या वर्षीच्या सुरुवातीपासूनच जगभरातील कोरोना संदर्भातल्या बातम्या मी वाचत होते. पाहत होते. प्रारंभी चीनच्या वुहान प्रांतात या आजाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमेरिका, युरोप, इटली सारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये कोरोनाने दहशत माजवली. बघता बघता भारतात ही त्याचं आगमन झालं. तो आपल्या घरापर्यंत येईल असं कधी मला वाटलंच नव्हतं ! सुरवातीला आपल्याला कोरोना होईल किंवा होवू शकतो हे अविश्वसनीय वाटत होतं. कारण सर्व नियम, पथ्य जसं की सोशल डिस्टंसिंग, सारखं हात धुणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर इत्यादीचे पालन करणे या सर्व बाबींवर मी आवर्जून भर दिला होता .
२ सप्टेबरला, मला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मला वाटलं , इतके दिवस घरी असल्याने किंवा बऱ्याच दिवसांनी मास्क वापरला, किंवा आपल्याला सवय नाही म्हणून पण असं वाटत असेल असं वाटलं. थोडा वेळ गेला. तोपर्यंत मला ताप आला आणि डोकं दुखायला सुरुवात झाली. कधी तरी येतो तसा ताप असावा असं सुरवातीला वाटलं. पण ताप काही कमी झालाच नाही.
Click here to read Mental health : जपू या, मनाचं आरोग्य
मग मात्र मला शंका आली की, आपण आजारी पडत आहोत !
मी आई वडिलांना माझ्या जवळ येऊ नका असं नीट समजावून सांगायला सुरवात केली. सकाळपर्यंत ताप कमी होतो का बघु या असं सांगून डॉक्टरांच्या सल्ल्याने तापावरची गोळी घेतली. झोप लागली. पण ताप काही कमी झाला नव्हता. ताप, त्याचबरोबर डोकं दुखत होतं आणि अंग दुखायला लागलं होतं.
काकांनी फोन करून सांगितलं, कोविडची टेस्ट करून घे. ठाण्यातील सरकारी रुग्णालयात टेस्ट केली. माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. पेशंट घरातलाच असल्याने सर्वांना टेस्ट कराव्या लागणारच होत्या.
मनाची चलबिचल निदान काय झालंय ते कळल्याने थांबली. डॉक्टरांनी घाबरु नकोस, सकारात्मक रहा असे सांगून धीर दिला. माझ्यामुळे घरी कोणाला त्रास नको म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय झाला आणि मी ३ तारखेला संध्याकाळी रुग्णालयात दाखल झाले. मी हॉस्पिटलमध्ये पोहचले. आजवर कधी रुग्णालयात राहिली नसल्याने थोडी भीती वाटत होती. पण घाबरून चालणार नव्हतं. कारण आधीच माझी आई प्रचंड घाबरली होती. आईला सांगितलं , अजिबात घाबरु नकोस ,काळजी करू नकोस, मी लगेच काही दिवसात घरी परत येते आहे.
मी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हे आवर्जुन उल्लेख करणे गरजेचे वाटतं की हे रूग्णालय स्वच्छ होते. डॉक्टराचे रुग्णांवर व्यवस्थित लक्ष आहे असं ह्या काळात दिसून आलं. रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी वर्ग पिपिई किटमध्ये काम करत असतात. सर्व कर्मचारी वर्गाचे मला विशेष कौतुक वाटत होतं. येणाऱ्या प्रत्येक रुग्णांशी ते आपुलकीने बोलत होते. काम करत होते. त्यांची ही सेवाभावी वृत्ती अत्यंत कौतुकास्पद आहे. स्वतःच्या आरोग्यास धोका आहे, हे जाणून देखील ते आपली सेवा चोखपणे बजावत होते. अर्थात खाजगी रुग्णालयात होणारं भरमसाठ बील, सरकारी व इतर रुग्णालयातील व्यवस्था, सोयी सुविधांचा अभाव आणि इतर प्रश्न आहेतच आणि तो फक्त वैद्यकीय क्षेत्रासाठी नाही तर सर्वासाठी चिंतेचा विषय आहे.
Click here to read Corona warriors : प्रिय कोरोना योध्यानो सलाम तुमच्या धैर्याला !
दुसऱ्या दिवशी चुलत बहीण व भाऊ त्यांच्या पण टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पण लक्षणं नसल्याने ते देखील क्वारंटाईन सेंटरला पोहचले होते. आता मात्र भिती वाढली होती. सुदैवाने आई वडीलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे माझा व इतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. आपल्याला लक्षणें दिसली की लगेच स्वतःला घरच्यापासून वेगळं करा. मी तसं केल्याने माझ्यापासून कोणालाही संसर्ग झाला नाही. त्याचाच काय तो आनंद होता.
काय झालं, कसं झालं, कोणामुळे झालं यापेक्षा आता जे झालं त्यावर उपाय करणं आणि योग्य काळजी घेणं हेच हातात होतं.
दोन तीन दिवसातच हळूहळू माझा ताप कमी झाला . परंतु अशक्तपणा असल्याने मला चक्कर येत होती. सुरवातीला श्वास घ्यायला त्रास होत होता तो हळुहळू कमी झाला. अचानक एक दिवस मला पुन्हा चक्कर आली. श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता. सिटी स्कॅन, एक्स – रे, शुगरचे प्रमाण तपासणे, आणि इतर सर्व टेस्ट होत होत्या. ऑक्सीजनची पातळी कमी जास्त होत होती. पण आता माझा ताप पूर्णपणे गेला होता. पुढच्या एका दिवसातच माझी तब्येत बऱ्यापैकी ठीक झाली. औषधं सुरू होती. त्याच बरोबरीने आराम देखील नीट सुरू होता.
Click here to read Corona Effect : अलालदरी धबधबा पर्यटकांविना पडलाय ओस
ह्या काळात, सोशल मीडियाचा वापर मी नेहमी करते त्याच्या तुलनेत ८५ टक्के कमी केला होता, हे मी इथे आवर्जुन सांगेल. कारण आजुबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम स्वतःवर होवू द्यायचा नव्हता. ह्यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचार करणे खूप आवश्यक आहे.याकाळात माझ्या घरचे सर्वजण, अनेक मित्र मैत्रिणी, नोकरीमुळे ओळखीचे झालेले काही सिनियर सहकारी यांनी या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी मला खूप धीर दिला.
रुग्णालयातील ५ दिवस व त्यापूर्वीचा एक दिवस, नंतर घरी राहायला लागणारे ७ दिवस आणि मागचे पुढचे दोन तीन दिवस असे एकूण १५ दिवस हे मनाची कणखरता दृढ करण्याबरोबरच, सकारात्मक विचार करणे, संयम, प्रतिकारक्षमता या सर्वांची कसोटी पाहणारे क्षण होते.
अनेक तज्ञांची मतं पाहता, यापुढे आपल्याला कोरोना सोबतच जगावं लागणार आहे. यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचं आहे. उदा. मास्कचा नियमीत वापर करणे, हात वेळोवेळी धुणे, सँनीटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे, प्रतिकारक्षमता, मानसिक कणखरता वाढवणें इत्यादि गोष्टींना आता पर्याय नाही.
Click here to read कथा : वेगळी वाट
इतकं करून देखील एखाद्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात किंवा कोणत्या प्रकारची लक्षणं जाणवली किंवा त्रास झाला तर वेळीच लक्ष द्या. टेस्ट करा. दुर्लक्ष करू नका.
घाबरु नका.आपला आत्मविश्वास, डॉक्टरांवरचा विश्वास, घरच्यांची, मित्र मैत्रिणी व जिवलगांची साथ आपल्याला नक्कीच बरं करेल .
सजग राहा आणि हिंमत ठेवा.
शेवटी कोरोनालाही कळू दे की ‘कोरोना’ला आपण कणखरतेने हरवतो आहे !
– सिद्धी बोबडे,ठाणे.
Click here to read भरारीच्या लता गुठे