Friday, November 22, 2024
HomeUncategorizedस्वातंत्र्यदिन विशेष- हिंदोस्ता हमारा..काही लोकप्रिय देशभक्तीपर गीते

स्वातंत्र्यदिन विशेष- हिंदोस्ता हमारा..काही लोकप्रिय देशभक्तीपर गीते

विशेषतः १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या राष्ट्रीय सणांच्या दिवशी आसमानात फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रध्वजाकडे पाहिले की, आपली छाती अभिमानाने भरुन येते आणि कळत नकळत आपले हात ध्वजाला सलाम करण्यासाठी उंचावतात. ओठी बोल येतात सारे जहॉ से अच्छा, हिंदोस्ता हमारा*, ये भारत देश है मेरा…..राष्ट्रगीत असो वा कोणतेही देशभक्तीपर गीत असो ते आपल्या कानावर पडले की, त्यात आपण सहज समरस होतो.

आपल्या बऱ्याच हिंदी चित्रपटातून देशभक्तीपर गीते आहेत. ती प्रचंड लोकप्रिय आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ही काही लोकप्रिय देशभक्तीपर गीते.. खास तुमच्यासाठी..

सारे जहॉ से अच्छा, हिंदोस्ता हमारा..*हे उर्दू कवी मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले गीत  या दिवशी हमखास आपल्याला ऐकायला मिळते. पण हे कोणतेही चित्रपट गीत नसून प्रचंड देशाभिमान असलेले १६ ऑगस्ट १९०४ रोजी सर्व प्रथम प्रसिध्द झालेले, तमाम हिंदुस्थानींच्या हृदयातील गीत आहे. या गीताच्या प्रत्येक शब्दातून आपणास देशाचे महत्व, महती स्पष्टपणे दिसते. मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना, हिंदी है हम, हिंदी है हम , वतन है हिंदोस्ता हमारा….या कवीला, संगीतकाराला आणि या गीतावर प्रेम करणाऱ्या तमाम हिंदुस्थानींना अभिवादन.

India Independence Day August 15 Republic Day January 26

ऐ मेरे वतन के लोगो

देशभक्तीपर गीतांमध्ये लोकप्रिय असे गीत म्हणजे “ऐ मेरे वतन के लोगो , जरा आँख मे भरलो पाणी, जो शहीद हुऐ है उनकी, जरा याद कुर्बानी”. कवि प्रदिप यांची गीतरचना, संगीतकार अण्णासाहेब चितळकर म्हणजे सी.रामचंद्र यांचे संगीत आणि लतादिदींचा आवाज असे ग्रेट कॉम्बिनेशन असलेले हे गीत आहे . गीतातील प्रत्येक शब्द रोमांच उभे करणारे आहेत. सर्व प्रथम नवी दिल्लीतील रामलिला मैदानावर २७ जानेवारी १९६३ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर जेंव्हा लतादिदींनी हे गीत सादर केले त्यावेळी पंडितजींनाही आपले अश्रू रोखता आले नाही. अशी अप्रतिम गीत रचना आणि संगीत आहे. १९६२ ला झालेल्या भारत-चीन युध्दात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हे गीत अर्पण करण्यात आलेले आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर : पुण्यतिथी विशेष Click here to read this

कर चले हम फिदा

असेच हमखास अश्रू आणणारे एक उत्कृष्ट गीत १९६४ ला प्रदर्शित झालेल्या चेतन आनंद यांच्या हकीकत या चित्रपटात आहे. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ” कर चले हम फिदा, जान वतन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथीयो ” हे गीत ऐकतांना व पाहतांना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाभिमान जागृत झाल्याशिवाय रहात नाही. हकीकत हा चित्रपट तसा युध्दपटच आहे. नायक धर्मेंद्र आणि त्यांचे साथीदार देशासाठी लढतांना शहीद होतात आणि बॅकग्राऊंडवर जेंव्हा हे गीत सुरू होते त्यावेळी अश्रूंचा महापूर येतो. कैफी आझमी यांच्या लेखनीतून उतरलेल्या या गीताला मदन मोहन यांनी अप्रतिमरितीने संगीतबध्द केलेले आहे.

India Independence Day August 15 Republic Day January 26

ये देश वीर जवानों का

देशातील युवा वर्गाला जल्लोषात आणणारे एक गीत म्हणजे १९५७ ला प्रदर्शित झालेल्या नया दौर या चित्रपटातील “ये देश वीरज वानोंका अलबेलोंकाम सतानोंका.. इस देश का यारो क्या कहना, ये देश हे दुनिया का गहना ” . दिलीप कुमार, अजित, वैजयंतीमाला , जॉनी वॉकर आदि कलाकारांवर चित्रीत झालेल्या या गीताचा जोश अजूनही कमी केला नाही. जवळपास ६३ वर्षाचे तारुण्य असलेले हे गीत ऐकतांना, पाहतांना आजही आबाल वृध्दांपासून सर्वांचा जोश जागृत होतो. उत्तम चित्रीकरणाने आणि नृत्य कौशल्याने हे गीत लक्षणीय ठरले आहे. साहिल लुधियानवी यांच्या लेखनीतून निर्माण झालेले हे गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजातील असून ओ.पी.नय्यर साहेबांनी संगीतबध्द केलेले आहे.

 

वो भारत देश है मेरा

आपल्या देशाचे अतिशय सुंदर वर्णन करणारे एक गीत म्हणजे १९६५ ला प्रदर्शित झालेल्या सिंकदर-ए-आजम या चित्रपटातील ” जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा , वो भारत देश है मेरा “. मोहम्मद रफी साहेबांनी अतिशय उत्तम असे गायलेले हे गीत. अर्थातच संगीतकार हंसराज बहल यांनी दिलेले या गीताचे संगीतही उत्कृष्टच आहे. भव्यदिव्य असा राजमहल, हत्ती, घोडे, मिरवणूक आणि आपल्या भारत देशाचे वर्णन. वा , क्या बात है ! गीतकार राजेंद्र कृष्ण म्हणतात, जहाँ सत्य, अहिंसा और धरम का पग पग लगता डेरा , वो भारत देश है मेरा. भारतातील नद्या, मंदिरे, पर्वत, सण, उत्सव, अत्यंत सुरेख रितीने या गाण्यात चित्रीत करुन खरा खुरा भारत दाखविण्यात दिग्दर्शक केदार कपूर यशस्वी ठरले आहे.

India Independence Day August 15 Republic Day January 26

मेरे देश की धरती

आपल्या देशाचे असेच सुरेख वर्णन मनोज कुमार यांनी त्यांच्या १९६७ ला प्रदर्शित झालेल्या उपकार या चित्रपटातून केलेले आहे. ते म्हणतात ” मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती, मेरे देश की धरती “. किती सुरेख आणि समर्पक असे आपल्या देशाचे वर्णन गीतकार गुलशन बावरा करतात. या गीतात आपल्या तिरंगा ध्वजाचे वर्णन करतांना किती अप्रतिम उपमा दिली आहे ते पहा. “रंग हरा हरिसिंह नलवेसे, रंग लाल हेै लाल बहादूर से, रंग बना बसंती भगतसिंग, रंग अमन का वीर जवाहरसे”. असे उत्कृष्ट वर्णन व चित्रीकरण असलेले हे गीत आहे . मनोजकुमार यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गीत आज जवळपास ५३ वर्षे झाली असली तरी एकदमच ताजे आहे. मनोजकुमारजी, कल्याणजी आनंदजी आणि महेंद्र कपूरजी, सॅल्यूट !

 

अपनी आजादी को हम

लिडर या चित्रपटातून दिलीपकुमार आणि वैजंयतीमाला यांच्यावर चित्रीत झालेले “अपनी आजादी को हम हरगीज मिटा सकते नही, सर कटा सकते है, लेकिन सर झुका सकते नही” हे गीत देखील देशभक्तीपर गीत म्हणून प्रसिध्द आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताचे गीतकार शकील बदायुनी तर संगीतकार नौशादजी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतरची दोन तीन दशके देशाभक्तीने भारावून गेलेली होती. त्याचे पडसाद चित्रपटसृष्टीत देखील उमटले. म्हणून या कालखंडातील बऱ्याच चित्रपटात देशभक्तीचे चित्रण झालेले आहे. या चित्रपटातून देखील अशाच प्रकारचे चित्रीकरण या गीताच्या वेळी झालेले आहे. एका कार्यक्रमात दिलीपकुमार आणि वैजंयतीमाला हे गीत साकार करतांना आपण पाहतो. आपल्या या राष्ट्रीय सणांच्यावेळी हमखासपणे एकदा तरी हे गीत ऐकायला मिळतेच.

जयंती विशेष : सोंगाड्याची दादागिरी…वाजवू का Click here to read this

भारत हमको जान से

एक आगळा वेगळा चित्रपट मनिरत्नम यांनी १९९२ ला प्रदर्शित केला होता. चित्रपटाचे नाव ‘रोजा’. अरविंद आणि मधु यांना घेऊन दिग्दर्शकाने वेगळाच विषय प्रेक्षकांच्या समोर आणला. आपल्या सिने रसिकांना हा चित्रपट आवडला देखील. यातील हरिहरण यांच्या आवाजात असलेले “भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है, सदियो से भारत भूमी दुनिया की शान है, भारत मॉ की रक्षा मे जीवन कुर्बान है” हे गीत बरेच लोकप्रिय झाले. हमखासपणे हे ही गीत राष्ट्रीय सणांच्या दिवशी ऐकावयास पहावयास मिळते. अतिशय सुरेख चित्रीकरण असलेले हे गीत आहे. या गीताचे गीतकार पी.के.मिश्रा असून ए.आर.रहेमान यांच्या संगीताने या गाण्याला एक वेगळीच उंची दिली आहे.

India Independence Day August 15 Republic Day January 26

हर करम अपना करेंगे

शो मॅन सुभाष घई दिग्दर्शित कर्मा नावाचा चित्रपट १९८६ ला प्रदर्शित झाला होता. एक वेगळाच विषय घेऊन सुभाषजींनी देशभक्तीचा नारा दिला. या चित्रपटात “हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए ” हे गीत आहे. १५ ऑगस्ट.. स्वातंत्र्य दिन, जेलमधील कैद्यांसमवेत जेलर राणा त्याच्या कुटुंबासह हे गीत म्हणतात अशी काही सिच्युऐशन आहे . या गीताने देखील बरीच लोकप्रियता मिळविली. मोहम्मद अजीज आणि कविता कृष्णमुर्ती यांच्या आवाजातील या गीताचे गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत. दिलीपकुमार, नूतन, दारासिंग, मुक्री आदी कलावंतावर चित्रीत असलेले हे गीत पाहतांना व ऐकतांना नक्कीच आनंद मिळतो.

 

मेरा रंग दे बसंती चोला

मनोजकुमारचा शहीद, बॉबी देओलचा शहीद भगतसिंग आणि अजय देवगणचा दि लिजेंड ऑफ भगतसिंग. या तिनही चित्रपटातून क्रांतीवीर भगतसिंग यांचे जीवन चरित्र आहे. यातील २००२ ला प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या चित्रपटात ” मेरा रंग दे बसंती चोला, माये रंग दे ” हे सोनू निगम यांच्या आवाजातील उत्कृष्ट असे देशभक्तीपर गीत आहे. निस्सिम देशाभिमानाचे प्रतिक असलेल्या क्रांतीवीर भगतसिंग यांच्या कार्याला त्रिवार वंदन. गीतकार समीर, संगीतकार ए.आर.रहेमान आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी असे हिट त्रिकुट या चित्रपटाच्या यशास मदतीला होते.

अशा प्रकारची बरीच राष्ट्रभक्ती, देशभक्तीपर गीते आहेत. त्यातील काही प्रातिनिधीक म्हणून या लेखात आहेत.

मी हे ठामपणे सांगतो की, देशभक्तीपर असलेला प्रत्येक चित्रपट,गीत हे भारतीयांच्या मनात, ओठावर निश्चितच रुळलेले आहेत. ११ जानेवारी २०१९ ला प्रदर्शित झालेल्या उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाने हे अधोरेखित केलेले आहे. सर्वांच्याच देशभक्तीबद्दल एवढेच सांगणे..

– डॉ.राजू पाटोदकर

India Independence Day August 15 Republic Day January 26

जयंती विशेष : पाश्चात्य नवनाट्यतंत्राचे पुरस्कर्ते संगीतसूर्य केशवराव भोसले – Click here to read this

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments