील, आदरणीय प्रेमळपणा, प्रामाणिकता, विनम्रता, विनयशीलता आणि विश्वास आम्ही अनुभवला आहे. असे पैलूदार गुणवान हिरे आमच्या सहवासात घडले. “आपले ज्ञान दुसऱ्यास द्यावे.” हे भाग्य आम्हाला लाभले.
आजही तुम्ही सारे, सरांचा जन्म दिवस किंवा आमचा विवाह दिन साधून गेट टुगेदरचे आयोजन करता. पिकनिक स्थळी, मनापासून वाढदिवस साजरा करता. हे पाहून मन भरून येतं. तेव्हा वाटतं की, आम्ही दोन मुलींचे पालक नसून, तुम्हा सर्वांचे पालक आहोत ! हया भाग्यापेक्षा आणखी काय हवे ! आम्हा उभयतांना तुमचा खूप अभिमान आहे.
आमच्या मनात घर करून, तुम्ही खूप पुढे गेले आहात. तरी आजही, जेव्हा जेव्हा भेटता तेव्हा, आदराने आमचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेता. असा आदरणीय नम्रपणा लाभणे दुर्मिळ आहे. तुम्ही सर्व मुले, आमच्या आयुष्यात कधीही न संपणारी, संस्काररुपी संपत्ती आहात.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/05/IMG_20210507_221714-150x150.jpg)
– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800
सुंदर आठवणी सांगितल्या आहेत वर्षा भाबल.खर तर मीच साक्षीदार आहे. मुलांमध्ये रमण, त्यांचे हावभाव टिपणे, त्यांचे अंतरंग समजून घेणे, फारच विलक्षण अनुभव होता. विद्यार्थ्याची प्रगती कशी होईल, त्यासाठी केलेली उपाययोजना, सगळ मनःपूर्वक केले. असो. वर्षा असेच लिहीत रहा. पुन्हा एकदा वर्षा तुला, आणि NST team ला धन्यवाद 🙏🙏
जीवन प्रवास चा हा लेख वाचला खूप छान आहे………..क्लास चे ते दिवस डोळ्यासमोर जसे च्या तसे उभे राहिले. मॅडम/सर (मावशी /काका )तुम्ही लिहिलेला हा लेख वाचून अंतःकरण भरून आले. सर /मॅडम तुमचे खूप खूप आभार आणि हो पुढील जीवन -प्रवास -भागाची आवजून वाट पाहतो……..😊
Khup chan madam….we r very proud to have both of u in our life as our teachers well wishers and guardians…
We love u a lot….
खूप छान मॅडम, आम्हाला जुने दिवस आठवले.. तुमच्या या लेखणीतून आम्ही सोनाली क्लासेस मधील जगलेलो प्रत्येक दिवस अनुभवतोय… असच लिहत रहा आणि आमचे लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत रहा… खूप खूप शुभेच्छा…