धुळे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील निसर्गरम्य ठिकाण व सुप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेला अलालदरी धबधबा या वर्षी कोरोनामुळे पर्यटकांविना ओस पडलाय.
अलालदरी धबधबा हा धनेर आमळी या धार्मिक क्षेत्रापासून अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. हा धबधबा समुद्र सपाटी पासून तब्बल 1,860 फूट ऊंच आहे. हा धबधबा धुळे जिल्ह्यातील शेवटचे टोक असून, अत्यंत मध्यभागी असलेले नयनरम्य ठिकाण आहे. उत्तरेकडे काही अंतरावर नंदुरबार जिल्ह्याची हद्द सुरु होते.
हा परिसर संपूर्ण दऱ्याखोऱ्यांचा अन् धबधब्यांचा आहे.
हा धबधबा तब्बल 300 फूट ऊंच असून या धबधब्याची दरी सुमारे 4.70 किलोमीटर आहे. या धबधब्याची दरी अत्यंत खोल आणि अरुंद असून पायवाट देखील खुप अवघड आहे.
या धबधब्याच्या आसपास संपूर्ण दाट जंगलच-जंगल आहे . या जंगलात मोर,लांडगे, बिबट्या अन्य पशु,पक्षी यांचा संचार असतो. या जंगलात साग,शिसव, तिवस,करवंद, आवळा,बोकद,बांबू, वड इत्यादि वृक्ष आहेत.
हा निसर्गरम्य परिसर डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात जळगाव,धुळे,नंदुरबार,नाशिक, गुजरात अश्या अनेक परिसरातून पर्यटक,विद्यार्थी येत असतात.
निसर्गप्रेमी देखील आवर्जून या परिसराचा आनंद लुटण्यासाठी येथे येत असतात.
नंदुरबार व धुळे जिल्ह्यात नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते या निसर्गरम्य ठिकाणी नक्कीच हजेरी लावतात व येथील सुखसुविधांचा , कामांचा देखील आढावा घेत असतात.
या ठिकाणी येण्यासाठी लागत असलेले अंतर : धुळे शहर पासून 95 किमी,साक्री पासून 40 किमी, नवापुर पासुन 50 किमी,नंदुरबार पासून 54 किमी आणि नाशिक पासुन 195 किमी आहे. प्रत्येक निसर्गप्रेमीने भेट द्यावी, असेच हे ठिकाण आहे.
– अक्षय कोठावदे ,नाशिक.
खूप छान निसर्ग रम्य सौंदर्य. वलेख पण छान आहे.👌👌