Thursday, September 19, 2024
Homeलेखजयंती विशेष : सोंगाड्याची दादागिरी...वाजवू का?

जयंती विशेष : सोंगाड्याची दादागिरी…वाजवू का?

महाराष्ट्रातील ग्रामीण प्रेक्षकांच्या मनावर आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून अधिराज्य करणारे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे शाहीर दादा कोंडके. सोंगाड्या ते वाजवू का ? असे एकापेक्षा एक सुपरहिट मराठी तर हिंदी, गुजराती भाषेतही काही चित्रपट निर्माण करुन दादांनी विविध प्रांतात आपला चाहता वर्ग तयार केला. ८ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्त सोंगाड्या शाहीर दादांची ही दादागिरी… वाजवू का ?

निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेता, शाहीर, विनोदी कलावंत आणि कट्टर शिवसैनिक, हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा अशी दादांची ओळख . दादा म्हणजे मराठी सिनेसृष्टीला लाभलेले एक अनमोल रत्न. ज्यांनी आपल्या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत स्वतंत्र असे अढळ स्थान निर्माण केले. ग्रामीण मराठी प्रेक्षक आणि शाहीर दादा कोंडके यांचे असं अतूट नातं जमलं.

Actor Comedian Dada Kondake with politician Balasaheb Thackeray Dada Kondake with Shiv Sena
Dada Kondake with Balasaheb Thackeray

दादा कोंडके म्हणजे बाप माणूस. उत्तम प्रतिभा आणि अचूकतेचा संगम. ग्रामीण मराठी प्रेक्षकांची नाडी ओळखलेला अवलिया अशा शब्दात स्व.जगदीश खेबुडकर उर्फ नाना यांनी कानाला हात लावून दादांच्या शाहीरी आणि गीत लेखनाबद्दल माझ्याशी बोलताना सांगितले होते.

शाहीर दादा कोंडके जन्मजात मुंबईकर . कारण ८ ऑगस्ट १९३२ गोकुळाष्टमीच्या दिवशी मुंबईच्या नायगाव परिसरातील एका गिरणी कामगाराच्या घरी त्यांचा जन्म झाला.
माऊली सखुबाईंचे ते लाडके अपत्य. म्हणून सगळ्या बाललीला माऊलीने पदरात घेतल्या.त्यांचे अभ्यासात दुर्लक्ष होते. म्हणून रोजी रोटीसाठी नायगावच्या श्रीकृष्ण बँन्ड पथकामध्ये त्यांनी नोकरी केली.

Dada Kondake actor Marathi comedian

तद्नंतर कलापथकातील प्रवास, सोबत निळू फुले, राम नगरकर, ही मित्रमंडळी होती . कालांतराने कला पथके बंद झाली आणि वसंत सबनीस लिखीत “विच्छा माझी पुरी करा” या वगनाट्याची निर्मिती दादांनी केली. हा अटीतटीचा, कटकटीचा काळ पण या काळाच्याही पुढे जाऊन दादांना सोंगाड्या इशारे करीत होता. आणि १९७१ ला सोंगाड्याची निर्मिती झाली. “काय ग सखु, काय ग सखु, विचारताच
..बोला दाजीबा” म्हणत उषा चव्हाण या सोंगाड्यात सामील झाल्या. सोंगाड्याची भट्टी जमली. दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी, संगीतकार राम कदम, गीतकार स्वत: शाहीर दादा. मग काय विचारता “माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी” सह सगळीच गाणी व चित्रपट सुपर हिट झाला. त्यानंतर दादांनी मागे वळून कधीच पाहिले नाही.

Marathi comedian Dada Kondake

सहृदयी दादा

चित्रतपस्वी भालजींना गुरूस्थानी मानलेल्या दादांनी सिनेक्षेत्रातील पहिले पाऊल त्यांच्याच तांबडी माती या चित्रपटातून १९६९ यावर्षी टाकले. आपल्या चित्रपट कारकिर्दीचा श्रीगणेशा गिरविला. शेवटपर्यंत दादांनी भालजींच्या गुरू स्थानाला कधीच अंतर दिले नाही.सहृदयी दादांची हिच खासियत होती. चित्रपटातून त्यांच्या आईची भूमिका केलेल्या रत्नमाला या देखील दादांची आये म्हणून सुप्रसिध्द झाल्या. त्यांनाही दादांनी प्रत्यक्ष जीवनात आईचा मान दिला. आपल्या चित्रपटातील तंत्रज्ञ ते कलावंत सर्वांवर दादांचे प्रेम असे . एवढंच काय पण चित्रपटात काम केलेल्या मुक्या प्राण्यांवर देखील दादांची माया होती . बैल, कुत्रा, बकरी,बकरा, माकड यांच्याशी दादांचा लळा. हे प्राणी दादांनी शेवटपर्यंत पाळले.

 चित्रपटातील मर्म

दादांनी जे चित्रपट निर्माण केले त्याचा बाज काहीसा वेगळाच. ग्रामीण प्रेक्षकांची, मराठी रसिकांची मने ओळखून त्यांना पाहिजे ते देऊन निखळ मनोरंजन करणारे असे चित्रपट त्यांनी दिले. केवळ मनोरंजनच नाही तर समाज प्रबोधनाचा वारसा त्यांनी जपला. आपल्या चित्रपटातून एखादे पात्र निवडताना त्यांनी अतिशय मार्मिकतेने त्या पात्राद्वारे समाजातील कटु प्रवृत्तींवर प्रकाश टाकला. त्याद्वारे केलेल्या भाष्यातून समाजाला संदेश दिला. त्यांनी साकारलेल्या विविध जाती धर्माच्या भुमिका प्रेक्षकांनी सहजतेने स्विकारल्या. कोठेही त्यांच्याबद्दल टिका टिपणी झाली नाही. जातीय तेढ, कटुता आली नाही. उलट त्या पात्राचा अथवा त्या व्यवसायाचा सकारात्मक परिणाम झाला.

Marathi actor comedian Dada Kondake

१९७५ मध्ये त्यांनी निर्माण केलेल्या पांडू हवालदार या चित्रपटातून मुंबईचा पोलीस हवालदार त्यांनी साकारला. त्यांच्यासोबत सखाराम हवालदार म्हणून अशोक सराफ यांची भूमिका होती. एक साधा भोळा प्रामाणिक तर दुसरा बेरकी. हा चित्रपट खुप गाजला. किंबहुना ग्रामीण भागात पोलीसांना पांडू हवालदार असे टोपण नाव मिळाले.

त्यानंतर आलेल्या १९७६ मधील तुमचं आमचं जमलं या चित्रपटातून भाऊबंदकी दाखवत त्यांनी बंधूत्वाचा संदेश दिला. वाघ्या या आपल्या कुत्र्यासमवेत चल रं वाघ्या रडू नको… पाया कुणाच्या पडू नको… ही दुनिया सारी जरी उलटली तरी मला तु सोडू नको. असे गीत साकारले. नातेवाईक, भाऊबंद जरी बदलले तरी मुका प्राणी आपल्यावर प्रेम करतो तो आपल्याला सोडून जात नाही असे भावनिक वर्णन या गीतात आहे. तर राम राम गंगाराम (१९७७) या चित्रपटातून तत्कालीन राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.

Ram ram gangaram Dada Kondake

त्यावेळी देशात आणीबाणी आणि २० कलमी कार्यक्रम सुरु होता. मुळात या चित्रपटाचे नाव ‘गंगाराम वीस कलमे’ असे होते. पण सेंसॉरमुळे ते बदलून राम राम गंगाराम केले. या चित्रपटात त्यांचे एक वाक्य होतं ते खूप गाजले. चित्रपटात दादा नेहमी म्हणायचे ‘ज्याला आय नाय त्याला काय नाय’ ( यातील आयचा अर्थ काँग्रेस, इंदिरा गांधी अर्थात आय काँग्रेस) सेंन्सार सोबत संघर्ष करुन प्रदर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. सोंगाड्या असो की एकटा जीव सदाशिव असो… की आली अंगावर, बोट लावील तिथं गुदगुल्या, आंधळा मारतो डोळा, येऊ का घरात , मुका घ्या मुका , सासरचे धोतर अशा सर्वच चित्रपटातून त्यांनी प्रसंग, गीत या माध्यमातून उत्तमरितीने प्रहसनाद्वारे मार्मिक भाष्य केले. हीच त्यांची खासियत होती. द्विअर्थी संवाद हा त्याचा आत्मा होता. पांढरपेशी वर्ग जरी त्यांच्या चित्रपटांना उघड नाव ठेवत असला तरी दादांचे चित्रपट पाहून त्यांना मनातून गुदगुल्याच होत होत्या.

Dada Kondake

मुलाखतीचा योग
दादांची मुलाखत घेण्याचा योग मला त्यांच्या आगे की सोच या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान २५ ऑगस्ट ८७ या दिवशी गोरेगाव (प) येथील फिल्मीस्थान स्टुडिओत आला. कलकत्ते की कलावती मै… हे हुमा खान यांच्यावरील गाण्याचे चित्रीकरण चालले होते. दादांनी त्यांचे पी.आर.ओ. स्व.पी.के. बोणे यांच्यामार्फत प्रेसला मुद्दाम बोलावले होते. छान गप्पाटप्पा झाल्या. त्यावेळी मी त्यांना एक प्रश्न विचारला होता कि दादा, तुमच्यासोबत सुरुवातीला जे तुमचे मित्र मराठी कलावंत होते ते नंतर त्यांनी तुमच्यासोबत काम का केले नाही ? याचे उत्तर देताना दादांनी सांगितले , या प्रश्नाचे उत्तर माझ्या ऐवजी तुम्ही त्यांनाच विचारा. तसेच पुढे बोलताना दादा म्हणाले, आपल्या मराठी लोकांची ही थोडी अडचण आहे . जर एखाद्या मित्राला अथवा  नातेवाईकास लॉटरीचे तिकीट लागले तर काहीही कारण नसताना आपणास आनंद व्हायच्या ऐवजी दुख: होते. त्यानंतर दादांनी तीन चार मराठी कलावंतांची नावे घेऊन ते हिंदीत काय करतात ? आणि मराठीत दादांसोबत का नाही याचे कारण सांगितले. पण तो भाग आता नको. असो .

दादांनी आपल्या विनोदी चित्रपट व अभिनयाने प्रेक्षकांना दुःख विसरावयास लावले. द्विअर्थी संवादात तर त्यांचा हातखंडा होता. पण वाजवू का ? या चित्रपटात मात्र दादांनी प्रेक्षकांना रडविले. प्रेक्षकांना रडतांना पाहून दादा गहिरवले आणि “मी यापुढे रडवणारा चित्रपट नाही काढणार , मला माझा प्रेक्षक हसतानाच पाहायचा आहे” असे भावोद्‌गार या चित्रपटाच्या प्रिमीयरला बीड येथे आशा टॉकीज मध्ये काढले , त्याचा मी साक्षीदार आहे.

Dada Kondake

असा हा आपल्या प्रेक्षकांना मनसोक्त हसविणारा अवलिया कलावंत १४ मार्च १९९८ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी तमाम महाराष्ट्राला रडवून गेला. दादा, खरंच तुमची दादागिरी अद्याप तरी कोणाला ना जमली… ना जमेल… आपल्या स्मृतीला अभिवादन व ही भावपूर्ण  शब्द सुमनांजली..

Written by डॉ.राजू पाटोदकर 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments