लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या विचारांचे कायम स्मरण, चिंतन व्हावे म्हणून पिंपळनेर येथे सुरू झालेले ग्रंथालय आज १००व्या वर्षात पदार्पण करीत आहे, ही मोठी भूषणावह बाब आहे.
स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य केंद्र व शक्तीस्थान म्हणून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरामधील लोकमान्य टिळक ग्रंथालयाची ओळख आहे. १ ऑगस्ट १९२१ रोजी हे ग्रंथालय सुरू करण्यात आले.शहरातील ५ तरुणांनी एकत्रित येऊन ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. कालानुरूप त्यास प्रतिसाद व यश मिळत गेले. ग्रंथालयाची दमदार वाटचाल आजही सुरू आहे. ग्रंथालयाला आज ९९ वर्षे पूर्ण झाले असून त्याने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
या पाच मित्रांनी सुरू केले ग्रंथालय:-
पिंपळनेर येथील पाच देशभक्त तरुण मित्रांनी एकत्र येऊन ग्रंथालयाची स्थापना केली. त्यात सर्वश्री वेणी माधव जोशी, रामकृष्ण सदाशिव जोशी , विनायक नारेश्वर जोशी , माधवराव बळवंत देशमुख,सावळाराम देवकृष्ण टिपरी यांचा समावेश होता. पूर्वी गावात पाच ठिकाणी ग्रंथालय होती.कालांतराने सर्वजण एकत्र आल्यावर केवळ एक ग्रंथालय सुरू केले.
त्याकाळी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे गावात येत होते. मात्र वर्तमानपत्र वाचत असतांना जर पोलीस येण्याची चाहूल लागली तर ते वृत्तपत्र लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता . टिळकांच्या आठवणीत लोक सदैव राहावेत व त्यातून लोकांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळत रहावी हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच नावाने ‘लोकमान्य टिळक ग्रंथालय’ उभारण्यात आले.
टिळकांच्या मराठा व केसरी वर्तमानपत्रातून त्यासाठी पिंपळनेरकरांना चांगलीच प्रेरणा मिळाली होती. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जीवाचे रान करणाऱ्या लोकमान्य टिळकांचे १९२० मध्ये निधन झाले. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लोकांना प्रेरणा म्हणून १ ऑगस्ट १९२१ साली ७०० पुस्तकांचे हे ग्रंथालय पिंपळनेमध्ये सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात गावातील ग्रंथ प्रेमींनी ग्रंथालयाला पुस्तके भेट स्वरूपात दिली. १९२६ मध्ये महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांनी या ग्रंथालयास भेट दिली होती. पुढे राजाराम महाराजांनी हे ग्रंथालय विठ्ठल मंदिरात सुरू करून ग्रंथालयाचे अध्यक्ष म्हणून कार्य सांभाळले.
अनेकांनी दिल्या आहेत भेटी:-
महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी,
माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,आचार्य विनोबा भावे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वि. वा. शिरवाडकर, पु.ल.देशपांडे आदींनी ग्रंथालयास भेटी दिल्या असून आपल्या हस्ताक्षरात अभिप्रायही दिले आहेत . ते आजही सुरक्षितरित्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. १०० वर्षे ग्रंथालय चालविणाऱ्या पिंपळनेर करांचे मनःपूर्वक अभिनंदन . पुढील उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
By अक्षय कोठावदे, नाशिक.