भारतीय राज्यघटना देशाची तारणहार असून देशाला संविधानच तारेल. सर्व जाती, धर्मांना जोडणारा व न्याय देणारा देशाचा एकमेव ग्रंथ म्हणजे संविधान आहे असे प्रतिपादन संविधानाचे गाढे अभ्यासक, सेवा निवृत्त सनदी अधिकारी इ.झेड.खोब्रागडे यांनी केले.
संविधान साहित्य संमेलन आयोजन समिती, अहेरी, संविधान फाउंडेशन नागपुर व आरक्षण कृती समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुस-या संविधान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सारख्या दुर्गम भागात दुसऱ्या संविधान साहित्य संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या अगोदर पहिले साहित्य संमेलन नागपुर येथे घेण्यात आले होते.
विचारपीठावर उद्घाटक म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंकित (भा.प्र. से), तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, रेखा खोब्रागडे, अन्न पुरवठा निरीक्षक शिल्पा दरेकर, उपविभागीय वनअधिकारी नितेश देवगडे, प्राचार्य महेंद्रकुमार मेश्राम, उमाजी गोवर्धन, मुख्य प्रवर्तक गौतम मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, संविधानामुळेच भारतीय नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून संविधानाचे पठण व वाचन सदैव होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक शाळा-महाविद्यालयात, कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अहेरी व गडचिरोलीत मी प्रशासकीय अधिकारी म्हणून वावरत असतांना खऱ्या वास्तवतेची जाणीव होऊन माणुसकी जपणे हाच संविधानाचा खरा पाया आहे, असे सांगून गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ फोफावली असली तरी नक्षल चळवळीतून किंवा शस्त्रातून कुठलीच क्रांती किंवा बदल घडणार नसून विधायक व संविधानाच्या मार्गानेच आमूलाग्र बदल घडू शकतो असे म्हणत संविधानच देशाला तारणार असल्याचे ठाम मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले.
संमेलनात संविधानावर आधारित वेगवेगळ्या टप्प्यांवर पाच सत्रे घेण्यात आली. दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती.
प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून व पुष्पअर्पण करून संमेलनाचे थाटात उदघाटन करण्यात आले.
या संमेलनाचे मुख्य प्रवर्तक गौतम मेश्राम यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन शैलेजा गोरेकर यांनी केले. वनिता कन्नाके यांनी आभार मानले. यावेळी बहुसंख्येने संख्येने नागरिक उपस्थित होते.
संविधान साहित्य संमेलन यशस्वीतेसाठी आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.-
– देवेंद्र भुजबळ. 9869484800