डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (तेंव्हाचे मराठवाडा विद्यापीठ) एक विठ्ठलाचे मंदिर होते. छोटेसेच पण टुमदार. विद्यापीठाच्या शेकडो एकर जमिनीवरचे हे चिमुकले मंदिर अगदी एका बाजूला होते. तशी आपली विद्यापीठे म्हणजे शेकडो एकर जमीन, तिच्यावर हिरव्या पिवळ्या गवतात उगाचच लांबलांब बांधलेल्या आधुनिक इमारती, त्यांना जोडणारे शक्यतो खराब किंवा क्वचित चांगले रस्ते आणि त्यावरून त्या त्या परीसरानुसार वेशभूषा केलेली आपसात बोलत फिरत असलेली मुले मुली असेच चित्र डोळ्यासमोर येते. याशिवाय प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा पुरावा म्हणून त्या प्रचंड परीसराभोवती कुठेकुठे तुटलेले आणि कुठेकुठे शिल्लक राहिलेले तारेचे कुंपण व जणू अत्यावश्यक असलेली झोपड्यांची अतिक्रमणे, ही सर्वसाधारण व्याख्या आमच्या मराठवाडा विद्यापीठालाही लागू होती.
जिथे हे एकाकी विठ्ठल मंदीर होते तिथे कधीच वर्दळ नसे. मी तिथे एका व्यक्तीशिवाय कुणालाही, कधीही पाहिल्याचे आठवत नाही. खरे तर मी सुद्धा फक्त त्या व्यक्तीला भेटण्यासाठीच तिथे जात असे. ते होते आमचे पवारसर ! मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख ,डॉ. सुधाकर पवार ! अगदी साधारण देहयष्टी, साधे कपडे, कातडी चपला आणि जुन्या पद्धतीच्या चष्म्यातून किलकिल करीत पाहणारे पण अतिशय चाणाक्ष डोळे, हे पवारसरांचे ढोबळ वर्णन होऊ शकेल !
मास्टर ऑफ मास कम्युनिकेशनला सर ‘संपादन आणि समीक्षालेखन’ हा विषय शिकवायचे. तसा त्यांचा वृत्तपत्रविद्येच्या सर्वच विषयांचा जबरदस्त अभ्यास होता. वाचन तर इतके अफाट होते की घरची एक पूर्ण खोली, विकत घेऊन वाचून संपविलेल्या पुस्तकांनी खचाखच भरलेली होती ! पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेले पवारसर मुळचे कुठले होते, ते आम्हाला माहित नव्हते. पण त्यांनी अनेक वर्षे कोल्हापूर आणि नाशिकला पत्रकारिता केली होती , हे सर्वांना माहित होते. त्यांच्या हाताखाली वृत्तपत्रविद्येचे अक्षरश: शेकडो विद्यार्थी तयार झाले. सरांच्या विद्यार्थ्यांना मराठवाड्यातच नाही तर पुण्यामुंबईत मोठमोठ्या वृत्तपत्रात, टीव्ही वाहिन्यात नोक-या मिळाल्या. परंतु पवारसरांनी कधी या गोष्टीचा थोडासुद्धा गर्व बाळगला नाही.
पवारसर पुरोगामी विचारांचे होते. तरीही देवभक्त होते. त्यांची विठ्ठल भक्ती अगदी बावनकशी होती. आषाढी कार्तिकी एकादशीचे त्यांचे उपवास कधी चुकले नाहीत. एखाद्या वारक-यासारखी मनाची ठेवण असलेल्या पवारसरांना वंचित घटकातील विद्यार्थ्याबद्दल विशेष प्रेम. एखादा अडचणीत असेल तर सर हेच त्याचे खात्रीचे आश्रयस्थान. गरीब मुलांच्या चेह-याकडे बघून हा माणूस तो मुलगा उपाशी आहे हे ओळखायचा, त्याला गुपचूप घरी नेऊन जेऊ घालायचा! विद्यार्थ्यांना सुट्टीत घरी जायला पैसे देणारे, त्यांना नोकरी मिळावी म्हणून दहा ठिकाणी शब्द टाकणारे. पवारसर फक्त शिक्षक नव्हतेच ते मुलांचे पालकच होते.
सरांचा तास म्हणजे अगदी मजेत जाणारा वेळ. मूळ टॉपीकला हात घालण्यापूर्वी आणि नंतर अनेक विषयांवरच्या गप्पा असे सुद्धा या तासाला म्हणता येईल. सर, कधी कधी आल्या आल्याच एखादा प्रश्न विचारायचे. कुणीही उत्तर देऊ शकले नाही तर न रागावता स्वत:च उत्तर देत. त्यांच्या तासाला मनावर कोणताही ताण येत नसे. पण त्यांनी अगदी सहजगत्या शिकवून मनात बिंबवलेली अनेक वाक्ये आजही जशीच्या तशी आठवतात. सरांच्या तासाला ‘बोअर होणे’ हे क्रियापद आम्ही विसरून जात असू. उलट तो तास सुरूच रहावा असे वाटे.
‘नोज फॉर न्यूज’ ही त्यांची एक आवडती फ्रेज होती. बातमीची व्याख्या समजावून दिल्यावर सर म्हणायचे, ‘…पण आता मी बातमीची जी वैशिष्ठ्ये सांगितली ती म्हणजे फक्त परीक्षेत लिहायचे उत्तर, बर का ! प्रत्यक्ष पत्रकारितेत जाल तेंव्हा मात्र तुम्हाला ‘नोज फॉर न्यूज’ हे शब्द लक्षात ठेवावे लागतील. जसे आपण डोळे बंद करून कुठे गेलो आणि आपल्याला कसला तरी वास आला की आपण ओळखतो- जवळच मासळी बाजार आहे किंवा सुंदर फुलांची बाग आहे. *किंवा घरात असलो तर दुध उतू गेले आहे हे नुसत्या वासावरून कळते तशी तुम्हाला बातमी कळाली पाहिजे.* तिचा वास आला पाहिजे. तुम्हाला बातमीसाठीचे ‘नाक’ विकसित करायचे आहे. याचे सरांचे एक नेहमीचे उदाहरण ठरलेले होते. भारत-पाक युद्धानंतर सिमला इथे दोन्ही देशांच्या प्रतिनिधीत बोलणी सुरु होती. पत्रकारांना प्रवेश नव्हता. बोलणी दिवसभर सुरु राहिली. एकेका वृत्तपत्राची ‘डेड-लाईन’ टळत चालली होती. वार्ताहर बसले होते तिथून फक्त चर्चेच्या दालनात चहा, जेवण घेऊन जाणारे वेटर्स दिसायचे. तीचतीच दृश्ये दिवसभर बघून वार्ताहर कंटाळले होते. ज्यांची डेड-लाईन जवळ येत होती ते अस्वस्थ व्हायचे !
तिथे बी.बी.सी.चाही प्रतिनिधी होता. त्याला एक वेटर मोठे तबक, त्यावर झिरझिरीत रुमाल टाकून, लगबगीने त्या दालनाकडे घेऊन जाताना दिसला. तो हळूच तेथून निसटला. वेटर दालनातून परत आल्यावर बी.बी.सी.च्या प्रतिनिधीने त्याला बाजूला गाठून एकच प्रश्न विचारला, ‘तबकात काय होते?’ वेटरने सांगितले, ‘सिमल्याची मिठाई, साहेब!’ झाले ! बी.बी.सी.चा वार्ताहर तेथून गायब झाला. त्याने लगेच तारेने बातमी देऊन टाकली, ‘सिमला बोलणी यशस्वी ! शांतता करार अंतिम टप्प्यात!’ वृत्तपत्रविद्येच्या प्रत्येक नव्या तुकडीला सरांच्या शैलीत हे उदाहरण ऐकल्यावर त्यातले नाट्य लक्षात आल्याने मजा यायची आणि ‘नोज फॉर न्यूज’ म्हणजे नेमके काय तेही समजायचे.
असेच त्यांनी सांगितलेले एक गंमतीशीर उदाहरण आठवते. एक दिवस सर वर्गात आले आणि सरळ सांगू लागले, ‘अमेरिकेतील एका खेड्यात एक माणूस सायकलवरून फिरत होता. तो अचानक खाली पडला. सांगा ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला या घटनेची बातमी छापून येईल का ?’ आम्ही अचंभित ! आमचे प्रश्नांकित चेहरे पाहून पुढे सरच म्हणाले, ‘येणार. नक्की येणार ही बातमी ! कल्पना करा त्या माणसाचे नाव होते, मायकेल डुकाकिस!’ आमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! तेंव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांची निवडणूक सुरु होती आणि श्री. डुकाकीस हे राष्ट्राध्यक्षपदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार होते. प्रत्येक वेळी फक्त त्या घटनेतील नाट्य महत्वाचे नसते तर कधी कधी ती कुणाबाबत घडली आहे तेही महत्वाचे ठरते ,हा मुद्दा सरांनी असा ३ मिनिटात समजावून दिला होता.
पुढे त्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष झालेल्या जॉर्ज बुश यांना मला राज्यपालांबरोबरच्या भेटीत अमोरासमोर पाहता आले तेही एक अर्थाने पवार सरांमुळेच! त्यांनीच शिकविलेल्या पत्रकारितेमुळे आणि आमच्या शाळेच्या केव्हीसर आणि गंगातीरकरसरांनी शिकविलेल्या इंग्रजीमुळे मला आयुष्यातली सर्वात मोठी संधी मिळाली होती. त्या भेटीत मी श्री. बुश यांना अलेक्झांडरसाहेबांना ‘अलेक्स’ असे पहिल्या नावाने संबोधताना आणि राज्यपालही त्याना ‘जॉर्ज’ असे म्हणताना पाहिले होते. नंतर कळाले युनोतील दीर्घ सेवेमुळे डॉ.अलेक्झांडर साहेबांचे जगभर अनेक मित्र होते. मला आधी डॉ .पी.सी. अलेक्झांडर यांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून, आणि नंतर त्याच बळावर बॅरिस्टर अंतुलेनंतर दुसरे कर्तुत्ववान मुख्यमंत्री ठरलेल्या, राणेसाहेबांकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती पत्रकारितेच्या अभ्यासामुळेच! पण हे सर्व ज्यांच्यामुळे शक्य झाले त्या पवारसरांचे आभार मानायचे राहूनच गेले ही खंत मनात कायम राहणार . कारण पवारसर जावून आता खूप वर्षे झालीत.
अलीकडे कॉलेजच्या दिवसांचा नॉस्टॅल्जिक विचार येतो तेंव्हा अनेकदा गावाबाहेरचा विद्यापीठाचा तो शांत परिसर आठवतो. संध्याकाळच्या फिकट तांबूस-सोनेरी किरणात विठ्ठल मंदिराकडून हळूहळू घराकडे परत निघालेली पवारसरांची ती लांबलेली सावली आठवते. त्यांच्या चेह-यावरचे ते काहीसे संकोचलेले मंद स्मित आठवले की डोळे नकळत ओले होतात.
किती मोठी माणसे आपल्या जीवनात येऊन किती तरी मोठे दान अलगद टाकून निघून जातात, नाही?
By श्रीनिवास बेलसरे, ७२०८६ ३३००३
खूप छान लेख.आदरणीय पवार सरांच्या आठवणी जाग्या झाल्या.शेवटी काय तर आपण म्हणतो ,माणसात देव असतो……इथं तर साक्षात विठ्ठलाचं शब्दरूपी दर्शन घडवलं…..
Thank you