लातूर जिल्यातील औसा येथील मंदाकिनी मोतीचंद दुरुगकर यांचे प्राथमिक, माध्यमिक व बी.एस.सी.पर्यंत शिक्षण औसा येथेच झाले.वडील मोतीचंद दुरुगकर हे स्वतः मुख्याध्यापक आणि पुरोगामी विचारांचे होते.त्यामुळे घरच्यांनी प्रथेप्रमाणे लग्नाची घाई केली नाही. उलट त्यांना इच्छेप्रमाणे औरंगाबाद येथे जाऊन रसायनशास्त्रात स एम.एस.सी.पर्यंत शिक्षण घेऊ दिले. त्यानंतर त्यांनी बी.एड.केले. त्यांच्या सर्व बहिणी, भाऊ उच्च शिक्षित झाले.
१९८३ साली बी.एड. झाल्यावर लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयात मंदाकिनीताईंची मुलाखत झाली. तेव्हापासून त्या आजतागायत याच महाविद्यालयात आहेत. आता त्या कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्य या पदापर्यंत पोहचल्या आहेत.
मंदाकिनीताईंचा विवाह १९८५ साली लातूर येथील पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्याशी झाला आणि त्या प्रा. मंदाकिनी मोतीचंद दुरुगकरच्या प्रा.स्मिता जयप्रकाश दगडे झाल्या. खरे पाहता शिक्षण,नोकरी आणि विवाह झाल्यावर एखादी स्त्री त्यातच खुश राहिली असती; पण स्मिताताईंनी अध्यापन करत असतानाच इंग्रजीतून अकरावी,बारावी या वर्गांसाठी रसायनशास्त्राची ८ पुस्तके लिहिली. ही पुस्तके वैद्यकीय, अभियांत्रिकी स्पर्धा परिक्षांच्या तयारी साठी खूप उपयुक्त ठरली आहेत. आतापर्यंत या पुस्तकांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. नंतर अभ्यासक्रम बदलल्याने आणि उपप्राचार्यपदाची जबाबदारी वाढल्याने, त्या ही पुस्तके अद्ययावत करू शकल्या नाहीत याची त्यांत खंत वाटते.आजही सकाळी १० ते रात्री १० अशा बारा तास त्या कार्यरत राहतात.
स्मिताताईंच्या शैक्षणिक कार्याची विविध संस्थांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत.त्यात प्रमुख म्हणजे राजश्री शाहू संस्थेचा प्रतिष्ठित असा शाहू भूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे.शाहू महाविद्यालयाचा उद्धिष्टपूर्ती पुरस्कार त्यांना सतत दरवर्षी मिळत आला आहे.लॉयनेस क्लबचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, सत्यशोधक समाजाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारही मिळाला आहे.
मराठवाडा विभागात उत्कृष्ठ शिक्षिका म्हूणून ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २०१४- १५ या वर्षीचा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षका पुरस्कार त्यांना मिळाला आहे . १ लाख १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
लातूर येथील प्रसिद्ध शाहू पॅटर्नच्या निर्मितीत स्मिताताईंचा महत्त्वाचा सहभाग आहे.या महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी निवडले जातात.या महाविद्यालयाची ख्याती इतकी झाली आहे की, महाराष्ट्राच्या विविध भागातून मुले,मुली अकरावी/ बारावीसाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतात.संस्थेतील काही अध्यापक आय.आय.टी तुन येथे अध्यापनासाठी आले आहेत.
राजश्री शाहू महाविद्यालय हे मराठवाड्यातील एकमेव स्वायत महाविद्यालय आहे. शाहू पॅटर्नचे जनक प्रा.अनिरुद्ध जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल झाली असल्याचे स्मिताताई कृतज्ञतेने नमूद करतात पूर्वी आय.आय.टी. साठी मराठवाड्यातुन एकही विद्यार्थी निवडला जात नसे, पण आता शाहू संस्थेचे अनेक विद्यार्थी आय.आय.टी. साठी निवडले जातात. लग्नाआधी वडील आणि लग्नानंतर पती हे दोघेही प्रागतिक विचारांचे असल्यामुळेच आपली आजवरची वाटचाल सुखकर झाली हे नमुद करताना स्मिताताई म्हणतात, “कुटुंबातील पित्याने आणि पतीने घरातील स्त्रीला नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे आणि वेळोवेळी आवश्यक ते सहकार्यही केले पाहिजे. निकोप समाजाच्या उभारणीसाठी ही अत्यंत गरजेचे गोष्ट आहे.”
एकीकडे शिक्षण क्षेत्रात स्मिताताई भरीव कार्य करीत राहिल्या तर त्यांचे पती जयप्रकाश दगडे यांनीही पत्रकारितेत आपले नाव उज्ज्वल केले. त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,पां.वा. गाडगीळ पुरस्कार असे एकूण ८० पुरस्कार मिळाले आहेत.या दांपत्याची कन्या डॉक्टर स्नेहा हिचा विवाह झाला असून चिरंजीव उच्च शिक्षण घेत आहे.
आजच्या विद्यार्थी, विद्याथीनि विषयी आपले काय निरीक्षण आहे ? असे विचारले असता स्मिताताई म्हणतात, सोशल मीडियाचा जो उपयोग आहे तो विद्यार्थ्यांनी जरूर केला पाहिजे; पण त्याच्या आहारी जाऊ नये.आज विद्यार्थ्यांचा पालकांशी, नातेवाईकांशी आणि शिक्षकांशी संवाद तुटत चालला आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच सावरले पाहिजे आणि आपले जीवन घडवले पाहिजे.” स्मिताताईंचा सल्ला आजच्या सर्व तरुण- तरुणींनी गांभीर्याने घेतला पाहिजे असाच आहे.
– रश्मी हेडे
*प्रा. स्मिताताई दगडे यांची प्रेरणादायी कहाणी*
आपल्या समाजात अनेक मुलींना पालकांची एक तर शिकवण्याची इच्छाच नसते किंवा शिकवले तरी दहावी फार तर बारावी पर्यंत . नंतर मुलींची इच्छा नसतानाही पुढचे सोपस्कार पार पाडण्यासाठी पालक मोकळे होतात.
परंतु , प्रा. स्मिताताई दुरूगकर – दगडे भाग्यशाली आहेत की, त्यांना माहेरी आणि सासरी सुध्दा पुरोगामी विचार सरणीचे आई-वडील आणि सासु – सासरे , पतीदेव नशीबाने लाभले . म्हणूनच , आज त्यांचे नाव लातुरच्या शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे आणि आपल्या कुळवंशाचे नाव शिक्षण क्षेत्रात एक कर्तृत्वसंपन्न उत्कृष्ठ शिक्षीका – प्राध्यापिका म्हणून अमर केले आहे . अशा नवदर्गेचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा !!
राजाराम जाधव ,
सहसचिव (सेवानिवृत्त)
महाराष्ट्र शासन ,
दिनांक २४.१०.२०२०