आजच्या आपल्या वेगवान जीवन शैलीमुळे व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपण आपल्या आहाराकडे जितके लक्ष दयायला हवे, तितके लक्ष देऊ शकत नाही; त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो .म्हणून आपला आहार संतुलित असला पाहिजे. त्यात भाज्या,फळे यांचा पुरेसा वाटा असणे आवश्यक आहे असे डॉ. शारदा निर्मल महाडुंळे आवर्जून सांगतात .
अहमदनगरच्या डॉ. शारदा ह्या आहारतज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ प्रसिद्ध आहेत. वृत्तपत्रातील लेखमालांवर आधारित “आयुर्वेदिक गर्भसंस्कार ” , “आरोग्यसखी” , “एकटीच या वळणावर ” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय विविध ठिकाणी लेक वाचवा, मुलींना शिकवा, गर्भ संस्कार या विषयावर त्या व्याख्याने देत असतात.
पुर्वाश्रमीच्या डॉ.शारदा निर्मळ यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरी – निर्मळ या गावी झाला.वडिलांची शेती होती .तसेच ते भारत सरकारच्या दूरसंचार विभागात अहमदनगर येथे कार्यरत होते.त्यामुळे त्यांचे बालपण व शिक्षण नगर येथेच झाले.कन्या विद्या मंदिर येथुन त्या दहावी तर न्यू आर्टस् कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमधून बारावी सायन्स झाल्या. लहानपणापासूनच त्यांचे डॉक्टर
व्हायचे स्वप्न होते.पाचवी ते बारावी केंद्रीय प्रवेश परीक्षेत त्यांचा क्रमांक संगमनेर येथील संगम सेवाभावी आयुर्वेद महाविद्यालयात लागला. तेथून १९९९ साली त्यांनी बी.ए. एम.एस. पदवी प्राप्त केली. स्त्रीरोग विषयात त्या नगर जिल्ह्यात प्रथम आल्या. पुढे त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशसाठी निवड झाली; पण त्याच दरम्यान डॉ.प्रशांत महाडुंळे यांच्याशी विवाह झाल्याने त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता आले नाही. परंतु ही उणीव त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनची सर्व पुस्तके अभ्यासून भरून काढली. पुढे योग पदविका अभ्यासक्रमात त्या महाराष्ट्रात पहिल्या आल्या.
विवाहानंतर ५ एप्रिल २००० पासून त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. स्त्रीयांविषयी तळमळ असल्यामुळे व विशेषतः ग्रामीण भागातील स्त्री आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी नगर जवळील केडगाव भागात वैद्यकीय सेवा सुरू केली.
२००२ साली दगदगीमुळे त्यांना पहिली मुलगी दुर्गा सातव्या महिन्यातच झाली.त्यांनी तिची अतोनात काळजी घेतली. पुढे ती सुदृढ झाली.तर २५ सप्टेंबर २००५ रोजी मुलगा अंकुरचा जन्म झाला. सासू सासरे यांच्यासह घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी वैद्यकीय सेवा सुरूच ठेवली. स्वतःच्या पहिल्या बाळंतपणाच्या अनुभवातून त्यांना गर्भ संस्काराचे महत्व कळले . २००४ पासून त्यांनी गर्भ संस्काराविषयी मोफत कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी नगर जिल्ह्यात २०० हुन अधिक कार्यशाळा घेतल्या. पुढे त्यांनी पुणे,नाशिक जिल्ह्यातही कार्यशाळा घेतल्या.आता कार्यशाळा घेण्याऐवजी त्यांनी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
लोकांपर्यंत गर्भ संस्कारांचे महत्व पोहचवण्यासाठी त्यांनी एप्रिल २०१२ मध्ये “आयुर्वेद गर्भसंस्कार “हे पुस्तक लिहिले. दरम्यान २०११ साली दुर्दैवाने त्यांचे वडील रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले.त्यांच्या स्मूतिप्रित्यर्थ पहिल्या स्मृतिदिनी “कर्मयोगी ” या पुस्तकाचे नोव्हेंबर २०१२ मध्ये प्रकाशन केले. त्यानंतर २०१४ मध्ये “आरोग्यसखी ” , २०१६ मध्ये ” एकटीच्या वळणावर ” हे पुस्तक तर दिनांक २ मे,२०१७ रोजी “आहारवेद” ‘हे त्यांचे पाचवे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
“योग्य आहाराचे महत्त्व ” या विषयावर एका प्रख्यात वृत्तपत्राने त्यांना लेखमाला लिहिण्याचे सुचविले. त्यानुसार वर्षभर चाललेली ही लेखमाला फारच लोकप्रिय झाली. त्या लेखांचे संकलन करून ” आहारवेद ” हे पुस्तक तयार झाले आहे .
दरम्यान, वंध्यत्वाच्या समस्येचा अभ्यास करून त्यांनी अशा महिलांसाठी विशेष उपचार पद्धती सुरू केली.त्यातून अशा महिलांना त्या यशस्वीपणे मातृत्वाचा आनंद मिळवून देत आहेत.
प्रारंभी घरच्या पडवीत वैद्यकीय सेवा सुरू केल्यावर पतीच्या साथीने त्यांनी २००६ साली प्रणव हॉस्पिटल उभारले. या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म,प्रसुतीगृह आणि विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलमुळे केडगाव परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे.पतीची पूर्ण साथ असल्यानेच हे सर्व शक्य होत आले,असे त्या कृतज्ञतेने नमुद करतात.आई वडिलांच्या संस्कारांमुळेच जीवनाकडे निरपेक्षपणे पाहण्याची दृष्टी मिळाली असे त्या मानतात.
आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिकन्या, लोकसत्ताचा नवदुर्गा, राष्ट्रिय स्त्री वैद्या, लोकमततर्फे सखी, आयुर्व सकाळचा मधुरांगण स्त्री गौरव पुरस्कार, आयुर्वेद भूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. समाजात आकाशाला गवसणी घालणाऱ्या अशा महिला आहेत म्हणूनच समाजाचे स्वाथ्य टिकून आहे.
– रश्मी हेडे.