Friday, November 22, 2024
Homeलेखनिमित्त कोरोनाचे !

निमित्त कोरोनाचे !

या विदारक आणि संहारक संकटालाही अनेक जण ‘एक संधी किंवा इष्टापत्ती ‘ म्हणतात.

आजवर जगाने दोन भीषण आणि संहारक महायुध्दे पाहिली,अनुभवली. अनेक देशांमध्ये झालेल्या लढायांनी इतिहासाची पानं रंगली .याबरोबरच दुष्काळ, पूर, सुनामी यासारख्या संकटांना मानव जातीला सतत सामोरे जावे लागले. अनेक देशांमध्ये अंतर्गत मतभेद आणि यादवी युध्दे सतत चालू आहेत. प्लेग, सार्स, बर्ड फ्ल्यू इ.रोगांच्या साथीही इथे आल्या होत्या. या सर्वांपेक्षा भयानक संकट कोरोनामुळे कोविडच्या रूपाने जगासमोर उभे राहिले आहे. याकडे दुर्लक्ष करून किंवा हे लाईटली पाहण्यात अर्थ नाही. कारण हे संकट सर्व देशांच्या सीमा ओलांडून कधीच सर्व जगभर पसरलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘जागतिक महामारी ’ म्हणून जाहीर केलंय.

कोरोनाचे उगमस्थान चीन आहे. तथापि तेथील परिस्थिती ब-यापैकी आटोक्यात आली आहे. मात्र अनेक प्रगत देशांत परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. रोजगार मोठ्या प्रमाणात बुडाले आहेत.अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. आपल्या देशात केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध पातळीवर अनेक प्रतिबंधात्मक,उपायात्मक आणि प्रबोधनात्मक कार्य केले सुरू केले आहेत . राजकीय मतभेद बाजूला पडले आहेत.हे सुचिन्ह आहे. अनेक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आणि विचारवंत सांगतात तसे हे युद्ध जरूर आहे. मात्र इथे युध्दभूमी आणि युध्द लढण्यासाठीची रणनिती भिन्न असणार आहे. इथे केवळ सरकारांवर अवलंबून रहाणे उपयोगी नाही .या युद्धात शत्रू समोर दिसत नाही . तर श्वास आणि स्पर्श यांतून शरिराच्या विविध अवयवांवर तो हल्ला करतो.

या विदारक आणि संहारक संकटालाही अनेक जण ‘एक संधी किंवा इष्टापत्ती ‘ म्हणतात. यामागे कारणंही तशीच आहेत .
यानिमित्ताने देशांदरम्यानच्या सीमा पुसट होत आहेत. ’राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच आंतरराष्ट्रीय एकात्मतेची’ निकड आणि अपरिहार्यता दिवसेंदिवस वाढत आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या ‘ जय जगत’ या घोषणेचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
अशाही परिस्थितीत आपल्या देशातील सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक सौख्य आणि सामाजिक शांतता वृद्धींगत होण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेलाही अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.यातून राष्ट्रीय एकात्मतेच्या नवीन पैलूची ओळख होत आहे.

कोरोनामुळे लाॅकडाऊनची अपरिहार्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आपल्या कुटुंबासोबत रहाण्याचा आणि त्या अनुषंगाने सह जीवनाचा आनंद आपसुकच मिळतो. त्यामुळे परस्परांतील शक्ती स्थाने आणि कच्चे दुवे आपण ओळखू शकतो. कुटुंबात आणि समाजात राहिल्याने ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ‘ अशी सहकार्याची भावना निर्माण होते.
अनेक कथा, कादंब-यांतून , टीव्ही मालिकांतून अनेक गावे आणि शहरे एक शांत ठिकाण म्हणून ओळखले जात होते . तथापि , औद्योगिकीकरणआणि तत्सम बाबींमुळे हे मध्यंतरी विस्मृतीत गेले होते. कोरोनामुळे आज इथे निसर्ग आणि माणसं ही मोकळा श्वास घेत आहेत.

कोरोनामुळे सतत हात साबणाने धुणे,सामाजिक दूरत्व पाळणे, सतत मास्क लावणे,शरीराच्या विविध अवयवांना विनाकारण स्पर्श न करणे याबरोबरच रस्त्यावर थुंकू नये अशा बाबी अंगवळणी पडल्या आहेत. कोरोनाचे संकट काही बाबतीत गडद होत आहे ते वैयक्तिक आणि सामाजिक पथ्ये न पाळल्याने.

या निमित्ताने समाजात आणि विशेषतः सोशल मिडियामधून अनेक अफवा पसरत असतात.त्यांच्याकडे डोळसपणे पहाण्याची गरज आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण विदेशी सोशल मिडियांतील अॅपस् नाकारले. ती जागृती कोरोनामुळे निर्माण झाली हे एका अर्थाने सुचिन्ह आहे. टीव्हीवर सतत एक चांगली जाहिरात दाखवली जाते. यातील एक गृहिणी आपल्या मुलाविषयी आपल्या पतिला समजावून सांगताना म्हणते,”आपल्या मुलाला एकटं रहायला सांगितले आहे, एकटं पाडायला नाही”! ही भूमिका सगळ्यांनीच विशेषतः कोरोनाबाधीत कुटुंबातील सदस्यांनी ठेवली पाहिजे.
कोरोनामुळे रोजगारावर मोठ्या प्रमाणावर आघात झाले आहेत.अशा परिस्थितीत अनेकांना आर्थिक विवंचनांना सामोरे जावे लागले. अशा व्यक्तींना मदतीचा हात दिला पाहिजे. आज सरकारच्या बरोबरीने अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या वतीने प्रशंसात्मक कार्य चालू आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लोकांच्या वैद्यकीय चाचणीसाठी चर्चा ऐकू येते. हे जरूर आवश्यक आहेच.यामुळे समाजातील कोरोनाची सद्यस्थिती कळू शकते.याबरोबरच आणखी एका क्षेत्रात नेटाने कार्य करण्याची गरज आहे. एक प्रसिध्द म्हण आहे- भुकेलेल्या माणसाला मासे देण्याऐवजी मासे पकडण्यासाठी जाळे द्या. म्हणजे तो मासे पकडण्यासाठी स्वयंपूर्ण होईल. या सुभाषिताप्रमाणे रोजगार गेलेल्या लोकांसाठी त्यांच्या क्षमता, समाजातील गरजा लक्षात घेऊन त्यांना केवळ आर्थिक ,अन्नधान्याची किंवा इतर मदत करण्याऐवजी रोजगार कसा मिळेल याची माहिती देऊन स्वतःची आणि कुटुंबाची उपजीविका सतत भागवण्याची कुवत निर्माण होईल.
मात्र अशाही स्थितीत अनेक जण इतरांना फसवून समाजात गटबाजीचे खेळ खेळत आहेत .त्यांना उजेडात आणून त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे.

पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण (ज्यांना आपण कोरोना योध्दे म्हणतो) या युध्दात नेकीने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची जाहीरपणे प्रशंसा केली पाहिजे.
कोरोनाशी लढताना अनेक जण वेगवेगळी( प्रसंगी परस्परविरोधी )मते मांडत आहेत. ह्यामुळे खरी वस्तुस्थिती काय आहे याविषयी शासकीय पातळीवर सोशल मिडियामधून सतत स्पष्टीकरणे प्रसारित करण्यात यावीत. मानवी इतिहासात विशेषतः भारतीय परिस्थितीत एका बाबीचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. आपल्या देशात आपण अनेक संकटांना उत्तर देत अनेक कठीण प्रसंगांतून सहीसलामत वाटचाल केली आहे. याही संकटांत घाबरून न जाता, परस्पर सहकार्य , एकमेकांशी सौदार्ह आणि भातृभाव जागवून आणि परस्परांतील मतभेदांना मूठमाती देऊन वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याची काळजी घेत आपण सहजरीत्या यातून बाहेर पडून जगातील एक आदर्श देश म्हणून उदयाला येऊ शकू.


By डाॅ. सतीश शिरसाठ.
प्राध्यापक, पुणे विद्यापीठ , ९९७५४३५१५२.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments