Wednesday, July 2, 2025
Homeबातम्यानांदेड : आदर्श बालरुग्ण सेवा

नांदेड : आदर्श बालरुग्ण सेवा

नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी हैद्राबाद व इतर महानगराकडे जाऊ लागू नये यादृष्टिने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना अधिक सक्षम करण्यावर गत दोन वर्षात विशेष भर देण्यात आला.

कोविड-19 च्या आव्हानानंतर बालकांच्या दृष्टिनेही शासकीय पातळीवर चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाल विभागाला अधिक सक्षम केले.

अवघ्या 3 महिन्यांपूर्वी बाल रुग्णांच्या सेवेत रुजू झालेल्या एका अद्ययावत वार्डाने डॉक्टरांच्या अथक परिश्रम व दक्षतेतून 2 हजार बालकांना जीवदान मिळाले यावर अनेकांचा विश्वासही बसणार नाही. ही अद्भूत किमया शासकीय रुग्णालयातील अवघ्या 12 डॉक्टर्स व संबंधित स्टाफ नर्स यांनी लिलया पेलून दाखविली.

कोविडच्या दृष्टिने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या नवीन बाल व नवजात शिशू अतिदक्षता विभागाद्वारे चांगल्या सुविधा निर्माण झाल्याचा निश्चितच सर्वांना लाभ होत आहे. ज्या दूरदृष्टिने येथील सेवा-सुविधा अत्याधुनिक करुन रुग्णांसाठी उपलब्ध झाल्या त्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने अधिक गंभीर बाल रुग्णांना येथे उपचार करून सुखरुप घरी पाठविता आले.

नवीन बाल व नवजात शिशु अतिदक्षता विभागाची क्षमता ही 150 बालकांची आहे. ऑक्टोंबर महिन्यात सर्वत्र लहान मुलांच्या निमोनिया, डेंग्यू, मेंदूज्वर, टायफाईड व इतर आजारांचे प्रमाण एकदम वाढले. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील गंभीर आजारी मुलांसह शेजारील तेलंगणा व परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातून उपचारासाठी मुले येथेच दाखल झाली.

अवघ्या ऑक्टोंबर महिन्यात या नवीन वार्डात 900 मुलांवर उपचार करण्याचे आव्हान येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी स्विकारुन ते पूर्ण करुन दाखविले.

१ डिसेंबरपर्यंत या वार्डातून २ हजार मुले सुखरूप बरे होऊन घरी गेली आहेत याचा मनोमन आनंद असल्याची भावना बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. सलीम तांबे  यांनी बोलून दाखविली.

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये नांदेड येथील आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागाचा पहिला क्रमांक येतो. या खालोखाल पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजला जातो. इथल्या सुविधा अत्याधुनिक आहेत. मल्टी पॅरामॉनिटर्सपासून सेंट्रल मॉनिटर्स सिस्टीम कार्डीयाक मॉनिटर, क्युबिकल विथ व्हेंटिलेटर, वॉर्मर्स अश्या अत्याधुनिक उपकरणांनी आपले वार्ड सज्ज आहेत.

मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात बालरुग्ण आल्याने त्यांना दाखल करुन घेऊन उपचार करणे हे कर्तव्य आहे. डॉक्टर्सच्या सर्व टिमने दिवसाची रात्र करुन गत 3 महिन्यांपासून एक दिवसही सुट्टी न घेता आजवर 2 हजार या नव्या अतिदक्षता विभागात दाखल झालेले बालक व खास कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन बेडच्या वार्डमध्ये जवळपास 1 हजार 300 बाल रुग्णांना चांगले उपचार करुन रुग्णालयातून घरी पाठविले आहे. ही बालरुग्णांची संख्या  थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 3 हजार 300 एवढी जात असल्याचे सांगतांना डॉ. तांबे यांना आपल्या चेहऱ्यावरचे समाधान लपविता आले नाही.

सर्वच स्तरातून या ठिकाणी बालरुग्ण येतात. काही अत्यंत हलाखीच्या परिस्थितील असतात. विशेषत: शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील मुलांना आणि पालकांना धीर देऊन समाधान करणे हे अधिक आव्हानात्मक असते. त्यांच्या सहकार्याने रुग्णालयाचे व्यवस्थापनही अधिक चांगले कार्य करू शकते असे डॉ. तांबे यांनी सांगितले.

हजारो रुग्णांना लाभ याचे मोठे समाधान – जिल्हाधिकारी

संभाव्य कोविड-19 च्या प्रादुर्भावाचा विचार करुन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यावर शासनाने भर दिला. या अंतर्गत जिल्ह्यातील बाल रुग्णांसाठीही अद्ययावत चांगल्या सुविधा का असू नयेत ? याचा विचार करुन या वार्डाच्या निर्मितीसाठी आम्ही आग्रही राहिलो. आज याचा चांगला उपयोग नांदेड जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील मुलांनाही होत आहे.

येथील संपूर्ण वैद्यकिय टिम ज्या मिशन मोडवर काम करते आहे त्याचे विशेष कौतूक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

– मुळ स्रोत : जि मा का नांदेड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४