Thursday, November 21, 2024
HomeयशकथाCovid warrior : ८० वर्षांचे पत्रकार अण्णांची कोरोनावर मात

Covid warrior : ८० वर्षांचे पत्रकार अण्णांची कोरोनावर मात

कोरोनाच्या विषाणूला सर्व सामान्य माणसाला समजेल असा शब्द म्हणजे महामारी ! पूर्वी ज्यावेळी वैद्यकशास्त्र प्रगत नव्हते तेव्हा कॉलरा,प्लेग, यांच्या साथी यायच्या. त्यानाही सामान्यत: महामारी म्हणूनच संबोधले जायचे. पण त्यावर आता परिणामकारक औषध उपचार निघाल्याने ते नियंत्रणात आले आहेत.

Click here to readकोरोना जाणा:कोरोना टाळा

आता कोरोना १९ या विषाणूने केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगात फार मोठा हाहा:कार उडवून दिला आहे. अनेकांचे संसार उद्धस्त झाले. पण अजूनही कोरोनावर हवे तसे नियंत्रण मिळवता आले नाही. याचे मुख्य कारण त्यासाठी लागणारी काळजी घेतली जात नाही . योग्य ती काळजी घेतली , पथ्य पाणी पाळले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुसऱ्याचा संसर्ग टाळला तर या रोगापासून संरक्षण होते. त्याच बरोबर रोगाची बाधा झाली तरी तो प्राणघातक न ठरता पूर्णपणे बारा होऊ शकतो असा माझा अनुभव आहे.

हवामानात बदल झाला कि, सर्दी, पडसे, खोकला, ताप असे आजार लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच होतात, पण कोरोना१९ चा विषाणू हा वेगळाच आहे. मी वैद्यक शास्त्राचा जाणकार नाही . पण कोरोनाचा मागच्याच महिन्यात अनुभव घेतला असल्याने त्याचे परिणाम मला चांगलेच माहित आहेत. त्या आधारेच मी हे लेखन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

मला प्रथम साधी थंडी वाजत होती, नंतर ताप आणि खोकला याने ग्रासले. मी घरगुती तसेच नेहमीच्या डॉक्टरांकडे उपचार केले . त्यांनी मला लगेच दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला. कोरोनाचे उपचार करणाऱ्या विशेष रुग्णालयात मला दाखल करण्यात आले. तेथील तपासणीत मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले, लगेच माझ्यावर उपचार सुरु झाले. या आजारात शरीरातील प्राणवायूचे प्रमाण ( ऑक्सिजन ) कमी होत असल्याने श्वास घेण्यात अडथळे येतात, अशक्तपणा येतो, त्यामुळे त्याबद्दल प्रत्येक रुग्णाची काळजी घेतली जाते. हा संसर्गजन्य आजार असल्याने ,त्याचे विषाणू थुंकी, खोकला, शिंका, बोलण्यातून पसरत असतात. म्हणूनच उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका यांच्याशिवाय अन्य कुणालाही त्या प्रभागात प्रवेश दिला जात नाही. उपचार करणारे वैद्यकीय पथकही योग्य ती काळजी घेऊनच उपचार करीत असते. इथे रुग्णाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, किवा इतर रुग्णालय कर्मचारी हे आपले नोकर नाहीत तर ते आपले सहाय्यक आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्याशी अरेरावीची, उद्धट भाषा न करता सौजन्याने वागले पाहिजे. या आजारात बहुतेक रुग्णांना खोकल्याचा त्रास होतो. आपल्या खोकल्याने दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. महत्वाचे म्हणजे मोबाईलचा रुग्णाने वापर टाळला पाहिजे. मोबाईलवर बोलण्याने त्रास होऊन खोकला वाढतो. हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. तसेच जेवल्यानंतर आपले ताट ,भांडे हे तेथील कर्मचार्याला उचलण्यास सांगणे योग्य नाही. आपल्याला काय हवे ते नीट मागून घ्यावे. दिलेली औषधे वेळच्यावेळी घेतली तर प्रकृती सुधारायला खूप सहाय्य होते. औषध घेताना ती देणाऱ्याशी वाद घालू नये. सकाळी स्पंजिंग करणे, स्नान करणे यात कर्मचार्यांना सहाय्य करावे. यामुळे सर्वांनाच आनंद मिळतो. डॉक्टर तपासायला यायच्यावेळी आपण आपली जागा सोडून इतरत्र जाऊ नये.

Click here to readCovid Warrior : कोरोनाला हरवलं कणखरतेने!

या आजारात रुग्णाला खोकल्याचा त्रास होतो. तसे त्याच्या ऑक्सिजनची लेव्हल कमी होत असल्याने त्याला श्वसनाला त्रास होतो .अशक्तपणा येत असल्याने चक्कर येते. तेव्हा शक्यतो एकट्याने चालण्याचा प्रयत्न करू नये. ऑक्सिजनच्या लेव्हलवर सतत लक्ष ठेऊन त्याची नोंद ठेवावी. मी हि सर्व पथ्ये पाळल्याने सर्वांनाच समाधान तर मिळालेच पण उपचार करणारेही नीट वागणूक देत होते. या आजारात खाण्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तळलेले, अति तिखट पदार्थ खाऊ नये .जेवण जितके साधे, पौष्टिक ,ताजे घ्याल तितका प्रकृतीला लवकर आराम मिळतो असा अनुभव आहे.रुग्णालयात मिळणारा नाश्ता, भोजन , संपूर्ण खाणे तसेच आरोग्याची, स्वच्छतेची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे हे अनुभवायला मिळाले. रुग्णालयातुन घरी आल्यावर एकदम काम करण्याची घाई करू नये. किमान एक महिना कोणातही मिसळू नये, किवा कुणाला जवळ येऊ देऊ नये. ओक्सिजनाचे प्रमाण ९७ वर कायम राहिल याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.

Click here to readCorona Effect : अलालदरी धबधबा पर्यटकांविना पडलाय ओस

कोरोना झालेल्या किवा होऊन गेलेल्या व्यक्तीने शक्यतो घरातील वडीलधारी मंडळी , लहान मुले यांना जवळ करू नये. कामाशिवाय नव्हे तर शक्यतो घराबाहेर पडूच नये. किमान महिनाभर तरी आपली कामे दुसऱ्याच्या सहाय्याने करावी. घरातील व्यक्तीनीही कोरोना झालेल्या व्यक्तीशी प्रेमाने वागून त्याला धीर द्यावा. त्याच्यापासून मुद्दाम दूर राहिल्यासारखे , त्याची भांडी स्वतंत्र ठेवणे असे वागले तर त्याचा रुग्णाच्या मनावर प्रतिकूल परिणाम होतो. त्याला नैराश्य येऊन त्याचा स्वभाव चिडखोर बनतो. त्याला खूप मानसिक त्रास होतो. यामुळे रुग्णाबाबत सकारात्मक भावना ठेवली ,त्याला धीर दिला तर तो लवकर बरा होतो. या आजाराला न घाबरता शासनाने दिलेले नियम पाळणे महत्वाचे आहे. आज नेमके तेच होत नसल्याने कोरोना नियंत्रणात येण्यात अडचणी येत आहेत.हे सर्वांनी लक्षात घेणे महत्वाचे आहे.

– विनायक बेटावदकर

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments