लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १ ऑगस्ट रोजीच्या जन्म शताब्दी सांगता वर्षाच्या निमित्ताने विशेष लेख….
शालेय शिक्षण केवळ दीड दिवस झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला नवा आयाम मिळवून दिला . त्यामुळे ते ‘लोकशाहीर’ या पदवीला प्राप्त झाले. साहित्यातील अद्वितीय योगदानाबरोबर त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य लाख मोलाचे आहे.
वस्तुत: अण्णांचा जन्म मातंग समाजात झाला. तथापि, जातीपातीच्याच नव्हे तर भौगोलिक सीमाही त्यांनी उल्लंघिल्या होत्या.
त्याकाळी रशियात पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजकपूर
यांच्या बरोबरीनेच त्यांना लोकप्रियता लाभली होती. जगातील श्रेष्ठ लोकशहा आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शब्दसुमने उधळताना ते म्हणतात, “जग बदल घालूनि घाव, सांगून गेले मला भीमराव !” एका महामानवाने दुस-या महामानवाला दिलेली ही मानवंदना आहे.
अण्णाभाऊंनी लिहिलेल्या ३५ कादंब-यांपैकी ‘फकीरा ‘ ही कादंबरी एक अक्षरवाड्मय आहे. सन १९६१ मध्ये तिला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊंनी ही कादंबरी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली आहे. दारिद्र्य आणि विषमतेच्या परिस्थितीवर दुर्दम्य आशावाद आणि मानसिक बळाने मात केलेल्या सामान्य माणसाला या कादंबरीचा त्यांनी नायक केला आहे .बाबासाहेब आंबेडकर यांचीही विचारधारा अशीच होती. या दृष्टिकोनातून ही अर्पणपत्रिका सार्थ ठरते.
अण्णाभाऊ साठे हे बंद खोलीत बसून पानाफुलांच्या कथा किंवा कादंब-या लिहिणा-या मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय साहित्यिकांपैकी नव्हते. तर मानवी आनंदाला आणि दु:खाला चित्रित करणारे वास्तवतावादी साहित्यिक होते.गूढ आणि अतर्क्य पोकळी तसेच नैराश्य आणि शून्य भविष्याऐवजी सर्वसामान्य माणसाच्या शक्तीला आणि कर्तृत्वाला त्यांनी साहित्यात स्थान दिले. त्यांच्या साहित्यातील केंद्रबिंदू असलेल्या नायकाने प्रसंगी जीवाची बाजी लावून मानवी मूल्यांची ज्योत सतत तेवत ठेवली. सुरूवातीला कम्युनिस्ट विचारांनी प्रेरित झालेल्या अण्णाभाऊंनी १९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख यांच्या साथीने लालबावटा हे विचारपीठ स्थापन केले. या माध्यमातून त्यांनी अनेक शासकीय निर्णयांना आव्हान दिले होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एका सांस्कृतिक शाखेचे ,पीपल्स थिएटर असोशिएसनचे ते महत्त्वपूर्ण सदस्य होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे योगदान मौलिक आहे.
अण्णाभाऊ साठे
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत दलित, वंचित आणि सर्वहारा माणसाच्या सक्षमीकरणाकडे आकृष्ट झाले होते. त्यांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्य माणूस आणि कामगारांच्या जीवनानुभवांना शब्दबद्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न केला .
१९५८ मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात ते म्हणतात, “ पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित , कामगारांच्या तळहातावर आधारलेली आहे “.यातून त्यांनी जागतिक पातळीवर कामगार आणि कष्टकरी वर्गाचे महत्व स्पष्ट केले आहे.
मी शाळेत असताना अण्णाभाऊंनी लिहिलेली एक हृदयस्पर्शी कथा आठवते- स्मशानातील सोनं ! दारिद्र्य आणि बेरोजगारीच्या अगतिकतेमुळे स्मशानातील प्रेताच्या तोंडातील सोने काढण्याची बिकट अवस्था आलेल्या एका माणसाला अशाच प्रकारे काम करताना आपली बोटं गमावण्याची वेळ आली होती.
अण्णाभाऊंच्या साहित्यातील आणि समाज परिवर्तनाच्या क्षेत्रातील अद्वितीय कार्याबद्दल त्यांच्या नावाने देशभरात अनेक संस्था आज दिमाखात कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले अण्णाभाऊ साठे महामंडळ, पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक ही यापैकी काही वानगीदाखल उदाहरणे आहेत. कुर्ला येथील एक उड्डाणपूल यासह अनेक इमारतींना अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले आहे.
दारिद्र्य, विषमता,दैन्य यांना मूठमाती देण्याचे अण्णाभाऊंचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल !
– प्रा.डाॅ. सतीश शिरसाठ, पुणे. -९९७५४३५१५२.
सर,
खुप छान आहे लेख .