Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं

ओठावरलं गाणं

नमस्कार 🙏 ओठावरलं गाणं….
या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. आज आपण पहाणार आहोत कविवर्य अशोक बागवे यांनी लिहिलेलं एक गीत ज्याचा अर्थ सहजपणे समजतो पण ते काव्य आहे संगमेश्वरी मराठी बोली भाषेतलं. गाण्याचे शब्द आहेत –

वासाचा पयला पाऊस अयला
नभाचे घुम्मड मातीये भरियेला

बालपणापासून आपल्या सर्वांच्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दरवर्षी येणारा पहिला पाऊस. लहानपणी आईचा डोळा चुकवून पहिल्या पावसाच्या मृत्तिकेचा गंध श्वासावाटे भरून घेत केलेलं त्याचं स्वागत आठवतं.

तारूण्याच्या टप्प्यावर या पावसात आपल्यासोबत आपलं आवडतं माणूस साथीला असावं असं वाटतं.

थोडंसं प्रौढत्वाकडे झुकल्यावर मात्र पहिल्या पावसाच्या सरीनंतर येणारी मृद् गंधाची चाहूल मनाला तर प्रसन्न करतेच पण त्याचबरोबर आजुबाजूला निसर्गाच्या वेगळ्याच छटा दिसू लागतात.

आपल्या हे ही लक्षात येतं कि आपण जेव्हढया तल्लीनतने या मृद् गंधाशी समरस झालो आहोत तेव्हढीच समरसता या आकाशाच्या पोकळीतही निर्माण झाली आहे आणि जमिनीपासून आकाशापर्यंत वातावरण या गंधामुळे भारून गेलं आहे.

पान्याचे तरींगे वरी थरारियला
जळीचे तळीले हुंकीर पेटीयला

आकाशातून पडणा-या पावसाच्या थेंबांपैकी काही थेंब तहानलेल्या मातीत मिसळल्यानंतर मातीच्या तृप्ततेचा गंध चहु दिशांना पसरत आकाशाच्या घुमटापर्यंत पोचतो आहे. तलाव आणि सरोवरात पडणा-या थेंबांमुळे उठणा-या तरंगांनाही कुठेतरी या मृद् गंधाची जाणीव होते आणि म्हणूनच पाण्यात पडताक्षणीच ते थरारून उठत आहेत. या तरंगांमुळे सरोवरातील आणि तलावातील तळाच्या पाण्यापर्यंत या मृद् गंधाची जादू पोचल्याची कल्पना एका हुंकारातून या तरंगांना मिळते.

फुलाने हळूच डोळा उचिलेला
कळीने लाजून मुर्का मारीयेला

आसपासच्या परिसरावर जादू करत आकाशापर्यंत जाणा-या या मातीच्या गंधामुळे वातावरणात झालेला बदल लक्षात येऊन या दोघांचंही आता मीलन होणार हे जाणून फुलाने हळूच डोळे उघडून आकाशाकडे जाणा-या मातीच्या गंधाकडे पाहिलं आणि कळीने लाजून छान मुरका मारला.

तुला बी कळीले मला बी कळीले
हातामध्ये हात अपाप मळीले

पाऊस आला, त्याने आपल्याला भिजवलं आणि त्याच्यामुळे आपल्या दोघांच्या भेटीमध्ये व्यत्यय येतो येतो कि काय अशी भीती वाटत असतानाच वातावरणात बदल घडवणा-या या मातीच्या गंधामुळे आपण दोघेही आणखीनच जवळ आलो आणि तुझ्याही नकळत तू माझा हात तुझ्या हातात घट्ट धरलास …. कधीही अंतर न देण्यासाठी! पहिल्या पावसामुळे आपला गंध उधळणा-या या मातीच्या गंधाचे मला आभारच मानायला हवेत.

संगमेश्वरी मराठी बोली भाषेतलं हे गाणं बागवे सरांनी “गर्द निळा झुला” या अल्बमसाठी लिहिलेलं असून कौशल इनामदार यांच्या संगीताचा वेगळा बाज असलेलं हे गाणं उदेश उमप यांनी आपल्या रांगड्या आवाजात आपल्यापर्यंत सहजपणे पोचवलं आहे.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. आज पाऊस आला आणि तुम्ही हे गाणं आमच्यासमोर ठेवलंय! किती सुंदर आहे ही कविता! जग सुंदर असतच पण कवी ते अधिक सुंदर करतो.आणि तुमच्यासारखे रसिक त्याचा मनमुराद आनंद घेतात आणि देतात.
    विकास जी, तुमच्या या सदरच्या रूपाने एक अनोखा आनंदाचा झरा आम्हाला लाभला आहे.
    खूप खूप धन्यवाद!

  2. अशोक बागवे यांच हे गाणं संगमेश्वरी मराठी बोलीभाषेतील असल्याने सहज समजण्यासारखी आहे आपण केलेले रसग्रहण उत्तम झाले आहे.

  3. आजच पाऊस पडतोय आणि हे गाणं बरोबर वर्णन लागू पडतंय. मृदगंध किती सुंदर उपमा. खूप छान रसग्रहण केले आहे. आवडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments