Thursday, November 21, 2024
Homeकलावाढदिवस विशेष : लतादीदींसोबत गायचं भाग्य लाभलं - सिनेगायक उदय वाईकर

वाढदिवस विशेष : लतादीदींसोबत गायचं भाग्य लाभलं – सिनेगायक उदय वाईकर

काही माणसे जन्माला येतानाच परमेश्वरी प्रसाद घेऊन येतात. ईश्र्वराच्या हृदयाशी संवाद साधणाऱ्या व्यक्ती लौकिक जीवनात समूह मनाशी नादयुक्त नाते निर्माण करत असतात. असेच नाते स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गेले अनेक वर्षे रसिकांसोबत निर्माण केले आहे. स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर 91 वर्षी पदार्पण करीत आहेत. अशा सरस्वती मातेच्या सानिध्यात माझ्या आयुष्याचे काही क्षण मला घालवता आले. या बद्दल मी स्वतः ला खूपच भाग्यवान समजतो. लतादीदींबरोबर मी अनेक गाणी गायली . अनेकदा स्टेज प्रोग्राममध्ये सहभागी होता आले.हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होते.

स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा परिचय म्हणजेच स्वरांचा परिचय. स्वरांचा परिचय शब्दात करणे म्हणजे लोखंडी तराजुने सोने मोजल्या सारखे आहे. खरे तर स्वर हे प्रत्येकाच्याच परिचयाचे असतात. प्रत्येकाच्या कंठात स्वर दडलेलाच असतो.

Click here to read आठवणीतील जसराजजी

पण ज्याचा स्वर श्रद्धा व साधनांच्या तपस्येचे बळ घेतलेला असतो तो शारदेच्या विणेमध्ये वसत असतो. सामान्य माणसे त्यांच्या कंठातील स्वरांची पूजा बांधू शकत नाहीत म्हणून त्यांचा स्वर हा केवळ आवाजच असतो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सारख्या कलावंतांची साधना आवाजालाच स्वरांचे सामर्थ्य देते.

आकाशाचे वर्णन आपण अथांग,विशाल,विलोभनीय, सुंदर असे करतो; पण तरिही नेमके आकाश आपल्याला सापडतच नाही.अगदी तसेच लतादीदींच्या गाण्याचं आहे. त्यांचे गाणे उत्तम, अलौकिक,सुरेल, मनाला भुलविणारे आहे. पण म्हणजे काय ? हो, शब्दात सांगणें कठीण आहे. लतादीदींचा आवाज म्हणजे परमेश्वराने निर्मिलेला अपूर्व चमत्कार आहे, की जो परमेश्वराला ही पुन्हा निर्मिता येणार नाही. लतादीदींचा स्वर खऱ्या मोत्यासारखा तजेलदार आहे.

मी मुंबईत असताना माझ्या आयुष्यातले दुसरे कोरसगीत लतादीदी व किशोर कुमार यांच्या बरोबर रेकॉर्डिंग केले. त्या दिवशी मी एका वेगळ्याच भावविश्वात रममाण झालो होतो. रकॉर्डिंग संपल्यावर माझ्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. शब्द सुरांवर राज्य करणाऱ्या या गाणदेवीची महती बापड्या शब्दानि काय गावी ?

Click here to read शांताबाईंच्या मनःपटलावरलं चांदणं!..

जुन्या काळात गाण्याच्या रेकॉर्डच्या त्या रंध्रात शिरून मोति करणाऱ्या, त्या सुईचे अग्र ( टोक ) अधिक सूक्ष्म की, त्या रंध्रतून उमटणारा लतादीदींचा स्वर सूक्ष्म हे सांगणे कठीण आहे.
लतादीदीचा स्वर म्हणजे परमेश्वराने जणु मोरपीस अमृतात बुडवून त्यांच्या गळ्यावरून अलगद फिरविले. लतादीदींचा स्वर ऐकताना वाटतं , खरोखरच जर स्वर्ग कुठे असेल तर तो या स्वरात आहे ! ह्या आवाजात एक विलक्षण आकर्षण, शक्ती आहे.

लतादीदींच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसे अभिवादन त्यांच्या जीवनातल्या 28 सप्टेंबर या शुभ दिनी करावयाचे असेल तर त्यासाठी “प्रभातकाळीच कोवळी सूर्यकिरणे दव बिंदूमध्ये भिजवून बनविलेल्या शाईने कमळ तंतुच्या लेखणीने आणि वायूलहरींच्या हलक्याफुलक्या हाताने फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेले मानपत्रच गुलाब कळीच्या करंडकातून त्यांच्या चरणी अर्पण करायला हवे”.

लता दीदींच्या वाढदिवसाबद्दल माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व विनम्र अभिवादन.

 

– सिनेगायक उदय वाईकर.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अभिष्टचिंतन…..

    आचार्य अत्रेंना *लताबाईं* बद्दल लिहायला सांगितल तेंव्हा अत्रे म्हणतात *:-*

    *केवळ लोखंडाच्या निफातून उतरल्या शाईनं, जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखादया अप्सरेच्या मृदुल चरणकमला खाली गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे*..

    लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर……

    *पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतू च्या लेखणी ने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं .. लताचा आवाज हा मानवी सुष्ठीतला एक अद्भुत चमत्कार आहे*..

    *साक्षात विधात्याला असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही*
    *श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद ,उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल .. सूर ,लय ,ताल ,सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर अस म्हणावं…*

    *….कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली……*

    *ल ता मं गे श क र*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments