Friday, November 22, 2024
HomeUncategorizedरोहिदास, असा कसा रे गेलास ?

रोहिदास, असा कसा रे गेलास ?

रोहिदास तांबे आमच्या टीमचा पेस बॉलर, ऑल राऊंडर गेल्याची बातमी आली आणि आम्हा असंख्य मित्र परिवारात दुःखाची कळा कोसळली.

समाज सेवेचा प्रचंड ध्यास असलेला,लोकांच्या मदतीला नित्य नियमित धावून जाणारा एक तारा आमच्यातून निखळून पडला.

आठवणीतील जसराजजी Click here

मागील छत्तीस दिवस हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारा हा धैर्यवान गडी. गेल्या आठवड्यातच त्याच्या प्रकृतीत अतिशय चांगली सुधारणा होऊन आठवडाभरातच तो बाहेर येणार ही चांगली बातमी मिळाली .त्याचा सगळा मित्र परिवार व त्याचे कुटुंबीय या चांगल्या बातमीचा आनंद घेत असतानाच काल अचानक ब्लड प्रेशर खाली आल्याचे निमित्त आणि आज सारं काही संपलं !

रोहिदास सकारात्मक ऊर्जेचा एक वाहता झरा, मनमिळावू , प्रेमळ स्वभाव,सगळ्यांना जिंकून घेणारा व गरजू लोकांसाठी धावून जाणारा एक आगळावेगळा अवलिया. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची जिद्द त्याच्या धडपडीतून नेहमीच जाणवत असे. कोणाचीही कोणतीही समस्या असो, विषय रोहिदासकडे गेल्यास त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तो जातीने हजर असे. लोकांच्या हक्कासाठी लढताना मी त्याला अनेकदा पाहिलं आहे. मग त्या पूर्ततेसाठी तो अनेक राजकीय व सरकारी लोकांशी सुद्धा संपर्क साधत असे.

Corona warriors : प्रिय कोरोना योध्यानो सलाम तुमच्या धैर्याला ! Click here

मला आठवतोय तो शालेय जीवनातील रोहिदास .परिस्थिती बेताचीच .परंतु शालेय जीवनात सकाळी उठून पेपर टाकून शाळेत जाणे,आईला भाजी विकण्यास मदत करणे, लोकांची घरगुती कामे करून देणे ,अडीअडचणीला लोकांच्या मदतीला धावून जाणे, या गुणांमुळे तो त्याच्या परिसरात सगळ्यांचा आवडता होता . जिद्द, मेहनत, लोकसेवेचे बाळकडू बालपणापासूनच त्याच्या अंगवळणी पडले. बालपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याच्या अंगी होती.

तीन भावंडे आणि एक बहिण ह्यामध्ये रोहिदास दोन नंबरचा. परंतु लहान वयातच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याने उचलली होती. रिक्षा परमिट आणि रिक्षा असणे हे त्या काळातील बेरोजगारांसाठी एक उत्तम साधन होतं. अत्यंत मेहनतीने काही कालावधीतच या भावंडांकडे तीन रिक्षा आल्या. लहान भावाला सरकारी नोकरी मिळावी यासाठी त्याची चाललेली धडपड मला अजूनही आठवते.

जयंती विशेष- आदरणीय आबा Click here

त्याकाळी मित्रांना नोकरी लागावी किंवा व्यवसाय चालू करून द्यावा यासाठी त्याने स्वतः सरकार दरबारी खस्ता खाल्ल्याचे मला अजूनही आठवते. त्यामध्ये आमचे काही मित्र चांगल्या मार्गाला देखील लागले. स्वतःचा उत्कर्ष साधताना त्याने लोकांच्या भल्याचा देखील तेवढाच विचार केला. त्याच्या परिसरातील सगळ्यांना एकटवून चाळ मालकाच्या विरोधात जाऊन अतिशय परिश्रमाने एस. आर. ए. स्कीम मधून आपल्या राहत्या चाळीस डेव्हलपमेंट करून अनेकांना चांगली घरे उपलब्ध करून दिली. हरिनाम सप्ताह, लोकांसाठी धार्मिक सहलींचे आयोजन व इतर अनेक सामाजिक कार्यात तो नेहमीच अग्रेसर असे.

त्याच्या घरी पाहुण्यांचा राबता हा नित्याचाच भाग. गावावरून कोणीही आजारी माणूस ट्रीटमेंटसाठी जर मुंबईत आला तर राहण्याचे ठिकाण म्हणजे रोहिदासचं घर. त्याच्या घरून कोणीही माणूस कधीच उपाशी गेला नाही .त्यासाठी त्याच्या पत्नीची आणि मुलांची सुद्धा त्याला तेवढीच साथ होती. कोणत्याही पक्षात नसतानासुद्धा त्याचे सगळ्या राजकीय नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होते.

भरारीच्या लता गुठे Click here

सरली शब्दांची खटपट l आला ग्रंथाचा शेवट येथे l सांगितले स्पष्ट l सद्गुरु भजन ll

या ओळीप्रमाणेआता सर्व शांत शांत झाले. संपूर्ण वातावरण दुःखदायी झाले. आणि म्हणून म्हणावेसे वाटते की …

कोण समयो येईल कैसा l याचा न कळे की भरवसा l जैसे पक्षी दाही दिशा l उडोन जाती ll

या उक्तीप्रमाणे परम मित्र आणि एक सच्चा सहकारी अगदी अचानक कोणत्याही प्रकारचा आस भास नसताना या जगाचा निरोप घेऊन मनाला चटका लावून गेला.

शेक्सपिअर अमर का आहे ? Click here

जन्म दुःखाचा अंकुरा जन्म सुखाचा सागर l
जन्म भयाचा डोंगर l चलेना ऐसा*प्रचंड लोकसंपर्क, परखड वाणी, स्वतःचा उत्कर्ष साधत असताना लोकसेवेचा असलेला ध्यास याचं प्रत्युत्तर म्हणजे रोहिदास. प्रत्येकाच्या सुखदुःखाला नेहमीच हजर. गाव आणि मुंबई काय हाकेच्या अंतरावर असा त्याचा प्रवास नित्याने पाहायला मिळे. लग्न समारंभ,दशक्रिया, मित्र परिवारामध्ये कोणताही कार्यक्रम असो रोहिदासची हजेरी 100% अशा मित्र प्रेमी व आप्त प्रेमी, आपुलकीचा प्रेमाचा, मायेचा, जिव्हाळ्याचा हा माणूस आपल्यातून निघून गेला आहे.

आमच्या या परम मित्राला त्याच्या असंख्य चाहत्यांकडून तसेच माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

– सुधीर (हेमंत) थोरवे, नवी मुंबई.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments