Wednesday, July 2, 2025
Homeयशकथाअमेरिकेतील शास्त्रीय संगीताची शिक्षिका:डॉ.अंजली नांदेडकर

अमेरिकेतील शास्त्रीय संगीताची शिक्षिका:डॉ.अंजली नांदेडकर

शाळा-कॉलेजच्या रियुनियनचे अनेक फायदे असतात. शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपल्या बरोबर असणारे मित्र-मैत्रिणी, पुढे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून कधी मान्यवर बनलेले असतात, तर काही जण वेगळ्या व्यवसायात पडलेले दिसतात. त्यांना नव्याने भेटताना आपणही समृद्ध होऊ शकतो. शाळा कॉलेजमधील मित्रांचे एकमेकांशी प्रेमाचे भावबंध जुळलेले असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आपल्याला पुन्हा परिवारात आल्यासारखे वाटते. माणूस कितीही मोठा झाला, तरी तो आपला शाळकरी दोस्त असेल, तर तो पूर्वीच्या दोस्तीच्या नात्याने वागतो.

अशाच एका रियुनियन मध्ये मला भेटली अंजली दाढे – नांदेडकर. खरं तर हे रियुनियन माझे पती हेमंत साने आणि त्यांच्या इंजिनीयरिंगमधील वर्ग मित्रांचे होते. 76 – 77 साली COEP, Pune इंजीनियरिंग मधून ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धेत चषक मिळवणारे काही कलाकार मुंबईत जमले होते. अंजली ही गायिका मैत्रिण मात्र अमेरिकेत असल्याने व्हिडिओ कॉलद्वारे जॉईन झाली होती.

Click here to read आठवणीतील गाणी – तब्बल 3,462 गाणी ऐकता येतील

“ही आमची मैत्रीण अंजली दाढे. ‘फिरोदिया’ची गायिका शास्त्रीय संगीत शिकलेली आहे.आता अमेरिकेत शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेते.” माझ्या मिस्टरांनी ओळख करून दिली. “तिने कार्यक्रमात गायलेले ‘सावरे सावरे ‘हे ‘अनुराधा’ चित्रपटातील गीत अजून आमच्या मनात रेंगाळत आहे. या समूहातील सर्वच कलाकार संगीत वेडे होते. आमचे ट्यूनिंग छान जमल्यामुळे आम्हाला फिरोदिया करंडक सलग दोन वेळा जिंकता आला.”

अंजली दाढे ही मुळची पुण्याची. 1966 अहिल्यादेवी – फर्ग्युसन – सीओईपी ह्या प्रवासात 1966 पासून ‘पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महाविद्यालया’तून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत होती. ती इंजिनीअरिंग कॉलेजमधील हुशार विद्यार्थिनी होती. लग्न होऊन परदेशात गेल्यावर तिचे संगीत शिक्षण थांबले होते. अंजलीने मटेरियल सायन्स अँड इंजीनियरिंग हा विषय घेऊन एम. एस. व पीएच.डी. पूर्ण केले ( युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया आणि नॉर्थ कैरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी ). एव्हाना तिच्या संसार वेलीवर दोन फुलेही फुलली होती.

Click here to read आठवणीतील जसराजजी

हा संपूर्ण परिवार 1989 साली हडसन नदीच्या काठी असलेल्या पगकिप्सी सिटी जवळील एका गावात राहायला आला होता. डॉ. अंजली यांनी ऑनलाईन मल्टीमीडिया बुक्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. आपल्या बंगल्यासमोर सुंदर बाग तयार करून या पती-पत्नींनी त्या वनश्रीत स्वतःला सामावून घेतले. पगकिप्सीमध्ये हिंदू आणि जैन मंदिर व इंडियन कल्चरल सेंटर अशी एक वास्तु आहे. तेथे संगीताचे वर्ग चालतात. अंजलीला तिच्या शास्त्रीय संगीत शिक्षणाचा उपयोग करण्याची संधी मिळाली. तेथे ती स्वयंसेवक संगीत शिक्षिका झाली. पण आपण आपले स्वतःचे संगीत विषयाचे शिक्षण पूर्ण केले नाही ही बोच तिच्या मनात सारखी सलत होती.

भारतात आपल्या पालकांना ती भेटायला आलेली असतांना तिने आपले संगीत विद्यालय पुन्हा शोधून काढायचे ठरवले. पन्नाशी उलटल्यावरही संगीत शिक्षण सुरू ठेवायला काय हरकत आहे ? असे तिला वाटले. पुण्यात येऊन ती पूर्वीच्या ठिकाणी संगीत विद्यालय शोधू लागली. तेथील गल्ल्यांमध्ये खूपच बदल झाले होते. जुन्या इमारती गायब झाल्या होत्या. तरी एका ठिकाणी, जुन्या राजवाडे मंगल कार्यालयाजवळ तिला गाण्याचे सूर ऐकू आले. ती त्या वर्गातच जाऊन बसली. तिच्या पूर्वीच्या गुरु डॉ. सुधा पटवर्धन आल्या आणि तिला पंचवीस वर्षांनी देखील बरोबर ओळखले, ” तू अंजली नारायण दाढे आहेस ना गं ?” अंजली हसत हसत या भेटीबद्दल सांगत होती, “काही मुले, हुशार म्हणून लक्षात राहतात. मी मात्र द्वाड म्हणून लक्षात राहिले असेल.”

Click here to read तमाशा बोर्डावरची महाराणी: मंगला बनसोडे करवडीकर

2010 पासून डॉक्टर सुधा पटवर्धन यांच्याकडे अमेरिकेतून ऑनलाइन शिक्षण घेऊन तिने आपली शास्त्रीय संगीत शिकण्याची मनीषा पूर्ण केली. विशारदनंतर पुढे मास्टर्स म्हणजे अलंकारचे शिक्षणही चालू आहे. पगकिप्सीच्या इंडियन कल्चरल सेंटरमध्ये विशारद पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची पात्रता झाल्याने गेली 15 वर्ष अंजली नांदेडकर मॅडम तेथे संगीत शिक्षिका म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. स्वतःचा वेगळा व्यवसाय असल्याने संगीत शिक्षणाकडे ती छंद म्हणून पहाते. विद्यार्थ्यांना (3 – 85 वर्षे ) संगीत शिक्षण देणे, इंडियन कल्चरल सेंटरचे काम करणे, हे सेवा म्हणून करीत आहे .आपल्यासारखेच संगीत शिक्षणाची इच्छा असणारे हे विद्यार्थी. त्यांना अमेरिकेत शास्त्रीय संगीत शिकावेसे वाटते, तर त्यांना ते दिले पाहिजे या भावनेने अंजली तिथे सतत कार्यरत असते.

“आमचे भारतीय आणि जैन मंदिर फार सुंदर आहे आणि कल्चरल सेंटर ही पाहण्यासारखे आहे. तेव्हा कधी अमेरिकेत आलात, तर पगकिप्सी ‘ला जरूर भेट द्या” असे अंजली नांदेडकर कडून आम्हालाआमंत्रण मिळाले. तो योग 2017 मध्ये आलाच. आम्ही काही मित्रमंडळी अमेरिकेला गेलो होतो. तेव्हा दोन दिवस पगकिप्सीसाठी ठेवले. अंजली आम्हाला हडसन नदीच्या पुलावर घेऊन गेली. “आधी हडसन नदीचे प्रचंड पात्र बघा आणि मग मंदिरातील देवांचे दर्शन घ्या.” असे म्हणून तिने गाडी नंतर मंदिराकडे वळवली. हिंदू आणि जैन मंदिर व कल्चरल सेंटर ही वास्तू खरेच सुरेख होती. अनेक सुंदर मुर्त्या होत्या. राम-लक्ष्मण-सीता, शंकर-पार्वती, गणेश, सरस्वती, राधाकृष्ण, बालाजी एवढेच नाही तर महावीराची ही मूर्ती होती. मंदिराच्या भल्या मोठ्या मोकळ्या स्वछ सुंदर दालनात ही सारी छोटी छोटी मंदिरे होती. आता या मुर्त्या रंगीत केल्या आहेत. ” मी प्रथम सरस्वतीला नमस्कार करून, मग संगीत क्लासला जाते.” अंजली म्हणाली. ” हीच ती जागा बघा ” असे म्हणत अंजली आम्हाला एका मोठ्या सभागृहात घेऊन गेली. त्या हॉलमध्ये अनेक वाद्ये होती. हार्मोनियम, काही तंबोरे, तबले ई . येथे शास्त्रीय संगीत व्होकल, तबला असे अनेक वर्ग चालतात हे कळले. पण शास्त्रीय व्होकल संगीत शिकवताना तंबोरा व तबल्याच्या साथीसाठी इलेक्ट्रॉनिक अँपचा वापर केला जातो. विशारदच्या परीक्षेसाठी सहा लेव्हल्स लागतात . सर्व वर्गांना अंजली नांदेडकर मॅडम एकट्याच शिकवतात आणि तबल्याचे वर्ग दुसरे गुरुजी घेतात असे कळले.

Click here to read शिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे

या इंडियन कल्चरल सेंटरमध्ये शिकणाऱ्या मुलांना गायनाचे सादरीकरण करता यावे, यासाठी सुंदर सभागृह आहे. व्यासपीठही असते व श्रोत्यांना बसण्याची सोय होती. ” या स्टेजवर आम्ही अनेक कार्यक्रम करतो ” असे अंजली आनंदाने सांगत होती आणि सेंटरची भरपूर माहितीही देत होती.

शास्त्रीय संगीताच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा मुले अमेरिकेतून देऊ शकतात. अभ्यासक्रम हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने पाठवलेला असतो. परीक्षा केंद्र मात्र जेथे असेल तेथे जाऊन परीक्षा द्यावी लागते. अमेरिकेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देण्यासाठी पंधरा केंद्रे आहेत. पगकिप्सीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला कॅनडा किंवा वर्जीनिया सेंटर ला जावे लागते.

Click here to read शांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..

अमेरिकेत हिंदू मुलांच्या शिक्षणातील अडचणी अशा की त्यांना देवनागरी लिपी येत नाही आणि संगीताचे अलंकार किंवा बंदिशी या देवनागरीत असतात. त्यामुळे अंजली बंदिशींची स्वरलिपी व थियरीचे सर्व टायपिंग इंग्रजीत करते. त्यासाठी दोन fonts निर्माण केल्या. पलुसकर आणि भातखंडे fonts. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी त्यांनी बाराशे पाने टाईप केली आहेत. अलंकार आणि पलटेसुद्धा इंग्रजी स्पेलिंग करून लिहावे लागतात. उदा. सा रे ग हे Sa Re Ga असे लिहून द्यावे लागते. सर्व धडे, लिखित आणि audio, वेब साईट वर फुकट उपलब्ध आहेत. www.swaranjalimusicschool.com

” परीक्षेला जाणे म्हणजे तर एक मोठा उपक्रमच असतो ” अंजली सांगत होती, “चार दिवस घराबाहेर राहण्याच्या तयारीने जावे लागते. मुलांचे पालक आपापल्या गाड्या काढतात. आठ तासांचा प्रवास करून आम्ही मुलांसहित कॅनडातील केंद्रावर पोचतो. नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा असल्याने अमेरिकेतील कडक थंडीला तोंड देत जावे लागते. कधी कधी बर्फाची वादळे होतात. अशात आपला आवाज टिकवून परीक्षा द्यायची असते.”

परीक्षा केंद्रावर संगीत सादरीकरणाची सोय केलेली असते. स्टेज, PA system (Microphone, Amplifier, Speakers), हॉल तयार असतो. गावातून संगीत प्रेमींना आमंत्रण देतात व ते ऐकायला येतात. मस्त मैफिल सजते.

या कल्चरल सेंटरमध्ये एक बाल विहार विभाग आहे. चिन्मयानंद संस्था हे वर्ग चालवतात. यात श्लोक, गाणी, गोष्टी यातून मुलांना भारतीय संस्कार दिले जातात. याचा परिणाम असा होतो की पुढे, मुलांना भारतीय शास्त्रीय संगीत व इतर कलाही जवळच्या वाटतात. यासाठी काही खास अभ्यासक्रम तयार केला आहे. भाषेचे शिक्षण दिले जाते. श्लोक म्हटल्याने मुलांचे उच्चारही नीट होतात. नाहीतर अमेरिकन हिंदू मुलांना मराठी, हिंदी गाणी म्हणणे कठीण जाते .

गोकुळाष्टमी पूर्वी येथे महिनाभर उत्सवी वातावरण असते. अंजली आणि संजीव विद्यार्थ्यांना भारतीय सण व खेळ याची माहिती देणारे देखावे तयार करतात. त्यासाठी सॉफ्ट क्लेच्या बाहुल्या, छोटी घरे, आगगाडी यासह गावाचा देखावा केलेला असतो. आपल्याकडे गौरी गणपतीत करतात तशी सजावट करून केलेली ही कला कुसर पाहायला अनेक ठिकाणाहून लोक येतात. या काळात लोक हे सेंटर तर पाहतातच पण डोनेशनही देतात. पावतीवर सर्व धर्मांची चिन्हे असतात.

कार्यक्रम सादर करण्यासाठी बॅनर नव्हते. तर अंजली मॅडम ने एक सरस्वती स्वतः पेंट केली. राजा रविवर्म्याच्या चित्रावरून प्रेरित होऊन काढलेली ती सरस्वती, येथील सर्व विद्यार्थ्यांना आवडली. हेच बॅनर प्रत्येक कार्यक्रमात लावण्यात येते. सारे विद्यार्थी सरस्वतीचे उपासक आहेत असे अंजलीचे म्हणणे.

लॉकडाउनच्या काळातही ऑनलाईन शिक्षण चालू होते (दर आठवड्यात 12 तास). याच काळात देवळासमोर एक बाग तयार करून अंजली यांनी वेळ कारणी लावला. एका सेवाभावी संस्थेकडून देवळाला १०० रोपे दान मिळाली होती. ती देवळासमोर अंगणात लावूया असा प्रस्ताव व्यवस्थापनाकडून आला. अंजली यांनी मास्टर गार्डनरचा कोर्स केल्यामुळे त्यांनी उत्साहाने पुढाकार घेतला. संस्थेने गावातील सभासदांना बोलवून या कामासाठी भरपूर स्वयंसेवक मिळवून दिले. गावातील लोकांनी येऊन तेथे श्रमदान केले. ३००० स्क्वे. फूट. ची जागा सर्वांनी साफसूफ करून तेथे फुलझाडांची रोपे लावली व बियाही पेरल्या. हिंदू व जैन मंदिरात येताना आता एक छानशी बाग फुललेली दिसते. थंडी सुरु झाली की मात्र ही सगळी बागच नष्ट होते. त्यामुळे थंडीपूर्वी त्यांची 1500 कलमे देवळाच्या आत छोट्या कुंड्यांमध्ये जपून ठेवली जातात. त्यांची देखभाल केली जाते आणि थंडी संपल्यावर ती रोपे पुन्हा लावली जातात.

“शास्त्रीय संगीत अमेरिकेत पुढे टिकून राहील असं तुम्हाला वाटतं का?” असं मी विचारल्यावर अंजली भावुकतेने म्हणाली, ” का नाही ? माणसाच्या भावना व्यक्त करणारे हे शास्त्रीय संगीत नक्कीच टिकून राहील. २००० वर्षांचा इतिहास आहे याला. कलाकाराला प्रतिभेचा अविष्कार करण्यास मुक्त वाव मिळतो. शिवाय, ऑनलाईन शिकायची सोय असल्यामुळे नव्या पिढीला हे शिकणे सोपे जाईल. आत्ताही हडसन नदीच्या पलीकडून विद्यार्थी संगीत शिकायला या सेंटरमध्ये येत आहेत.”

मी विचारलं, “अंजली, तू एवढे विद्यार्थी घडवत आहेस पण तुझ्या मुलांना संगीताची गोडी लागली आहे का ?” यावर समाधानाने अंजली उत्तरली, ” माझी दोन्ही मुले पियानो आणि ड्रम वाजवतात. मला पेटीचीही साथ छान करू शकतात. बारा वर्ष वयापासून दोघे गावातील चर्च मध्ये ऑर्गन वाजवत आहेत. एकजण संध्याकाळी शाळेमध्ये मारचिंग बँडला ड्रम शिकवतो. चला ऐकायला.”

घरी जाण्यापूर्वी अंजलीने गाडी दुसरीकडेच वळवली. हिरव्या झाडांमधून गाडी खूप दूर दूर चालली होती. अचानक एका ठिकाणी थांबून ती गाडीतून उतरली. आम्ही आजूबाजूला पाहिलं तर ती एक दफनभूमी होती. एका समाधीपाशी जाऊन तिने चक्क साष्टांग नमस्कार घातला. तिथे लिहिलं होतं “डॉ. आनंदीबाई जोशी यांची समाधी”.

“ही खरी सरस्वती ! भारतातील पहिली स्त्री डॉक्टर.” अंजली म्हणाली. आम्हीही नकळत हात जोडले.

 

Written by मेघना साने

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. Hello, my name is Anjali Malshe Ranade. Wish I knew about this reunion!

    For the first Firodiya competition, in 76, I won the first prize for निगाहें मिलानेको जी चाहता है।

    Next year, in 77, when Anju Dadhe joined our team, she won for classical सावरे सावरे and I won again in light for साकीया आज मुझे नीन्द नहीं आएगी।

    Would have loved to meet the Firodiya crew. Surprised too since Anju and I are even in one WA group. We have meT a few times too since I live in the US since 78. In NJ for the past many years.

    Say hello to Hemant.

    Warm Regards,
    Anjali Malshe-Ranade

  2. खूप छान ! शास्त्रीय संगीत सातासमुद्रापार रुजवणं आणि वाढवणं , खूप मोठे कार्य ! प्रेरणादायी आणि कौतुकास्पद कामगिरी अंजली ताईचे अभिनंदन ! आणि अशा व्यक्तिमत्वांची ओळख करून देणारे सुंदर लेखन करणाऱ्या मेघनाताईंचे आभार !

  3. खूप छान. ओघवत्या भाषेत लिहिले आहे. नकळत अंजलीताईं आपल्या शा वाटू लागल्या. हे लेखन कौशल्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४