“खिसा* एक लघुपट…! हा लघुपट जरी असला तरी भल्या भल्या चित्रपटांमधील कथानकांना मागे टाकणारे कथानक लाभल्यामुळे दिग्दर्शक राज मोरे यांच्या ह्या लघुपटाचे आयर्लँडच्या बर्लिन येथे ९व्या आंतर्राष्ट्रीय लघुपट महोत्सवांत आॕनलाईन स्क्रिनींग होणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा जागतिक स्तरांवर घेण्यात येणार असून *खिसा* हा पहिलाच भारतीय लघुपट ठरणार आहे.महाराष्ट्राला आणखी एक नव्या दमाचा चित्रपट दिग्दर्शक लाभला आहे असंच म्हणावं लागेल.
Click here forआठवणीतील गाणी – तब्बल 3,462 गाणी ऐकता येतील
राज मोरे हे सर जे.जे.इन्स्टिट्युट आॕफ ॲप्लाईड आर्टचे विद्यार्थी.माझ्या सुदैवाने माझे विद्यार्थी.त्यांचा कला ॲकॕडेमिक विषय – फोटोग्राफी ,ते आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त कंटेंम्पररी पेंटर अर्थात समकालीन चित्रकार आणि आता *खिशा* ने त्यांना दिलेली दिग्दर्शक ही ओळख…..! सारं कांही वैशिष्ट्यपूर्ण असं कलाप्रवासाचं जीवन राज प्रितम मोरे यांचं आहे.
राज मुळे मला आठवते आहे,जेजेने राज्याला,देशाला आणि कलाजगताला विविध कलाप्रवाह असलेले राज दिलेले आहेत. र किंवा *R या अक्षरांचा जेजेशी कांहीतरी ऋणानुबंध असावा असंच आता वाटायला लागलंय….! रवीकुल अर्थात रविंद्र कुलकर्णी,राज ठाकरे,रवि जाधव,रवि धनवे,आता राज मोरे…अशी बरीच नांवे सांगता येतील. पैकी राज मोरे हा माझा कला विद्यार्थी राहिलेला असल्यामुळे त्याच्या विषयी म्हणुनच आठवणीं जाग्या झाल्या.
Click here to readतमाशा बोर्डावरची महाराणी: मंगला बनसोडे करवडीकर
खिसा हा अनेक अर्थांनी उपयोगात आणला जाणारा शब्द. ‘अमुक एकाचा खिसा गरम आहे’,’तमुक एकाने सारा माल खिशात घातला’,’त्यांचे खिशे ओले केले की काम होईल’,’राजकारणात पडायचं असेल तर खिसा भरलेला पाहिजे’,’खिसा खाली केला की माडीवरुन खाली येतात’ हे सारं अकोल्याचा राज पहात होता,त्याला हे दिसत होतं.मूळ चित्रकार असल्याने तर आणखीणच सूक्ष्म निरीक्षण झालं.राजने,ही ‘खिशा’ मुळे होणारी सर्वसामान्यांची व्यथा आणि ‘खिशा’चाच स्वैर वापर करुन समाजाला वेठीस धरणारा मूठभर वर्ग… अशा निरिक्षणांना एका चित्रकाराच्या नजरेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न तसेच कटुसत्य कथन करणारा हा यशस्वी प्रयोग म्हणजे हा लघुपट आहे.
एकत्र खेळणार्या लहान मुलांमधील या लघुपटाच्या कथानायक असलेल्या मुलाने त्याच्या शर्टाला मोठ्या आकाराचा खिसा खास शिवून घेतला.असा खिसा की ज्यात दगडं,नाणे,बिल्ले इतरही बारिक-सारीक वस्तु कोंबता येतात.तरीही त्याच्या खिशात जागा असतेच अजून कांहीतरी भरायला…! अशा या मुलाला कथित राजकारणी आणि पारंपारिकतेची सामाजिक नितीमुल्ये जपण्याचा आव आणणार्या भ्रष्ट माणसांसमोर बळी पडावे लागते. अशी मनाला हेलावणारी कथा या लघुपटाद्वारे राजने मांडून प्रचलित राजकारणावर नव्हे तर राजकारण्यांवर आसूड ओढलेले आहेत.
Click here to readकथा : वेगळी वाट
सत्य कधी लपत नसतं.ते व्यक्त होतंच असतं.जर ते राज सारख्या प्रतिभावान चित्रकाराच्या नजरेतून व्यक्त झालं तर जग त्या सत्याचा आदर राखतं. “खिसा” म्हणूनच जागतिक स्तरावर पोहोचलेला लघुपट आहे.नुकतंच “खिसा”ला इस्तंबूलच्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट स्पर्धेत बेस्ट स्क्रिन प्ले आणि बेस्ट फिल्म असे दोन मानाचे पुरस्कार लाभलेले आहेत.भारतात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके यांच्या नावांचा बेस्ट स्क्रिन प्ले पुरस्कार देखिल या लघुपटाने खिशात घातलेला आहे. हे सारं कमी की काय २०२१ला होणार्या तुर्की गोल्डन स्टार ॲवाॕर्ड महोत्सवात “खिसा” दाखविला जाणार आहे.
यशाच्या महामार्गाला पेंटर मोरे ने राजमार्गा त रुपांतरीत करुन भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील फिल्मसृष्टीला आणखी एक राजमार्ग मिळालेला आहे. राज प्रितम मोरेचा म्हणूनच अभिमान वाटेल अशीच कामगिरी आहे.त्याच्या या कलाकार्याला त्याच्याच रंगलेपनातील बिन्धास्तपणा आणि कुंचल्यातील फटकार्यांना गती लाभो ही सदिच्छा.
– प्रा.गजानन सिताराम शेपाळ
सर ज.जी.उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई